Thursday, October 3, 2019

China - 1

काल चीनच्या राज्यक्रांतीला सत्तर वर्षे झाली. १९७९ पर्यंत जवळपास आपल्याचसारखी आर्थिक स्थिती असलेला हा देश नंतरच्या काळात आपल्याला खूपच मागे टाकून पुढे गेला. यामुळे मला चीनबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत आले आहे. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा कधीतरी चीनमध्ये काम करण्यास मिळावे अशी सुप्त इच्छा होती. ती फलद्रुप होऊन मला प्रत्येकी सुमारे सहा महिन्यांचे तीन प्रोजेक्ट चीनच्या मुख्य भूमीवर आणि एक हाँग काँग मध्ये करण्यास मिळाला. या निमित्ताने मला चीनची अर्थव्यवस्था, संस्कृती, इतिहास, जीवनपद्धती आणि तेथील लोकांची स्वभाववैशिष्ट्ये यांचा जवळून अभ्यास करता आला.
चिनी माणसांचा स्वभाव खूपच आतिथ्यशील आहे. 'अतिथी देवो भव ' ही परंपरा सर्वच आशियायी देशांत आहे, पण चीनमध्ये मला ती प्रत्येकाच्या स्वभावात मुरलेली जाणवली. मी कुटुंबाशिवाय एकटा राहत आहे याची जाणीव सर्व सहकाऱ्यांना होती. शनिवार-रविवार मला कंटाळा येऊ नये म्हणून ते आवर्जून प्रयत्न करीत. मात्र एखाद्या चिनी पारंपरिक लग्नसमारंभास जावे अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही.
No photo description available.'चीनमध्ये मी काय खात होतो' हा प्रश्न मला भारतात अनेकदा विचारला गेला. चिनी लोक काहीही खातात अशी आपली समजूत आहे. ही समजूत काही प्रमाणातच खरी आहे. चीन भारतासारखाच विशाल देश आहे. त्याचे अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची (भारतासारखीच) वेगळी संस्कृती, भाषा आणि खाद्य संस्कृती आहे. चीनच्या कँटोन प्रांतातील लोक निरनिराळे प्राणी/कीटक खातात. कँटोन हा चीनच्या आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) असलेला प्रांत आहे. हाँग काँग कँटोनमध्येच येते. चीनच्या उत्तरेला 'हान' वंशाचे लोक राहतात. ते चीनमध्ये बहुसंख्येने आहेत. ते असे कोठलेही प्राणी-कीटक खाणे निषिद्ध समजतात. चीनमध्ये प्रामुख्याने डुक्कर खाल्ले जाते. परंतु पश्चिमेला असलेल्या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य आहेत. ते डुक्कर खात नाहीत तर बीफ खातात. त्यामुळे चीनच्या कंपन्यांतील कॅंटीनमध्ये मुस्लिमांसाठी वेगळा काउंटर असतो. त्यावर डुक्कराचे पदार्थ मिळत नाहीत. मी 'सर्वहारी' असल्याने आणि मला नव्या चवी घेऊन बघण्याची आवड असल्याने चीनमध्ये मला कोठेच खाण्याची समस्या आली नाही. चिनी पदार्थात मसाले असतात. पण ते आपल्या मसाल्यांपेक्षा वेगळे असतात. आपल्याकडे मिळणाऱ्या चिनी पदार्थांची चव आपल्या जिभेला सोयीची केलेली असते. मूळ चिनी पदार्थांची चव पूर्णतः: वेगळी असते. मला भारतीय चिनी पदार्थांपेक्षा मूळ चिनी चवीचे पदार्थ आवडतात. त्यामुळेही मी चीनमध्ये आरामात राहू शकलो आणि सर्वसामान्य लोकांत सहज मिसळू शकलो. मी बेजिंगमध्ये राहत असताना माझ्या जवळच चीनची सुप्रसिद्ध 'खाऊ गल्ली ' होती. तेथे अनेक प्रकारचे कीटक खाण्यास मिळतात. पण असे कीटक खाणे सर्वसामान्य चिनी लोकांस कमीपणाचे वाटत असल्याने बहुदा मी बेजिंगमध्ये असेपर्यंत मला त्याचा पत्ता माझया चिनी मित्रांनी लागू दिला नाही. त्यामुळे या नव्या खाद्यानुभवाला मी मुकलो.
चीनमधील मध्यम आकाराच्या गावात हॉटेलांत पिंजरे ठेवलेले असतात. त्यात अनेक जिवंत प्राणी असतात. एखादे प्राणीसंग्रहालय वाटावे असे चित्रविचित्र जिवंत प्राणी ठेवलेले असतात. मी त्यात मुंगूस, मोर, हरीण, साप,नाग, कोंबडी असे अनेक प्राणी पहिले. मोठ्याल्या फिश टॅंकमध्ये मासे असतात. तुम्हाला जो प्राणी / मासा हवा तो दाखवायचा. मग तो प्राणी शिजवून आणून देतात. मात्र त्या पूर्ण प्राण्याची ऑर्डर द्यावी लागते. मला साप खाऊन बघण्याची इच्छा होती. पण 'एका सापाचे सूप पाच माणसांसाठी असते' असे मला सांगितले गेले. माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांपैकी (चिनी, भारतीय, युरोपियन, अमेरिकन) कोणीही हे सूप घेण्यास तयार न झाल्याने मला साप खाऊन बघता आला नाही.
चीन संस्कृतीसंबंधी पुढील लेखात.

No comments:

Post a Comment