Tuesday, October 8, 2019

चीन-३

चीनचे कॅलेंडर आपल्यासारखेच चंद्राच्या कलांवर आधारलेले आहे.  त्याला ते Lunar Calendar असेच म्हणतात. कोरिया आदी चीनच्या जवळपासच्या काही देशांत ते वापरले जाते. त्यांचे नववर्ष आपल्या एक ते दोन महिने आधी सुरु होते (अधिक महिना कधी येतो त्यावर अवलंबून). आपल्याकडे नववर्ष जसे सृष्टीचा नव्याने पाळावी फुटण्याचा महोत्सव असतो तसेच चीनमध्येही यावेळी कडाक्याची थंडी संपून झाडांना नवी पालवी येऊ लागलेली असते.  नववर्ष महोत्सव हा चीनमधील अत्यंत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.  राष्ट्रीय दिवसाप्रमाणे (१ ऑक्टोबर) या दिवशीही चिनी लोक आपापल्या गावी येतात. हा उत्सव त्याचे कुटुंबीयांची पुनर्मीलन असते. सर्वसाधारणपणे यावेळी सर्व कंपन्यांना पंधरा दिवस सुट्टी असते. बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते.
छेनामध्ये या वेळी भरपूर फटाके उडविले जातात. आपल्यासारखेच रस्त्यात फटाके उडविले जात असतात. मोठ्या शहरात आता रस्त्यांवर फटाके उडविण्यास बंदी आहे.  यावेळी घराघरांवर चिनी पद्धतीचे कागदी लाल कंदील लावले जातात. या कंदिलांवर शुभेच्छादर्शक वचने असतात. यावेळी घरातील लहान मुलाला छोटा रेशमाचा लाल कंदील भेट म्हणून दिला जातो. हा कंदील घराच्या दारावर लावायचा असतो. मोठा झाल्यावर मुलीला लग्नासाठी मागणी घालताना हा कंदील त्याने त्या मुलीला द्यायचा अशी पद्धत आहे.  माझया मुलासाठी माझया चिनी सहकाऱ्यांनी हा कंदील मला दिला होता आणि त्याचे काय करायचे हे सांगितले होते.
नववर्षदिनी घरासमोर फळे धरलेले संत्र्याचे झाड असणे खूप शुभ समजले जाते. त्यामुळे यावेळी मॉलमध्ये फळे लगडलेली संत्र्याची कुंडीतील झाडे विकण्यासाठी ठेवलेली असतात. मँडरिन भाषेत लिहिलेली लाल रंगाची शुभेच्छापत्रे एकमेकांना देतात. लाल रंग हा शुभ समाजाला जात असल्याने सर्वत्र लाल रंगाचे साम्राज्य दिसते. (मात्र कोणाचे नाव लाल रंगात लिहिणे खूप अशुभ समजतात. लाल रंगात कोणाचेही नाव आपण लिहिले तर आपण त्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करीत आहोत असे समजले जाते. आम्हाला चीनमध्ये गेल्यावर ही काळजी घेण्यास सांगितले होते) नववर्षदिन पक्वान्न होतात. नववर्षाच्या आसपास मित्रमंडळींना घरी बोलावितात. गावात ड्रॅगॉन डान्स होतात. घरासमोर, दुकानासमोर ड्रॅगन डान्स झाल्यास अशुभ शक्ती दूर  पाळतात आणि भरभराट होते असा समज आहे. ड्रॅगॉन डान्स करणारी मंडळे असतात. त्यांना मुद्दाम बोलावून भरपूर पैसे देतात. हा ड्रॅगॉन डान्स पाहण्यासारखा असतो.
नववर्षदिनी घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात. मोठी माणसे त्यांना आशीर्वाद देतात तसेच लाल रंगाच्या कागदात गुंडाळलेली भेटवस्तू अथवा लाल पाकिटात काही पैसे घालून लहान मुलांना देतात.
चीनमध्ये प्रत्येक वर्षाला एका प्राण्याचे नाव असते. त्या त्या नावाच्या वर्षात जन्मलेल्या माणसाची ती 'जन्मरास' असते असे ते मानतात. पहिली रास 'उंदीर', दुसरी 'बैल' तर बारावी 'डुक्कर' आहे. त्यांच्या पौराणिक कथेप्रमाणे १२ प्राणी परमेश्वराकडे गेले. बैल शक्तिवान असल्याने तो सर्वात पुढे होता. पण देवासमोर जाण्याच्या क्षणी बैलाच्या पाठीवरून उंदराने उडी मारली आणि तो सर्वात प्रथम देवापुढे पोचला. म्हणून उंदीर ही पहिली रास आहे. त्या त्या राशींच्या प्राण्याच्या स्वभावावरून त्या त्या जन्मराशींच्या माणसांचे स्वभाव ठरतात असे ते मानतात.  ड्रॅगॉन राशी सर्वात शुभ मनाली जाते. या राशीच्या माणसांना राजयोग असतो अशी समजूत आहे.  ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु झालेल्या चिनी वर्षाची राशी 'डुक्कर' आहे.
चिनी राशी दर बारा वर्षांनी परत येतात.  प्रत्येक चक्रातील बारा राशींना (उंदरापासून डुकरापर्यंत) एका चक्रात गुंफिले आहे. अशी पाच चक्रे असतात. प्रत्येक चक्र चिनी पंचमहाभूतांशी जोडलेले आहे. ही पंचमभूते म्हणजे जल, काष्ठ, अग्नी, सुवर्ण, पृथ्वी.  यापैकी सुवर्णचक्र हे अतिशय भाग्यवान समजले जाते. सध्या पृथ्वीचक्रातील शेवटचे वर्ष चालू आहे.  सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्मलेले मूल अत्यंत भाग्यवान मानले जाते. त्यामुळे अनेक चिनी कुटुंबनियोजन करून आपले मूल सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्माला येईल अशा प्रयत्नात असतात. त्यामुळे चिनी समाजात २००० साली सुवर्णड्रॅगन वर्षी  'बेबीबूम' आली होती.
ज्यांना शक्य असेल त्यांनी चिनी नववर्षदिनी चीनला अथवा सिंगापूरला भेट द्यावी आणि हा चिनी नववर्षाचा उत्साह अनुभवावा. आता येऊ घातलेला  चिनी नववर्षदिन  २५ जानेवारी २०२० रोजी आहे. 

No comments:

Post a Comment