Wednesday, October 16, 2019

अपरोक्षानुभूती : निराभास -2

आपण मागच्या लेखात वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय हे पहिले.  त्यासंबंधी थोडे आणखी जाणून घेऊ.
आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत आहोत. खोलीला खिडकी आहे, परंतु खिडकीच्या विशिष्ट दिशेमुळे सूर्यकिरण आत पोचत नाहीत. आपण खिडकीजवळ छोटा आरसा घेऊन उभे राहिलो आणि सूर्यकिरणांचा कवडसा त्या खोलीत पाडला तर तेवढा भाग प्रकाशित होतो.  म्हणजेच एखादी वस्तू दिसण्यासाठी आपल्याला आरशाला त्या वस्तूच्या दिशेने वळवावे लागते. ती वस्तू प्रकाशित व्हावी लागते.
आपले असेच असते.  स्वयंप्रकाशी ब्रह्म  अथवा साक्षी चैतन्य आकाशात तळपत असते. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या ज्ञानेंद्रियांत प्रकटते. हा मनाचा आरसा ज्या वस्तूच्या अथवा विचाराच्या  दिशेने चैतन्य परावर्तित करतो त्या वस्तूचे / विचाराचे आपल्याला त्या त्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्या वस्तूसंबंधी वृत्ती आपल्या मनात निर्माण होते. मग आपले चैतन्य ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला त्या वस्तूचे/विचाराचे ज्ञान करून देतात. ती वस्तू आपल्या मनातून परावर्तित झालेल्या चैतन्याने प्रभावित होते/ प्रकाशित होते. प्रकाशित झाल्यावर आपल्याला त्या वास्तूचे ज्ञान हेते. ही झाली त्या वस्तूची/ विचाराची फलव्याप्ती.  वृत्तिव्याप्ती ही प्रथम आपल्या मनात होते, वृत्तिव्यापीमुळे चैतन्याने प्रकाशित झालेल्या वस्तूचे ज्ञान आपल्याला होते. ही झाली फलव्याप्ती  . ज्ञान होण्यासाठी वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
आपल्याला सूर्याचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर आरसा सूर्याच्या दिशने वळवावा लागेल. तरच त्या आरशात  आपल्याला सूर्याची प्रतिमा दिसेल. मात्र या आरशाच्या कवडशाच्या साहाय्याने सूर्याला प्रकाशित करण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच आपल्याला ब्रह्माचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर केवळ वृत्तिव्याप्ती पुरेशी आहे, फलव्याप्तीची गरज नाही. आपल्याला आपल्या 'चित्तवृत्ती' ब्रह्माकडे वळवाव्या लागतील, ब्रह्माकार कराव्या लागतील. केवळ तेवढे पुरेसे आहे. ज्या क्षणी चित्तवृत्ती ब्रह्माकार होतील त्याक्षणी ब्रह्म आपल्यापुढे प्रकट होईल.
विविध प्रकारच्या अध्यात्मिक साधना या आपली 'वृत्ती' ब्रह्माकार करण्याच्या साधना आहेत. मग ती भक्तिमार्गातील भक्तीची साधना असो, योगमार्गातील चित्तवृत्तींना शांत करण्याची ध्यानाची साधना असो अथवा अद्वैत वेदान्तातील आपले अज्ञान दूर करून ज्ञानाची कवाडे उघडण्याची ज्ञानसाधना असो.
ब्रह्माचे आकलन होण्यासाठी चैतन्याचे ब्रह्मावर प्रक्षेपण होण्याची गरज नाही. केवळ मनाचा आरसा ब्रह्माकडे वळविला तरी पुरेसे आहे. यालाच 'निराभास' असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याच्या जवळ जाणारा शब्द समूह 'without reflection' असू शकेल. अद्वैत वेदान्ताचे सार या एका शब्दात सामावलेले आहे.
मागच्या भागाची लिंक : https://www.facebook.com/photo.php?fbid=10218039445771927


No comments:

Post a Comment