Thursday, November 11, 2021

अद्वैत वेदांत : जाणिवेचे स्तर

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' असे सगळी उपनिषदे उच्चारवाने सांगत असतात. मात्र आपल्याला आपल्याला आसपासची सृष्टी दिसत असते, पंचेंद्रियांना जाणवत असते. म्हणूनच उपनिषदामधील हे ज्ञान बरेच वेळा हास्यास्पद वाटते. परंतु उपनिषदांनी जाणिवेचे अनेक स्तर आहेत असे सप्रमाण मांडले आहे. 'जगत् मिथ्या' हे तत्त्वज्ञानही जाणिवेच्या अत्यंत वेगळ्या स्तरावरील आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. जाणिवेच्या व्यावहारिक स्तरावर हे जग खोटे आहे, आभासात्मक आहे असे उपनिषदे अजिबात सांगत नाहीत. हे जाणिवेचे विविध स्तर कोणते आहेत हे आपण समजून घेऊ. मांडुक्य उपनिषदात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे. 

जाणिवेच्या स्तरांचा विचार करताना जनक राजाची एक गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट http://shorturl.at/lBSXZ या लिंकवर माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. जनक राजा झोपलेला असताना त्याला एक वाईट स्वप्न पडते. झोपेतून उठल्यावर त्याला प्रश्न पडतो की 'स्वप्नात जे पाहिले ते खरे की आता जे पाहतो आहे ते खरे'. या गोष्टीतून जागृतावस्थेतील जाणिवेचा स्तर आणि स्वप्नावस्थेतील जाणिवेचा स्तर भिन्न असतात हे सूचित केले आहे. विस्तारभयामुळे ती संपूर्ण गोष्ट या लेखात देता येत नाही. पण जिज्ञासू तेथे जाऊन वाचू शकतात. 

जाणिवेच्या तीन अवस्था आपल्या नित्य परिचयाच्या आहेत. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा या त्या तीन अवस्था. मात्र मांडुक्य उपनिषद चौथ्या अवस्थेचेही विवेचन करते. त्याला हे उपनिषद काहीही नाव न देता चौथी अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चतुर्थ असाच आहे.  

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.

या तीनही अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्था समजण्यासाठी चित्रपटगृहातील पडद्याचे उदाहरण देता येईल.  हा पडदा नसेल तर चित्रपट दाखविताच येणार नाही. पण चित्रपटातील दृश्यांपासून हा पडदा पूर्णपणे अलिप्त असतो. चित्रपटात पुराचे दृश्य असेल तरी हा पडदा ओला होत नाही, आगीचे दृश्य असले तरी हा पडदा जळत नाही. चित्रपटातील दृश्यांना आधार देत अलिप्तपणे उभे राहणे एवढेच या पडद्याचे काम आहे. तुर्यावस्था अशीच आहे. 

तुर्यावस्था ही आपल्याला आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव असणे आहे. ही जाणीव असतानाही आपले दैनंदिन व्यवहार सुरूच असतात. आपण स्वप्नावस्थेतूनही जातो, गाढ झोपही अनुभवतो. म्हणूनच या तीन अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे असे म्हटले जाते. सोन्याच्या पाटल्या म्हणजे केवळ विशिष्ट नाम-रूप असलेले सोने आहे याची स्पष्ट जाणीव असतानाही माणूस त्या पाटल्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात करू शकतो तसेच हे आहे. 

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' हे तुर्यावस्थेच्या जाणिवेच्या स्तरावर संपूर्णतः खरे आहे. 

आपण सर्वांना तुर्यावस्था या जन्मात प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

No comments:

Post a Comment