Tuesday, May 31, 2022

कर्मयोग- साधना- ज्ञानयोग - मुक्तीच्या तीन पायऱ्या - भाग १

 सर्व विश्व हे ब्रह्म आहे असे अद्वैत वेदांत सांगते. अद्वैत वेदान्ताच्या दृष्टीतून आपण सगळे सदासर्वकाळ मुक्तच असतो. पण मायेच्या पांघरुणामुळे आपल्याला आपण आणि आसपासचे विश्व ब्रह्म असल्याचा अनुभव येत नाही, मुक्तीचा अनुभव  येत नाही.  जर आपण मुक्तच आहोत तर दैनंदिन जीवनात आपला जो संघर्ष चालू असतो, विविध समस्यांना  आपल्याला सामोरे जावे लागते त्याबाबत हे तत्वज्ञान काय सांगते? वेदान्ताच्या प्रस्थानत्रयींमध्ये भगवद्गीतेला स्थान आहे. गीता कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलेली आहे. त्यात कर्मयोगाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर अद्वैत वेदांताचा संदर्भ काय - अद्वैत वेदांतात कर्मयोगाचे स्थान काय  हे शोधणे नक्कीच उपयोगी ठरेल. 

आपण ब्रह्म आहोत, मग आपल्याला आपण ब्रह्म असल्याचा अनुभव का येत नाही? याचे कारण अज्ञान आहे. अज्ञान दूर करण्याचा मार्ग म्हणजे अर्थातच ज्ञान मिळविणे. हा आहे ज्ञानयोग. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, विविध ग्रंथ यांच्या साहाय्याने अथवा प्रवचने ऐकून आपण ज्ञान मिळवू शकतो. परंतु केवळ वाचन करून अथवा प्रवचने ऐकून आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. अद्वैत वेदान्ताने ज्ञानयोगाच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. 'श्रवण','मनन' आणि 'निजिध्यासन' या त्या तीन पायऱ्या,  

श्रवण म्हणजे एखादी गोष्ट नीट ऐकून अथवा वाचून समजून घेणे. समोरच्या माणसाला काय सांगायचे आहे ते सर्व खाचा खोचांसकट समजून घेणे म्हणजे श्रवण. जे ऐकले आहे त्यावर विचार करून त्यात आलेल्या शंकांचे निरसन करून घेणे म्हणजे मनन. सर्व शंकांचे निरसन झाल्यावर जे ऐकले आहे/ वाचले आहे आणि समजले आहे ते अनुभवाला येते काय हे पाहणे म्हणजे निजिध्यासन. श्रवण-मनन-निजिध्यासन हे एकाच वेळी होऊ शकतात. आपण आधी ऐकल्याचे आज मनन-निजिध्यासन करू शकतो. याच वेळी नवे काही श्रवण करू शकतो. 

मात्र काही जण हे श्रवण-मनन टप्पे पार करूनही 'अहं ब्रह्मास्मि' चा अनुभव येत नाही.  याचे कारण म्हणजे या व्यक्तींचे मन स्थिर नसते. त्यामुळे अनुभव जाणण्यासाठी लागणारी एकाग्रता त्यांच्याकडे नसते. यावर उपाय काय? .... पुढील लेखात याचा विचार करू. 

Tuesday, May 10, 2022

माझा नास्तिकतेकडून अस्तिकतेकडे झालेला प्रवास

माझ्या अनेक फेसबुक मित्रानी माझ्या परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेल्या प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे म्हणून हा लेख. खरे तर मी या विषयावर फारसे बोलत नाही. पण खूप आग्रह झाल्याने हे लिहीत आहे.

माझ्या मते परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फारसे अंतर नाही. मात्र अर्धवट नास्तिकता अथवा अर्धवट अस्तिकता यापासून परम नास्तिकता अथवा परम अस्तिकता फारच दूर आहेत.
मी माझी नास्तिकता अथवा अध्यात्मिक बैठक मागच्या जन्मातूनच घेऊन आलो होतो असे आता वाटते. मी केवळ आठ-दहा वर्षांचा असतानाच माझ्या मुंजीला विरोध केला होता. शेवटी मी बारा वर्षांचा झाल्यावर माझ्या वडिलांनी माझी मुंज सोसायटीच्या गच्चीवर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केली. मी आधीच जाहीर केल्यानुसार माझे जानवे मुंजीच्या दुसऱ्या दिवशी खुंटीला अडकविले ते आजतागायत. कोठलेही धार्मिक विधी करण्यात मला स्वारस्य नव्हते. मी कधीच कोणत्याही पूजेला बसलो नाही - आजही बसत नाही. देवासमोर कसलेही मागणे मागणे मला लहानपणापासून हास्यास्पद वाटत होते. आजही हास्यास्पद वाटते. परमेश्वराने मला जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा कृतज्ञही आहे. पण त्यासाठी ही कृतज्ञता केवळ देवाच्या मूर्तीसमोर व्यक्त न करता मनात असणे मी अधिक महत्वाचे मानतो. म्हणूनच माझे बाह्य वर्तन आजही परम नास्तिकाचेच आहे. या दृष्टीनेच परम नास्तिकता आणि परम अस्तिकता यात फार अंतर नाही असे मी म्हणतो.
मी असा लहानपणापासूनच नास्तिक आणि बंडखोर होतो. सुदैवाने मला माझ्या पालकांनी देवपूजा अथवा कोठल्याही विधीसंबंधी कोठलीही सक्ती केली नाही. माझे लग्नही रजिस्टरच झाले होते. मुंजीनंतर झालेली सत्यनारायणाची पूजा सोडता मी कधीच सत्यनारायणाच्या पूजेला बसलो नाही.
माझ्या या बाह्य वर्तनाने मी नेहमीच 'नास्तिक' म्हणून ओळखला जात होतो. परंतु 'देव' या संकल्पनेबद्दल माझ्या मनात नेहमी विचार चालू असत. म्हणूनच IIT मध्ये असताना मी तत्वज्ञानाचे विषय माझे Elective म्हणून निवडत होतो. तेथेच मला भारतीय प्राचीन तत्वज्ञानाची तोंडओळख झाली.
IIT मध्ये असल्यापासूनच मी रोज संपूर्ण शरीर Relax करीत होतो. झोपून मनानेच शरीराचा प्रत्येक अवयव पूर्ण शिथिल करीत होतो. हे मला कोणी शिकविले नव्हते, तर अंत:प्रेरणेने मी करत होतो. शिक्षण संपवून नोकरीला लागल्यावरही मी रोज हे Relaxation करत होतो.
मी सुमारे तीस वर्षांचा असताना मी खूप आजारी पडलो. यावेळी माझी पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती आणि बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. माझ्या आजाराचे निदान होत नव्हते. अंगात खूप ताप होता. मी खोलीत एकटाच पडून होतो आणि माझ्या शरीराकडे लक्ष ठेऊन होतो. अचानक मला माझ्या शरीरातील रक्तप्रवाह कमी होत आल्याचे जाणवले. मी आता पूर्ण लक्ष माझ्या शरीराकडे दिले. आणि मला अचानक out of the body अनुभव आला. त्यानंतर मी अनेक अनुभवांतून गेलो. माझ्या (जन्माच्या प्रतीक्षेत असलेल्या) बाळाला माझी गरज असेल याची जाणीव होताच मी माझ्या शरीरात क्षणार्धात परत आलो. माझा ताप आता पूर्ण उतरला होता. नंतरही दोन दिवस मला अनेक वेगळे अनुभव येत होते. घरच्यांना (आणि मलाही) मला एखादी मानसिक व्याधी जडली असावी असा संशय आला. मला ठाण्यातील एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. पण त्यांनी मी मानसिकदृष्ट्या संपूर्ण सुदृढ असल्याचा निर्वाळा दिला.
त्यानंतर सुमारे अकरा वर्षे उलटली. मला आलेले out of the body आणि अन्य अनुभव कोणाला सांगितले नव्हते. ज्या जवळच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते मला झालेले भास होते असे सांगून गप्प बसविले होते आणि हे अनुभव विसरून जाण्याचा सल्ला दिला होता. पण अचानक माझ्या अनुभवांचा अर्थ लावणारे गुरु मला भेटले. मला प्राचीन अध्यात्मिक ज्ञानाची आवड असल्याने मी ठाण्यात सहयोग मंदिरातर्फे चालविण्यात येणाऱ्या 'पातंजल योग' अभ्यासवर्गाला गेलो. हा वर्ग 'स्वामी आनंदऋषी' घेत होते. पहिल्या दिवशी वर्ग संपल्यावर मी त्यांना मला अकरा वर्षांपूर्वी आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. त्यांनी लगेच मला त्यांच्या घरी नेले. तेथे अनेकांचे Near Death Experiences (NDE) चे अनुभव संकलित केलेले (त्यांनी लिहिलेले) पुस्तक वाचण्यास दिले. यातील अनुभव आणि मला 'मी शरीराबाहेर पडून परत शरीरात येईपर्यंतचे' अनुभव शब्दश: सारखे होते. मला नक्की काय झाले होते याचे कोडे अकरा वर्षांनी उलगडले होते. मी मृत्यूला स्पर्श करून आलो होतो. (त्यानंतर दोन दिवस येत असलेले अनुभव अद्वैत वेदान्ताच्या मांडणीशी सुसंगत होते हे नंतर लक्षात आले). नंतर स्वामीजींनी हे सर्वसामान्यांना सहसा न येणारे अनुभव का आले असावेत याचा शोध घेतला. तेव्हा मी कॉलेजजीवनापासून करत असेलेले Relaxation म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून 'विपश्यना ध्यान' होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला ताबडतोब विपश्यना शिबिरास जाण्यास सांगितले. त्यानंतर मी आजवर नऊ वेळा विपश्यना शिबीर (प्रत्येकी दहा दिवसांचे) केले आहे आणि विपश्यनेचे तंत्र घोटवून घेतले आहे.
यानंतर माझ्या अध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळाली. स्वामी आनंदऋषी यांच्याकडे ओशोंच्या पुस्तकाचे भांडार होते. स्वामीजी हे ओशोंच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक. स्वामीजी हे व्यवसायाने CA. टाटा हॉटेल्सच्या अमेरिकेतील व्यवसायाचे अर्थविषयक कामकाजाचे उपाध्यक्ष. त्यामुळे त्यांची विविध विषयांवरील मते तर्कशुद्ध आणि स्पष्ट होती. त्यांच्यासोबत अध्यात्मिक संवाद साधताना स्पष्टता मिळत असे. हळूहळू वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. youtube वर स्वामी सर्वप्रियानंद Swamisarvapriyanandafans यांच्याशी सूर जुळले. त्यांच्या भाषणातून अद्वैत वेदान्तातील खाचाखोचा कळल्या. मला तीस वर्षांपूर्वी आलेले अनुभव आणि अद्वैत वेदांत यांची संगती जुळली. सध्या अद्वैत वेदांताचा अभ्यास सुरु आहे.
अशाप्रकारे मी आज परम अस्तिक आहे. या विश्वात ब्रह्माशिवाय काहीही नाही असा मला विश्वास आहे - अनुभव आहे. आजही मी पूजा-अर्चा करीत नाही. भक्तिमार्ग आणि ध्यानमार्ग हे दोन मार्ग ब्रह्मज्ञानाकडे जाणारे मार्ग आहेत. मी ध्यानमार्गाचा साधक आहे.
माझ्या अनुभवांतून एक गोष्ट स्पष्ट होते. आपण मागील जन्मांतून अध्यात्मिक प्रवास केलेला असतो. तेथूनच पुढे सुरुवात करायची असते. म्हणून इतरांकडे बघून, त्यांची कॉपी करून तुमचा प्रवास करू नका. आपण कोठे आहोत, कसा प्रवास केला आहे याचा शोध घ्या आणि आपला मार्ग ठरवा. आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु प्रवासात वेळोवेळी भेटतील. कोणालाही आपल्याला भावलेल्या मार्गाने साधना करण्याची सक्ती करू नका. कोणता माणूस मागील जन्मी कशाप्रकारे साधना करून आला आहे आणि कोणत्या टप्प्याला आहे हे केवळ तोच जणू शकतो.
असा आहे माझा या जन्मातील अध्यात्माचा प्रवास ... परम नास्तिकतेकडून परम अस्तिकतेकडे झालेला प्रवास.
-------------------------------------------------------------------------------
माझ्या अनुभवानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील. 'मी कधी पूजा-अर्चा करत नाही, मग माझी मूर्तिपूजा, होमहवन इत्यादीसंबंधी भूमिका' इत्यादी. त्याला उत्तर मी वेळोवेळी माझ्या पोस्टमधून दिलेलेच आहे. पण वरील पोस्टचा संदर्भ धरून मी लवकरच अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी वेगळी पोस्ट लिहीन. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. म्हणजे सर्वांना एकत्र उत्तर देता येईल.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, May 9, 2022

सर्वमं खल्व ईदम् ब्रह्म

 आपल्यापैकी अनेकांना आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही तर शरीर मन यांचा अनुभव  घेणारे चैतन्य आहे हे पटते. परंतु चैतन्य हे सर्वव्यापी असून आपण आणि हे विश्व या चैतन्यात प्रकट झालो आहोत, एकाच चैतन्याचा (ब्रह्माचा) भाग आहोत हे समजणे थोडे कठीण जाते. 

सांख्य दर्शन प्रत्येकाचे चैतन्य (पुरुष) वेगळे मानते. तसेच आसपासचे 'जड' विश्व (प्रकृती) या चैतन्यापासून वेगळे आहे असे मानते. पुरुषाला वेगवेगळे 'अनुभव' देणे हे प्रकृतीचे काम आहे  तर पुरुषांमुळेच प्रकृतीचे प्रकटीकरण होते असे हे दर्शन मानते. भारतीय मानसावर सांख्य तत्वज्ञानाचा प्रभाव असल्याने सर्वव्यापी चैतन्यात जड प्रकट होते हे अद्वैत तत्वज्ञान समजण्यास थोडे कठीण जाते. 

आपण प्रथम एक उदाहरण घेऊ आणि नंतर आपल्या अनुभवाचे विश्लेषण करून अद्वैत तत्वज्ञान समजून घेऊ. आपल्याकडे सोन्याच्या पाटल्या आहेत. त्या पाटल्यांना 'पाटल्या' म्हणता येईल तसेच 'सोने' ही म्हणता येईल. हे दोन वेगळे पदार्थ नाहीत, तर एकाच आहे. त्या वितळावल्या तर पाटल्या नष्ट होतील, परंतु सोने तसेच राहील. त्या सोन्याचा आपल्याला नेकलेस बनविता येईल.  म्हणजे खरे तर तो पदार्थ 'सोने' आहे. त्याच्या रूप, नाम, उपयोगामुळे आपण त्याला वेगळा पदार्थ म्हणू. परंतु पाटल्या या अंतर्बाह्य सोनेच आहेत. म्हणजे त्या सोन्याने 'व्याप्त' आहेत. सोने काढले तर पाटल्या राहणार नाहीत, पण पाटल्या वितळवून नष्ट केल्या तर सोने शिल्लक राहील. 

आता आपण आपल्या रोजच्या जीवनातील एक प्रसंग घेऊ आणि त्याची संगती वरील उदाहरणाशी जोडता येते का ते पाहू. आपल्याला झोपेत स्वप्न पडते. प्रत्येक स्वप्नात आपण असतो. आजूबाजूला अन्य माणसे असतात. आपल्या आसपासचे विश्व उभे असते.  हे स्वप्नातील विश्व आपल्या मनाने निर्माण केलेले असते.  जसे दागिन्यांचा आधार सोने असते तसे मन हेच स्वप्नातील विश्वाचा आधार असते.  स्वप्नातील 'आपलाही' आधार मनच असते. त्यातून मन बाहेर पडताच (शांत झोप लागल्यावर) हे विश्व विलीन होते. हे स्वप्नातील विश्व आपल्या 'मनात' निर्माण होते, मनातच विलीन पावते.

अगदी अशाच प्रकारे आपले जागेपणीचे विश्व चैतन्यात निर्माण होते आणि चैतन्यातच  विलीन पावते.  आपल्या स्वप्नात आपण असतो तसेच या जगातही आपण असतो. हे आपण म्हणजे सर्वव्यापी चैतन्य अथवा 'साक्षीचैतन्य' आहे. जागेपणीच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट म्हणजे 'चैतन्याचा' आविष्कार आहे, चैतन्याने घेतलेले रूप, नाम आहे आणि त्याचा उपयोग आहे. महासागरात लाटा उसळतात आणि महासागरातच विलीन होतात. प्रत्येक लाट म्हणजे केवळ वेगवेगळे रूप घेतलेले पाणी असते. तसेच या विश्वातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळे रूप घेतलेले चैतन्य आहे. आणि हे सर्व चैतन्याच्या महासागरातच घडत आहे. 

गाढ झोपेत (सुषुप्ती) हे सर्व विश्व चैतन्यात विलीन पावते. तेथे फक्त आपण असतो. म्हणूनच झोपेतून उठल्यावर आपण गाढ झोपेचा अनुभव सांगू शकतो. 

Saturday, May 7, 2022

The Hard Problem of Consciousness: Part 2

 मागील भागात आपण डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने मांडलेला The Hard Problem of Consciousness काय आहे याची तोंडओळख करून घेतली. आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या विविध संवेदना मेंदूपर्यंत कशा पोचतात हे दाखविण्यास प्रचलित विज्ञान समर्थ आहे. परंतु या संवेदनांचे अनुभवात रूपांतर कसे होते आणि त्याद्वारे विविध भावभावना कशा उत्पन्न होतात हे दाखविण्यास सध्याचे विज्ञान असमर्थ आहे हे डेव्हिड चालमर्स यांनी दाखवून दिले आहे. काही भौतिकवादी (Materialistic) शास्त्रज्ञांच्या मते भविष्यकाळात विज्ञान पुढे सरकले की हे दाखविण्यास समर्थ ठरेल. या शास्त्रज्ञांचा 'हे जग पदार्थ-ऊर्जा यांनी बनलेले आहे आणि त्याव्यतिरिक्त काहीही नाही' यावर गाढ विश्वास आहे. या उलट अनेक शास्त्रज्ञ 'चैतन्य' हे पदार्थ-ऊर्जेपेक्षा वेगळे असल्याचे मानतात.


काही शास्त्रज्ञानी Hard Problem of Consciousness सारखाच Hard Problem of Matter असल्याचे दाखवून दिले आहे. सध्याचे भौतिक शास्त्राचे नियम पदार्थांचे एकमेकांवरील परिणाम दाखविते. म्हणजेच ते Software आहे. परंतु प्रत्येक softwear मागे त्याला आधार देणारे hardware असावे लागते. हे hardware काय आहे हे सध्याचे विज्ञान सांगू शकत नाही असे हे शास्त्रज्ञ मानतात. Matter म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास जेवढे अधिक खोलात जाऊ तेवढे नवे विसंवाद सापडत जातात. विज्ञान अधिक आपल्याला अधिकाधिक गोंधळात पाडते. विज्ञानाच्या मुळापर्यंत आपण आलो असे वाटत असतानाच Heisenberg's principle of uncertainty नी आपल्याला धक्का दिला. तसेच प्रकाश हा किरणांच्या स्वरूपात जातो या आपल्या दृढ समजुतीला धक्का मिळाला आणि आता प्रकाशाच्या या विसंगत आचरणातील संगती शोधण्याची प्रयत्न चालू आहेत. तीन मितींपेक्षा अधिक मिती असण्याची शक्यता दिसते आहे. या परिस्थितीत आपले तीन मितींमधील अवकाशावर (space) आधारलेले विज्ञान अपुरे भासू लागेल. काही दशकांपूर्वी मानवाला वाटत होते की लवकरच त्याला विज्ञानाची सर्व कोडी उलगडतील आणि विश्वनिर्मितीचे गूढ उकलेल. पण आपण जसे विज्ञानाच्या खोलात शिरत आहोत तशी विज्ञानाची सर्व कोडी उलगडण्याचे शक्यता धूसर होत चालली आहे. असे असेल तर भविष्यात पदार्थापासून (Matter) चैतन्याची निर्मिती होते हे दाखविण्याची आणि तसे प्रयोगाने करून दाखविता येण्याची शक्यता मला फारच कमी वाटते.
मग अशा वेळी आपल्याला उपनिषदे लिहिणारे प्राचीन ऋषी मार्ग दाखवितात. ध्यानस्त अवस्थेत असताना झालेले चैतन्य-पदार्थ संबंधातील ज्ञान ते आपल्यापुढे ठेवतात. हे ज्ञान आपण अंधभक्तीने जसेच्यातसे न स्वीकारता आपल्या दैनंदिन अनुभवांच्या कसोटीवर पारखून घ्यावे अशीही त्यांची अपेक्षा आहे. उपनिषदांत ऋषींनी काय सांगितले आहे ते पुढील लेखांत पाहू.
संतोष कारखानीस ठाणे

Thursday, May 5, 2022

The Hard Problem of Consciousness : Part 3

 या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने मांडलेला The Hard Problem of Consciousness म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली. आपली ज्ञानेंद्रिये आणि चेतासंस्था यांच्यामार्फत मेंदूकडे जाणारे संदेश वैयक्तिक अनुभवात रूपांतरित कसे होतात हे विज्ञानाला अजूनही कळले नाही आणि कळण्याची शक्यता धूसर आहे असे त्याचे म्हणणे आहे. काही भौतिकवादी (Materialistic) शास्त्रज्ञ मात्र हे चेतासंदेशांचे रूपांतर वैयक्तिक अनुभवत होणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्याचा शोध लवकरच विज्ञानाला लागेल असे मानतात. त्यांच्यामते पदार्थ (Matter) हेच मूलभूत असून चेतनेचा उगम पदार्थातूनच होत असला पाहिजे.



परंतु पदार्थविज्ञानात आपण जसजसे खोलात शिरतो तसे अधिकाधिक विसंगती नजरेस येऊ लागतात. Matter म्हणजे काय हे खोलात शिरून समजविण्यास सध्याचे विज्ञान अपुरे आहे. म्हणूनच चैतन्याचे मूळ हे 'पदार्थ' (Matter) नसून अन्यत्र असावे अशी शक्यता आपण दुसऱ्या भागात व्यक्त केली होती.

हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींना ध्यानस्त अवस्थेत चैतन्य-पदार्थ यांच्या संबंधाचे स्फुरण झाले होते. त्यांनी त्यांना स्फुरलेले विचार उपनिषदांत मांडले आहेत. त्यांच्या मते पदार्थ (Matter) हे मूलभूत नसून चैतन्य हेच एकमेव मूलभूत आहे. सर्व पदार्थ (Matter & Energy) हे चैतन्यताच उगम पावतात आणि चैतन्यताच विलीन होतात. न्याय वैशेषिकांनी घेतलेल्या 'चैतन्य हे पदार्थ घडविते' या भूमिकेपेक्षा ही भूमिका भिन्न आहे. तसेच सांख्यांनी घेतलेल्या 'चैतन्य आणि पदार्थ हे मुलत: भिन्न असून चैतन्यामुळे पदार्थ अस्तित्वात येतात तर पदार्थामुळे चैतन्याचे अस्तित्व जाणवते' या भूमिकेपेक्षाही ही भूमिका वेगळी आहे.

चैतन्य (ब्रह्म) हेच एकमेव अस्तित्वात असून (अस्तित्व - सद् हा ब्रह्माचा एक गुण आहे) चैतन्याचा सूर्य तळपत आहे. मनाच्या 'आरशात' त्याचे प्रतिबिंब उमटते. मनाच्या 'अहंकार' या भागाशी ते एकरूप होऊन चेतासंस्थेच्या साहाय्याने शरीरात पसरते. मग आपल्याला शरीर 'चैतन्यमय' भासते. आपल्या मनात एखाद्या पदार्थांविषयी वृत्तीव्याप्ती निर्माण झाली की या चेतनेचे प्रक्षेपण आपण आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे संबंधित पदार्थांवर करतो. उमटलेल्या संवेदना मेंदूत जातात. तेथे वृत्तिव्याप्ती असलेल्या गोष्टीबाबत फलव्याप्ती निर्माण होऊन आपल्या चैतन्यमध्ये ती गोष्ट उमटते - त्या गोष्टीचे आपल्या अनुभवात रूपांतर होते.

वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती यासंबंधी अधिक जाणून घेऊ. आपल्याला एखाद्या वस्तूविषयी, घटनेविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली की वृत्ती व्याप्ती निर्माण होते. एखादा विद्यार्थी वर्गात बसला आहे आणि त्याची शिक्षक काय शिकवितो आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर शिकविण्यासंबंधी वृत्तिव्याप्ती जागृत झाली आहे असे म्हणता येईल. मग त्याच्या डोळे कान आणि मन ही इंद्रिये आपल्या चैतन्याचे प्रक्षेपण शिकविण्यावर करू लागतील. त्यातून निर्माण झालेल्या संवेदना मेंदूत जातील आणि तेथे त्यांचे फलव्याप्तीत रूपांतर होऊन अनुभवात रुपांतरीत होईल- चैतन्यात प्रवेश करेल. जर त्या शिकविण्यासंदर्भात वृत्तिव्याप्तीच निर्माण झाली नाही तर डोळे-कान यांनी संवेदना ग्रहण करूनही त्याचे अनुभवत रूपांतर होणार नाही - चैतन्यात प्रवेश होणार नाही.

आपली ज्ञानेंद्रिये एकावेळी अनेक गिगाबाईट डेटा गोळा करत असतात. आपल्या मेंदूची हा सर्व डेटा ग्रहण करण्याची क्षमता नसते. म्हणूनच केवळ वृत्तिव्याप्ती निर्माण झालेला डेटाच मेंदू गोळा करू शकतो.

ही आपली ज्ञानग्रहणाची प्रक्रिया चैतन्यात घडते. स्वप्नातील घटना त्या त्या पातळीवर सत्य असतात. तेथे निर्माण झालेले विश्व आपल्या मनाने तयार केलेले असते. आपले मन हे त्याचा आधार असते. तेथे आपणही असतो. तद्वतच जागेपणाच्या पातळीवरील विश्व त्या पातळीवर सत्य असते. या विश्वाचा आधार चैतन्य असते. स्वप्नातील घटना आपल्या मनात घडत असतात, तसेच जागेपणीच्या घटना चैतन्यात घडत असतात.

थोडा गुंतागुंतीचा वाटणारा विषय माझ्या परीने सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण त्याला आपल्या अनुभवाची जोड दिलीत तर कदाचित अधिक सोपा होऊ शकेल.

लेखमाला समाप्त.
लेखनसीमा.

Monday, May 2, 2022

The Hard Problem of Consciousness Part 1

 


डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी 'The Hard Problem of Consciousness' हा मुद्दा अधोरेखीत केला. सध्याचे मनोविज्ञान आणि चेताविज्ञान (neurological science) हे आपल्या शरीरात दिसणाऱ्या चेतनेवर संशोधन करतात. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संदेशांचे ग्रहण कसे होते, हे संदेश विद्युत संदेशांत कसे रुपांतरीत होतात, तेथील चेता संस्थेद्वारे मेंदूतील या संदेशांची व्यवस्था लावण्याच्या ठिकाणी कसे पोचतात याची बरीचशी माहिती आता विज्ञानाला झालेली आहे आणि अजून खोलात शिरून माहिती मिळविणत्याचे प्रयत्न चालू  आहेत.  माझ्या समोरील लॅपटॉपचा स्क्रीन मी बघत आहे आणि ते मेंदूला कळते याचा अर्थ असा नाही  की तो लॅपटॉप माझ्या डोळ्यात शिरतो आणि मेंदूपर्यंत जातो. प्रथम लॅपटॉपपासून येणारे प्रकाशकिरण डोळ्यात जातात. तेथे त्यांचे विद्युत संदेशांत रूपांतरण होते. हे विद्युत संदेश मेंदूच्या विशीष्ट भागात चेता संस्थेमार्फत नेले जातात. तेथे या संदेशांचे पृथ्थकरण होते आणि मेंदूत त्या लॅपटॉपची चित्र तयार होते. कधीकधी त्यामुळे मनात एखादी भावना उमटते. नंतर ते चेतापेशींमध्ये आठवणींच्या रूपात साठविले जाते आणि आवश्यक असेल तेव्हा परत मनात उतरते. 

ही अत्यंत जटील अशी प्रक्रिया आहे. विज्ञानालाही याचा पूर्ण उलगडा झालेला नाही. चेतासंदेश मेंदूत पोचल्यावर त्याचे पृथ्थकरण कसे होते आणि त्यातून आपल्याला अनुभव कसा मिळतो याबाबत प्रचलित विज्ञान पूर्णतः अनभिज्ञ आहे. आणि याच प्रक्रियेला डेव्हिड चालमर्स 'The Hard Problem of Consciousness' असे संबोधतो. ज्ञानेंद्रियांना जाणीव होऊन त्याचे चेतासंदेशांत रूपांतर, संदेशांचे वहन याला तो Soft Problems of Consciousness असे संबोधितो कारण प्रचलित विज्ञानाच्या कक्षेत त्यांचा अभ्यास करता येतो.  परंतु या संदेशांचे अनुभवत रूपांतर होणे हे प्रचलित विज्ञानाच्या कक्षेच्या संपूर्ण बाहेर आहे असे त्याचे आणि अन्य अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. 

काही भौतिकवादी शास्त्रज्ञांच्या मते हे अनुभवात/भावनेत  रूपांतर विज्ञानाच्या आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या नियमानुसार होत असावे. आपल्याला भौतिकशास्त्रातील काही मूलभूत नियम माहीत आहेत. विश्वातील सर्व जड (Matter-Energy) प्रक्रिया या नियमांनुसारच चालतात हे आपल्याला माहीत आहे. तद्वतच ही चेतासंदेशांचे अनुभवत रूपांतर करण्याची प्रक्रिया अतिसूक्ष्म स्तरावर काम करणाऱ्या भौतिक नियमांनुसार होत असावी. 

आज आपल्याला Soft Problems of Consciousness सोडविता आल्याने आपण अनेक प्रकारचे यंत्रमानव बनवू शकतो. ते आपल्यापेक्षाही अचूक काम करू शकतात. मात्र त्यांना अनुभव, भावना नसतात. एखाद्या यंत्रमानवाला तुम्ही एक फटका मारलात तर त्याला काहीही वाटणार नाही. (कदाचित केलेल्या प्रोग्रॅमनुसार तो तुमच्यावरही हात उगारेल. पण त्यात रागाची भावना नसेल). पण भौतिकशास्त्राचे हे नवे नियम कळले तर आपण भाव-भावना असलेले यंत्रमानव सहज तयार करू शकू असे हे भौतिकवादी शास्त्रज्ञ मानतात. 

प्राचीन भारतीय तत्ववेत्यांनी या 'The Hard Problem of Consciousness' वर काही हजार वर्षांपूर्वीच विचार केला आहे. उपनिषदांमध्ये याचा विस्तृत उहापोह आहे. आपण पुढील लेखात उपनिषादांची या Problem वर काय भूमिका आहे हे पाहू.