या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण डेव्हिड चालमर्स या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने मांडलेला The Hard Problem of Consciousness म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली. आपली ज्ञानेंद्रिये आणि चेतासंस्था यांच्यामार्फत मेंदूकडे जाणारे संदेश वैयक्तिक अनुभवात रूपांतरित कसे होतात हे विज्ञानाला अजूनही कळले नाही आणि कळण्याची शक्यता धूसर आहे असे त्याचे म्हणणे आहे. काही भौतिकवादी (Materialistic) शास्त्रज्ञ मात्र हे चेतासंदेशांचे रूपांतर वैयक्तिक अनुभवत होणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्याचा शोध लवकरच विज्ञानाला लागेल असे मानतात. त्यांच्यामते पदार्थ (Matter) हेच मूलभूत असून चेतनेचा उगम पदार्थातूनच होत असला पाहिजे.
हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींना ध्यानस्त अवस्थेत चैतन्य-पदार्थ यांच्या संबंधाचे स्फुरण झाले होते. त्यांनी त्यांना स्फुरलेले विचार उपनिषदांत मांडले आहेत. त्यांच्या मते पदार्थ (Matter) हे मूलभूत नसून चैतन्य हेच एकमेव मूलभूत आहे. सर्व पदार्थ (Matter & Energy) हे चैतन्यताच उगम पावतात आणि चैतन्यताच विलीन होतात. न्याय वैशेषिकांनी घेतलेल्या 'चैतन्य हे पदार्थ घडविते' या भूमिकेपेक्षा ही भूमिका भिन्न आहे. तसेच सांख्यांनी घेतलेल्या 'चैतन्य आणि पदार्थ हे मुलत: भिन्न असून चैतन्यामुळे पदार्थ अस्तित्वात येतात तर पदार्थामुळे चैतन्याचे अस्तित्व जाणवते' या भूमिकेपेक्षाही ही भूमिका वेगळी आहे.
चैतन्य (ब्रह्म) हेच एकमेव अस्तित्वात असून (अस्तित्व - सद् हा ब्रह्माचा एक गुण आहे) चैतन्याचा सूर्य तळपत आहे. मनाच्या 'आरशात' त्याचे प्रतिबिंब उमटते. मनाच्या 'अहंकार' या भागाशी ते एकरूप होऊन चेतासंस्थेच्या साहाय्याने शरीरात पसरते. मग आपल्याला शरीर 'चैतन्यमय' भासते. आपल्या मनात एखाद्या पदार्थांविषयी वृत्तीव्याप्ती निर्माण झाली की या चेतनेचे प्रक्षेपण आपण आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे संबंधित पदार्थांवर करतो. उमटलेल्या संवेदना मेंदूत जातात. तेथे वृत्तिव्याप्ती असलेल्या गोष्टीबाबत फलव्याप्ती निर्माण होऊन आपल्या चैतन्यमध्ये ती गोष्ट उमटते - त्या गोष्टीचे आपल्या अनुभवात रूपांतर होते.
वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती यासंबंधी अधिक जाणून घेऊ. आपल्याला एखाद्या वस्तूविषयी, घटनेविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली की वृत्ती व्याप्ती निर्माण होते. एखादा विद्यार्थी वर्गात बसला आहे आणि त्याची शिक्षक काय शिकवितो आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर शिकविण्यासंबंधी वृत्तिव्याप्ती जागृत झाली आहे असे म्हणता येईल. मग त्याच्या डोळे कान आणि मन ही इंद्रिये आपल्या चैतन्याचे प्रक्षेपण शिकविण्यावर करू लागतील. त्यातून निर्माण झालेल्या संवेदना मेंदूत जातील आणि तेथे त्यांचे फलव्याप्तीत रूपांतर होऊन अनुभवात रुपांतरीत होईल- चैतन्यात प्रवेश करेल. जर त्या शिकविण्यासंदर्भात वृत्तिव्याप्तीच निर्माण झाली नाही तर डोळे-कान यांनी संवेदना ग्रहण करूनही त्याचे अनुभवत रूपांतर होणार नाही - चैतन्यात प्रवेश होणार नाही.
आपली ज्ञानेंद्रिये एकावेळी अनेक गिगाबाईट डेटा गोळा करत असतात. आपल्या मेंदूची हा सर्व डेटा ग्रहण करण्याची क्षमता नसते. म्हणूनच केवळ वृत्तिव्याप्ती निर्माण झालेला डेटाच मेंदू गोळा करू शकतो.
ही आपली ज्ञानग्रहणाची प्रक्रिया चैतन्यात घडते. स्वप्नातील घटना त्या त्या पातळीवर सत्य असतात. तेथे निर्माण झालेले विश्व आपल्या मनाने तयार केलेले असते. आपले मन हे त्याचा आधार असते. तेथे आपणही असतो. तद्वतच जागेपणाच्या पातळीवरील विश्व त्या पातळीवर सत्य असते. या विश्वाचा आधार चैतन्य असते. स्वप्नातील घटना आपल्या मनात घडत असतात, तसेच जागेपणीच्या घटना चैतन्यात घडत असतात.
थोडा गुंतागुंतीचा वाटणारा विषय माझ्या परीने सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण त्याला आपल्या अनुभवाची जोड दिलीत तर कदाचित अधिक सोपा होऊ शकेल.
लेखमाला समाप्त.
लेखनसीमा.
No comments:
Post a Comment