Monday, May 9, 2022

सर्वमं खल्व ईदम् ब्रह्म

 आपल्यापैकी अनेकांना आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही तर शरीर मन यांचा अनुभव  घेणारे चैतन्य आहे हे पटते. परंतु चैतन्य हे सर्वव्यापी असून आपण आणि हे विश्व या चैतन्यात प्रकट झालो आहोत, एकाच चैतन्याचा (ब्रह्माचा) भाग आहोत हे समजणे थोडे कठीण जाते. 

सांख्य दर्शन प्रत्येकाचे चैतन्य (पुरुष) वेगळे मानते. तसेच आसपासचे 'जड' विश्व (प्रकृती) या चैतन्यापासून वेगळे आहे असे मानते. पुरुषाला वेगवेगळे 'अनुभव' देणे हे प्रकृतीचे काम आहे  तर पुरुषांमुळेच प्रकृतीचे प्रकटीकरण होते असे हे दर्शन मानते. भारतीय मानसावर सांख्य तत्वज्ञानाचा प्रभाव असल्याने सर्वव्यापी चैतन्यात जड प्रकट होते हे अद्वैत तत्वज्ञान समजण्यास थोडे कठीण जाते. 

आपण प्रथम एक उदाहरण घेऊ आणि नंतर आपल्या अनुभवाचे विश्लेषण करून अद्वैत तत्वज्ञान समजून घेऊ. आपल्याकडे सोन्याच्या पाटल्या आहेत. त्या पाटल्यांना 'पाटल्या' म्हणता येईल तसेच 'सोने' ही म्हणता येईल. हे दोन वेगळे पदार्थ नाहीत, तर एकाच आहे. त्या वितळावल्या तर पाटल्या नष्ट होतील, परंतु सोने तसेच राहील. त्या सोन्याचा आपल्याला नेकलेस बनविता येईल.  म्हणजे खरे तर तो पदार्थ 'सोने' आहे. त्याच्या रूप, नाम, उपयोगामुळे आपण त्याला वेगळा पदार्थ म्हणू. परंतु पाटल्या या अंतर्बाह्य सोनेच आहेत. म्हणजे त्या सोन्याने 'व्याप्त' आहेत. सोने काढले तर पाटल्या राहणार नाहीत, पण पाटल्या वितळवून नष्ट केल्या तर सोने शिल्लक राहील. 

आता आपण आपल्या रोजच्या जीवनातील एक प्रसंग घेऊ आणि त्याची संगती वरील उदाहरणाशी जोडता येते का ते पाहू. आपल्याला झोपेत स्वप्न पडते. प्रत्येक स्वप्नात आपण असतो. आजूबाजूला अन्य माणसे असतात. आपल्या आसपासचे विश्व उभे असते.  हे स्वप्नातील विश्व आपल्या मनाने निर्माण केलेले असते.  जसे दागिन्यांचा आधार सोने असते तसे मन हेच स्वप्नातील विश्वाचा आधार असते.  स्वप्नातील 'आपलाही' आधार मनच असते. त्यातून मन बाहेर पडताच (शांत झोप लागल्यावर) हे विश्व विलीन होते. हे स्वप्नातील विश्व आपल्या 'मनात' निर्माण होते, मनातच विलीन पावते.

अगदी अशाच प्रकारे आपले जागेपणीचे विश्व चैतन्यात निर्माण होते आणि चैतन्यातच  विलीन पावते.  आपल्या स्वप्नात आपण असतो तसेच या जगातही आपण असतो. हे आपण म्हणजे सर्वव्यापी चैतन्य अथवा 'साक्षीचैतन्य' आहे. जागेपणीच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट म्हणजे 'चैतन्याचा' आविष्कार आहे, चैतन्याने घेतलेले रूप, नाम आहे आणि त्याचा उपयोग आहे. महासागरात लाटा उसळतात आणि महासागरातच विलीन होतात. प्रत्येक लाट म्हणजे केवळ वेगवेगळे रूप घेतलेले पाणी असते. तसेच या विश्वातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळे रूप घेतलेले चैतन्य आहे. आणि हे सर्व चैतन्याच्या महासागरातच घडत आहे. 

गाढ झोपेत (सुषुप्ती) हे सर्व विश्व चैतन्यात विलीन पावते. तेथे फक्त आपण असतो. म्हणूनच झोपेतून उठल्यावर आपण गाढ झोपेचा अनुभव सांगू शकतो. 

No comments:

Post a Comment