Monday, August 5, 2024

शिवतांडव नृत्य आणि शिवतांडव स्तोत्र ‘ लेखक दा. कृ. सोमण, पंचांगकर्ता, खगोल अभ्यासक

आज पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण प्राचीन तांडवनृत्याविषयी आणि शिवतांडव स्तोत्राविषयी माहिती करून घेऊया.

‘ तांडव नृत्य ‘ हा प्राचीन नृत्यप्रकार असून भगवान शंकराने ते प्रवर्तित केले असे समजले जाते. संगीतरत्नाकर ग्रंथामध्ये तांडवनृत्याची उत्पत्ती दिलेली आहे. ती अशी—
प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्रयुक्तं ततो हर: ।
तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत् ॥
लास्यमस्याग्रत: प्रीत्या पार्वत्या समदीदृशत् ।
बुद्ध् वाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोऽवदन् ॥
— नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धत नृत्य आठवून ते आपल्या गणांतील अग्रणी असलेल्या तंडूकरवी भरतमुनीला दाखविले. तसेच लास्ट हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करून दाखविले. तंडूने करून दाखविले ते तांडव, असे जाणून भरतादी मुनीनी ते नृत्य मानवांना शिकविले.
तांडव नृत्याचे सात प्रकार आहेत. ते असे— (१) आनंदतांडव (२) संध्यातांडव (३) कालिकातांडव (४) त्रिपुरतांडव (५) गौरीतांडव (६) संहारतांडव (७) उमातांडव. हे सातही प्रकार नटराज शिवाला प्रिय होते.
संध्यातांडवनृत्याचे वर्णन शिवप्रदोष स्तोत्रात आले आहे. जेव्हा शिव नृत्यासाठी सिद्ध होतो त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते. इंद्र बासरीतून स्वर छेडतो. ब्रह्मा ताल देतो, लक्ष्मी गाणे गाते, विष्णू मृदंग वाजवितात आणि सर्व देवदेवता भोवती उभ्या राहून हा नृत्यदर्शनाचा सोहळा अनुभवतात. या नृत्यात शिवाचे स्वरुप द्विभुज असते. पायाखाली दैत्य चिरडला जात असल्याचे दृश्य नसते.
गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही नृत्ये उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यांमध्ये शिव हा भैरव अथवा वीरभद्र स्वरुपात असतो. त्याच्याबरोबर उमा किंवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशानभूमीत भूतगणांच्या साथीने ही भयानक नृत्ये करतो. इथे जीवांचा अहंकार भस्मसात होतो, अशा अवस्थेचे प्रतीक म्हणजे स्मशानभूमीच होय म्हणून त्या पार्श्वभूमीवर हे नृत्य केले जाते.
शिवतांडव नृत्य करीत असताना त्याला साथ देण्यासाठी देव आणि असूर सारखेच उत्सुक असतात. भगवान शंकर हे संगीत आणि नृत्याचे जनक मानले जातात. काही ग्रंथांमध्ये दोन प्रकारच्या तांडवनृत्याचे प्रकार सांगितलेले आहेत. (१) रौद्ररूप - रौद्रतांडवनृ्य. आणि (२) आनंदरूप - आनंदतांडवनृत्य. रौद्रतांडव नृत्य रूद्र करतो आणि आनंदतांडव नृत्य नटराज करतो.
नटराज हे शिवाचे एक रूप आहे. या रूपात शिवाने नृत्य- नाट्य कला प्रवर्तित केली. खरे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरातील पूजेबरोबर नृत्य-नाट्याचे, संगीताचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत . मी ठाणे येथील प्राचीन शिवमंदिराच्या विश्वस्तांना हे सुचविले. परंतू ते कृतीत येत नाही. शिव हा आद्य नट आहे. निसर्गातही संगीत चालू असते. तुम्ही जर निसर्गात भ्रमंती केलीत तर तुम्हालाही निसर्गाचे संगीत ऐकू येईल. कधी कधी निसर्गात तांडवनृत्यही दिसते. ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाळा आहे.
नटराजमूर्ती ही अनेक मंदीरांमध्ये तसेच शिल्पांमध्ये आढळते. नटराजाचे तांडव हेच प्रमुख नृत्य आहे.
शिवतांडव स्तोत्राची रचना रावणाने आपले आराध्य भगवान शिव यांची स्तुती करण्यासाठी केली होती असे सांगण्यात येते. या स्तोत्रामध्ये एकूण १७ श्लोक आहेत. त्यापैकी १५ श्लोकांची रचना प्रत्यक्ष शिवभक्त रावणाने केली असे सांगितले आहे. २ श्लोक नंतर जोडण्यात आले. रावणाने ड्रमच्या तालावर १००८ छंदांची रचना केली असेही सांगितले जाते. शिव क्रोधात असतात तेव्हा तांडव नृत्य करतांना तिसरा डोळा उघडतात. शिव आनंदात असतात त्यावेळी डमरू वाजवीत आनंदतांडव नृत्य करतात.
======================

No comments:

Post a Comment