Friday, November 21, 2014

तू कधी थांबणार?

अंगुलीमाल हा बुद्धकालीन एक भयानक वाटमाऱ्या होता. आक्रमक, हिंस्र आणि क्रूर स्वभावाचा. त्याची दहशत जबरदस्त होती. अंगुलीमाल हे त्याला त्याच्या दुष्कृत्यांवरून पडलेलं नाव. मनात लालसा उत्पन्न झाली की त्यानं अडवलेल्या माणसाचा मुडदा पाडीत असे. त्याच्या अंगावरचं, बरोबरचं धन लुटून तो थांबत नसे. त्याच्या मनात भयावह क्रूरपणा उत्पन्न व्हायचा. आपल्या धारदार शस्त्रानं तो त्या व्यक्तीची बोटं कापून टाकीत असे. त्या बोटांची माळ तो गळ्यात घालायचा म्हणून अंगुलीमाल.. या अंगुलीमालाला शांत करण्याची कोणाची हिंमत होत नसे. एकदा तथागत श्रावस्तीकडे निघाले असता, या अंगुलीमालानं त्यांना गाठलं. गाठलं म्हणजे त्यांचा पाठलाग सुरू केला. बुद्ध त्यांच्या वेगानं झपाटय़ानं पुढे चालू होते. अंगुलीमालानं त्यांच्याकडे पाहून म्हटलं, ''हे भिक्षू, थांब, थांब..'' बुृद्ध चालत राहिले. त्यानं पुन्हा आक्रमक पुकारा केला, ''थांब, थांब.'' तथागत न थांबता म्हणाले, ''मी तर केव्हाच थांबलोय; तू कधी थांबणार?'' ते शब्द अंगुलीमालाच्या कानावर पडले. तथागतांच्या स्वरात ना भीतीची कंपनं, ना आपण झपाटय़ानं पुढे जात असल्याचा दर्प. त्यांची वाणी प्राकृत आणि स्थिरचित्त होती. थांबण्याची क्रिया त्यांना अवगत असल्याची प्रखर जाणीव होती. तू कधी थांबणार आहेस? हे शब्द त्या रानावनात दुमदुमले असतील. पशू-पक्षीही स्तब्धावले असतील; पानं-फुलं स्थिर झाली असतील. कदाचित.. कदाचित पण अंगुलीमाल मात्र थांबला. थबकला नाही, थांबला तो थांबलाच. अंगुलीमालच्या आयुष्यातला तो क्षण सत्याचा आविष्कार ठरला. द मोमेंट ऑफ ट्रथ! अंगुलीमालनं वाटमारी थांबवली; त्यानं आपली क्रूर्कम थांबवली, त्याच्या मनात क्षणोक्षणी उसळणारी लालसा थांबवली. समोर दिसणाऱ्या सावजाकडे मनात उफाळून येणारी हिंसेची, चोरीमारीची तण्हा (तृष्णा) थांबवली. त्याला असल्या लालसेमधलं 'अनिच्च' तत्त्व कळलं-आकळलं म्हणून तो थांबला.. तथागतांनी मानवी व्यवहाराची संगती लावली. त्यामागील तर्कशुद्ध कार्यकारणपरंपरा समजून घेतली आणि चार आर्यसत्यं आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली. परिच्च सम्मुपाद या सिद्धान्ताचं विवरण केलं. प्रत्येकाला मनात अंतज्र्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा मध्यममार्ग दाखवला. अंगुलीमालसम लालसेचं स्वरूप बदललंय. आन् चंगळवादाच्या रूपात प्रत्येक व्यक्तीत एक अंगुलीमाल निर्माण झालाय. आपण वाटमारी करतोय, परिसराची, नैसर्गिक उपजत इंधनांची आणि नातेसंबंधांची!! क्षणभर विसावून मनात डोकावलास तर मित्रा, आजही तथागतांच्या शब्दाचे प्रतिध्वनी ऐकू येतील. तू कधी थांबणार?? डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com लोकसत्ता मधून साभार

1 comment: