
------------------------------------------------------------------------------------------
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे‘त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल. आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग‘ नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
-------------------------------------------------------------------------------------------------------
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!‘ कोणीतरी समजावत आहे. पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल.
-----------------------------------------------------------
"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘
""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो मी.‘‘
""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..‘‘
""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?‘‘
""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘
""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.
""पण शिखर न येताच?‘‘
""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो‘ असं वाटत नसतं इतकंच!
---------------------------------------------------------------------------------------------
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा. चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.
-----------------
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥1॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें निळकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2॥ तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥3॥ हा तुकोबांचा गाथेतील अभंग आहे . .
अप्रतिम.....
ReplyDelete