Friday, December 7, 2018

पंचमहाभूते

भारतीय अध्यात्मशास्त्र हे पाश्चात्य संकल्पनांनुसार केवळ तात्विक Philosophy नाही तर ऐहिक जीवनाचा पाया  आहे.

भारतीय अध्यात्मात पंचममहाभुतांची कल्पना मांडली आहे. ही कल्पना भारतीय अध्यात्माचा पाया आहे असे म्हणता येईल. ही कल्पना न्याय-वैशेषिक तत्वज्ञानातून आलेली आहे. न्याय-वैशेषिक तत्वज्ञान अत्यंत प्राचीन मानले जाते. प्रपंच या शब्दाचा अर्थच पंचमहाभूतांपासून बनलेले.

ही पंचमहाभूतांची कल्पना माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांभोवती गुंफलेली आहे.

आकाशतत्व हे पहिले पंचमहाभूत.आकाशाचा शब्दगुण  आहे.
वायूतत्व हे दुसरे पंचमहाभूत. वायूमध्ये शब्दगुण आहेच, पण स्पर्शगुणही आहे.
अग्नीतत्व हे तिसरे पंचमहाभूत. यात शब्द आणि स्पर्शगुण  आहेतच. पण यात रूपगुणही आहे.
जलतत्व हे चौथे पंचमहाभूत. त्यात  शब्दगुण , स्पर्शगुण आणि रूपगुण आहेतच. पण यात रसगुणही आहे.
पृथ्वीतत्व हे पाचवे पंचमहाभूत. यात शब्दगुण , स्पर्शगुण, रूपगुण आणि रसगुणही आहेतच, पण यात गंधगुण ही आहे.

हा जो क्रम मांडला आहे तो सूक्ष्म (तरल) अनुभूतीपासून आपण स्थूल अनुभूतीकडे आहे. पृथ्वीतत्त्व सर्वात स्थूल अनुभूती देणारे आहे तर आकाशतत्व सर्वात तरल अनुभूती देणारे आहे.

गांधत्व, द्रव्यत्व, उष्णत्व, चालावं आणि अप्रतिघात (प्रतिघात = अडथळा) हे अनुक्रमे पृथी, जल, अग्नी, वायू आणि आकाशतत्वाचे गुण  आहेत.
पंचमभूतांचा त्रिदोषांशीही संबंध आहे. आकाश हे प्रामुख्याने सत्वगुण दर्शक आहे, वायू रजोगुणदर्शक आहे, सत्व आणि रजोगुण हे अग्नितत्वात असतात. सत्व आणि तमोगुण जलतत्वात असतात. पृथ्वीतत्त्व प्रामुख्याने तमोगुणांनी भरलेले आहे.

वैशेषिक दर्शनानुसार परमेश्वराला जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा ही पंचमहाभूते पंचमहाभूते एकमेकांशी संलग्न झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली.

सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊन कुंडलिनी शास्त्र उगम पावले. यात सप्त चक्रे सांगितली आहेत. ही चक्रे या पंचमहाभूतांच्या क्रमानेच येतात. मूलाधार चक्र हे पहिले चक्र. ते पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि ते आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली असते. पृथ्वीतत्त्व स्थूलअनुभवांशी जोडलेले असल्याने साधना या चक्रापासून सुरु होते. त्यानंतर येणारे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. त्यानंतरचे मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायुतत्वाशी तर विशुद्ध चक्र आकाशतत्वाशी संबंधित आहे. या नंतरची दोन चक्रे 'आज्ञाचक्र आणि 'सहस्त्रार' अधिक सूक्ष्माकडे घेऊन जातात. कुंडलिनी साधना याच क्रमाने या चक्रांना जागृत करते. या साधनेत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करतो.

योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊनच विकसित झाले आहे. या दोन्ही शास्त्रातही पंचममहाभूतांना महत्व आहे.

पंचमहाभूते आयुर्वेदातील त्रिदोषांशी संबंधीत आहेत. कफदोष हा पृथ्वी आणि जल तत्व यांच्या संयोगाने बनतो. पित्तदोष हा अग्नीतत्वाचे रूप आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश या तत्वांनी बनतो.

अशाप्रकारे भारतीय अध्यात्मशास्त्र हे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.







Tuesday, December 4, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ६


हर्न्लेने केलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या भाषांतराने जगभरात खळबळ उडवून दिली. जगभरातले पुरातत्त्वसंशोधक अजून नवीन काही हस्तलिखिते सापडतील ह्या आशेने मध्य आशियाकडे धाव घेऊ लागले. अनेकांना ती सापडली - पण बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इतके महत्त्वाचे काहीही नव्हते. गौतम बुद्धानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतात सुरु होऊन त्यानंतर प्रामुख्याने मध्य आशियातून युरोपकडे जाणाऱ्या पश्चिमेकडीलखुश्कीच्या मार्गावरून (सिल्क रूट) होत गेला होता. बौद्ध धर्माला बरेच श्रीमंत व्यापारी अनुयायी म्हणून लाभले होते. त्यांनीच दिलेल्या धनामुळे मध्य आशियात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक बौद्ध स्तूप, विहार, आणि बुद्धप्रतिमा (उदाहरण: अफगाणिस्थानमधील बामियानच्या बुद्ध मूर्ती - ज्या २००१ मध्ये तालिबानने तोडल्या!) बनवल्या गेल्या होत्या.

Image may contain: fire and textहे झाले थोडे विषयांतर. पुन्हा बॉवर मॅन्युस्क्रीप्टसकडे वळूया. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हर्न्लेने शोधून काढले की त्यांमध्ये एकूण ७ खंड होते: २ ज्योतिषविषयक, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. ह्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या सुरुवातीला १० अश्या 'पवित्र' व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे की ज्या हिमालयाच्या परिसरात रहात होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होत्या. ही नावे होती: अत्रेय, हरित, पराशर, भेल, गार्ग, संभव्य, वसिष्ठ, कारल, काप्य आणि - आणि - सुश्रुत! ह्यापुढे जाऊन हे जे ३ पुरातन वैद्यकीय खंड बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमध्ये होते त्याचे लेखक होते: चरक, भेल, आणि - होय - सुश्रुत!

अश्याप्रकारे भारतातील एक ऋषीतुल्य व्यक्तीचे नाव एका ऐतिहासिक दस्तावेजात येण्याची जगातली ही पहिली वेळ होती. बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा कालखंड विज्ञानाच्या आधारे निश्चित करता येत होता आणि त्यामध्ये सुश्रुताचे नाव एक वैद्य म्हणून आल्याने हे निश्चित झाले की भारतीयांना कमीतकमी ईसवी सन ६५० मध्ये सुश्रुताच्या सुश्रुत संहितेबद्दल आणि त्यात सांगितलेल्या सर्जरी व प्लास्टिक सर्जरीबद्दल माहिती होती. मागील एका भागात दिलेल्या जेम्स बॉन्डच्या उदाहरणाप्रमाणे आपण अजूनही सुश्रुत खरा होता की नव्हता ह्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ईसवी सन ६५० मध्ये कोणी एक सुश्रुत नावाची व्यक्ती वैद्यकीय शास्त्रज्ञ मानली जात होती आणि त्याच्या नावाने एक 'सुश्रुत संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला गेला होता. कविराज कुंजलाल भिषगरत्न म्हणतात त्याप्रमाणे सुश्रुत संहितेचा काल ईसवी सन पूर्व ८०० असेलही कदाचित पण हाती असलेल्या पुराव्यांनी इतके नक्कीच म्हणता येते की ईसवी सन ६५० मध्ये आज माहित असलेली सुश्रुत संहिता नक्की माहित होती. ह्या सर्जरीच्या विषयावर लिहिले गेलेले आणि ह्यापेक्षा जुने असे दुसरे कोणतेही पुस्तक संपूर्ण जगात उपलब्ध नाही - त्यामुळे निश्चितच ही आपल्या भारतीयांसाठी मोठ्या गर्वाची गोष्ट आहे!

पण सुश्रुत संहिता खरच इतकी भारी आहे? का उगाच फक्त ती भारतीय आहे म्हणून मी तिचे गोडवे गातोय? माझे आयुर्वेदावरचे ज्ञान जवळपास शून्य आहे. पण इतक्या शतकांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या ग्रंथात जे वैद्यकीय क्षेत्रासंबंधित ज्ञान संपादित केलेले आहे ते पाहून माझ्यासाख्या (थोडेफार फक्त इतिहास विषयाशिवाय इतर वाचन नसणाऱ्या) माणसाचेसुद्धा भान हरपून जायला होते. उदाहरणार्थ: ह्या संहितेत ७६ प्रकारचे डोळ्याचे रोग सांगितलेले आहेत - १२१ प्रकारच्या सर्जरीत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे उल्लेख आहेत - ४२ सर्जीकल प्रोसेसेसचे उल्लेख आहेत - आणि हे सर्व कमी आहे की काय म्हणून जवळपास ७०० विविध वनस्पतींचे त्यांच्या औषधी गुणानुसार ३७ विविध गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे! आणि हे सर्व - कविराजांचे मत ग्राह्य धरले तर २८०० वर्षांपूर्वी - किंवा हाती असलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे वय लक्षात घेतले तर १४०० वर्षांपूर्वी!

आता एक अप्रुपाची गोष्ट. सुश्रुत संहितेच्या पहिल्या खंडातील - सूत्रस्थानमधील - सोळाव्या अध्यायात खालील श्लोक आहेत:

विश्लेषितायास्त्वथ नासिकाया वक्ष्यामि सन्धानविधिं यथावत् |
नासाप्रमाणं पृथिवीरुहाणां पत्रं गृहीत्वा त्ववलम्बि तस्य ||२७||

तेन प्रमाणेन हि गण्डपार्श्वादुत्कृत्य बद्धं त्वथ नासिकाग्रम् |
विलिख्य चाशु प्रतिसन्दधीत तत् साधुबन्धैर्भिषगप्रमत्तः ||२८||

सुसंहितं सम्यगतो यथावन्नाडीद्वयेनाभिसमीक्ष्य बद्ध्वा |
प्रोन्नम्य चैनामवचूर्णयेत्तु पतङ्गयष्टीमधुकाञ्जनैश्च ||२९||

सञ्छाद्य सम्यक् पिचुना सितेन तैलेन सिञ्चेदसकृत्तिलानाम् |
घृतं च पाय्यः स नरः सुजीर्णे स्निग्धो विरेच्यः स यथोपदेशम् ||३०||

रूढं च सन्धानमुपागतं स्यात्तदर्धशेषं तु पुनर्निकृन्तेत् |
हीनां पुनर्वर्धयितुं यतेत समां च कुर्यादतिवृद्धमांसाम् ||३१||

(भावार्थ: आता मी तुम्हाला कृत्रिम नाक जोडायची पद्धत सांगतो. सुरुवातीला झाडाचे एक पान घ्या जे नाकाच्या कापल्या गेलेल्या भागावर लांबीरुंदीने व्यवस्थित बसेल. हे माप घेऊन झाले की ह्या मापाने गालावर खूण करून घेऊन खालून वर सुरीने त्वचा कापून घावी. ही त्वचा संपूर्णपणे शरीरापासून वेगळी होऊ न देता नाकावर लावण्यात यावी. त्यानंतर थंड डोक्याच्या डॉक्टरने त्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी (साधुबंद) बांधावी. डॉक्टरने हे पण पहावे की सर्व भाग व्यवस्थित चिकटले आहेत आणि त्यानंतर दोन नळ्या श्वासोच्छवासाठी आणि त्वचा खाली नाकात चिकटू नये म्हणून तेथे घाल्याव्यात.)

लागला क्लू? ओळखीची वाटतेय ही पद्धत? पहिल्या भागात आपण पाहिलेल्या कावसजीच्या ऑपरेशनशी ही पद्धत किती मिळतीजुळती आहे पहा - फक्त फरक इतकाच की त्या कुंभाराने कपाळावरची त्वचा वापरली आणि सुश्रुत गालावरची त्वचा वापरायला सांगतो - बस्स बाकी काही नाही! पण त्वचा वाळू न द्यायची 'ट्रीक' तीच आहे - की मूळ शरीरापासून ती वेगळी होऊ न देणे. कावसजीच्या आधी कमीतकमी १००० वर्षे ही पद्धत भारतात वापरली जात होती हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमुळे सिद्ध झाले आणि हे जगन्मान्य आहे!

थोडंसं विषयांतर पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमधली भाषा आणि लिपी त्या वेळच्या वापरल्या जाणाऱ्या सामान्यांच्या वापरातील होती. भारतात ज्ञानसाधना ही कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक वर्गाची मक्तेदारी नव्हती असाही ह्यातून निष्कर्ष काढता येतो. हेच ज्ञान परंपरागत पुढे गेले. १७९४ मध्येही त्या कुंभाराने चक्क सुश्रुत संहितेतील पध्दत वापरली ह्यात कोणालाही वावगं काही वाटलं नाही ह्यातूनही तेच अधोरेखित होते.

पुढे ह्या कावसजीबद्दलच्या लेखाने जगातली प्लास्टिक सर्जरीची दिशा खरंच बदलली. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुरु झाले. कावसजीचा लेख १७९४ मध्ये येउन गेल्यानंतर एक इंग्लिश सर्जन जोसेफ कॉन्स्टन्टाइन कार्प्यू (Carpue) हा सुश्रुताची कृत्रिम नाक बसवायची पद्धत लंडनमध्ये वापरू लागला. त्याने १८१४ आणि १८१५ मध्ये ह्या पद्धतीने दोन यशस्वी ऑपरेशन्स केली. ह्यावर त्याने १८१६ मध्ये 'An Account of two successful operations for restoring a lost nose from the integuments of the forehead' ह्या नावाने एक प्रबंधपण लिहिला. कार्प्यूच्या प्रबंधाचे १८१७ मध्ये कार्ल फर्डिनांड फॉन ग्रेफ (Graefe) ह्या जर्मन सर्जनने जर्मन भाषेत भाषांतर केले. त्यानंतर पुढे त्याने स्वतःचे एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव होते ‘ऱ्हीनोप्लास्टिक' (Rhinoplastik). ह्या सर्जरीला 'प्लास्टिक' हे नाव सर्वात प्रथम त्याने वापरले. कार्प्यू आणि ग्रेफच्या कामाची युरोपात भरपूर प्रशंसा झाली. 'ऱ्हीनोप्लास्टी' ह्या कृत्रिम नाक बसवायच्या सर्जरीला खूप मागणी येऊ लागली. आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा पाया जगात ह्या दोघांनी ऱ्हीनोप्लास्टीद्वारे घातला असे मानले जाते. कावसजीची गोष्ट खरी असो वा नसो - पण ह्याचे मूळ श्रेय सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला जाते हे मात्र त्रिवार सत्य आहे - म्हणूनच सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला 'Father of Plastic Surgery' आपण सर्व जगात छातीठोकपणे म्हणू शकतो!

समाप्त

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो: बॉवर मॅन्युस्क्रीप्टचा एक भाग

ता क: बॉवर मॅन्युस्क्रीप्टस सध्या कुठे आहेत? इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डमध्ये - युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या बॉडलिअन लायब्ररीत हर्न्लेची आठवण म्हणून ह्या जतन करून ठेवलेल्या आहेत. जर कुणी लंडनला येणार असेल तर मला नक्की सांगा, आपण बघायला जाऊया!

जिज्ञासूंना हर्न्लेने केलेले बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे भाषांतर येथे वाचायला मिळेल: https://archive.org/stream/TheBowerManuscript#page/n1/mode/2up

शोध सुश्रुताचा - भाग ४

Image may contain: 3 peopleसोबतचे पहिले चित्र पहा. दिसतात की नाही दोघे दाढीवाले सख्खे भाऊ? अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावसभाऊ होते हे दोघे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या जगातल्या दोन सर्वशक्तिमान साम्राज्यांचे सम्राट होते. डावीकडचा आहे रशियाचा झार दुसरा निकोलस आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज (आपल्यासाठी त्या काळचा 'भो पंचम भूप जॉर्ज' वगैरे वगैरे). ह्या दोन भावांमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरु झाली - मध्य आशियात साम्राज्य विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवे होते आणि ब्रिटीशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती. आणि ब्रिटीशांना मध्य आशियामधले रशियाचे अस्तित्व नकोच होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील होते. ह्या चढाओढीचे नावपण इतिहासात समर्पकपणे ठेवलेले आहे - 'द ग्रेट गेम'. ह्या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. ह्याच चढाओढीत काही वर्षांनी ह्या दोघांचा तिसरा मावस भाऊ उतरला - तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कैझर विल्हेम आणि ह्या ग्रेट गेमचे रुपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झाले. तीन मावस भावांनी आपापसात खेळलेले हे युद्ध - पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली!

आपल्याला पहिल्या महायुद्धाइतके दूर जायचे नाहीये. आपण एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी थांबूया. सन १८८८. इराण नावाचा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्या ठिकाणी भरपूर टोळ्या आणि अनेक छोटी मोठी संस्थाने होती. 'खानत' म्हणत असत त्यांना. अमिरांच्या अमिराती आणि खानांच्या खानत. अफगाणिस्थानची परिस्थिती अगदी आजच्यासारखी होती. कोणतीही मध्यवर्ती राजवट नसलेली. (आणि असली तरी तिला न जुमानणाऱ्या 'सार्वभौम' टोळ्या!). मध्य आशियातल्या देशांमधले बरेचसे ब्रिटीश, रशियन, तुर्की, आणि अफगाणी व्यापारी पार्ट टाईम व्यापार करायचे आणि पार्ट टाईम इंग्लंडसाठी किंवा रशियासाठी हेरगिरी करायचे. त्यांचे मोठे मोठे व्यापारी काफिले असायचे त्यामुळे हेरगिरी वगैरे उद्योग सोपे पडायचे आणि वरून भरपूर पैसे. हेरगिरी म्हणजे त्या त्या भागातली माहिती (विशेषकरून सैनिकी) आणायची आणि आपापल्या ब्रिटीश किंवा रशियन मालकांना पुरवायची. असाच एक स्कॉटीश व्यापारी होता. ॲंड्रू दाल्ग्लेइश (Andrew Dalgleish) हे त्याचे नाव. हा ब्रिटीश हेर होता. ह्याची बायको मध्य आशियातल्या यार्कंद भागातली होती. स्वतः ॲंड्रूला तिकडची स्थानिक उघ्यूर भाषा नीट अवगत होती. त्यामुळे व्यापार आणि हेरगिरी दोन्ही सुरळीत चालले होते. लेह-लडाख मधून मध्य आशियात हा व्यापारासाठी बरीच ये-जा करायचा.

मार्च १८८८ मध्ये व्यापारासाठी ॲंड्रू लेहवरून यार्कंदला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर बरेचसे नोकर आणि अनेक स्थानिक यात्रेकरू होते. काही अंतर गेल्यावर दाउद मोहोम्मद नावाचा एक क्वेट्टा भागातला पठाण त्याच्या काफिल्यात सामील झाला. दाउद मोहोम्मद पूर्वीचा व्यापारी होता पण व्यापारात दिवाळे निघाल्याने सध्या रशियासाठी लपून-छपून हेरगिरी करत होता. ८ एप्रिल १८८८ रोजी हा काफिला काराकोरम खिंडीत पोहोचला. ॲंड्रू सगळ्यांच्या पुढे होता. काराकोरम खिंड पार करून त्याने आपला तंबू बर्फात टाकला होता. संध्याकाळ झाली होती. थोडे चहापाणी करून आवरेपर्यंत बाकीच्या सगळ्यांची खिंड पार करून झाली. बाकी काफिल्याचे तंबू ठोकून झाले. ॲंड्रू सगळ्या तंबूंची पहाणी करायला निघाला. अनेक लोकांनी त्याला चहा विचारला पण सस्मित नाही म्हणून तो पुढे निघाला. जाताजाता प्रत्येक तंबूमधून रोटीचा छोटा तुकडा घ्यायला तो विसरला नाही. (मुस्लिम जगतात बंधुभाव दाखवण्यासाठी ह्या प्रथेला फार मोठे महीत्त्व होते - आणि ॲंड्रूला हे नीट माहित होते!) चालत चालत तो काफिल्याच्या शेवटी पोहोचला. दाउद मोहोम्मदचा तंबू नुकताच लावून झाला होता. त्याच्या तंबूत बसून ॲंड्रूने त्याचा हालहवाल विचारला. व्यापार नीट कसा करावा ह्याचा ॲंड्रू त्याला सल्ला देत होता. अचानक मोहोम्मद उठला. ॲंड्रूने विचारले, "कुठे चाललास?" मोहोम्मद म्हणाला, "काही नाही. जरा बाहेर जाऊन येतो." मोहोम्मद ताडकन तंबूबाहेर गेला. ॲंड्रूला कसलाच संशय आला नाही. मोहोम्मद बाहेर जाउन त्याची बंदूक घेऊन आला आणि तंबूच्या भिंतीमधून त्याने ॲंड्रूवर पाठीमागून गोळी चालवली. गोळी ॲंड्रूया खांद्याला लागली. तो कळवळला पण लगेच उठायचा प्रयत्न त्याने केला. त्याचा तंबू होता सर्वात पुढे म्हणजे अगदी लांब. त्यामुळे कोणतेही हत्यार आणणे अशक्य होते आणि आता दाउद मोहोम्मद नंगी तलवार घेऊन त्या तंबूत घुसला होता. दाउदने केलेले तलवारीचे वार ॲंड्रूने दोन हातांनी झेलायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी तो जखमी अवस्थेत बाहेर पळाला आणि बर्फात उताणा पडला. दाउद मोहोम्मदाने त्याचावर सपासप वार करून त्याला यमसदनास धाडले. ॲंड्रूचे नोकर आणि असलेले यात्रेकरू हा सगळा प्रसंग घाबरून बघत होते. दाऊदने त्या सर्वांना धमकावले. रात्रीचे जेवण बनवले गेले. दाउद ॲंड्रूच्या तंबूत परतला आणि ॲंड्रूच्या पलंगावरच त्या रात्री झोपला. सकाळी तो तिथून निघून गेला. अश्या प्रकारे एक ब्रिटीश हेर एका रशियन हेराकडून मारला गेला.

ॲंड्रू ब्रिटीशांचा 'माणूस' असल्याने ब्रिटीश सरकारने ह्या सर्व प्रकारचे साक्षी पुरावे करून लागलीच पुढच्या वर्षी - म्हणजे १८८९ मध्ये - हॅमिल्टन बॉवर नावाच्या एका आर्मी इन्टलीजन्स ऑफिसरला ह्या कामगिरीवर लेहला धाडले. ह्याचे काम एकच होते ते म्हणजे दाउद मोहोम्मदला पकडणे. संपूर्ण मध्य आशियामधून एका माणसाला शोधणे आणि त्याला पकडणे अशक्यप्राय काम होते. पण हॅमिल्टन बॉवरने हे काम स्वीकारले. तो लेहमधून निघाला आणि दाउद मोहोम्मदचा शोध घेत घेत तिआन शान डोंगरांच्या पायथ्याशी कुशर नावाच्या गावात पोहोचला. ह्या गावात दाउद मोहोम्मदची चौकशी करता करता त्याला एक तुर्की माणूस भेटला. त्याने बॉवरला सांगितले की जवळच एक वाळवंट आहे आणि स्थानिक लोक मानतात की त्याच्या खाली एक शहर गाडलेले आहे. तो माणूस आणि त्याचा मित्र तिथे खजिना शोधायला गेले होते. पण त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. फक्त एक जुनाट पुस्तकासारखे काहीतरी मिळाले. बॉवरला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला ते घेऊन यायला सांगितले. तासाभरात तो माणूस ते घेऊन परत आला. ते पुस्तक म्हणजे एक हस्तलिखित पोथी होती. (बॉवरच्या मूळ इंग्लिश ट्रॅव्हल रेकॉर्डस मध्ये 'पोथी' हाच शब्द आहे!) त्यातली अक्षरे संस्कृतसारखी होती. सहज उत्सुकता म्हणून बॉवरने ही पोथी पैसे देऊन विकत घेतली. पुढे आपले 'नेटवर्क' वापरून बॉवरने दाउद मोहोम्मदला समरकंदजवळ पकडले. (कसे पकडले ते सांगायची ही जागा नाही!) पण तुरुंगात दाउद मोहोम्मदने संशयितरीत्या फाशी लावून घेऊन आत्महत्या केली. (त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही!) बॉवरने लेहमध्ये ॲंड्रू दाल्ग्लेइशसाठी एक स्मारक बांधले आणि तो कलकत्त्याला परत आला. त्याने ती विकत घेतलेली पोथी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. त्याची भाषा अगदी वरवर संस्कृतसारखी वाटली तरी अगम्य भाषेत ती लिहिली होती - त्यांना काही ती वाचता येईना. कोणीतरी तज्ञ माणसाकडून त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे गरजेचे होते.

पुढे कोणी केले हे काम? नक्की काय होते त्या पोथीत लिहीलेले?

पुढच्या भागात पाहूया!

क्रमश:

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो १: रशियाचा झार दुसरा निकोलस आणि इंग्लंडचा पाचवा जॉर्ज, हॅमिल्टन बॉवर

फोटो २: बॉवरला मिळालेली 'पोथी' आणि त्यातील अगम्य भाषा

Sunday, December 2, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ३


एक मात्र नक्की की सुश्रुत नावाचा कोणी एक माणूस होऊन गेला ह्याची आपल्याकडे काहीही ऐतिहासिक नोंद नाही. इतिहास लिखाणाच्या बाबतीत एकूणच उदासीनता. मग कसं शोधायचं ह्या सुश्रुताला? पहिले सोप्पे उत्तर - अर्थातच सुश्रुत संहितेतून. इंटरनेटवर शोधले तर सुश्रुत संहितेबद्दल भरपूर म्हणजे अगदी भरपूर लेख, पुस्तके, आणि वर्तमानपत्रातले लेख मिळतात. पण सर्वात व्यापक आणि विश्वसनीय असे सुश्रुत संहितेचे इंग्रजीतले भाषांतर १९०७ साली केलेले कविराज कुंजलाल भिशग्रत्न ह्यांचे आहे. सूत्रस्थान / निदानस्थान - कल्पस्थान / उत्तर तंत्र असे हे तीन खंड आहेत. ह्या खंडांमध्ये कविराजांनी त्यांना उपलब्ध असणाऱ्या सर्व पुरातन हस्तलिखितांमधल्या सर्व 'सुश्रुत' ह्या नावाने येणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय कामाचा समावेश केला आहे. हे तीनही खंड बघण्यासारखे आहेत. लेखाच्या शेवटी मी ह्या तीनही खंडांच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या जिज्ञासूंनी पहाव्यात.
Image may contain: 1 personआता आपण सुश्रुत संहितेबद्दलच्या समस्या पाहूया. आज आपल्याला उपलब्ध असणारी सुश्रुत संहिता ही कमीत कमी एक वेळा आधीच्या एका सुश्रुत संहितेवर बेतलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन ह्याने ही आज आपल्याला माहित असलेली संहिता बनवलेली आहे. त्यामुळे हे सांगणे अशक्य आहे की त्यातले किती मूळचे आणि किती नागार्जुनाने वाढवलेले अथवा वगळलेले आहे. दुसरी समस्या म्हणजे कविराजांनी बघितलेल्या हस्तलिखितांमध्ये एकापेक्षा जास्त सुश्रुतांचा उल्लेख येतो. (सुश्रुताचा उल्लेख महाभारतातपण आहे!) त्यामुळे हे ठरवणे कठीण आहे की नेमका 'आपला' सुश्रुत कोणता! कविराजांच्या मते हा सुश्रुत गौतम बुद्धाच्या आधी २०० वर्षे होऊन गेला असावा - म्हणजे त्याचा काल ईसवी सन पूर्व ८०० येतो - पण ह्याबद्दल कोणतेच पुरावे नाहीत. काही इतिहास संशोधकांचे मत आहे की सुश्रुत बुद्धानंतर झाला. नक्की काहीच माहित नाही.
अजून पुढे काही प्रश्न उभे रहातात. सुश्रुत संहिता ही स्वतः सुश्रुताने लिहिली का त्याच्यानंतर काही शतकांनी त्याच्या एखाद्या शिष्याने? सुश्रुत मर्त्य मानव होता की पुराणांमधल्या अश्विनीकुमारांसारखा एखादा 'देव'? मी त्याला 'देव' म्हणण्याचे कारण सांगतो. हे उदाहरण पहा. समजा (असे न होवो पण) लंडन एखाद्या नैसर्गिक प्रलयामुळे गाडले गेले आणि आजपासून २००० वर्षानंतर उत्खनन सुरु असताना 'Leadership lessons from life of James Bond' ह्या नावाचे एक पुस्तक सापडले ज्याची काहीच मधली पाने शिल्लक आहेत. त्या वेळचे संशोधक काय अंदाज बांधतील? ते म्हणतील २००० वर्षांपूर्वी जेम्स बॉन्ड नावाचा कुणी एक महान नेता लंडनमध्ये होऊन गेला होता. आज आपली तीच परिस्थिती सुश्रुताबद्दल नाहीये का? आपल्याला फक्त लिखाणात 'सुश्रुत' भेटतो आणि बाकी कुठल्याच इतिहासात नाही. माझ्या म्हणण्याचा मुद्दा हा आहे की सुश्रुत संहिता पुस्तकाच्या कालावरून सुश्रुत कधी होऊन गेला (आणि झाला की नाही!) ह्याची काहीच माहिती मिळत नाही. पण आपल्याला समजा एखादे असे पुस्तक अथवा हस्तलिखित मिळाले ज्यामध्ये सुश्रुताच्या आयुष्याचा 'उल्लेख' येतो तर मग आपण मान्य करू की सुश्रुत नावाचा माणूस खरंच होऊन गेला. आणि हा उल्लेख जर एखाद्या शल्यक्रियेविषयीच्या हस्तलिखीतामध्ये मिळाला तर आपण नक्की म्हणू शकू की सुश्रुत नावाचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत माणूस होऊन गेला असावा. आपल्या लंडनच्या उदाहरणाकडे पुन्हा जाऊया. जर २००० वर्षांनंतर संशोधकांना २०१८ सालच्या वर्तमानपत्रात (ज्याची तारीख शाबूत आहे) जेम्स बॉन्ड चित्रपट परीक्षणाचा काही भाग वाचायला मिळाला तर? तर त्यांना असे म्हणता येईल की आधी मिळालेल्या पुस्तकातली व्यक्ती आणि परीक्षणातली व्यक्ती एकच आहे. ते असा निष्कर्ष काढू शकतील की जेम्स बॉन्ड हा २०१८ च्या आसपास होऊन गेला. पण हा माणूस खरा होता की नाही हे ते सांगू शकतील का? अजिबात नाही!
पुढची पायरी म्हणजे एखादे जुने हस्तलिखित (ज्यात सुश्रुताचा उल्लेख आहे) मिळवून त्याचा काल निश्चित करणे आणि त्यावरून सुश्रुताच्या कालखंडाचा अंदाज करणे. पण हेही खूप कठीण आहे कारण आपल्याकडच्या हस्तलिखित ग्रंथांचे कालखंड फारसे जुने नाहीयेत. आपल्याकडच्या सर्वात जुन्या ऋग्वेदाची प्रत सन १४६४ मधली आहे (पुण्याच्या भांडारकर ईन्स्टीटयुटमध्ये ठेवलेली आहे) - ह्यावरून असं म्हणायचं का की ऋग्वेद फक्त ५५० वर्षे जुना आहे? किंवा ह्याआधी भारतात ग्रंथच लिहीले गेले नाहीत? म्हणजे ही पद्धतपण संपूर्ण विश्वसनीय नाहीये. दुर्दैवाने सुश्रुत नावाच्या माणसाचा आपला शोध येथे येऊन थांबल्यासारखा होतो.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न - इटलीमध्ये कागदोपत्री पुरावे आहेत की त्यांच्याकडे सोळाव्या शतकात त्वचारोपणाचे प्रयोग सुरु झाले होते आणि काही यशस्वीसुद्धा होत होते. मग मागील लेखात पाहिल्याप्रमाणे सुश्रुतालाच जग ह्या शास्त्राचे जनक का म्हणते? कशावरून हे जगमान्य आहे की भारतात त्यांच्या आधी हे शास्त्र विकसित झालेले होते? असे एखादे हस्तलिखित अथवा ग्रंथ आहे की ज्यात सुश्रुताचा उल्लेख आढळतो आणि जो १९०७ सालच्या आधी कविराजांनी अभ्यासला नाही? ह्याचे उत्तर आहे - होय! कविराजांनी त्यांचे ग्रंथ प्रकाशित करायच्या आधी ही हस्तलिखिते लेह भागात घडलेल्या एका संशयित रशियन गुप्तहेराच्या खूनामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या अपघातात्मक परिस्थितीमुळे सापडली होती. एखाद्या हॉलीवूडपटात शोभावी अशी ती घटना होती. काय झाले होते नक्की? कशी शोधली गेली ही हस्तलिखिते? पुढच्या लेखात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: कविराज कुंजलाल भिशग्रत्न
सुश्रुत संहिता - खंड १: https://archive.org/stream/englishtranslati01susruoft…
सुश्रुत संहिता - खंड २: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaDvitiyaKhanda1…
सुश्रुत संहिता - खंड ३: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaTritiyaKhanda1…

शोध सुश्रुताचा - भाग २


मागील भागात आपण पाहिलं की ऑक्टोबर १७९४ मध्ये पुण्यातल्या एका कुंभाराने कावसजीवर केलेल्या सर्जरीमुळे युरोपातील - विशेषतः इंग्लंडमधील डॉक्टरांची आणि सर्जन्सची झोप उडाली. येथे एक गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे की ती वाहवा त्या सर्जरीला मिळाली होती - ती एका 'कुंभाराने' केली होती म्हणून नव्हे. इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स - जिची फेलोशिप जगातले डॉक्टर्स मिळवतात आणि मानाने Fellow of Royal College of Surgeons (F.R.C.S.) असे स्वतःच्या नावामागे लावतात - ह्या संस्थेचे संस्थापक मूळचे न्हावी होते. इंग्लंडमध्ये पंधराव्या - सोळाव्या शतकांमध्ये जखमी सैनिकांवर सर्जरी मुख्यतः हे न्हावी (ज्यांना 'बार्बर सर्जन्स' म्हणत) करत असत. आजही इंग्लंडमध्ये पारंपारिक सर्जन्सना स्वतःला 'डॉक्टर' म्हणून घ्यायला आवडत नाही. त्यांच्यामते औषधे देणारा साधा 'मेडिसिन मॅन' म्हणजे 'डॉक्टर' - 'सर्जन' म्हणजे त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा (शैक्षणिकदृष्ट्या) जो प्रत्यक्ष ऑपरेशन करतो आणि म्हणून त्यांच्या स्वतः च्या नावामागे ते 'मिस्टर' लावतात आणि नावापुढे FRCS. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची स्थापना १८०० ची म्हणजे कावसजीवर केलेल्या ऑपरेशननंतर फक्त ६ वर्षांनंतर झाली - हा नक्कीच योगायोग नव्हता!
Image may contain: 1 person, sittingआता पुन्हा सुश्रुताकडे वळूया. त्याआधी एक गोष्ट करून पहा. गुगल ईमेज सर्च मध्ये 'Sushrut Surgeon India' हे सर्च करून पहा. पहिला जो फोटो येतो तो आपण सगळीकडे पाहिलेला असतो. एक दाढीवाला तेजस्वी माणूस एका रुग्णाच्या चेहेऱ्यावर काहीतरी शस्त्रक्रिया करत आहे. साधी पांढरी धोतरे घातलेले त्यांचे दोन सहाय्यक आहेत ज्यांनी रुग्णाला धरून ठेवले आहे - एक साडी नेसलेल्या बाई हातात काहीतरी घेऊन त्यांना मदत करत आहेत. एक सहाय्यक फक्त मागे उभा राहून हे सर्व पहात आहे. राजा रवि वर्म्याने काढल्यासारखे वाटते हे चित्र. बरेचदा त्याखाली लिहिलेले असते "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये प्लास्टिक सर्जरी करताना" किंवा "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करताना". चित्र तेच असते फक्त कॅप्शन्स वेगवेगळ्या असतात. ह्या असल्या चित्रांखाली मी 'सुश्रुत' हे नाव पहिल्यांदा वाचले.
मग मी शोधायचा प्रयत्न केला कोणी बरं काढलं आहे हे चित्र? चित्रातला माणूस खरंच 'सुश्रुत' आहे का? काही तथ्य आहे का ह्या कॅप्शन्समध्ये? बऱ्याच शोधाअंती समजलं की हे चित्र कुणा भारतीयाने काढलेले नाहीयेच! १९४८ मध्ये पार्क - डेव्हीस नावाच्या औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीने रॉबर्ट थोम नावाच्या चित्रकाराला ८५ चित्रे काढायचे काम दिलेले होते - त्याने ८ वर्षे रिसर्च करून ही सगळी चित्रे काढली - त्यातलेच हे एक चित्र! पार्क - डेव्हीस कंपनीने ही सगळी चित्रे एकत्र करून त्याचे विविध संच बनवले आणि अमेरिकेतल्या सगळ्या डॉक्टरांकडे पाठवून दिले. अनेक डॉक्टरांनी ही चित्रे आपापल्या वेटिंग रूम मध्ये लावून टाकली. मग पार्क - डेव्हीस कंपनीने हळूच कंपनी ब्रांडीगसाठी ही चित्रे वापरून टाकली. आपण जे हे 'सुश्रुता'चे चित्र पहातोय त्याची फुल पेज जाहिरात १० ऑगस्ट १९५९ च्या 'टाईम' मासिकात आलेली होती. खाली लिहिले होते "Plastic Surgery, usually regarded as a recent medical advance, was practised thousands of years ago by a Hindu surgeon, Susruta. Living in a society that punished wrongdoers with physical disfigurement, his restorative skills were greatly in demand. His writings contributed to the spread of Hindu medicine throughout the ancient world.". पुढच्या काही दशकांमध्ये हे चित्र भारतात आले. आपल्याकडे त्याच्या लाखो-करोडो कॉप्या बनल्या आणि एका औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या ऐवजी हे चित्र आयुर्वेद आणि सुश्रुताचे 'ब्रांडीग' करू लागले!
जर पार्क - डेव्हीस कंपनीला खात्री होती की सुश्रुत होता आणि तो ही ऑपरेशन्स करायचा मग आपण कशाला आपलं डोकं खपवतोय? रॉबर्ट थोमने सुद्धा जवळपास ८ वर्षे अभ्यास करून मगच ही चित्रे काढली होती - मिळाले असेल त्याला एखादे सुश्रुताचे चित्र - आपल्याला काय करायचेय? पण आपण जर इथेच थांबलो तर आपल्याला सुश्रुताचा 'शोध' कधीच लागणार नाही. भारतात जवळपास १००० वर्षांपूर्वी ही ऑपरेशन्स होत असत ह्याची खात्री देता येणार नाही. खरंच सुश्रुत नावाचा कोणी माणूस होऊन गेला का? खरंच तो प्लास्टिक सर्जरी करायचा का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत रहातात!
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या आधी आपण छोट्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. सुश्रुत कोण होता? याचा कार्यकाल काय होता? अनेक संदर्भ - अगदी पार्क - डेव्हीसच्या जाहिरातीपण - सांगतात की सुश्रुत ह्या शास्त्राचा जनक होता. ह्या शास्त्राची सर्व सूत्रे सुश्रुतच्या पुस्तकात - 'सुश्रुत संहिते'त मिळतात. सुश्रुताबद्दल आपल्याकडे काहीच माहिती नाही पण नशिबाने 'सुश्रुत संहिता' मात्र उपलब्ध आहे.
मग कोणी लिहिली 'सुश्रुत संहिता' आणि कधी? शोधू शकतो का आपण? हे आपण पुढच्या भागात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: रॉबर्ट थोमचे सुप्रसिद्ध चित्र

शोध सुश्रुताचा - भाग १

देश इंग्लंड. जानेवारी १७३१ चा हाडे गोठवून टाकणारा थंड गारठा. इंग्रजी भाषेला इंग्लंडच्या राष्ट्रभाषेचा दर्जा मिळून फक्त ८० वर्षे झालेली. सन १०६६ नंतर इंग्लंडमध्ये इंग्रजी बोलणे कमीपणाचे मानले जात असे. सध्या मराठीचे जे मुंबईत हाल आहेत तेच इंग्रजीचे इंग्लंडमध्ये हाल होते. तिला अशिक्षित खेडवळांची भाषा मानली जात असे. इंग्रजीत कोणतीही साहित्यनिर्मिती होत नसे. जवळपास ५५० हून अधिक वर्षे खुद्द इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषा फ्रेंच आणि लॅटिन भाषेच्या वर्चस्वाखाली होती. लोकांच्या दबावामुळे शेवटी १६५० मध्ये कोर्टाच्या निकालाने जानेवारी १६५१ पासून इंग्रजीचा सार्वत्रिक वापर (राज्यकारभारात / न्यायदानात / सार्वजनिक शिक्षणात इत्यादी.) इंग्लंडमध्ये पुन्हा सुरु झाला आणि इंग्रजीला पुन्हा वैभवाचे दिवस आले. त्या तपशीलवार इतिहासाबद्दल पुन्हा कधीतरी.
Image may contain: 2 peopleतर पुन्हा वळूया जानेवारी १७३१. पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम संपले नव्हते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायला ४५ वर्षे शिल्लक होती. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एडवर्ड केव्ह नावाच्या माणसाने जगातले पहिलेवहिले मासिक छापले. 'द जन्टलमन्स मॅग्झिन' हे त्याचे नाव. एडवर्ड हा एका चांभाराचा मुलगा. अत्यंत धडपड्या. त्याने ही मासिकाची कल्पना लंडनमध्ये बऱ्याच लोकांकडे मांडली पण कुणाला पसंत पडली नाही. शेवटी त्याने स्वतःच कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. हे ते आद्य मासिक आणि त्यानंतर आलेली जगातली सर्व मासिके ह्याच 'द जन्टलमन्स मॅग्झिन' वर बेतलेली आहेत. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक ह्या मासिकासाठी लिहीत असत. युरोपात ह्या मासिकाला प्रचंड मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनी त्या वेळी भारतात आपले हातपाय पसरत होती. त्यामुळे पूर्वेकडील देशांमधील विविध गोष्टी - चालीरीती ह्या मासिकामूळेच युरोपात कळाल्या. तब्बल २०० वर्षे हे मासिक चालले आणि १९२२ मध्ये बंद झाले. ह्या लेखाचा विषय हे मासिक नाहीये. मी ह्या मासिकाचे जुने अंक चाळत असताना ऑक्टोबर १७९४ मध्ये ह्या मासिकात आलेला एक लेख माझ्या पहाण्यात आला. तो लेख हा कुतूहलाचा मुद्दा आहे. तो काय ते आपण पाहूया.
ह्या लेखाचे नाव होते "A portrait illustrative of a remarkable chirurgical operation" (म्हणजे मराठीत: "एका शल्यक्रियेचे चित्र आणि लेख"). ह्या चित्रात एक कावसजी नावाचा मराठी (होय!) माणूस दाखवला आहे. काळासावळा. डोक्यावर पागोटे असलेला. खांद्यावर फडके घेतलेला. एकदम दमदार गडी. कावसजीचे चित्र 'द जन्टलमन्स मॅग्झिन' मध्ये यायचे कारण म्हणजे पुण्यात (होय पुण्यात!) त्याच्यावर झालेली Rhinoplasty (ऱ्हीनोप्लास्टी: म्हणजे कृत्रिम नाक बसवण्याची शस्त्रक्रिया!). १७९४ मध्ये जेव्हा युरोपातील डॉक्टर शरीरातील एकीकडील त्वचा दुसरीकडे लावू शकत नव्हते तेव्हा कावसजीचे संपूर्ण नाक कृत्रिमरित्या बसवले होते. आणि ते कोणत्या राजवाड्यात नाही तर पुण्यातील रस्त्यावर - आणि तेपण एका पार्ट टाईम शल्यविशारदाने!
ह्या चित्रानंतर एक लेख होता. त्याचा सारांश असा - दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजीचे संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. तिसऱ्या इंग्रज टिपू युद्धात कावसजी इंग्रजांच्या बाजूने लढत होता आणि टिपूच्या सैन्याद्वारे पकडला गेला. कावसजी हा काही शिपाई नव्हता आणि सैन्यात बैलगाडी चालवत होता. त्यावेळच्या प्रचलित शिक्षेनुसार कावसजीचे नाक कापून टाकले गेले. कावसजी तिथून पुण्याला गेला आणि एका कुंभाराकडून हे नवीन नाक बसवून घेतले.
त्या कुंभाराने सर्वप्रथम मेणाने कावसजीच्या नाकाच्या मापाचा आकार बनवून घेतला. तो कावसजीच्या कपाळावर (चेहेऱ्यावर नाकाच्या ठिकाणी नव्हे!) बसवला. कपाळावर त्या मेणाभोवती त्याचा आकार (outline) काढून घेतला. नंतर एका चाकूने त्या आकाराची त्वचा कापली पण ती संपूर्ण कापून टाकली नाही. दोन डोळ्यांच्या मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवली. त्यानंतर मेणाला नाकाचा आकार देऊन ते नाकाच्या जागी बसवले. कपाळावरून आणलेली त्वचा त्याच्यावर पांघरली. थोड्या जडीबुटी लावल्या. काही आठवड्यात ती त्वचा नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) रुजली. कपाळाचा व्रण तीन महिन्यांनी भरला. ह्या लेखाचा समारोप "This operation is very generally successful." ह्या वाक्याने केलेला आहे. अधिक माहितीसाठी सोबतचे कावसजीचे मूळ चित्र पहा.
ह्या लेखाने युरोपात खळबळ माजवली. युरोपिअन डॉक्टर्स ह्या गोष्टीवर अनेक वर्षे रिसर्च करत होते. पण शरीराचा कोणताही भाग कापला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला की तो वाळून जात असे. त्याला योग्य रक्तपुरवठा अथवा प्राणवायू न मिळाल्याने तो कोमेजून जात असे. युरोपिअन डॉक्टर्स गालांवरून अथवा मांड्यांवरुन नीट त्वचा कापू शकत असत पण ती खोट्या नाकावर बसवली की ती कडक होऊन जात असे - आणि ह्यासाठी त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. पण ह्या पुणेरी कुंभाराने हा प्रश्न सोडवला होता. डोळ्यांच्या मध्ये ती त्वचा मूळ शरीराशी संलग्न असल्याने ती वाळून जायचा अथवा कडक व्ह्यायचा प्रश्न उरला नाही. त्या त्वचेला रक्त आणि प्राणवायू नियमित मिळाल्याने नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) ती व्यवस्थित रुजत होती. आणि एकदा का ती रुजली की मग डोळ्यांच्या मधील तो ब्रीज कापून टाकत असत. कपाळावर व्रण रहात असे पण संपूर्ण नाक नसण्यापेक्षा हे केव्हाही बरे होते!
कावसजीबद्दलच्या या लेखाबद्दल गेली अनेक शतके वाद सुरु आहेत. अगदी २००९ मध्येपण ब्रिटीश मेडिकल जर्नल्स हा विषय चघळत होती. हा कावसजीबद्दलचा लेख खरा असो वा नसो पण ह्या एका लेखाने संपूर्ण युरोपातील डॉक्टर्स आणि सर्जन्सना हलवून टाकले. त्यांची विचारसरणी बदलून टाकली. सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ह्या शाखांमधील मूलभूत बदलांसाठी हा लेख कारणीभूत ठरला. सर्जरीसाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांमध्ये बदल करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताबद्दल आणि भारतीय चिकित्सापद्धतीबद्दल त्यांच्या मनात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली. आयुर्वेदाचे नाव युरोपात ह्याआधी गेले होते. कोणी एक 'सुश्रुत' हा "Father of Plastic Surgery" म्हणून त्यांना माहीत होता. त्याची 'सुश्रुत संहिता' ऐकून माहीत होती. पण त्याची पद्धत वापरून त्या कुंभाराने केलेले ऑपरेशन मात्र सर्वांची वाहवा मिळवून गेले.
कोण होता हा सुश्रुत? खरंच होता का तो "Father of Plastic Surgery"? पाहूया आपण पुढच्या भागात!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: 'द जन्टलमन्स मॅग्झिन'चा संस्थापक एडवर्ड केव्ह, कावसजीचे ऑक्टोबर १७९४ मधले चित्र
ता. क. १: ज्यांना हा मूळचा १७९४ चा लेख पहायचा असेल त्यांनी खालील लिंकवर पान ८९१ पहावे.
ता. क. २: जिज्ञासूंना 'द जन्टलमन्स मॅग्झिन' चे काही लेख खालील लिंकवर वाचायला मिळतील: