एक मात्र नक्की की सुश्रुत नावाचा कोणी एक माणूस होऊन गेला ह्याची आपल्याकडे काहीही ऐतिहासिक नोंद नाही. इतिहास लिखाणाच्या बाबतीत एकूणच उदासीनता. मग कसं शोधायचं ह्या सुश्रुताला? पहिले सोप्पे उत्तर - अर्थातच सुश्रुत संहितेतून. इंटरनेटवर शोधले तर सुश्रुत संहितेबद्दल भरपूर म्हणजे अगदी भरपूर लेख, पुस्तके, आणि वर्तमानपत्रातले लेख मिळतात. पण सर्वात व्यापक आणि विश्वसनीय असे सुश्रुत संहितेचे इंग्रजीतले भाषांतर १९०७ साली केलेले कविराज कुंजलाल भिशग्रत्न ह्यांचे आहे. सूत्रस्थान / निदानस्थान - कल्पस्थान / उत्तर तंत्र असे हे तीन खंड आहेत. ह्या खंडांमध्ये कविराजांनी त्यांना उपलब्ध असणाऱ्या सर्व पुरातन हस्तलिखितांमधल्या सर्व 'सुश्रुत' ह्या नावाने येणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय कामाचा समावेश केला आहे. हे तीनही खंड बघण्यासारखे आहेत. लेखाच्या शेवटी मी ह्या तीनही खंडांच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या जिज्ञासूंनी पहाव्यात.
आता आपण सुश्रुत संहितेबद्दलच्या समस्या पाहूया. आज आपल्याला उपलब्ध असणारी सुश्रुत संहिता ही कमीत कमी एक वेळा आधीच्या एका सुश्रुत संहितेवर बेतलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन ह्याने ही आज आपल्याला माहित असलेली संहिता बनवलेली आहे. त्यामुळे हे सांगणे अशक्य आहे की त्यातले किती मूळचे आणि किती नागार्जुनाने वाढवलेले अथवा वगळलेले आहे. दुसरी समस्या म्हणजे कविराजांनी बघितलेल्या हस्तलिखितांमध्ये एकापेक्षा जास्त सुश्रुतांचा उल्लेख येतो. (सुश्रुताचा उल्लेख महाभारतातपण आहे!) त्यामुळे हे ठरवणे कठीण आहे की नेमका 'आपला' सुश्रुत कोणता! कविराजांच्या मते हा सुश्रुत गौतम बुद्धाच्या आधी २०० वर्षे होऊन गेला असावा - म्हणजे त्याचा काल ईसवी सन पूर्व ८०० येतो - पण ह्याबद्दल कोणतेच पुरावे नाहीत. काही इतिहास संशोधकांचे मत आहे की सुश्रुत बुद्धानंतर झाला. नक्की काहीच माहित नाही.
अजून पुढे काही प्रश्न उभे रहातात. सुश्रुत संहिता ही स्वतः सुश्रुताने लिहिली का त्याच्यानंतर काही शतकांनी त्याच्या एखाद्या शिष्याने? सुश्रुत मर्त्य मानव होता की पुराणांमधल्या अश्विनीकुमारांसारखा एखादा 'देव'? मी त्याला 'देव' म्हणण्याचे कारण सांगतो. हे उदाहरण पहा. समजा (असे न होवो पण) लंडन एखाद्या नैसर्गिक प्रलयामुळे गाडले गेले आणि आजपासून २००० वर्षानंतर उत्खनन सुरु असताना 'Leadership lessons from life of James Bond' ह्या नावाचे एक पुस्तक सापडले ज्याची काहीच मधली पाने शिल्लक आहेत. त्या वेळचे संशोधक काय अंदाज बांधतील? ते म्हणतील २००० वर्षांपूर्वी जेम्स बॉन्ड नावाचा कुणी एक महान नेता लंडनमध्ये होऊन गेला होता. आज आपली तीच परिस्थिती सुश्रुताबद्दल नाहीये का? आपल्याला फक्त लिखाणात 'सुश्रुत' भेटतो आणि बाकी कुठल्याच इतिहासात नाही. माझ्या म्हणण्याचा मुद्दा हा आहे की सुश्रुत संहिता पुस्तकाच्या कालावरून सुश्रुत कधी होऊन गेला (आणि झाला की नाही!) ह्याची काहीच माहिती मिळत नाही. पण आपल्याला समजा एखादे असे पुस्तक अथवा हस्तलिखित मिळाले ज्यामध्ये सुश्रुताच्या आयुष्याचा 'उल्लेख' येतो तर मग आपण मान्य करू की सुश्रुत नावाचा माणूस खरंच होऊन गेला. आणि हा उल्लेख जर एखाद्या शल्यक्रियेविषयीच्या हस्तलिखीतामध्ये मिळाला तर आपण नक्की म्हणू शकू की सुश्रुत नावाचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत माणूस होऊन गेला असावा. आपल्या लंडनच्या उदाहरणाकडे पुन्हा जाऊया. जर २००० वर्षांनंतर संशोधकांना २०१८ सालच्या वर्तमानपत्रात (ज्याची तारीख शाबूत आहे) जेम्स बॉन्ड चित्रपट परीक्षणाचा काही भाग वाचायला मिळाला तर? तर त्यांना असे म्हणता येईल की आधी मिळालेल्या पुस्तकातली व्यक्ती आणि परीक्षणातली व्यक्ती एकच आहे. ते असा निष्कर्ष काढू शकतील की जेम्स बॉन्ड हा २०१८ च्या आसपास होऊन गेला. पण हा माणूस खरा होता की नाही हे ते सांगू शकतील का? अजिबात नाही!
पुढची पायरी म्हणजे एखादे जुने हस्तलिखित (ज्यात सुश्रुताचा उल्लेख आहे) मिळवून त्याचा काल निश्चित करणे आणि त्यावरून सुश्रुताच्या कालखंडाचा अंदाज करणे. पण हेही खूप कठीण आहे कारण आपल्याकडच्या हस्तलिखित ग्रंथांचे कालखंड फारसे जुने नाहीयेत. आपल्याकडच्या सर्वात जुन्या ऋग्वेदाची प्रत सन १४६४ मधली आहे (पुण्याच्या भांडारकर ईन्स्टीटयुटमध्ये ठेवलेली आहे) - ह्यावरून असं म्हणायचं का की ऋग्वेद फक्त ५५० वर्षे जुना आहे? किंवा ह्याआधी भारतात ग्रंथच लिहीले गेले नाहीत? म्हणजे ही पद्धतपण संपूर्ण विश्वसनीय नाहीये. दुर्दैवाने सुश्रुत नावाच्या माणसाचा आपला शोध येथे येऊन थांबल्यासारखा होतो.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न - इटलीमध्ये कागदोपत्री पुरावे आहेत की त्यांच्याकडे सोळाव्या शतकात त्वचारोपणाचे प्रयोग सुरु झाले होते आणि काही यशस्वीसुद्धा होत होते. मग मागील लेखात पाहिल्याप्रमाणे सुश्रुतालाच जग ह्या शास्त्राचे जनक का म्हणते? कशावरून हे जगमान्य आहे की भारतात त्यांच्या आधी हे शास्त्र विकसित झालेले होते? असे एखादे हस्तलिखित अथवा ग्रंथ आहे की ज्यात सुश्रुताचा उल्लेख आढळतो आणि जो १९०७ सालच्या आधी कविराजांनी अभ्यासला नाही? ह्याचे उत्तर आहे - होय! कविराजांनी त्यांचे ग्रंथ प्रकाशित करायच्या आधी ही हस्तलिखिते लेह भागात घडलेल्या एका संशयित रशियन गुप्तहेराच्या खूनामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या अपघातात्मक परिस्थितीमुळे सापडली होती. एखाद्या हॉलीवूडपटात शोभावी अशी ती घटना होती. काय झाले होते नक्की? कशी शोधली गेली ही हस्तलिखिते? पुढच्या लेखात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: कविराज कुंजलाल भिशग्रत्न
सुश्रुत संहिता - खंड १: https://archive.org/stream/englishtranslati01susruoft…
सुश्रुत संहिता - खंड २: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaDvitiyaKhanda1…
सुश्रुत संहिता - खंड ३: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaTritiyaKhanda1…
No comments:
Post a Comment