Tuesday, December 4, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ६


हर्न्लेने केलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या भाषांतराने जगभरात खळबळ उडवून दिली. जगभरातले पुरातत्त्वसंशोधक अजून नवीन काही हस्तलिखिते सापडतील ह्या आशेने मध्य आशियाकडे धाव घेऊ लागले. अनेकांना ती सापडली - पण बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इतके महत्त्वाचे काहीही नव्हते. गौतम बुद्धानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतात सुरु होऊन त्यानंतर प्रामुख्याने मध्य आशियातून युरोपकडे जाणाऱ्या पश्चिमेकडीलखुश्कीच्या मार्गावरून (सिल्क रूट) होत गेला होता. बौद्ध धर्माला बरेच श्रीमंत व्यापारी अनुयायी म्हणून लाभले होते. त्यांनीच दिलेल्या धनामुळे मध्य आशियात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक बौद्ध स्तूप, विहार, आणि बुद्धप्रतिमा (उदाहरण: अफगाणिस्थानमधील बामियानच्या बुद्ध मूर्ती - ज्या २००१ मध्ये तालिबानने तोडल्या!) बनवल्या गेल्या होत्या.

Image may contain: fire and textहे झाले थोडे विषयांतर. पुन्हा बॉवर मॅन्युस्क्रीप्टसकडे वळूया. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हर्न्लेने शोधून काढले की त्यांमध्ये एकूण ७ खंड होते: २ ज्योतिषविषयक, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. ह्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या सुरुवातीला १० अश्या 'पवित्र' व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे की ज्या हिमालयाच्या परिसरात रहात होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होत्या. ही नावे होती: अत्रेय, हरित, पराशर, भेल, गार्ग, संभव्य, वसिष्ठ, कारल, काप्य आणि - आणि - सुश्रुत! ह्यापुढे जाऊन हे जे ३ पुरातन वैद्यकीय खंड बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमध्ये होते त्याचे लेखक होते: चरक, भेल, आणि - होय - सुश्रुत!

अश्याप्रकारे भारतातील एक ऋषीतुल्य व्यक्तीचे नाव एका ऐतिहासिक दस्तावेजात येण्याची जगातली ही पहिली वेळ होती. बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा कालखंड विज्ञानाच्या आधारे निश्चित करता येत होता आणि त्यामध्ये सुश्रुताचे नाव एक वैद्य म्हणून आल्याने हे निश्चित झाले की भारतीयांना कमीतकमी ईसवी सन ६५० मध्ये सुश्रुताच्या सुश्रुत संहितेबद्दल आणि त्यात सांगितलेल्या सर्जरी व प्लास्टिक सर्जरीबद्दल माहिती होती. मागील एका भागात दिलेल्या जेम्स बॉन्डच्या उदाहरणाप्रमाणे आपण अजूनही सुश्रुत खरा होता की नव्हता ह्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ईसवी सन ६५० मध्ये कोणी एक सुश्रुत नावाची व्यक्ती वैद्यकीय शास्त्रज्ञ मानली जात होती आणि त्याच्या नावाने एक 'सुश्रुत संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला गेला होता. कविराज कुंजलाल भिषगरत्न म्हणतात त्याप्रमाणे सुश्रुत संहितेचा काल ईसवी सन पूर्व ८०० असेलही कदाचित पण हाती असलेल्या पुराव्यांनी इतके नक्कीच म्हणता येते की ईसवी सन ६५० मध्ये आज माहित असलेली सुश्रुत संहिता नक्की माहित होती. ह्या सर्जरीच्या विषयावर लिहिले गेलेले आणि ह्यापेक्षा जुने असे दुसरे कोणतेही पुस्तक संपूर्ण जगात उपलब्ध नाही - त्यामुळे निश्चितच ही आपल्या भारतीयांसाठी मोठ्या गर्वाची गोष्ट आहे!

पण सुश्रुत संहिता खरच इतकी भारी आहे? का उगाच फक्त ती भारतीय आहे म्हणून मी तिचे गोडवे गातोय? माझे आयुर्वेदावरचे ज्ञान जवळपास शून्य आहे. पण इतक्या शतकांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या ग्रंथात जे वैद्यकीय क्षेत्रासंबंधित ज्ञान संपादित केलेले आहे ते पाहून माझ्यासाख्या (थोडेफार फक्त इतिहास विषयाशिवाय इतर वाचन नसणाऱ्या) माणसाचेसुद्धा भान हरपून जायला होते. उदाहरणार्थ: ह्या संहितेत ७६ प्रकारचे डोळ्याचे रोग सांगितलेले आहेत - १२१ प्रकारच्या सर्जरीत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे उल्लेख आहेत - ४२ सर्जीकल प्रोसेसेसचे उल्लेख आहेत - आणि हे सर्व कमी आहे की काय म्हणून जवळपास ७०० विविध वनस्पतींचे त्यांच्या औषधी गुणानुसार ३७ विविध गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे! आणि हे सर्व - कविराजांचे मत ग्राह्य धरले तर २८०० वर्षांपूर्वी - किंवा हाती असलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे वय लक्षात घेतले तर १४०० वर्षांपूर्वी!

आता एक अप्रुपाची गोष्ट. सुश्रुत संहितेच्या पहिल्या खंडातील - सूत्रस्थानमधील - सोळाव्या अध्यायात खालील श्लोक आहेत:

विश्लेषितायास्त्वथ नासिकाया वक्ष्यामि सन्धानविधिं यथावत् |
नासाप्रमाणं पृथिवीरुहाणां पत्रं गृहीत्वा त्ववलम्बि तस्य ||२७||

तेन प्रमाणेन हि गण्डपार्श्वादुत्कृत्य बद्धं त्वथ नासिकाग्रम् |
विलिख्य चाशु प्रतिसन्दधीत तत् साधुबन्धैर्भिषगप्रमत्तः ||२८||

सुसंहितं सम्यगतो यथावन्नाडीद्वयेनाभिसमीक्ष्य बद्ध्वा |
प्रोन्नम्य चैनामवचूर्णयेत्तु पतङ्गयष्टीमधुकाञ्जनैश्च ||२९||

सञ्छाद्य सम्यक् पिचुना सितेन तैलेन सिञ्चेदसकृत्तिलानाम् |
घृतं च पाय्यः स नरः सुजीर्णे स्निग्धो विरेच्यः स यथोपदेशम् ||३०||

रूढं च सन्धानमुपागतं स्यात्तदर्धशेषं तु पुनर्निकृन्तेत् |
हीनां पुनर्वर्धयितुं यतेत समां च कुर्यादतिवृद्धमांसाम् ||३१||

(भावार्थ: आता मी तुम्हाला कृत्रिम नाक जोडायची पद्धत सांगतो. सुरुवातीला झाडाचे एक पान घ्या जे नाकाच्या कापल्या गेलेल्या भागावर लांबीरुंदीने व्यवस्थित बसेल. हे माप घेऊन झाले की ह्या मापाने गालावर खूण करून घेऊन खालून वर सुरीने त्वचा कापून घावी. ही त्वचा संपूर्णपणे शरीरापासून वेगळी होऊ न देता नाकावर लावण्यात यावी. त्यानंतर थंड डोक्याच्या डॉक्टरने त्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी (साधुबंद) बांधावी. डॉक्टरने हे पण पहावे की सर्व भाग व्यवस्थित चिकटले आहेत आणि त्यानंतर दोन नळ्या श्वासोच्छवासाठी आणि त्वचा खाली नाकात चिकटू नये म्हणून तेथे घाल्याव्यात.)

लागला क्लू? ओळखीची वाटतेय ही पद्धत? पहिल्या भागात आपण पाहिलेल्या कावसजीच्या ऑपरेशनशी ही पद्धत किती मिळतीजुळती आहे पहा - फक्त फरक इतकाच की त्या कुंभाराने कपाळावरची त्वचा वापरली आणि सुश्रुत गालावरची त्वचा वापरायला सांगतो - बस्स बाकी काही नाही! पण त्वचा वाळू न द्यायची 'ट्रीक' तीच आहे - की मूळ शरीरापासून ती वेगळी होऊ न देणे. कावसजीच्या आधी कमीतकमी १००० वर्षे ही पद्धत भारतात वापरली जात होती हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमुळे सिद्ध झाले आणि हे जगन्मान्य आहे!

थोडंसं विषयांतर पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमधली भाषा आणि लिपी त्या वेळच्या वापरल्या जाणाऱ्या सामान्यांच्या वापरातील होती. भारतात ज्ञानसाधना ही कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक वर्गाची मक्तेदारी नव्हती असाही ह्यातून निष्कर्ष काढता येतो. हेच ज्ञान परंपरागत पुढे गेले. १७९४ मध्येही त्या कुंभाराने चक्क सुश्रुत संहितेतील पध्दत वापरली ह्यात कोणालाही वावगं काही वाटलं नाही ह्यातूनही तेच अधोरेखित होते.

पुढे ह्या कावसजीबद्दलच्या लेखाने जगातली प्लास्टिक सर्जरीची दिशा खरंच बदलली. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुरु झाले. कावसजीचा लेख १७९४ मध्ये येउन गेल्यानंतर एक इंग्लिश सर्जन जोसेफ कॉन्स्टन्टाइन कार्प्यू (Carpue) हा सुश्रुताची कृत्रिम नाक बसवायची पद्धत लंडनमध्ये वापरू लागला. त्याने १८१४ आणि १८१५ मध्ये ह्या पद्धतीने दोन यशस्वी ऑपरेशन्स केली. ह्यावर त्याने १८१६ मध्ये 'An Account of two successful operations for restoring a lost nose from the integuments of the forehead' ह्या नावाने एक प्रबंधपण लिहिला. कार्प्यूच्या प्रबंधाचे १८१७ मध्ये कार्ल फर्डिनांड फॉन ग्रेफ (Graefe) ह्या जर्मन सर्जनने जर्मन भाषेत भाषांतर केले. त्यानंतर पुढे त्याने स्वतःचे एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव होते ‘ऱ्हीनोप्लास्टिक' (Rhinoplastik). ह्या सर्जरीला 'प्लास्टिक' हे नाव सर्वात प्रथम त्याने वापरले. कार्प्यू आणि ग्रेफच्या कामाची युरोपात भरपूर प्रशंसा झाली. 'ऱ्हीनोप्लास्टी' ह्या कृत्रिम नाक बसवायच्या सर्जरीला खूप मागणी येऊ लागली. आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा पाया जगात ह्या दोघांनी ऱ्हीनोप्लास्टीद्वारे घातला असे मानले जाते. कावसजीची गोष्ट खरी असो वा नसो - पण ह्याचे मूळ श्रेय सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला जाते हे मात्र त्रिवार सत्य आहे - म्हणूनच सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला 'Father of Plastic Surgery' आपण सर्व जगात छातीठोकपणे म्हणू शकतो!

समाप्त

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो: बॉवर मॅन्युस्क्रीप्टचा एक भाग

ता क: बॉवर मॅन्युस्क्रीप्टस सध्या कुठे आहेत? इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डमध्ये - युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या बॉडलिअन लायब्ररीत हर्न्लेची आठवण म्हणून ह्या जतन करून ठेवलेल्या आहेत. जर कुणी लंडनला येणार असेल तर मला नक्की सांगा, आपण बघायला जाऊया!

जिज्ञासूंना हर्न्लेने केलेले बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे भाषांतर येथे वाचायला मिळेल: https://archive.org/stream/TheBowerManuscript#page/n1/mode/2up

No comments:

Post a Comment