Sunday, December 2, 2018

शोध सुश्रुताचा - भाग २


मागील भागात आपण पाहिलं की ऑक्टोबर १७९४ मध्ये पुण्यातल्या एका कुंभाराने कावसजीवर केलेल्या सर्जरीमुळे युरोपातील - विशेषतः इंग्लंडमधील डॉक्टरांची आणि सर्जन्सची झोप उडाली. येथे एक गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे की ती वाहवा त्या सर्जरीला मिळाली होती - ती एका 'कुंभाराने' केली होती म्हणून नव्हे. इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स - जिची फेलोशिप जगातले डॉक्टर्स मिळवतात आणि मानाने Fellow of Royal College of Surgeons (F.R.C.S.) असे स्वतःच्या नावामागे लावतात - ह्या संस्थेचे संस्थापक मूळचे न्हावी होते. इंग्लंडमध्ये पंधराव्या - सोळाव्या शतकांमध्ये जखमी सैनिकांवर सर्जरी मुख्यतः हे न्हावी (ज्यांना 'बार्बर सर्जन्स' म्हणत) करत असत. आजही इंग्लंडमध्ये पारंपारिक सर्जन्सना स्वतःला 'डॉक्टर' म्हणून घ्यायला आवडत नाही. त्यांच्यामते औषधे देणारा साधा 'मेडिसिन मॅन' म्हणजे 'डॉक्टर' - 'सर्जन' म्हणजे त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा (शैक्षणिकदृष्ट्या) जो प्रत्यक्ष ऑपरेशन करतो आणि म्हणून त्यांच्या स्वतः च्या नावामागे ते 'मिस्टर' लावतात आणि नावापुढे FRCS. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची स्थापना १८०० ची म्हणजे कावसजीवर केलेल्या ऑपरेशननंतर फक्त ६ वर्षांनंतर झाली - हा नक्कीच योगायोग नव्हता!
Image may contain: 1 person, sittingआता पुन्हा सुश्रुताकडे वळूया. त्याआधी एक गोष्ट करून पहा. गुगल ईमेज सर्च मध्ये 'Sushrut Surgeon India' हे सर्च करून पहा. पहिला जो फोटो येतो तो आपण सगळीकडे पाहिलेला असतो. एक दाढीवाला तेजस्वी माणूस एका रुग्णाच्या चेहेऱ्यावर काहीतरी शस्त्रक्रिया करत आहे. साधी पांढरी धोतरे घातलेले त्यांचे दोन सहाय्यक आहेत ज्यांनी रुग्णाला धरून ठेवले आहे - एक साडी नेसलेल्या बाई हातात काहीतरी घेऊन त्यांना मदत करत आहेत. एक सहाय्यक फक्त मागे उभा राहून हे सर्व पहात आहे. राजा रवि वर्म्याने काढल्यासारखे वाटते हे चित्र. बरेचदा त्याखाली लिहिलेले असते "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये प्लास्टिक सर्जरी करताना" किंवा "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करताना". चित्र तेच असते फक्त कॅप्शन्स वेगवेगळ्या असतात. ह्या असल्या चित्रांखाली मी 'सुश्रुत' हे नाव पहिल्यांदा वाचले.
मग मी शोधायचा प्रयत्न केला कोणी बरं काढलं आहे हे चित्र? चित्रातला माणूस खरंच 'सुश्रुत' आहे का? काही तथ्य आहे का ह्या कॅप्शन्समध्ये? बऱ्याच शोधाअंती समजलं की हे चित्र कुणा भारतीयाने काढलेले नाहीयेच! १९४८ मध्ये पार्क - डेव्हीस नावाच्या औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीने रॉबर्ट थोम नावाच्या चित्रकाराला ८५ चित्रे काढायचे काम दिलेले होते - त्याने ८ वर्षे रिसर्च करून ही सगळी चित्रे काढली - त्यातलेच हे एक चित्र! पार्क - डेव्हीस कंपनीने ही सगळी चित्रे एकत्र करून त्याचे विविध संच बनवले आणि अमेरिकेतल्या सगळ्या डॉक्टरांकडे पाठवून दिले. अनेक डॉक्टरांनी ही चित्रे आपापल्या वेटिंग रूम मध्ये लावून टाकली. मग पार्क - डेव्हीस कंपनीने हळूच कंपनी ब्रांडीगसाठी ही चित्रे वापरून टाकली. आपण जे हे 'सुश्रुता'चे चित्र पहातोय त्याची फुल पेज जाहिरात १० ऑगस्ट १९५९ च्या 'टाईम' मासिकात आलेली होती. खाली लिहिले होते "Plastic Surgery, usually regarded as a recent medical advance, was practised thousands of years ago by a Hindu surgeon, Susruta. Living in a society that punished wrongdoers with physical disfigurement, his restorative skills were greatly in demand. His writings contributed to the spread of Hindu medicine throughout the ancient world.". पुढच्या काही दशकांमध्ये हे चित्र भारतात आले. आपल्याकडे त्याच्या लाखो-करोडो कॉप्या बनल्या आणि एका औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या ऐवजी हे चित्र आयुर्वेद आणि सुश्रुताचे 'ब्रांडीग' करू लागले!
जर पार्क - डेव्हीस कंपनीला खात्री होती की सुश्रुत होता आणि तो ही ऑपरेशन्स करायचा मग आपण कशाला आपलं डोकं खपवतोय? रॉबर्ट थोमने सुद्धा जवळपास ८ वर्षे अभ्यास करून मगच ही चित्रे काढली होती - मिळाले असेल त्याला एखादे सुश्रुताचे चित्र - आपल्याला काय करायचेय? पण आपण जर इथेच थांबलो तर आपल्याला सुश्रुताचा 'शोध' कधीच लागणार नाही. भारतात जवळपास १००० वर्षांपूर्वी ही ऑपरेशन्स होत असत ह्याची खात्री देता येणार नाही. खरंच सुश्रुत नावाचा कोणी माणूस होऊन गेला का? खरंच तो प्लास्टिक सर्जरी करायचा का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत रहातात!
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या आधी आपण छोट्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. सुश्रुत कोण होता? याचा कार्यकाल काय होता? अनेक संदर्भ - अगदी पार्क - डेव्हीसच्या जाहिरातीपण - सांगतात की सुश्रुत ह्या शास्त्राचा जनक होता. ह्या शास्त्राची सर्व सूत्रे सुश्रुतच्या पुस्तकात - 'सुश्रुत संहिते'त मिळतात. सुश्रुताबद्दल आपल्याकडे काहीच माहिती नाही पण नशिबाने 'सुश्रुत संहिता' मात्र उपलब्ध आहे.
मग कोणी लिहिली 'सुश्रुत संहिता' आणि कधी? शोधू शकतो का आपण? हे आपण पुढच्या भागात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: रॉबर्ट थोमचे सुप्रसिद्ध चित्र

No comments:

Post a Comment