Tuesday, December 4, 2018

शोध सुश्रुताचा - भाग ४

Image may contain: 3 peopleसोबतचे पहिले चित्र पहा. दिसतात की नाही दोघे दाढीवाले सख्खे भाऊ? अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावसभाऊ होते हे दोघे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या जगातल्या दोन सर्वशक्तिमान साम्राज्यांचे सम्राट होते. डावीकडचा आहे रशियाचा झार दुसरा निकोलस आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज (आपल्यासाठी त्या काळचा 'भो पंचम भूप जॉर्ज' वगैरे वगैरे). ह्या दोन भावांमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरु झाली - मध्य आशियात साम्राज्य विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवे होते आणि ब्रिटीशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती. आणि ब्रिटीशांना मध्य आशियामधले रशियाचे अस्तित्व नकोच होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील होते. ह्या चढाओढीचे नावपण इतिहासात समर्पकपणे ठेवलेले आहे - 'द ग्रेट गेम'. ह्या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. ह्याच चढाओढीत काही वर्षांनी ह्या दोघांचा तिसरा मावस भाऊ उतरला - तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कैझर विल्हेम आणि ह्या ग्रेट गेमचे रुपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झाले. तीन मावस भावांनी आपापसात खेळलेले हे युद्ध - पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली!

आपल्याला पहिल्या महायुद्धाइतके दूर जायचे नाहीये. आपण एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी थांबूया. सन १८८८. इराण नावाचा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्या ठिकाणी भरपूर टोळ्या आणि अनेक छोटी मोठी संस्थाने होती. 'खानत' म्हणत असत त्यांना. अमिरांच्या अमिराती आणि खानांच्या खानत. अफगाणिस्थानची परिस्थिती अगदी आजच्यासारखी होती. कोणतीही मध्यवर्ती राजवट नसलेली. (आणि असली तरी तिला न जुमानणाऱ्या 'सार्वभौम' टोळ्या!). मध्य आशियातल्या देशांमधले बरेचसे ब्रिटीश, रशियन, तुर्की, आणि अफगाणी व्यापारी पार्ट टाईम व्यापार करायचे आणि पार्ट टाईम इंग्लंडसाठी किंवा रशियासाठी हेरगिरी करायचे. त्यांचे मोठे मोठे व्यापारी काफिले असायचे त्यामुळे हेरगिरी वगैरे उद्योग सोपे पडायचे आणि वरून भरपूर पैसे. हेरगिरी म्हणजे त्या त्या भागातली माहिती (विशेषकरून सैनिकी) आणायची आणि आपापल्या ब्रिटीश किंवा रशियन मालकांना पुरवायची. असाच एक स्कॉटीश व्यापारी होता. ॲंड्रू दाल्ग्लेइश (Andrew Dalgleish) हे त्याचे नाव. हा ब्रिटीश हेर होता. ह्याची बायको मध्य आशियातल्या यार्कंद भागातली होती. स्वतः ॲंड्रूला तिकडची स्थानिक उघ्यूर भाषा नीट अवगत होती. त्यामुळे व्यापार आणि हेरगिरी दोन्ही सुरळीत चालले होते. लेह-लडाख मधून मध्य आशियात हा व्यापारासाठी बरीच ये-जा करायचा.

मार्च १८८८ मध्ये व्यापारासाठी ॲंड्रू लेहवरून यार्कंदला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर बरेचसे नोकर आणि अनेक स्थानिक यात्रेकरू होते. काही अंतर गेल्यावर दाउद मोहोम्मद नावाचा एक क्वेट्टा भागातला पठाण त्याच्या काफिल्यात सामील झाला. दाउद मोहोम्मद पूर्वीचा व्यापारी होता पण व्यापारात दिवाळे निघाल्याने सध्या रशियासाठी लपून-छपून हेरगिरी करत होता. ८ एप्रिल १८८८ रोजी हा काफिला काराकोरम खिंडीत पोहोचला. ॲंड्रू सगळ्यांच्या पुढे होता. काराकोरम खिंड पार करून त्याने आपला तंबू बर्फात टाकला होता. संध्याकाळ झाली होती. थोडे चहापाणी करून आवरेपर्यंत बाकीच्या सगळ्यांची खिंड पार करून झाली. बाकी काफिल्याचे तंबू ठोकून झाले. ॲंड्रू सगळ्या तंबूंची पहाणी करायला निघाला. अनेक लोकांनी त्याला चहा विचारला पण सस्मित नाही म्हणून तो पुढे निघाला. जाताजाता प्रत्येक तंबूमधून रोटीचा छोटा तुकडा घ्यायला तो विसरला नाही. (मुस्लिम जगतात बंधुभाव दाखवण्यासाठी ह्या प्रथेला फार मोठे महीत्त्व होते - आणि ॲंड्रूला हे नीट माहित होते!) चालत चालत तो काफिल्याच्या शेवटी पोहोचला. दाउद मोहोम्मदचा तंबू नुकताच लावून झाला होता. त्याच्या तंबूत बसून ॲंड्रूने त्याचा हालहवाल विचारला. व्यापार नीट कसा करावा ह्याचा ॲंड्रू त्याला सल्ला देत होता. अचानक मोहोम्मद उठला. ॲंड्रूने विचारले, "कुठे चाललास?" मोहोम्मद म्हणाला, "काही नाही. जरा बाहेर जाऊन येतो." मोहोम्मद ताडकन तंबूबाहेर गेला. ॲंड्रूला कसलाच संशय आला नाही. मोहोम्मद बाहेर जाउन त्याची बंदूक घेऊन आला आणि तंबूच्या भिंतीमधून त्याने ॲंड्रूवर पाठीमागून गोळी चालवली. गोळी ॲंड्रूया खांद्याला लागली. तो कळवळला पण लगेच उठायचा प्रयत्न त्याने केला. त्याचा तंबू होता सर्वात पुढे म्हणजे अगदी लांब. त्यामुळे कोणतेही हत्यार आणणे अशक्य होते आणि आता दाउद मोहोम्मद नंगी तलवार घेऊन त्या तंबूत घुसला होता. दाउदने केलेले तलवारीचे वार ॲंड्रूने दोन हातांनी झेलायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी तो जखमी अवस्थेत बाहेर पळाला आणि बर्फात उताणा पडला. दाउद मोहोम्मदाने त्याचावर सपासप वार करून त्याला यमसदनास धाडले. ॲंड्रूचे नोकर आणि असलेले यात्रेकरू हा सगळा प्रसंग घाबरून बघत होते. दाऊदने त्या सर्वांना धमकावले. रात्रीचे जेवण बनवले गेले. दाउद ॲंड्रूच्या तंबूत परतला आणि ॲंड्रूच्या पलंगावरच त्या रात्री झोपला. सकाळी तो तिथून निघून गेला. अश्या प्रकारे एक ब्रिटीश हेर एका रशियन हेराकडून मारला गेला.

ॲंड्रू ब्रिटीशांचा 'माणूस' असल्याने ब्रिटीश सरकारने ह्या सर्व प्रकारचे साक्षी पुरावे करून लागलीच पुढच्या वर्षी - म्हणजे १८८९ मध्ये - हॅमिल्टन बॉवर नावाच्या एका आर्मी इन्टलीजन्स ऑफिसरला ह्या कामगिरीवर लेहला धाडले. ह्याचे काम एकच होते ते म्हणजे दाउद मोहोम्मदला पकडणे. संपूर्ण मध्य आशियामधून एका माणसाला शोधणे आणि त्याला पकडणे अशक्यप्राय काम होते. पण हॅमिल्टन बॉवरने हे काम स्वीकारले. तो लेहमधून निघाला आणि दाउद मोहोम्मदचा शोध घेत घेत तिआन शान डोंगरांच्या पायथ्याशी कुशर नावाच्या गावात पोहोचला. ह्या गावात दाउद मोहोम्मदची चौकशी करता करता त्याला एक तुर्की माणूस भेटला. त्याने बॉवरला सांगितले की जवळच एक वाळवंट आहे आणि स्थानिक लोक मानतात की त्याच्या खाली एक शहर गाडलेले आहे. तो माणूस आणि त्याचा मित्र तिथे खजिना शोधायला गेले होते. पण त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. फक्त एक जुनाट पुस्तकासारखे काहीतरी मिळाले. बॉवरला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला ते घेऊन यायला सांगितले. तासाभरात तो माणूस ते घेऊन परत आला. ते पुस्तक म्हणजे एक हस्तलिखित पोथी होती. (बॉवरच्या मूळ इंग्लिश ट्रॅव्हल रेकॉर्डस मध्ये 'पोथी' हाच शब्द आहे!) त्यातली अक्षरे संस्कृतसारखी होती. सहज उत्सुकता म्हणून बॉवरने ही पोथी पैसे देऊन विकत घेतली. पुढे आपले 'नेटवर्क' वापरून बॉवरने दाउद मोहोम्मदला समरकंदजवळ पकडले. (कसे पकडले ते सांगायची ही जागा नाही!) पण तुरुंगात दाउद मोहोम्मदने संशयितरीत्या फाशी लावून घेऊन आत्महत्या केली. (त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही!) बॉवरने लेहमध्ये ॲंड्रू दाल्ग्लेइशसाठी एक स्मारक बांधले आणि तो कलकत्त्याला परत आला. त्याने ती विकत घेतलेली पोथी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. त्याची भाषा अगदी वरवर संस्कृतसारखी वाटली तरी अगम्य भाषेत ती लिहिली होती - त्यांना काही ती वाचता येईना. कोणीतरी तज्ञ माणसाकडून त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे गरजेचे होते.

पुढे कोणी केले हे काम? नक्की काय होते त्या पोथीत लिहीलेले?

पुढच्या भागात पाहूया!

क्रमश:

- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

फोटो १: रशियाचा झार दुसरा निकोलस आणि इंग्लंडचा पाचवा जॉर्ज, हॅमिल्टन बॉवर

फोटो २: बॉवरला मिळालेली 'पोथी' आणि त्यातील अगम्य भाषा

No comments:

Post a Comment