Sunday, December 2, 2018

शोध सुश्रुताचा - भाग १

देश इंग्लंड. जानेवारी १७३१ चा हाडे गोठवून टाकणारा थंड गारठा. इंग्रजी भाषेला इंग्लंडच्या राष्ट्रभाषेचा दर्जा मिळून फक्त ८० वर्षे झालेली. सन १०६६ नंतर इंग्लंडमध्ये इंग्रजी बोलणे कमीपणाचे मानले जात असे. सध्या मराठीचे जे मुंबईत हाल आहेत तेच इंग्रजीचे इंग्लंडमध्ये हाल होते. तिला अशिक्षित खेडवळांची भाषा मानली जात असे. इंग्रजीत कोणतीही साहित्यनिर्मिती होत नसे. जवळपास ५५० हून अधिक वर्षे खुद्द इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषा फ्रेंच आणि लॅटिन भाषेच्या वर्चस्वाखाली होती. लोकांच्या दबावामुळे शेवटी १६५० मध्ये कोर्टाच्या निकालाने जानेवारी १६५१ पासून इंग्रजीचा सार्वत्रिक वापर (राज्यकारभारात / न्यायदानात / सार्वजनिक शिक्षणात इत्यादी.) इंग्लंडमध्ये पुन्हा सुरु झाला आणि इंग्रजीला पुन्हा वैभवाचे दिवस आले. त्या तपशीलवार इतिहासाबद्दल पुन्हा कधीतरी.
Image may contain: 2 peopleतर पुन्हा वळूया जानेवारी १७३१. पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम संपले नव्हते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायला ४५ वर्षे शिल्लक होती. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एडवर्ड केव्ह नावाच्या माणसाने जगातले पहिलेवहिले मासिक छापले. 'द जन्टलमन्स मॅग्झिन' हे त्याचे नाव. एडवर्ड हा एका चांभाराचा मुलगा. अत्यंत धडपड्या. त्याने ही मासिकाची कल्पना लंडनमध्ये बऱ्याच लोकांकडे मांडली पण कुणाला पसंत पडली नाही. शेवटी त्याने स्वतःच कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. हे ते आद्य मासिक आणि त्यानंतर आलेली जगातली सर्व मासिके ह्याच 'द जन्टलमन्स मॅग्झिन' वर बेतलेली आहेत. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक ह्या मासिकासाठी लिहीत असत. युरोपात ह्या मासिकाला प्रचंड मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनी त्या वेळी भारतात आपले हातपाय पसरत होती. त्यामुळे पूर्वेकडील देशांमधील विविध गोष्टी - चालीरीती ह्या मासिकामूळेच युरोपात कळाल्या. तब्बल २०० वर्षे हे मासिक चालले आणि १९२२ मध्ये बंद झाले. ह्या लेखाचा विषय हे मासिक नाहीये. मी ह्या मासिकाचे जुने अंक चाळत असताना ऑक्टोबर १७९४ मध्ये ह्या मासिकात आलेला एक लेख माझ्या पहाण्यात आला. तो लेख हा कुतूहलाचा मुद्दा आहे. तो काय ते आपण पाहूया.
ह्या लेखाचे नाव होते "A portrait illustrative of a remarkable chirurgical operation" (म्हणजे मराठीत: "एका शल्यक्रियेचे चित्र आणि लेख"). ह्या चित्रात एक कावसजी नावाचा मराठी (होय!) माणूस दाखवला आहे. काळासावळा. डोक्यावर पागोटे असलेला. खांद्यावर फडके घेतलेला. एकदम दमदार गडी. कावसजीचे चित्र 'द जन्टलमन्स मॅग्झिन' मध्ये यायचे कारण म्हणजे पुण्यात (होय पुण्यात!) त्याच्यावर झालेली Rhinoplasty (ऱ्हीनोप्लास्टी: म्हणजे कृत्रिम नाक बसवण्याची शस्त्रक्रिया!). १७९४ मध्ये जेव्हा युरोपातील डॉक्टर शरीरातील एकीकडील त्वचा दुसरीकडे लावू शकत नव्हते तेव्हा कावसजीचे संपूर्ण नाक कृत्रिमरित्या बसवले होते. आणि ते कोणत्या राजवाड्यात नाही तर पुण्यातील रस्त्यावर - आणि तेपण एका पार्ट टाईम शल्यविशारदाने!
ह्या चित्रानंतर एक लेख होता. त्याचा सारांश असा - दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजीचे संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. तिसऱ्या इंग्रज टिपू युद्धात कावसजी इंग्रजांच्या बाजूने लढत होता आणि टिपूच्या सैन्याद्वारे पकडला गेला. कावसजी हा काही शिपाई नव्हता आणि सैन्यात बैलगाडी चालवत होता. त्यावेळच्या प्रचलित शिक्षेनुसार कावसजीचे नाक कापून टाकले गेले. कावसजी तिथून पुण्याला गेला आणि एका कुंभाराकडून हे नवीन नाक बसवून घेतले.
त्या कुंभाराने सर्वप्रथम मेणाने कावसजीच्या नाकाच्या मापाचा आकार बनवून घेतला. तो कावसजीच्या कपाळावर (चेहेऱ्यावर नाकाच्या ठिकाणी नव्हे!) बसवला. कपाळावर त्या मेणाभोवती त्याचा आकार (outline) काढून घेतला. नंतर एका चाकूने त्या आकाराची त्वचा कापली पण ती संपूर्ण कापून टाकली नाही. दोन डोळ्यांच्या मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवली. त्यानंतर मेणाला नाकाचा आकार देऊन ते नाकाच्या जागी बसवले. कपाळावरून आणलेली त्वचा त्याच्यावर पांघरली. थोड्या जडीबुटी लावल्या. काही आठवड्यात ती त्वचा नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) रुजली. कपाळाचा व्रण तीन महिन्यांनी भरला. ह्या लेखाचा समारोप "This operation is very generally successful." ह्या वाक्याने केलेला आहे. अधिक माहितीसाठी सोबतचे कावसजीचे मूळ चित्र पहा.
ह्या लेखाने युरोपात खळबळ माजवली. युरोपिअन डॉक्टर्स ह्या गोष्टीवर अनेक वर्षे रिसर्च करत होते. पण शरीराचा कोणताही भाग कापला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला की तो वाळून जात असे. त्याला योग्य रक्तपुरवठा अथवा प्राणवायू न मिळाल्याने तो कोमेजून जात असे. युरोपिअन डॉक्टर्स गालांवरून अथवा मांड्यांवरुन नीट त्वचा कापू शकत असत पण ती खोट्या नाकावर बसवली की ती कडक होऊन जात असे - आणि ह्यासाठी त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. पण ह्या पुणेरी कुंभाराने हा प्रश्न सोडवला होता. डोळ्यांच्या मध्ये ती त्वचा मूळ शरीराशी संलग्न असल्याने ती वाळून जायचा अथवा कडक व्ह्यायचा प्रश्न उरला नाही. त्या त्वचेला रक्त आणि प्राणवायू नियमित मिळाल्याने नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) ती व्यवस्थित रुजत होती. आणि एकदा का ती रुजली की मग डोळ्यांच्या मधील तो ब्रीज कापून टाकत असत. कपाळावर व्रण रहात असे पण संपूर्ण नाक नसण्यापेक्षा हे केव्हाही बरे होते!
कावसजीबद्दलच्या या लेखाबद्दल गेली अनेक शतके वाद सुरु आहेत. अगदी २००९ मध्येपण ब्रिटीश मेडिकल जर्नल्स हा विषय चघळत होती. हा कावसजीबद्दलचा लेख खरा असो वा नसो पण ह्या एका लेखाने संपूर्ण युरोपातील डॉक्टर्स आणि सर्जन्सना हलवून टाकले. त्यांची विचारसरणी बदलून टाकली. सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ह्या शाखांमधील मूलभूत बदलांसाठी हा लेख कारणीभूत ठरला. सर्जरीसाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांमध्ये बदल करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताबद्दल आणि भारतीय चिकित्सापद्धतीबद्दल त्यांच्या मनात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली. आयुर्वेदाचे नाव युरोपात ह्याआधी गेले होते. कोणी एक 'सुश्रुत' हा "Father of Plastic Surgery" म्हणून त्यांना माहीत होता. त्याची 'सुश्रुत संहिता' ऐकून माहीत होती. पण त्याची पद्धत वापरून त्या कुंभाराने केलेले ऑपरेशन मात्र सर्वांची वाहवा मिळवून गेले.
कोण होता हा सुश्रुत? खरंच होता का तो "Father of Plastic Surgery"? पाहूया आपण पुढच्या भागात!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: 'द जन्टलमन्स मॅग्झिन'चा संस्थापक एडवर्ड केव्ह, कावसजीचे ऑक्टोबर १७९४ मधले चित्र
ता. क. १: ज्यांना हा मूळचा १७९४ चा लेख पहायचा असेल त्यांनी खालील लिंकवर पान ८९१ पहावे.
ता. क. २: जिज्ञासूंना 'द जन्टलमन्स मॅग्झिन' चे काही लेख खालील लिंकवर वाचायला मिळतील:

No comments:

Post a Comment