मागील लेखात आपण कुंडलिनी मार्गातील सात चक्रांची आणि त्यांच्या गुणांची (Attributes) अत्यंत त्रोटक स्वरूपात माहिती घेतली. या चक्रांचा आणि आपल्या मनोव्यापाराचा संबंध काय हे ही पहिले. या चक्रांचे स्थान आणि अधिक माहिती आपल्याला इंटरनेटवर सहज मिळू शकेल. मी या लेखमालेच्या शेवटी लिंक्स देईनच. या चक्रांची विस्तृत माहिती देणे हा या लेखमालेचा हेतू नाही, तर कुंडलिनी ध्यानाला सुरुवात कोठून करावी हे सांगणे हा हेतू आहे.
ध्यान करणे याचा अर्थच आपले सतत भरकटणारे मन एका ठिकाणी स्थिर करणे. हे मन एखाद्या माकडासारखे असते. माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असते. तसेच एका गोष्टीचा विचार मनात येतो, काही मिनिटातच त्या विचारावरून मन एकदम दुसऱ्या विचारावर झेप घेते. मग तेथून आणखी वेगळ्याच. हे सतत चालू असते. हे चक्र डोक्यात सतत चालू असल्याने आपल्या मेंदूची बरीच क्षमता फुकट जात असते. कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो तेव्हा तो कॉम्प्युटरच्या प्रोसेसिंग पॉवरचा बराचसा भाग खाऊन टाकतो. तसेच काहीसे हे आहे. खरे तर विचार करण्याची क्षमता हे आपल्याला मिळालेले वरदान आहे. पण त्याचा आत्यंतिक वापर झाल्याने आपण हे विचार बंद कसे करायचे याचा स्विच कुठे आहे हेच विसरून गेलो आहोत. एकदा या सतत भरकटणाऱ्या मनाला ताळ्यावर आणले की आपला पुढील प्रवास सोपा आहे. हा अनावश्यक विचार बंद करण्याचा स्विच शोधायचा आहे. भरकटणारे मन स्थिर केल्याशिवाय कुंडलिनी ध्यान करणे अशक्य आहे. आपापले मन एकेका चक्रावर क्रमाक्रमाने स्थिर करूनच ते ते चक्र कार्यान्वित करायचे आहे- भेदायचे आहे.
भारतीय प्राचीन शास्त्रानुसार ध्यानाला सुरुवात करण्याची अथवा मन स्थिर करण्याची एकच पद्धत आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्मियांची पद्धत एकच आहे. त्याला निरनिराळी नावे आहेत. आपण आपल्या सोयीसाठी राजयोगात पतंजलीऋषींनी दिलेले नाव 'प्राणधारणा' वापरू. प्राण' म्हणजे 'श्वास' आणि 'धारणा' म्हणजे धारण करणे -त्यावर लक्ष ठेवणे. ही प्रक्रिया म्हणजे 'प्राणायाम' नव्हे. प्राणायामात श्वास बदलायचा असतो. प्राणधारणेत मात्र नैसर्गिक श्वासावर लक्ष ठेवायचे असते. त्याची गती वाढली, मंद झाली तरी आपण स्वत:हुन त्यात बदल न करता फक्त अनुभवायचे असते.
यासंबंधी पुढील लेखात जाणून घेऊ.
No comments:
Post a Comment