मध्यंतरी एकदा 'कुंडलिनी विद्या' अर्थात 'सप्तचक्रांवर' लिखाण सुरु केले होते. परंतु ती लेखमाला सुरु ठेवणे कार्यबाहुल्यामुळे जमले नाही.
माझा कुंडलिनी शास्त्रावरील अभ्यास फार खोलवर नाही. ध्यान करताना लक्षात आले की खोलवर ध्यानात गेलो की आपोआप सप्तचक्रांवर ध्यान लागते. म्हणूनच मग त्याचा अभ्यास करण्याचे ठरविले. इंटरनेटवरून बरीच माहिती मिळविली. प्रत्यक्ष ध्यानात अनुभव घेतले आणि लिहिण्यास बसलो.
कुंडलिनी शास्त्र हे आपल्या अतिप्राचीन सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. सांख्य दर्शनात प्रत्येकाचा पुरुष स्वतंत्र मनाला गेलेला आहे. सभोवताली प्रकृतीचा खेळ चालू आहे आणि पुरुष तो खेळ अलिप्तपणे अनुभवतो. कुंडलिनी शास्त्रात पुरुषाला शिव मानले आहे. प्रकृतीला कुंडलिनी शक्ती मानले गेले आहे. आणि प्रत्येक माणसासाठी हा शक्तीचा खेळ शक्तीच्या शिवसोबत मीलनासाठी चालला आहे असे मानले गेले आहे.
कुंडलिनी शास्त्राप्रमाणे आपल्या डोक्याचवरील सर्वोच्च स्थान (टाळू) येथे शिवाचे वास्तव्य आहे. कुंडलिनी आपल्या पाठीच्या मणक्याच्या सर्वात खालच्या ठिकाणी वास्तव्य करीत असते. या कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून क्रमाक्रमाने शिवापर्यंत आणणे ही कुंडलिनी साधना आहे. कुंडलिनीच्या स्थानापासून शिवाच्या स्थानापर्यंत हा प्रवास पाठीच्या कण्याच्या मार्गाने होतो. या मार्गात सात प्रमुख चक्रे अथवा स्थाने मानली गेली आहेत. ही चक्रे ओलांडत म्हणजे भेदत कुंडलिनीचा प्रवास होतो.
ग्रंथ हेच माझे गुरु आहेत. ग्रंथांपर्यंत पोचण्याचे इंटरनेट हेच माझे साधन आहे. म्हणूनच ज्यांना या कारणामुळे माझे लेख वाचायचे नसतील त्यांनी कृपया या लेखांच्या वाटेला जाऊ नये. त्यांनी माहिती मिळविण्यासाठी त्यांचे अन्य मार्ग शोधावेत. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाण्यासाठी मोकळे आहेत.
हे शास्त्र समजावण्यासाठी जे साहित्य उपलब्ध आहे ते थोड्याफार सांकेतिक भाषेत आहे. त्यामुळे समजणे कठीण जाते. अनेक वेळा तर प्रत्यक्ष अनुभवानंतर या शास्त्रातील गूढ भाषेचा अर्थ लागतो. मलाही अनेक वर्षांच्या ध्यानानंतर त्यातील थोड्याच संकेतांचा अर्थ कळला आहे. त्यामुळे या शास्त्रातील मी मोठा जाणकार आहे असा मी दावा करीत नाही. परंतु मला जेवढा अर्थ उलगडला आहे तेवढा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचत त्यामुळे आपल्याला या शास्त्रात गोडी वाटेल आणि आपला प्रवास सुरु होईल. हे ज्ञान फक्त त्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण कारण्याएवढेच असेल, कारण माझी झेप तेवढीच आहे.
पुढील लेखात आपण हा विषय समजून घेण्यास सुरुवात करू.
No comments:
Post a Comment