मागील लेखात आपण कुंडलिनी विद्येसंबंधात थोडी माहिती घेतली होती. कुंडलिनी विद्या ही कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून म्हणजेच मूलाधार चक्रापासून सहस्रारात वसलेल्या शिवापर्यंत नेण्याची विद्या आहे हे आपण पाहिले. हा प्रवास पाठीच्या मणक्यातून होतो. पाठीच्या मणक्यातून मज्जारज्जू (Spinal Chord) जातो. ही विद्या आपल्या मज्जारज्जूला आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला कार्यान्वित करण्याची विद्या आहे. अर्थातच आपल्या शरीर-मनावर परिणाम घडविणारी विद्या आहे. आपले शरीरस्वास्थ्य-मनोस्वास्थ्य टिकविण्याची विद्या आहे. कोणाला काही अद्भुत-अलौकिक अनुभव घेण्यासाठी ही विद्या शिकायची असेल तर त्यांनी या वाटेला न जाणेच चांगले. कारण काही अदभूत अनुभवाच्या प्रतीक्षेत मूळ उद्देशावरून लक्ष उडून शरीर-मनाला काही धोका संभवू शकतो. जर कोणाला यातून काही अलौकिक वाटणारे अनुभव आलेच तर ते त्याने स्वत:जवळच ठेवावे, विसरून जावे. त्याची वाच्यता केल्याने अथवा सतत मनात घोळवत राहिल्याने (मन विचलित होऊन) कुंडलिनी परत खाली उतरून मन:स्वास्थ्य बिघडू शकते. एकदा वर गेलेली कुंडलिनी परत खाली आल्यास त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. काही अध्यात्मिक गुरु काही काळानंतर वासनेच्या आणि अन्य चिखलात रुतलेले दिसतात. हा वर गेलेली कुंडलिनी परत खाली उतरण्याचा परिणाम असावा.
कुंडलिनी विद्येचा अभ्यास करताना पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्यातून निघणारे मज्जातंतू (Nerves) प्रथम कार्यान्वित करायचे आहेत. यालाच पाठीच्या शेवटच्या मणक्यातील चक्र म्हणजे मूलाधार चक्र भेदणे असे नाव आहे. हे या चक्रातून निघणारे मज्जातंतू ज्या ज्या अवयवात जातात ते अवयव चांगल्या प्रकारे कार्यंवित होतात. पण याचा आणखीही एक महत्वाचा परिणाम होतो. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूत जाते. मेंदूच्या या भागात काही मनोव्यापार नियंत्रित करणारी केंद्रे असतात. त्यावरही हे मज्जातंतू कार्यान्वित झाल्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.
उदाहरणार्थ: स्वाधिष्ठान चक्रातून निघणारे मज्जातंतू लैंगिक अवयवांकडे जातात. आपल्याला माहीत आहे की लैंगिक आवेग हे तीव्र आणि आवरण्यास कठीण असतात. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूतील आवरत्या न येणाऱ्या तीव्र भावना नियंत्रित करणाऱ्या भागात जाते. यामुळे या चक्रावर ध्यान केल्यास अति तीव्र भावनांवर (झटकन राग येणे इत्यादी) नियंत्रण मिळविता येते. तसेच या चक्रातून निघणारे काही मज्जातंतू लहान आतड्याच्या शेवटच्या भागाकडे आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाकडे जातात. संतापी स्वभावामुळे शरीराच्या या भागाला इजा पोचू शकते. या चक्रावर ध्यान केल्यास (हे चक्र भेदले गेल्यास) स्वभाव शांत होतो आणि पोटाचे हे रोगही आटोक्यात येतात.
मनोव्यापार उच्च पातळीवर नेणे आधुनिक वैद्यकीय शास्त्राला कठीण वाटते, पण कुंडलिनी विद्येच्या साहाय्याने ते साध्य करता येते.
कुंडलिनी जागृतीच्या मार्गात असणारी चक्रे कोणती, त्याचा आधुनिक शास्त्राच्या परिभाषेत संबंध काय हे आपण पुढील लेखात पाहू.
No comments:
Post a Comment