गेला आठवडा आपण सांख्य दर्शनाचा अभ्यास करत होतो. हे इ.स. पूर्व ७०० वर्षे इतके प्राचीन दर्शन आहे. भारतीय जनमानसावर सर्वात अधिक प्रभाव या दर्शनाचा आहे.
'सत्कार्यवाद' हा या दर्शनाचा आधार आहे. म्हणजेच शून्यातून काही निर्माण होऊ शकत नाही असे हे दर्शन मानते, त्यामुळे या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या 'देवाने विश्व घडविले' या सिद्धांतास हे दर्शन विरोध करते. या विश्वाची 'पुरुष' आणि 'प्रकृती' ही दोन मूलभूत तत्वे असल्याचे हे दर्शन प्रतिपादन करते.
प्रकृतीमध्ये असीम शक्यता दडलेल्या आहेत. मात्र या शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी ती अस्वस्थ आहे. पुरुष हा केवळ चैतन्य आहे. अनुभवाशिवाय चैतन्यला अर्थ नाही. प्रकृती आणि पुरुष एकत्र आल्यावर प्रकृती पुरुषापुढे विश्व उभे करते. पुरुष त्याचा अनुभव घेण्यात अडकत जातो. आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हेच विसरतो. त्यामुळे तो दु:ख अनुभवतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुरुषाला आपल्या निरंजन चैतन्याची जाणीव होणे. याला या दर्शनात 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला ही जाणीव होण्यासाठी अनेक मार्ग या ऋषीमुनींनी दाखविले आहेत. आपण एक उदाहरण म्हणून त्यातील एका मार्गाची ओळख करून घेतली.
हे दर्शन प्रकृतीचा खोलात शिरून अभ्यास करते. प्रकृतीने हे विश्व आपल्यापुढे उभे केले आहे. आपल्या समस्याच या विश्वातील समस्याच आहेत. त्यामुळे आपल्या विविध ज्ञानशाखांनी आपल्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी याच दर्शनाचा आधार घेतला. आपण यापैकी एका ज्ञानशाखेचे उदाहरण पाहिले.
प्राचीन भारतीय ज्ञान हे विविध शाखांच्या तुकड्यातुकड्यात निर्माण झालेले नाही. ते एकसंघ (streamlined) आहे. हेच आपल्या विविध ज्ञानशाखांचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा अभ्यास सांख्यदर्शनाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण राहील. असेच अन्य शाखांच्याबाबत आहे.
एक भारतीय म्हणून आपल्याला सांख्य दर्शनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
ही लेखमाला येथेच संपवितो.
लेखनसीमा !