प्रकृती आपल्यातील असीम शक्यता दाखविण्यासाठी अस्वस्थ आहे. पुरुष (चैतन्य) विविध अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष एकत्र आले की एकमेकांना सहाय्यभूत होतात. परंतु आपला खेळ अधिकाधिक वेळ चालत राहावा म्हणून प्रकृती पुरुषाला आपल्यात अधिकधीक गुंतवत जाते. यात पुरुष आपण मुळात 'केवळ चैतन्य' आहोत हेच विसरतो. मग प्रकृतीमुळे मनात निर्माण होणारी सुख-दु:खे आपलीच आहेत असे समजू लागतो. हेच माणसाच्या दु :खाचे कारण आहे. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याची जाणीव होणे - म्हणजे कैवल्य प्राप्त होणे - हा या जीवनातील दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते.
कपिल मुनींनी इ.स.पूर्वी सातशे वर्ष या काळात सांख्य दर्शन प्रतिपादन केले. त्यानंतर सत्तावीसशे वर्षात पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक मार्ग सुचविले गेले. यापैकी एक मार्ग आहे 'कुंडलिनी ध्यान'. कुंडलिनी ध्यानाचा आधार सांख्य तत्वज्ञान आहे.
पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर यायचे असेल तर अत्यंत सावधपणे ज्या क्रमाने गुंतत गेलो त्याच्या विरुद्ध क्रमाने स्वत:ला सोडवून घ्यावे लागेल. म्हणजेच ज्या गोष्टीत शेवटी गुंतलो त्यातून प्रथम सुटका करावी लागेल. कोठल्याही जाळ्यात अडकलेल्या माणसाला अशाच क्रमाने जावे लागते. कुंडलिनी ध्यानात हाच क्रम आहे.
पाठीच्या काण्यात प्रत्येक दोन मणक्यांमधून चेतातंतू बाहेर पडतात. यातील पाच ठिकाणे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली गेली आहेत. या शिवाय कपाळावरील दोन भुवयांमधील जागा (भ्रूमध्य) आणि डोक्याचा सर्वात वरचा भाग (टाळू) ही ठिकाणेही महत्वाची मनाली गेली आहेत. या ठिकाणांना 'चक्र' म्हणतात. ही सात चक्रे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली जातात.
सर्वात खालचे गदद्वाराजवळचे मूलाधार चक्र या चक्रावर 'पृथ्वी' या पंचमहाभूतांचे वर्चस्व असते. त्यानंतर अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्र (जल), मणिपूर चक्र (अग्नी), अनाहत चक्र (वायू) आणि घशातील विशुद्ध चक्र (आकाश) अशी चक्रे येतात. प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडायचे असेल तर क्रमाक्रमाने मूलाधार चक्रापासून सुरुवात करून विशुद्ध चक्र जागृत करावे लागते. नंतर भ्रूमध्यातील आज्ञाचक्र आणि टाळूमधील सहस्त्रार जागृत करावे लागते. शेवटची दोन चक्रे आपल्या चित्ताशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पुरुष ज्या क्रमाने प्रकृतीच्या जाळ्यात अडकला त्याच्या विरुद्ध क्रमाने सुटका करून घ्यावी लागते.पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी इतरही अनेक उपाय ऋषीमुनींनी शोधले आहेत. परंतु त्यावर माझा फार अभ्यास नाही. आपला नित्य व्यवहार प्रकृतीशी होत असल्याने सांख्य दर्शन आधारभूत मानून अनेक जीवनोपयोगी शास्त्रे विकसित झाली आहेत. उदा. योग, आयुर्वेद. आपण याबद्दल पुढील लेखात विचार करू.
कुंडलिनी ध्यानासंबंधी विस्तृत विवेचन माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' विभागात आहे.
No comments:
Post a Comment