Wednesday, August 28, 2024

महाभारतातील युद्धकथा - भीष्मवधपर्व

 महाभारतातील युद्धकथा - भीष्मवधपर्व (sagarpadhye.blogspot.com)

सात्यकी

 अनंत सुरेश अंभईकर सरांचा महाभारताचा व्यासंग अतिशय दांडगा आहेच. त्याच जोरावर त्यांनी सात्यकीवर विलक्षण लेखमाला लिहिली आहे. तरी सात्यकी हे पात्र नव्याने कळावे ह्यासाठी सर्व भागांची लिंक खाली देत आहे, सर्वांनी वाचनाचा आनंद घ्यावा..

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

वैदिक समय कालगणना

 


Tuesday, August 20, 2024

गंगा नदी प्रणाली

 


काशी-मथूरा

 १७५७ मध्ये होळीच्या वेळी (दोन दिवस), मथुरा आणि वृंदावन यांनी अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सैन्याच्या हातून हिंदूंचा संहार पाहिला. होळी साजरी करण्यासाठी तेथे जमलेले हजारो स्थानिक आणि यात्रेकरू यात बळी पडले. त्यांनी लहान मुले आणि महिलांनाही सोडले नाही. तो दिवस २८ फेब्रुवारी १७५७ हा होता. 


जाट राजपुत्र जवाहर सिंग याने ५००० सैनिकांसह अब्दालीच्या सैन्याला मथुरा गावाबाहेर प्रतिकार करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु ती व्यर्थ ठरली. ही लढाई ९ तास चालली. जवाहरसिंगच्या ३००० सैनिकांनी वीरगती गाठली.


त्यानंतर अब्दालीच्या फौजांनी गोकुळकडे कूच केले. तेथील नागा साधूंनी मंदिरे आणि लोकांचे रक्षण केले. अब्दालीच्या सैन्याविरुद्ध झालेल्या भीषण युद्धात नागा साधू विजयी झाले. यात २००० हून अधिक नागा साधूंना वीरगती प्राप्त झाली.


या दोन दिवसांत धर्म आणि मातृभूमीसाठी सद्गती मिळवलेल्या आणि नरसंहाराला बळी पडलेल्या आपल्या सर्व योद्धा पूर्वजांना ही होळी समर्पित करुयात.


- आपला अमर




Saturday, August 17, 2024

ऐरावतेश्वर मंदिरातील जिन्याच्या संगीतमय पायऱ्या !

 ऐरावतेश्वर मंदिरातील जिन्याच्या संगीतमय पायऱ्या !

तामिळनाडू मधील कुम्भकोणम जवळ दारासुरम येथे भगवान शंकरांना समर्पित असणारे "ऐरावतेश्वर मंदिर" आहे !
सदरील मंदिराचे बांधकाम 12 व्या शतकात राज राजा चोळ यांनी केलेलं आहे!
ह्या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील बली पिठम जवळ दगडात कोरलेला जिना आहे. हा जीना चढत असताना जिन्याच्या पायऱ्यांवर पाऊल टाकल्यावर ह्या पायऱ्या मधून सात प्रकारचे संगीतमय स्वर निर्माण होतात! लेखक धोंडोपंत दामले

विरुपाक्ष मंदिरातील पिन-होल कॅमेरा..!

 फिजिक्स मधील पिन-होल कॅमेराच्या सिध्दांताचा शोध सर्वप्रथम 1816 मध्ये फ्रांस मधील जोसेफ निसेफर निप्स याने लावला असा खोटा प्रचार केला जातो !

पण पिन-होल कॅमेराच्या सिद्धांताचा शोध हा हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्मातील ऋषीमुनी आणि राजांनी लावलेला आहे. ह्याची साक्ष कर्नाटक येथील हंम्पी मध्ये असलेल्या विरुपाक्ष मंदिरातील पिन-होल कॅमेरा देतो.!
विरुपक्ष मंदिर हे राजा कृष्णदेव राय ह्यांनी बांधलेले असून हे मंदिर भगवान शंकरांचा अवतार भगवान विरुपाक्ष ह्यांना समर्पित आहे.!
पिन-होल कॅमेरा सिद्धांत म्हणजे काय?
पिन-होल कॅमेरा एक बंद बॉक्स असतो. ज्याच्या एका बाजूला एक छिद्र असते. आणि त्या बॉक्सच्या बाहेरील बाजूस त्या छिद्रा समोर असणाऱ्या वस्तुवरती प्रकाश किरणे रिफ्लेक्ट होऊन छिद्रातून बॉक्स मध्ये प्रवेश करतात. बॉक्सच्या दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर त्या वस्तूचे उलटे छायाचित्र निर्माण होते. त्या सिध्दांताला पिन-होल कॅमेरा सिद्धांत असे म्हणतात.!
विरुपाक्ष मंदिराचा निर्माण अश्या पद्धतीने केलेला आहे की मंदिर परिसरात असणाऱ्या "राजा गोपुरम" वास्तूची छाया ही राजा गोपुरम पासून 300 फूट दूर असलेल्या सौलू मंडपा ह्या वास्तू मधील गाभाऱ्यातील भिंतीवर उलट्या स्वरूपात दिसते.!
इथे पिन-होल कॅमेरा सिध्दांत त्याकाळी वापरलेला आहे. सौलू मंडपा वास्तूच्या एका भिंतीला बारीक छिद्र आहे. आणि बरोबर त्या छिद्राच्या 300 फूट समोर " राज गोपुरम" ही वास्तू बांधलेली आहे. ज्यामुळे " राज गोपुरम" वास्तूवरती प्रकाश किरणे रिफ्लेक्ट होऊन ती " सौलू मंडप " वास्तूच्या भिंतीला असणाऱ्या छिद्रातून प्रवेश करून " सौलू मंडप " वास्तूच्या दुसऱ्या भिंतीवर " राज गोपुरम" चे उलटे छायाचित्र निर्माण करतात.!
सौलू मंडप भिंतीवर निर्माण होणारे राज गोपुरम चे उलटे छायाचित्र हे दोन रंगात दिसते. सकाळच्या वेळी ते ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये दिसते. आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या दिशेने रवाना होताना हे छायाचित्र संपूर्ण सोनेरी रंगात दिसत.!
ह्यावरून लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या तथाकथित विज्ञानाचे ढोल पिटणाऱ्या पाश्चात्य वैज्ञानिकांच्या जन्माआधी हजारों वर्षांपूर्वीच हिंदू धर्मातील ऋषीमुनीं आणि अनेक हिंदू राजांनी उच्च कोटीच्या विज्ञानाचे शिखर सर केलेले होते.! लेखक धोंडोपंत दामले



प्रकाशाचा विवर्तन सिध्दांत (Diffraction of light) व छाया सोमेश्वर मंदिर !

 प्रकाशाचा विवर्तन सिध्दांत (Diffraction of light) व छाया सोमेश्वर मंदिर !

तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यामध्ये " छाया सोमेश्वर मंदिर" आहे. सदरील मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून ह्या मंदिराचे बांधकाम राजा कुंदुरू चोळ ह्याने 11 व्या शतकात केले आहे!
छाया सोमेश्वर मंदिराच बांधकाम हे प्रकाश किरणांच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या (Diffraction of light) आधारावर केलेले आहे ! ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील गर्भगृहात असणाऱ्या शिवलिंगाच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर गर्भगृहाच्या बाहेरील मंडपातील खांबाची स्थिर स्वरूपातील सावली पडते.!
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाभाऱ्याची भिंत आणि सूर्य यांच्यामध्ये कुठलाही खांब नाहीये.! तरी सुद्धा ही सावली दिवस भर एकाच जागी स्थिर रहाते.!
मंदिराच बांधकाम हे (Diffrection Of Light) अर्थात प्रकाशाचा विवर्तन सिध्दांताच्या आधारावर केले गेले आहे.! त्यामुळे खांबाची सावली गर्भगृहातील शिवलिंगाच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर दिवसभर स्थिर स्वरूपात राहते.!
प्रकाशाच्या विवर्तन सिध्दांतानुसार प्रकाश किरणांच्या मध्ये कुठलीही गोष्ट आडवी आली तर प्रकाशाची किरणे त्या वस्तूवर आदळून रस्ता बदलतात. आणि परिणामी स्वरूपात त्या वस्तूची सावली एका जागी स्थिर दिसते.!
आपण फोटो मध्ये बघू शकता मंदिरातील गर्भगृहाच्या बाहेरील दोन्ही बाजूला प्रकाश किरणे आत मध्ये येण्यासाठी मोकळी जागा ठेवलेली आहे.! त्यामुळे सदरील जागेतून प्रवेश करणाऱ्या प्रकाश किरणांच्या मध्ये मंडपातील खांब आडवे आल्याने ती प्रकाश किरणे आपली दिशा बदलून गर्भगृहातील शिवलिंगाच्या मागील बाजूच्या भिंतीवर खांबाची स्थिर प्रतिमा निर्माण करतात.!
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशाच्या विवर्तन सिद्धांताचा शोध हा 17 व्या शतकात लागलेला आहे. म्हणजे जवळपास मंदिराच्या निर्माणानंतर ६०० वर्षांनी लागलेला आहे.!
ह्याचाच अर्थ त्याकाळी मंदिराचे बांधकाम करणाऱ्या वास्तुकारांना प्रकाशाच्या विवर्तन सिद्धांताचे अचूक ज्ञान होते.!
छाया सोमेश्वर मंदिराच्या निर्माण काळात वापरण्यात आलेला प्रकाशाचा विवर्तन सिध्दांत प्राचीन भारतीय विज्ञान हे इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने पुढे होते ह्याची साक्ष देतो.!
© धोंडोपंत दामले.



भूकंप विरोधी तंत्रज्ञान वापरून बनवलेले सुरंग टीला मंदिर!

 भूकंप विरोधी तंत्रज्ञान वापरून बनवलेले सुरंग टीला मंदिर!

छत्तीसगड मधील सिरपूर येथील सुरंग टीला मंदिर हे भूकंप विरोधी तंत्रज्ञान वापरून बनवले गेले आहे. !
मंदिराचे बांधकाम महाशिवगुप्त बलार्जुन ह्यांनी सातव्या शतकात केले गेले असून हे मंदिर भगवान शंकरांना समर्पीत आहे !
11 व्या शताब्दी मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने त्या परिसरातील सर्व इमारती नष्ट केल्या पण येथे वापरण्यात आलेल्या भूकंप विरोधी तंत्रज्ञानामुळे ह्या मंदिराच्या पायऱ्या वाकण्या पलीकडे कुठलेही नुकसान झाले नाही.!
हे मंदिर मयमतम स्थापत्य शास्त्रा नुसार निर्माण करण्यात आले आहे.! मंदिराचे बांधकाम करताना मंदिराच्या भू-गर्भात 1 मीटर लांबी आणि 1 मीटर रुंदीचे 80 फूट खोल 3 खड्डे बनवले गेलेत ! ह्या खड्डयामध्ये नंतर अग्नी प्रजवलीत केला गेला ज्यामुळे ह्यातील हवा बाहेर फेकली गेली आणि नंतर हे खड्डे सील करण्यात आले.! ज्यामुळे ह्यामध्ये व्हॅक्युम निर्माण झाला.! आणि व्हॅक्युम मुळे भूकंप लहरींचा प्रवास रोखला गेला.!
मंदिराच्या भिंतीचे बांधकाम हे आयुर्वेदिक लेप वापरून करण्यात आलेले आहे. ज्या लेपाचे आयुष्य हजारो वर्षे असते. ह्या लेपाना "वज्रलेप " असे म्हणतात. ह्यासमोर आजच्या युगातील सिमेंट सुद्धा एवढं टिकू शकत नाही.!
विचार करा पूर्वीच्या काळात किती महान तंत्रज्ञान होत ज्याच्या समोर आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा टिकू शकत नाही.!

Friday, August 9, 2024

संपत शनिवारची कहाणी

 आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसुद्धां शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्‍या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहूं लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकर्‍या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बीं वाटलं नि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली.

इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यांनं आंघोळ घाल. घरांत गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वांटलेले बीं लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला?” तुला कांहीं कमी पडणार नाहीं” म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोंचलं, शनिदेव अदृश्य झाले. काहीं वेळानं घरीं सासूसासरे, दीरजावा आल्या. त्यांनीं सर्व तयाई उत्तम पाहिली, संतोषी झालीं. आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं. हें असं कशानं आलं, म्हणून आश्चर्य करूं लागली.

दुसर्‍या शनिवारीं ब्राह्मणानं दुसर्‍या सुनेला घरी ठेवलं. सगळीं माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली? शानिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरीं आले. मागच्या सारखंच मला न्हाऊं घाल, मांखू घाल, म्हणून म्हणूं लागले. ब्राह्मणाची सून घरीं होती ती त्याच्याशीं बोलूं लागली, “बाबा, आम्हीं काय करावं! आमच्याजवळ कांहीं नाहीं.” देव म्हणाले, “ जे असेल त्यांतलंच थोडंसं मला दे.” ब्राह्मणाची सून मजजवळ कांहीं असलं तरी नाहीसं होईल.” असा त्यांनीं शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकीं पाहूं लागली. तिला कांहीं सापडलं नाहीं. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरीं आलीं. सर्व तयारी पाहू लागलीं. तो त्यांना कांहींच दिसेना. मग सुनेला रागं भरलीं. सुनेनं झालेली हकीकत सांगितलेली.

पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसर्‍या सुनेला घरीं ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला तेल लाव म्हणून म्हणूं लागले. तिनं दुसर्‍या जावेसारखा जबाब दिला. देवांनीं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? कांहीं वेळानं सासुसासरा घरीं आलीं, जेवणाची तयाई पाहूं लागलीं, तों तिथं कांहीं दिसेना. मग त्यांनीं सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत फार खिन्न झालीं.

पुढं चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरीं ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरीं आला. सुनेला म्हणूं लागला. “बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव.” तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हां देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडींमडकीं पाहूं लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला, आणि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली. इतक्यांत सासूसासरा तिथं आलीं. सुनेला विचारूं लागली. “मुली मुली, आज तूं काय केलं आहेस?” सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडीं लावायला केनीकुर्डूची भाजी आहे.” सासूसासर्‍यांस आनंद झाला. “आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं?” म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला. सासर्‍याला आनंद झाला.

इतक्यांत काय चमत्कार झाला? सासर्‍यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं कांहीं खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी तें सोडून पाहिलं तॊ, पत्रावळींवर हिरेमोत्यें दृष्टीस पडलीं सुनेला दाखविलीं, ह्याच पत्रावळींवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला, “देवानं मुलीला दर्शन दिलं.” पुढं दुसर्‍या सुनांस हकीकत विचारली, त्यांनीं दोन वेळां आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही त्याला कांहीं दिलं नाहीं, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ कांहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्यामडक्यांत दाणे नाहींसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला.” पुढं सासुसासर्‍यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करूं लागली.

जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

शुक्रवारची कहाणी

 एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. 

त्याची पत्नी शेजारणीकडे गेली. आपल्या गरीबीबद्दल सांगितलं. तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. 

“श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर. दिवसभर उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत. हळदी कुंकू देऊन ओटी भरावी. दूध-साखर प्यायला द्यावी. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं.” 

त्याप्रमाणे ब्राह्मण स्त्री शुक्रवारचं व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. एके दिवशी त्यानं गावाला सहस्रभोजन घातलं; पण बहिणीला बोलवलं नाही. त्याला वाटलं, बहिणीला बोलावलं, तर गरीब म्हणून सारे हसतील. अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती. 

बहिणीनं विचार केला, भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल. भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ? ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली. शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं. 

भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला. तिला म्हणाला, “ताई, तू गरीब. तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागदागिने नाहीत. तुझ्याकडे पाहून सगळे हसतात. मी तुला बोलावलं नाही. आज तू आलीस. आता उद्या येऊ नकोस.” 

हे ऐकून ती हिरमुसली होऊन जेवली. मुलांना घेऊन घरी आली.

दुसरे दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला. तिनं विचार केला, “कसाही असला, तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं?” ती मुलांना घेऊन जेवायला गेली. तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला. 

तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं तिला हात धरून घालवून दिलं. ती खूप दु:खी-कष्टी झाली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची दया आली. नंतर तिला सुखाचे दिवस आले.

एक वर्ष निघून गेले. तशी तिची गरीबी गेली. ती श्रीमंत झाली. देवीची तिजवर कृपा झाली. शुक्रवारचं उद्यापन करायचं; म्हणून भावाला जेवायल बोलावलं.

भाऊ मनात ओशाळला व म्हणाला, “ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. तू नाही आलीस, तर मी काही तुझ्या घरी येणार नाही.” ती ‘हो’ म्हणाली. 

भावाच्या मनातलं कारण तिने ओळखलं. दुसऱ्या दिवशी दाग-दागिने घालून, उंची पैठणी नेसून भावाकडं जेवायला गेली. 

भावानं मोठ्या प्रेमाने व आदराने तिला पानावर बसवलं. ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली. भावानं विचार केला, उकडत असेल. नंतर दागिने काढून पाटावर ठेवले. भावानं विचार केला, जड म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठा घास उचलून सरीवर ठेवला. एकेक पक्वानाचा घास एकेका दागिन्यावर ठेवत गेली. 

आता मात्र भावानं विचारलं, “ताई, हे काय करते आहेस ?” 

ती म्हणाली, “दादा, मी करते, हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस, तिला मी भरवते आहे.” 

भावानं तिला पुन्हा जेवावयास सांगितलं. 

तेव्हा ती म्हणाली, “हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं, ते मी सहस्रभोजनाचे दिवशी जेवले.” 

हे ऐकताच भाऊ अतिशय खजील झाला. उठून त्याने बहिणीचे पाय धरले. झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. बहीण मोठ्या मनाची; तिने क्षमा केली. एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघं प्रेमाने जेवले. 

दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला खूप आनंद झाला. 

तिनं शुक्रवारचे देवीचे व्रत केले; त्यामुळे ती श्रीमंत व सुखी, आनंदी झाली. तसं तुम्हा-आम्हां करो. 

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Tuesday, August 6, 2024

बुध-बृहस्पतींची कहाणी

 ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत.

असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणें भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले.

सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, आम्ही संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे, आतां आम्हीं पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा !

ते म्हणाले, श्रावणमासीं दर बुधवारी आणि बृहस्पतवारीं जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावं पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात ! त्याप्रमाणं ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यांत तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनीं तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला ! तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं, म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली, पुन्हां त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे तीनदां झालं.

पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हां तीं अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली.मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागलें. तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला.

तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं, तूप वाढूं सांगितलं, ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्यांचा सन्मान केला, मुलंबाळं झालीं, दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध-बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत ! ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

मंगळागौरीची कहाणी

 आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामान ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू  लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी  सुफळ संपूर्ण.

Monday, August 5, 2024

शिवतांडव नृत्य आणि शिवतांडव स्तोत्र ‘ लेखक दा. कृ. सोमण, पंचांगकर्ता, खगोल अभ्यासक

आज पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण प्राचीन तांडवनृत्याविषयी आणि शिवतांडव स्तोत्राविषयी माहिती करून घेऊया.

‘ तांडव नृत्य ‘ हा प्राचीन नृत्यप्रकार असून भगवान शंकराने ते प्रवर्तित केले असे समजले जाते. संगीतरत्नाकर ग्रंथामध्ये तांडवनृत्याची उत्पत्ती दिलेली आहे. ती अशी—
प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्रयुक्तं ततो हर: ।
तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत् ॥
लास्यमस्याग्रत: प्रीत्या पार्वत्या समदीदृशत् ।
बुद्ध् वाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोऽवदन् ॥
— नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धत नृत्य आठवून ते आपल्या गणांतील अग्रणी असलेल्या तंडूकरवी भरतमुनीला दाखविले. तसेच लास्ट हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करून दाखविले. तंडूने करून दाखविले ते तांडव, असे जाणून भरतादी मुनीनी ते नृत्य मानवांना शिकविले.
तांडव नृत्याचे सात प्रकार आहेत. ते असे— (१) आनंदतांडव (२) संध्यातांडव (३) कालिकातांडव (४) त्रिपुरतांडव (५) गौरीतांडव (६) संहारतांडव (७) उमातांडव. हे सातही प्रकार नटराज शिवाला प्रिय होते.
संध्यातांडवनृत्याचे वर्णन शिवप्रदोष स्तोत्रात आले आहे. जेव्हा शिव नृत्यासाठी सिद्ध होतो त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते. इंद्र बासरीतून स्वर छेडतो. ब्रह्मा ताल देतो, लक्ष्मी गाणे गाते, विष्णू मृदंग वाजवितात आणि सर्व देवदेवता भोवती उभ्या राहून हा नृत्यदर्शनाचा सोहळा अनुभवतात. या नृत्यात शिवाचे स्वरुप द्विभुज असते. पायाखाली दैत्य चिरडला जात असल्याचे दृश्य नसते.
गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही नृत्ये उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यांमध्ये शिव हा भैरव अथवा वीरभद्र स्वरुपात असतो. त्याच्याबरोबर उमा किंवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशानभूमीत भूतगणांच्या साथीने ही भयानक नृत्ये करतो. इथे जीवांचा अहंकार भस्मसात होतो, अशा अवस्थेचे प्रतीक म्हणजे स्मशानभूमीच होय म्हणून त्या पार्श्वभूमीवर हे नृत्य केले जाते.
शिवतांडव नृत्य करीत असताना त्याला साथ देण्यासाठी देव आणि असूर सारखेच उत्सुक असतात. भगवान शंकर हे संगीत आणि नृत्याचे जनक मानले जातात. काही ग्रंथांमध्ये दोन प्रकारच्या तांडवनृत्याचे प्रकार सांगितलेले आहेत. (१) रौद्ररूप - रौद्रतांडवनृ्य. आणि (२) आनंदरूप - आनंदतांडवनृत्य. रौद्रतांडव नृत्य रूद्र करतो आणि आनंदतांडव नृत्य नटराज करतो.
नटराज हे शिवाचे एक रूप आहे. या रूपात शिवाने नृत्य- नाट्य कला प्रवर्तित केली. खरे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरातील पूजेबरोबर नृत्य-नाट्याचे, संगीताचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत . मी ठाणे येथील प्राचीन शिवमंदिराच्या विश्वस्तांना हे सुचविले. परंतू ते कृतीत येत नाही. शिव हा आद्य नट आहे. निसर्गातही संगीत चालू असते. तुम्ही जर निसर्गात भ्रमंती केलीत तर तुम्हालाही निसर्गाचे संगीत ऐकू येईल. कधी कधी निसर्गात तांडवनृत्यही दिसते. ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाळा आहे.
नटराजमूर्ती ही अनेक मंदीरांमध्ये तसेच शिल्पांमध्ये आढळते. नटराजाचे तांडव हेच प्रमुख नृत्य आहे.
शिवतांडव स्तोत्राची रचना रावणाने आपले आराध्य भगवान शिव यांची स्तुती करण्यासाठी केली होती असे सांगण्यात येते. या स्तोत्रामध्ये एकूण १७ श्लोक आहेत. त्यापैकी १५ श्लोकांची रचना प्रत्यक्ष शिवभक्त रावणाने केली असे सांगितले आहे. २ श्लोक नंतर जोडण्यात आले. रावणाने ड्रमच्या तालावर १००८ छंदांची रचना केली असेही सांगितले जाते. शिव क्रोधात असतात तेव्हा तांडव नृत्य करतांना तिसरा डोळा उघडतात. शिव आनंदात असतात त्यावेळी डमरू वाजवीत आनंदतांडव नृत्य करतात.
======================

श्रावणी सोमवार शिवमूठ कथा

 आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली.

नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा,भ्रतरा,नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा.पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग,चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानणंदानीं उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं,दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.
नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली. नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ? सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Like
Comment
Send
Share