Monday, November 24, 2014

डॉ.लोहिया यांची विकासनीती भाग ३ : आपली पारंपारिक अर्थव्यवस्था

मागील भागात आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचे SWOT Analysis केले होते. ते लक्षात घेता आपली बलस्थाने आणि मर्यादा या पाश्चात्य देशांच्या बलस्थाने आणि मर्यादांपेक्षा पूर्णपणे भिन्न होत्या असे दिसून येईल. म्हणूनच आपली विकासनीती या देशांपेक्षा वेगळी (Unique) असणे आवश्यक होते.
महात्मा गांधी भारतातील रुजलेल्या स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेला आदर्श मानीत होते. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेमुळे ग्रामीण भाग आपला विकास आपणच करू शकत होता. त्यात गावातील प्रत्येकाचा सहभाग होता. प्रत्येकाच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पनांना त्यात वाव होता म्हणूनच ही व्यवस्था अधिक Creative होती. ग्रामपातळीवरील सहभागामुळे कायद्याचे पालन होणे आणि कायदा पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे सुलभ होते, न्यायव्यवस्था काटेकोर नसली तरी जलद होती. पर्यावरण रक्षण होत होते. गावातील पैसा गावातच रहात होता. उर्जा, पाणी इत्यादी संसाधानंचा जपून वापर होत होता.
या अर्थव्यवस्थेत जातीव्यवस्थेचा जन्म झाला. जातिव्यवस्थेमुळे समाजात स्थैर्य आले, एका पिढीकडून कौशल्ये दुसऱ्या पिढीकडे सहजतेने आणि पूर्णपणे हस्तांतरित होत होती. मुलांना आवश्यक ते शिक्षण सहजच घरीच मिळत होते. एका बाजूने ही अत्यंत Innovative व्यवस्था होती. परंतु त्यात काही खूप मोठे दोष शिरले होते. जन्माधिष्टीत जातिव्यवस्थेत उच्च-नीचतेची उतरंड तयार झाली होती. अस्पृश्यतेसारख्या भयानक रूढी समाजात स्थिर होऊ लागल्या होत्या. श्रमाला कमी प्रतिष्ठा मिळू लागली होती. एखाद्याला जातीव्यवस्थेने दिलेल्या कामाव्यतिरिक्त अन्य काम करावेसे वाटले तर ते सहज शक्य नव्हते. गांधीजींनी जातीव्यवस्थेचे हे स्वरूप ओळखले होते. सामाजिक/आर्थिक व्यवस्थेचा ढाचा कायम ठेऊन त्यातील हे दोष दूर करण्याचा उपाय गांधीजी त्यांच्या परीने शोधीत होते.
आपली अर्थव्यवस्था 'ग्रामीण अर्थव्यवस्था' कधीच नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने कच्च्या मालाचे उत्पादन होते आणि पक्का माल बाहेरून विकत घेतला जातो. आपली अर्थव्यवस्था ही ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेचा उत्तम तोल राखणारी, निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होती. येथे ग्रामीण भागात कच्चा माल पिकत होता. नगरांमध्ये त्यावर संस्कार होऊन तो भारतात विकला जात होता वा परदेशी निर्यात होत होता. रेशमाच्या वस्त्राच्या उत्पादनासाठी तर कच्चा माल चीनमधून येत असे आणि वस्त्रे बनवून तो माल पाश्चात्य राष्ट्रांना निर्यात होत असे. मसाल्यांच्या शेतीउत्पादनांवर प्रक्रिया करून तो माल निर्यात होत असे.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यव्यस्थेला आधार देण्यासाठी येथील सुविधां (Infrastructure) अशाच विशेष प्रकारच्या असणे आवश्यक होते. आपल्या Creative पूर्वजांनी अशा सुविधांचे जाळेच तयार केले होते. येथे नगरे नदीच्या / समुद्राच्या काठावर वसली होती. प्रत्येक नगरच्या पंचक्रोशीत अनेक गावे होती. ही गावे त्यांच्या पंचक्रोशीतील नगरांना कच्च्या रस्त्याने जोडली होती. विविध नगरे एकमेकांना रस्त्याने अथवा जलमार्गाने जोडली होती. सर्व नगरांना जोडणारे मोठे रस्ते बंदरांना जोडले होते. बंदरावर परदेशी व्यापाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था होती. जहाज बांधणीचे शास्त्र प्रगत होते. रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी मोठे वृक्ष होते. रस्ते सुरक्षित राहावे यासाठी राजाची गस्त असे. डोंगरी भागातून बंदरापर्यंत येण्यासाठी केलेले नाणेघाटासारखे  रस्ते आजही याची साक्ष देतात. सिल्क रूट तर खुश्कीच्या मार्गाने युरोपला जोडत होता.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळताना पर्यावरणाचा तोल ही सांभाळला जात होता. ग्रामीण भागात कृषी उद्योग होते. कृषी उत्पादने पंचक्रोशीतील नगरांत बैलगाडीच्या सहायाने शेतकरी विकण्यास आणू शकत होता. नगरांत उत्पन्न होणारा कचरा नजीकच्या खेड्यातील शेतीसाठी कच्चा माल (खते तयार करण्यासाठी)  होता. नगरातील सांडपाणी नजीकच जिरविले जात होते, ते शेतीला उपयुक्त होते. नगरे-खेडी यांच्या साहचर्यामुळे लोकवस्तीचा भारही नागरांवर न पडता विभागाला जात होता.
नगरांत तयार झालेला पक्का माल रस्त्याच्या मार्गाने व्यापारी अन्य नगरांत/बंदरात नेत असत. त्यासाठी अनेक बैल असलेल्या बैलगाड्या असत. पानिपतच्या युद्धात अशा ३२ बैल असलेल्या गाड्यांनी सैन्याला रसद पुरविल्याचे उल्लेख आहेत. अंतर्गत वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असे. म्हणूनच बारा महिने वाहणाऱ्या गंगा/यमुनेच्या तीरावर मोठ्या संख्येने नगरे वसली होती.
श्रमाची कामे करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा उपयोग होत असे. यासाठी बलवान बैल असलेली वाणे विकसित केली गेली होती. श्रम करणारे बैल मिळविण्यासाठी बैलांच्या खच्चीकरणाचे तंत्र विसासित केले गेले होते. याच वेळी बैलांचा वंश चालू राहावा, तो अधिक विकसित व्हावा म्हणून 'देवाला वळू सोडण्याची' प्रथा होती. दूध हे उप-उत्पादन होते. हे बैलांपासून उर्जा मिळविण्याचे तंत्र पर्यावरणाशी मैत्री करणारे होते.
या संपूर्ण व्यवस्थेत शहरांचा बकालपणा टाळला गेला होता आणि खेड्यातील शेतकऱ्याला त्याचा माल योग्य भावात विकला जाण्याची हमी होती. शेतीमाल विकणाऱ्या मधल्या दलालांची आवश्यकता नव्हती. ही एक आदर्श Supply Chain Management होती.
ही व्यवस्था शेकडो वर्षांपासून विकसित होत गेली होती. (श्रीकृष्णाने यादवांची वसाहत गोकुळातून हलवून द्वारकेला नेली आणि यादवांना दूध विक्रीच्या व्यवसायातून बाहेर काढून परदेशांशी व्यापार करणाऱ्या बंदरावर आणून वसविले. परदेश व्यापारामुळे द्वारका 'सोन्याची' झाली.) ही व्यवस्था इंग्रज येईपर्यंत नीट चालू होती. अहिल्याराणी होळकरांनी बांधलेला इंदोर पासून कल्याण बंदारापर्यंतचा रस्ता (NH222) याची साक्ष देतो. या व्यवस्थेमुळे इंग्रजांना येथे त्यांचा पक्का माल खपविणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ही व्यवस्था खच्ची केली.
परंतु हजारो वर्षांपासून रुजलेल्या व्यवस्थेची पाळेमुळे शे-दीडशे वर्षात उखडणे इंग्रजांना शक्य नव्हते.  ही भक्कम पायावर विकसित झालेली अर्थव्यवस्था हाच आपला स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचा पाया होऊ शकला असता. गांधीजींनी हे ओळखले होते. परंतु गांधीजींचे प्रमुख कार्य (Mission) वेगळे असल्याने तसेच ते अर्थतज्ञ नसल्याने ही वस्तुस्थिती ते योग्य शब्दात मांडू शकले नाहीत. परंतु डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ते ओळखले होते. त्यांनी गांधीजींच्या कल्पनेला नव्या युगात कसे प्रत्यक्षात आणता येईल याचा विचार केला. 
डॉ. राम मनोहर लोहियांनी काय सुचविले होते ते पुढील भागात.

Sunday, November 23, 2014

सापळे

Image result for भयसापळासंत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त, आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे. त्यांनी सांगितले आहे, की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान‘ त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल. जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,‘ अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!
------------------------------------------------------------------------------------------
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे‘त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल. आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग‘ नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
-------------------------------------------------------------------------------------------------------
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!‘ कोणीतरी समजावत आहे. पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल.
-----------------------------------------------------------

"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘
""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो मी.‘‘
""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..‘‘
""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?‘‘
""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘
""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.
""पण शिखर न येताच?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो‘ असं वाटत नसतं इतकंच!
---------------------------------------------------------------------------------------------

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा. चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

-----------------

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥1॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें निळकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2॥ तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥3॥ हा तुकोबांचा गाथेतील अभंग आहे . .

Saturday, November 22, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -२ :SWOT Analysis

या लेखमालेच्या मागील भागात आपण SWOT Analysis या व्यवस्थापन विचार पद्धतीला स्पर्श केला होता.

आपल्या देशाच्या विकासनीतीवर भाष्य करताना देशाचे SWOT Analysis करणे आवश्यक आहे. डॉ. लोहियांच्या काळी (स्वातंत्र्य मिळाले तेव्हा) असलेल्या आपल्या बलस्थाने आणि मर्यादांमध्ये आता थोडा बदल झाला आहे. संधी आणि धोके यामध्ये मात्र मोठा बदल झालेला जाणवतो. या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन आपण स्वातंत्र्याच्या वेळच्या परिस्थितीचाच प्रामुख्याने विचार करणार आहोत.


बलस्थाने  (Strengths): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील बलस्थाने दिसून येतात.

सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता
शेती, औषधोपचार, धातुशास्त्र, वास्तुशास्त्र इ. मधील पारंपारिक ज्ञान
पशु आणि मानवी श्रमांत काम करू शकणारी यंत्रे आणि अवजारे
प्राचीन सामाजिक आणि आर्थिक घट्ट वीण (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात उसविली होती).
वेगळ्या विचारांचा (धर्म, पंथ इत्यादी) आदर अरण्याची परंपरा, धार्मिक सहिष्णुता (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात  मोडली होती).
प्राचीन आर्थिक भरभराटीचा, व्यापाराचा वारसा (दुसऱ्या महायुद्धापर्यंत भारतीय GDP चा वाटा जगाच्या ३०% होता. स्वातंत्र्याच्या वेळी 1USD = 1INR होते)
धार्मिक आणि राजकीय सत्ता वेगळ्या (युरोपात या सत्ता एकमेकांत विलीन झाल्या होत्या)
पर्यावरण संरक्षणाला धार्मिक विचारात महत्वाचे स्थान
पूर्वेकडील देशांचे सांस्कृतिक नेतृत्व
मध्यपूर्वेतील देशांचे आर्थिक नेतृत्व (१९५६ पर्यंत मध्यपूर्वेतील देश भारतीय रुपया हे चलन वापरीत होते).
तिबेटसारख्या शांततावादी मित्राचा उत्तरेकडे शेजार
पाण्याची भरपूर उपलब्धता
मोटारी, विमाने, शस्त्रास्त्रे यासारख्या गोष्टी भारतात बनत होत्या.
मर्यादा (Weaknesses): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील मर्यादा दिसून येतात.

पुरेसे भांडवल उपलब्ध नाही
कच्चा माल पुरविणारे सुपीक त्रिभुज प्रदेश पाकिस्तानात गेले तर त्यावर प्रक्रिया करणारे कारखाने भारतात राहिले. यामुळे कच्च्या मालाची अनुपलब्धता
जाती धर्मात विभागाला गेलेला समाज., जन्माधिष्टीत उच्चनीचता, अस्पृश्यता
विजेची, पोलादाची अनुपलब्धता
मोठी लोकसंख्या, शेतीची कमी उत्पादकता, मोसमी पावसाचा लहरीपणा
सततच्या आक्रमणांमुळे / अपप्रचारामुळे नागरिकांमधील पराभूत मानसिकता
प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर / राजावर अवलंबून राहण्याची मानसिकता
संस्थाने विलीन करण्यास होणारा विरोध
संधी  (Opportunities): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी पुढील संधी उपलब्ध होत्या असे दिसते.

नव-स्वतंत्र देश भारताकडे नेतृत्वाच्या अपेक्षेने पाहत होते.
मध्य-पूर्वेकडील देशांत तेलाचे साठे मिळत होते, त्या देशांचे आर्थिक नेतृत्व आपल्याकडे होते.
देश विकासाच्या उंबरठ्यावर होता. विकासाची दिशा ठरविण्यास वाव होता.
देशाच्या नेतृत्वाला जनता देवाप्रमाणे मानीत होती. जनतेचे मन वळविणे अधिक सोपे होते.
येथे बनणारी शस्त्रास्त्रे घेण्यासाठी नवस्वतंत्र देश उत्सुक होते.
धोके (Threats) : देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी देशाच्या विकासाला पुढील धोके होते असे दिसते.

देशाचे तुकडे पाडण्यासाठी प्रयत्न करणारी पाश्चात्य राष्ट्रे.
पाकिस्तानकडून आक्रमणाचा धोका
आपली औद्योगिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणारी पाश्चत्य राष्ट्रे
देशाच्या उत्तरेला असलेला साम्राज्यवादी चीन (१९५० नंतर)
या बलस्थाने/मर्यादा/संधी/धोके यांचा विचार करूनच देशाच्या विकासाची रूपरेखा (Road map) बनविणे आवश्यक होते. आपली बलस्थाने आणि मर्यादा पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. म्हणूनच आपली विकासनीती पूर्णपणे वेगळी (Unique) असणे आवश्यक होते. डॉ. लोहिया हे स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी असलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांना आपल्या देशाच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पूर्णपणे जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाच्या समाजवादी पक्षाच्या समितीने बनविलेली विकासनीती देशाच्या गरजांचे भान असलेली होती.

या विकसनीतीचा उहापोह आपण पुढील लेखात करुया.

Friday, November 21, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -१

डॉ. राम मनोहर लोहिया
डॉ. राम मनोहर लोहिया हे नामवंत अर्थतज्ञ होते. स्वातंत्रासाठी झालेल्या 'Quit India' १९४२ क्रांतीच्या पाच मोठ्या नेत्यांपैकी एक होते. गोवा मुक्ती आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले. तेव्हाच्या समाजवादी पक्षाचे ते अध्यक्ष होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) समाजवादी पक्ष निवडून येईल अशी अपेक्षा होती आणि निवडून आल्यास नवस्वतंत्र देशाला विकासाची दिशा देण्याचे, नवी विकासनीती तयार करणे आणि राबविण्याची जबाबदारी नवस्वतंत्र देशाच्या पहिल्या सरकारवर पडणार होती.
ही नवी विकासनीती तयार करण्यासाठी समाजवादी पक्षाने एक समिती नेमली होती आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. राम मनोहर लोहिया होते. या समितीने जो आराखडा तयार केला होता त्यावर गांधीवादी अर्थशास्त्राचा प्रभाव होता. किंबहुना गांधीवादी अर्थशास्त्राला आधुनिक युगात वापरण्यायोग्य स्वरूप या आराखड्यात दिले गेले होते.
हा विकास आराखडा काय होता, तो का राबविला गेला नाही, त्यामुळे आपल्या विकासावर काय परिणाम झाला, तो कोणत्या देशांनी राबविला आणि त्यांना त्याचे काय फायदे/तोटे झाले याचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.

कोणालाही (राष्ट्र, कंपन्या, माणसांचे समूह किंवा वैयक्तिक) विकास आराखडा ठरविताना चार प्राथमिक गोष्टींचा विचार करावा लागतो.
  1. बलस्थाने (Strengths)
  2. मर्यादा (Weaknesses)
  3. संधी (Opportunities)
  4. धोके (Threats)
यापैकी बलस्थाने आणि मर्यादा या अंतर्गत (Internal) असतात तर संधी आणि धोके हे बाह्य परिस्थितीमुळे (Environment) निर्माण होतात. अशा प्रकारे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीला व्यवस्थापन शास्त्रात SWOT Analysis म्हणतात.
भारताचे SWOT Analysis आपण पुढील भागात करू.
(क्रमश:)


तू कधी थांबणार?

अंगुलीमाल हा बुद्धकालीन एक भयानक वाटमाऱ्या होता. आक्रमक, हिंस्र आणि क्रूर स्वभावाचा. त्याची दहशत जबरदस्त होती. अंगुलीमाल हे त्याला त्याच्या दुष्कृत्यांवरून पडलेलं नाव. मनात लालसा उत्पन्न झाली की त्यानं अडवलेल्या माणसाचा मुडदा पाडीत असे. त्याच्या अंगावरचं, बरोबरचं धन लुटून तो थांबत नसे. त्याच्या मनात भयावह क्रूरपणा उत्पन्न व्हायचा. आपल्या धारदार शस्त्रानं तो त्या व्यक्तीची बोटं कापून टाकीत असे. त्या बोटांची माळ तो गळ्यात घालायचा म्हणून अंगुलीमाल.. या अंगुलीमालाला शांत करण्याची कोणाची हिंमत होत नसे. एकदा तथागत श्रावस्तीकडे निघाले असता, या अंगुलीमालानं त्यांना गाठलं. गाठलं म्हणजे त्यांचा पाठलाग सुरू केला. बुद्ध त्यांच्या वेगानं झपाटय़ानं पुढे चालू होते. अंगुलीमालानं त्यांच्याकडे पाहून म्हटलं, ''हे भिक्षू, थांब, थांब..'' बुृद्ध चालत राहिले. त्यानं पुन्हा आक्रमक पुकारा केला, ''थांब, थांब.'' तथागत न थांबता म्हणाले, ''मी तर केव्हाच थांबलोय; तू कधी थांबणार?'' ते शब्द अंगुलीमालाच्या कानावर पडले. तथागतांच्या स्वरात ना भीतीची कंपनं, ना आपण झपाटय़ानं पुढे जात असल्याचा दर्प. त्यांची वाणी प्राकृत आणि स्थिरचित्त होती. थांबण्याची क्रिया त्यांना अवगत असल्याची प्रखर जाणीव होती. तू कधी थांबणार आहेस? हे शब्द त्या रानावनात दुमदुमले असतील. पशू-पक्षीही स्तब्धावले असतील; पानं-फुलं स्थिर झाली असतील. कदाचित.. कदाचित पण अंगुलीमाल मात्र थांबला. थबकला नाही, थांबला तो थांबलाच. अंगुलीमालच्या आयुष्यातला तो क्षण सत्याचा आविष्कार ठरला. द मोमेंट ऑफ ट्रथ! अंगुलीमालनं वाटमारी थांबवली; त्यानं आपली क्रूर्कम थांबवली, त्याच्या मनात क्षणोक्षणी उसळणारी लालसा थांबवली. समोर दिसणाऱ्या सावजाकडे मनात उफाळून येणारी हिंसेची, चोरीमारीची तण्हा (तृष्णा) थांबवली. त्याला असल्या लालसेमधलं 'अनिच्च' तत्त्व कळलं-आकळलं म्हणून तो थांबला.. तथागतांनी मानवी व्यवहाराची संगती लावली. त्यामागील तर्कशुद्ध कार्यकारणपरंपरा समजून घेतली आणि चार आर्यसत्यं आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली. परिच्च सम्मुपाद या सिद्धान्ताचं विवरण केलं. प्रत्येकाला मनात अंतज्र्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा मध्यममार्ग दाखवला. अंगुलीमालसम लालसेचं स्वरूप बदललंय. आन् चंगळवादाच्या रूपात प्रत्येक व्यक्तीत एक अंगुलीमाल निर्माण झालाय. आपण वाटमारी करतोय, परिसराची, नैसर्गिक उपजत इंधनांची आणि नातेसंबंधांची!! क्षणभर विसावून मनात डोकावलास तर मित्रा, आजही तथागतांच्या शब्दाचे प्रतिध्वनी ऐकू येतील. तू कधी थांबणार?? डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com लोकसत्ता मधून साभार

स्वातंत्र्याची महत्ता

लोकांना आजही भाकडकथा सांगत,
कोणाचे तरी काल्पनिक भय दाखवत,
ठसवत,
प्रसंगी आक्रमक होत
वैचारिक गुलाम निर्माण करणा-या
संघटनांचे
आणि त्यांचे गुलाम असणा-या
कथित विचारवंतांचे
आज प्राबल्य वाढत आहे.

मित्रहो, काल्पनिक भयाने भयभित होऊ नका...
भयदायक असे संपुर्ण विश्वात काहीएक नाही
स्वत:ची स्वतंत्र बुद्धी वापरा...

संघटना बनवणे हाच मुळात गुलामीकडे जायचा
आणि इतरांनाही
वैचारिक गुलामीच्या गटारात
नेण्याचा मार्ग आहे
त्यापासून नेहमीच सावध रहा!

आदिमानवाने झुंडी बनवल्या
काल्पनिक भयापोटी
टोळ्या बनवल्या
तो टोळीवाद आजही जीवंत किती!

भेकड लोकच झुंडी बनवतात...टोळ्या बनवतात...
संघटना बनवतात...
भेकडांना अधिकच भेकड बनवतात
भेकडाची हिंसकता अधिकच भयावह असते
आणि यच्चयावत विश्वात
अशा भेकडांच्या यादीत जावू नका
स्वतंत्र व्हा

स्वत:चे विचार विकसनशील ठेवा
कोणाही गतकाळातील
वर्तमानातील
महापुरुषांना अंतिम मानू नका
विश्वात मुळात अंतिम असे
काहीएक नाही

पुढे चाला...
अग्रगामी व्हा...जसा काळ अग्रगामी असतो..
तरच आपण स्वतंत्र असतो.
तीच ख-या स्वातंत्र्याची महत्ता आहे!

-------------------------------------------------------------------------------------------
कवी Sanjay Sonawani