Showing posts with label डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती. Show all posts
Showing posts with label डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती. Show all posts

Thursday, April 2, 2015

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -४

१९५२ साली नवस्वतंत्र देशाची पहिली लोकसभा निवडणूक झाली. स्वातंत्र्यानंतर कोन्ग्रेस अंतर्गत असलेला समाजवादी पक्ष कोन्ग्रेस मधून बाहेर पडला होता. मिळालेले स्वातंत्र्य तळागाळातील जनतेपर्यंत पोचले पाहिजे हा समाजवादी नेत्यांचा आग्रह होता. समाजवादी पक्षाचे नेते १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी  असल्याने सर्वसामान्य जनतेत आवडते होते. यामुळे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत समाजवादी पक्षाचेच सरकार येईल अशी समाजवादी नेत्यांना खात्री होती. निवडून आल्यावर देशाची प्रगती कशाप्रकारे करता येईल याचा एक आराखडा (Blueprint) करण्याचे समाजवादी पक्षाने ठरवले. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. डॉ. राम मनोहर लोहिया या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने मांडलेला देशाचा विकासाचा आराखडा मराठीतून 'समाजवादाचे नवरत्न' या नावाने प्रा. मधु दंडवते यांनी प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंनी तो मुळातून वाचावा.

या वेळी डॉ. लोहियांनी अल्प-प्रमाण यंत्राची (Small Machines) कल्पना मांडली. या पूर्वीच्या माझ्या लेखात मांडलेले SWOT Analysis (बलस्थाने, मर्यादा, संधी आणि धोके) यासाठी पाया म्हणून स्वीकारली गेली.

भारतात विकसित झालेले तंत्रज्ञान,  कौशल्ये यांचा योग्य प्रकारे वापर करून सध्या वापरात असलेल्या यंत्रांमध्ये (उदा. नांगर, बैलगाडी, मोट इ .) योग्य ते बदल करून ही यंत्रे अधिक कार्यक्षम बनवावीत ही त्यांची मुलभूत  संकल्पना होती. ही यंत्रे पूर्वापार चालत होती तशीच मानवी अथवा पशुश्रमावर चालतील, ही यंत्रे खेड्यातील व्यावसायिक (उदा. सुतार, लोहार इ.) तयार करू शकतील आणि त्यांची निगा राखू शकतील.  भारतातील विज्ञान शिक्षणाची दिशा अशी छोटी यंत्रे विकसित करण्याची असेल. निर्यातक्षम वस्तू अशाच छोट्या प्रमाणावर चालणाऱ्या गृहउद्योगात तयार होतील, त्यांची जुळणी खेड्यातील घरा-घरात होईल आणि त्यांची गुणवत्ता तपासणी करून निर्यात लगतच्या (छोट्या) शहरातील कंपनीमार्फत होईल ही ढोबळमानाने कल्पना होती. यात मनुष्य / पशु यांच्या श्रामाशाक्तीवर भर दिल्याने निसर्गाचे रक्षण झाले असतेच, शिवाय तेलाच्या आयातीसाठी वाया जाणारा पैसा वाचला असता. मग गोधन वाचविण्यासाठी कायदे करावे लागले नसते, तर शेतकऱ्यानेच गोधनाची काळजी घेतली असती. आपल्याकडे अमाप असणारे मनुष्यबळ वापरत आले असते

या कल्पनेत भारताने हजारो वर्षे विकसत केलेले विकासाचे प्रारूप तसेच ठेऊन त्या आधारे देशाचा विकास करणे अभिप्रेत होते. या प्रारूपाच्या आधारावरच हा देश शेकडो वर्षे निर्यातीत अग्रभागी होता आणि विकासाच्या शिखरावर होता.

या प्रारुपानुसार निसर्गाशी जवळीक साधून विकास शक्य होता. मोठ्या धरणाची गरज नव्हती, मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करण्यासाठी निसर्गाचा विध्वंस करण्याची गरज नव्हतॆ. छोटी शहरे आणि त्याभोवती खेडी असे स्वरूप दिसले असते. खेड्यांमधील कृषीमाल शेतकरी या शहरांत स्वत:च्या बैलगाडीतून पाठवू शकले असते. दलालांची गरज नव्हती. शहरांतील सांडपाणी आणि जैविक कचरा नजिकच्या खेड्यांसाठी खत/शेतीचे पाणी म्हणून उपयोगी पडला असता. ही छोटी शहरे मोठ्या शहराना जोडली जाऊन मोठी शहरे बंदरांना जोडली गेली असती. किंबहुना हीच आपली प्राचीन व्यवस्था होती. तिचे पुनरुज्जीवन करण्याची फक्त गरज होती आणि ते कमी खर्चात झाले असते. बकाल शहरे आणि भकास खेडी हे चित्र निर्माणच झाले नसते. विकास तळागाळापर्यंत  पोचला असता. सत्ता आणि संपत्ती यांचे विकेंद्रीकरण झाले असते.

अर्थात या दिशेने जाण्यात धोके नव्हते असे नाही. आपल्या ग्रामीण व्यवस्थेवर अजूनही जतिव्यवस्थेचा पगडा आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तर तो खूपच होता. भारतीय समजव्यवस्थेचा गाडा जातीव्यवस्थेत फसू नये म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे होते. तरीही आपल्या मर्यादा आणि बलस्थाने यांचा विचार करता डॉ  राम मनोहर लोहियांनी सुचविलेला अल्पप्रमाण यंत्राचा मार्ग निश्चितच देशाची सर्वांगीण प्रगती करणारा होता.

परंतु १९५२च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवाद पक्षाचा पराभव झाला आणि पंडित नेहरू पंतप्रधान झाले.  नेहरूंना विकासाचे पाश्चात्य प्रारूप भावत होते. त्यांनी मोठी धरणे, मोठे कारखाने या पद्धतीने विकासाला चालना दिली. आपल्याकडील मर्यादित साधन संपत्तीच्या सहाय्याने या पद्धतीने विकास कूर्म गतीने झाला, निसर्गाचा विनाश झाला, बकाल शहरे जन्माला आली आणि खेड्यातील जीवन भकास झाले .

आज विकासाच्या पाश्चात्य मार्गावरून आपण खूप वाटचाल केली आहे. यावेळी मार्ग बदलणे  कठीण आहे, पण अशक्य नाही. मात्र दिशा बदलताना एकदम जोरात बदलली (Sharp Turn) तर गाडीच उलटण्याचा धोका असतो हे लक्षात ठेऊन पुढे जावे लागेल.  

Monday, November 24, 2014

डॉ.लोहिया यांची विकासनीती भाग ३ : आपली पारंपारिक अर्थव्यवस्था

मागील भागात आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचे SWOT Analysis केले होते. ते लक्षात घेता आपली बलस्थाने आणि मर्यादा या पाश्चात्य देशांच्या बलस्थाने आणि मर्यादांपेक्षा पूर्णपणे भिन्न होत्या असे दिसून येईल. म्हणूनच आपली विकासनीती या देशांपेक्षा वेगळी (Unique) असणे आवश्यक होते.
महात्मा गांधी भारतातील रुजलेल्या स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेला आदर्श मानीत होते. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेमुळे ग्रामीण भाग आपला विकास आपणच करू शकत होता. त्यात गावातील प्रत्येकाचा सहभाग होता. प्रत्येकाच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पनांना त्यात वाव होता म्हणूनच ही व्यवस्था अधिक Creative होती. ग्रामपातळीवरील सहभागामुळे कायद्याचे पालन होणे आणि कायदा पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे सुलभ होते, न्यायव्यवस्था काटेकोर नसली तरी जलद होती. पर्यावरण रक्षण होत होते. गावातील पैसा गावातच रहात होता. उर्जा, पाणी इत्यादी संसाधानंचा जपून वापर होत होता.
या अर्थव्यवस्थेत जातीव्यवस्थेचा जन्म झाला. जातिव्यवस्थेमुळे समाजात स्थैर्य आले, एका पिढीकडून कौशल्ये दुसऱ्या पिढीकडे सहजतेने आणि पूर्णपणे हस्तांतरित होत होती. मुलांना आवश्यक ते शिक्षण सहजच घरीच मिळत होते. एका बाजूने ही अत्यंत Innovative व्यवस्था होती. परंतु त्यात काही खूप मोठे दोष शिरले होते. जन्माधिष्टीत जातिव्यवस्थेत उच्च-नीचतेची उतरंड तयार झाली होती. अस्पृश्यतेसारख्या भयानक रूढी समाजात स्थिर होऊ लागल्या होत्या. श्रमाला कमी प्रतिष्ठा मिळू लागली होती. एखाद्याला जातीव्यवस्थेने दिलेल्या कामाव्यतिरिक्त अन्य काम करावेसे वाटले तर ते सहज शक्य नव्हते. गांधीजींनी जातीव्यवस्थेचे हे स्वरूप ओळखले होते. सामाजिक/आर्थिक व्यवस्थेचा ढाचा कायम ठेऊन त्यातील हे दोष दूर करण्याचा उपाय गांधीजी त्यांच्या परीने शोधीत होते.
आपली अर्थव्यवस्था 'ग्रामीण अर्थव्यवस्था' कधीच नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने कच्च्या मालाचे उत्पादन होते आणि पक्का माल बाहेरून विकत घेतला जातो. आपली अर्थव्यवस्था ही ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेचा उत्तम तोल राखणारी, निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होती. येथे ग्रामीण भागात कच्चा माल पिकत होता. नगरांमध्ये त्यावर संस्कार होऊन तो भारतात विकला जात होता वा परदेशी निर्यात होत होता. रेशमाच्या वस्त्राच्या उत्पादनासाठी तर कच्चा माल चीनमधून येत असे आणि वस्त्रे बनवून तो माल पाश्चात्य राष्ट्रांना निर्यात होत असे. मसाल्यांच्या शेतीउत्पादनांवर प्रक्रिया करून तो माल निर्यात होत असे.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यव्यस्थेला आधार देण्यासाठी येथील सुविधां (Infrastructure) अशाच विशेष प्रकारच्या असणे आवश्यक होते. आपल्या Creative पूर्वजांनी अशा सुविधांचे जाळेच तयार केले होते. येथे नगरे नदीच्या / समुद्राच्या काठावर वसली होती. प्रत्येक नगरच्या पंचक्रोशीत अनेक गावे होती. ही गावे त्यांच्या पंचक्रोशीतील नगरांना कच्च्या रस्त्याने जोडली होती. विविध नगरे एकमेकांना रस्त्याने अथवा जलमार्गाने जोडली होती. सर्व नगरांना जोडणारे मोठे रस्ते बंदरांना जोडले होते. बंदरावर परदेशी व्यापाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था होती. जहाज बांधणीचे शास्त्र प्रगत होते. रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी मोठे वृक्ष होते. रस्ते सुरक्षित राहावे यासाठी राजाची गस्त असे. डोंगरी भागातून बंदरापर्यंत येण्यासाठी केलेले नाणेघाटासारखे  रस्ते आजही याची साक्ष देतात. सिल्क रूट तर खुश्कीच्या मार्गाने युरोपला जोडत होता.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळताना पर्यावरणाचा तोल ही सांभाळला जात होता. ग्रामीण भागात कृषी उद्योग होते. कृषी उत्पादने पंचक्रोशीतील नगरांत बैलगाडीच्या सहायाने शेतकरी विकण्यास आणू शकत होता. नगरांत उत्पन्न होणारा कचरा नजीकच्या खेड्यातील शेतीसाठी कच्चा माल (खते तयार करण्यासाठी)  होता. नगरातील सांडपाणी नजीकच जिरविले जात होते, ते शेतीला उपयुक्त होते. नगरे-खेडी यांच्या साहचर्यामुळे लोकवस्तीचा भारही नागरांवर न पडता विभागाला जात होता.
नगरांत तयार झालेला पक्का माल रस्त्याच्या मार्गाने व्यापारी अन्य नगरांत/बंदरात नेत असत. त्यासाठी अनेक बैल असलेल्या बैलगाड्या असत. पानिपतच्या युद्धात अशा ३२ बैल असलेल्या गाड्यांनी सैन्याला रसद पुरविल्याचे उल्लेख आहेत. अंतर्गत वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असे. म्हणूनच बारा महिने वाहणाऱ्या गंगा/यमुनेच्या तीरावर मोठ्या संख्येने नगरे वसली होती.
श्रमाची कामे करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा उपयोग होत असे. यासाठी बलवान बैल असलेली वाणे विकसित केली गेली होती. श्रम करणारे बैल मिळविण्यासाठी बैलांच्या खच्चीकरणाचे तंत्र विसासित केले गेले होते. याच वेळी बैलांचा वंश चालू राहावा, तो अधिक विकसित व्हावा म्हणून 'देवाला वळू सोडण्याची' प्रथा होती. दूध हे उप-उत्पादन होते. हे बैलांपासून उर्जा मिळविण्याचे तंत्र पर्यावरणाशी मैत्री करणारे होते.
या संपूर्ण व्यवस्थेत शहरांचा बकालपणा टाळला गेला होता आणि खेड्यातील शेतकऱ्याला त्याचा माल योग्य भावात विकला जाण्याची हमी होती. शेतीमाल विकणाऱ्या मधल्या दलालांची आवश्यकता नव्हती. ही एक आदर्श Supply Chain Management होती.
ही व्यवस्था शेकडो वर्षांपासून विकसित होत गेली होती. (श्रीकृष्णाने यादवांची वसाहत गोकुळातून हलवून द्वारकेला नेली आणि यादवांना दूध विक्रीच्या व्यवसायातून बाहेर काढून परदेशांशी व्यापार करणाऱ्या बंदरावर आणून वसविले. परदेश व्यापारामुळे द्वारका 'सोन्याची' झाली.) ही व्यवस्था इंग्रज येईपर्यंत नीट चालू होती. अहिल्याराणी होळकरांनी बांधलेला इंदोर पासून कल्याण बंदारापर्यंतचा रस्ता (NH222) याची साक्ष देतो. या व्यवस्थेमुळे इंग्रजांना येथे त्यांचा पक्का माल खपविणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ही व्यवस्था खच्ची केली.
परंतु हजारो वर्षांपासून रुजलेल्या व्यवस्थेची पाळेमुळे शे-दीडशे वर्षात उखडणे इंग्रजांना शक्य नव्हते.  ही भक्कम पायावर विकसित झालेली अर्थव्यवस्था हाच आपला स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचा पाया होऊ शकला असता. गांधीजींनी हे ओळखले होते. परंतु गांधीजींचे प्रमुख कार्य (Mission) वेगळे असल्याने तसेच ते अर्थतज्ञ नसल्याने ही वस्तुस्थिती ते योग्य शब्दात मांडू शकले नाहीत. परंतु डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ते ओळखले होते. त्यांनी गांधीजींच्या कल्पनेला नव्या युगात कसे प्रत्यक्षात आणता येईल याचा विचार केला. 
डॉ. राम मनोहर लोहियांनी काय सुचविले होते ते पुढील भागात.

Saturday, November 22, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -२ :SWOT Analysis

या लेखमालेच्या मागील भागात आपण SWOT Analysis या व्यवस्थापन विचार पद्धतीला स्पर्श केला होता.

आपल्या देशाच्या विकासनीतीवर भाष्य करताना देशाचे SWOT Analysis करणे आवश्यक आहे. डॉ. लोहियांच्या काळी (स्वातंत्र्य मिळाले तेव्हा) असलेल्या आपल्या बलस्थाने आणि मर्यादांमध्ये आता थोडा बदल झाला आहे. संधी आणि धोके यामध्ये मात्र मोठा बदल झालेला जाणवतो. या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन आपण स्वातंत्र्याच्या वेळच्या परिस्थितीचाच प्रामुख्याने विचार करणार आहोत.


बलस्थाने  (Strengths): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील बलस्थाने दिसून येतात.

सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता
शेती, औषधोपचार, धातुशास्त्र, वास्तुशास्त्र इ. मधील पारंपारिक ज्ञान
पशु आणि मानवी श्रमांत काम करू शकणारी यंत्रे आणि अवजारे
प्राचीन सामाजिक आणि आर्थिक घट्ट वीण (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात उसविली होती).
वेगळ्या विचारांचा (धर्म, पंथ इत्यादी) आदर अरण्याची परंपरा, धार्मिक सहिष्णुता (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात  मोडली होती).
प्राचीन आर्थिक भरभराटीचा, व्यापाराचा वारसा (दुसऱ्या महायुद्धापर्यंत भारतीय GDP चा वाटा जगाच्या ३०% होता. स्वातंत्र्याच्या वेळी 1USD = 1INR होते)
धार्मिक आणि राजकीय सत्ता वेगळ्या (युरोपात या सत्ता एकमेकांत विलीन झाल्या होत्या)
पर्यावरण संरक्षणाला धार्मिक विचारात महत्वाचे स्थान
पूर्वेकडील देशांचे सांस्कृतिक नेतृत्व
मध्यपूर्वेतील देशांचे आर्थिक नेतृत्व (१९५६ पर्यंत मध्यपूर्वेतील देश भारतीय रुपया हे चलन वापरीत होते).
तिबेटसारख्या शांततावादी मित्राचा उत्तरेकडे शेजार
पाण्याची भरपूर उपलब्धता
मोटारी, विमाने, शस्त्रास्त्रे यासारख्या गोष्टी भारतात बनत होत्या.
मर्यादा (Weaknesses): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील मर्यादा दिसून येतात.

पुरेसे भांडवल उपलब्ध नाही
कच्चा माल पुरविणारे सुपीक त्रिभुज प्रदेश पाकिस्तानात गेले तर त्यावर प्रक्रिया करणारे कारखाने भारतात राहिले. यामुळे कच्च्या मालाची अनुपलब्धता
जाती धर्मात विभागाला गेलेला समाज., जन्माधिष्टीत उच्चनीचता, अस्पृश्यता
विजेची, पोलादाची अनुपलब्धता
मोठी लोकसंख्या, शेतीची कमी उत्पादकता, मोसमी पावसाचा लहरीपणा
सततच्या आक्रमणांमुळे / अपप्रचारामुळे नागरिकांमधील पराभूत मानसिकता
प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर / राजावर अवलंबून राहण्याची मानसिकता
संस्थाने विलीन करण्यास होणारा विरोध
संधी  (Opportunities): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी पुढील संधी उपलब्ध होत्या असे दिसते.

नव-स्वतंत्र देश भारताकडे नेतृत्वाच्या अपेक्षेने पाहत होते.
मध्य-पूर्वेकडील देशांत तेलाचे साठे मिळत होते, त्या देशांचे आर्थिक नेतृत्व आपल्याकडे होते.
देश विकासाच्या उंबरठ्यावर होता. विकासाची दिशा ठरविण्यास वाव होता.
देशाच्या नेतृत्वाला जनता देवाप्रमाणे मानीत होती. जनतेचे मन वळविणे अधिक सोपे होते.
येथे बनणारी शस्त्रास्त्रे घेण्यासाठी नवस्वतंत्र देश उत्सुक होते.
धोके (Threats) : देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी देशाच्या विकासाला पुढील धोके होते असे दिसते.

देशाचे तुकडे पाडण्यासाठी प्रयत्न करणारी पाश्चात्य राष्ट्रे.
पाकिस्तानकडून आक्रमणाचा धोका
आपली औद्योगिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणारी पाश्चत्य राष्ट्रे
देशाच्या उत्तरेला असलेला साम्राज्यवादी चीन (१९५० नंतर)
या बलस्थाने/मर्यादा/संधी/धोके यांचा विचार करूनच देशाच्या विकासाची रूपरेखा (Road map) बनविणे आवश्यक होते. आपली बलस्थाने आणि मर्यादा पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. म्हणूनच आपली विकासनीती पूर्णपणे वेगळी (Unique) असणे आवश्यक होते. डॉ. लोहिया हे स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी असलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांना आपल्या देशाच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पूर्णपणे जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाच्या समाजवादी पक्षाच्या समितीने बनविलेली विकासनीती देशाच्या गरजांचे भान असलेली होती.

या विकसनीतीचा उहापोह आपण पुढील लेखात करुया.

Friday, November 21, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -१

डॉ. राम मनोहर लोहिया
डॉ. राम मनोहर लोहिया हे नामवंत अर्थतज्ञ होते. स्वातंत्रासाठी झालेल्या 'Quit India' १९४२ क्रांतीच्या पाच मोठ्या नेत्यांपैकी एक होते. गोवा मुक्ती आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले. तेव्हाच्या समाजवादी पक्षाचे ते अध्यक्ष होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) समाजवादी पक्ष निवडून येईल अशी अपेक्षा होती आणि निवडून आल्यास नवस्वतंत्र देशाला विकासाची दिशा देण्याचे, नवी विकासनीती तयार करणे आणि राबविण्याची जबाबदारी नवस्वतंत्र देशाच्या पहिल्या सरकारवर पडणार होती.
ही नवी विकासनीती तयार करण्यासाठी समाजवादी पक्षाने एक समिती नेमली होती आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. राम मनोहर लोहिया होते. या समितीने जो आराखडा तयार केला होता त्यावर गांधीवादी अर्थशास्त्राचा प्रभाव होता. किंबहुना गांधीवादी अर्थशास्त्राला आधुनिक युगात वापरण्यायोग्य स्वरूप या आराखड्यात दिले गेले होते.
हा विकास आराखडा काय होता, तो का राबविला गेला नाही, त्यामुळे आपल्या विकासावर काय परिणाम झाला, तो कोणत्या देशांनी राबविला आणि त्यांना त्याचे काय फायदे/तोटे झाले याचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.

कोणालाही (राष्ट्र, कंपन्या, माणसांचे समूह किंवा वैयक्तिक) विकास आराखडा ठरविताना चार प्राथमिक गोष्टींचा विचार करावा लागतो.
  1. बलस्थाने (Strengths)
  2. मर्यादा (Weaknesses)
  3. संधी (Opportunities)
  4. धोके (Threats)
यापैकी बलस्थाने आणि मर्यादा या अंतर्गत (Internal) असतात तर संधी आणि धोके हे बाह्य परिस्थितीमुळे (Environment) निर्माण होतात. अशा प्रकारे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीला व्यवस्थापन शास्त्रात SWOT Analysis म्हणतात.
भारताचे SWOT Analysis आपण पुढील भागात करू.
(क्रमश:)