Saturday, June 26, 2021

कुंडलिनी विद्या भाग ७

 आपण 'प्राणधारणेचे' तीन टप्पे मागील काही भागात शिकलो. हा प्राणधारणेसंबंधी शेवटचा लेख. या पुढील लेख हे कुंडलिनी ध्यानासंबंधी असतील. आपण आता या लेखमालेच्या मध्यंतरात आलो आहोत. म्हणूनच या लेखानंतर आपण एक 'short break' घेणार आहोत. या काळात आपण आपली प्राणधारणेत प्रगती करणार आहोत. सुमारे एक आठवड्यानंतर आपण या लेखमालेच्या पुढील भागास सुरुवात करू. माझ्या ब्लॉगवर 'Follow By email' या भागात आपला email दिल्यास लेखमालेतील लेख प्रसिद्ध झाल्याबरोबर आपल्याला तसा email येईल. 

प्राणधारंणा ही कोठल्याही ध्यानाची पूर्वतयारी आहे. जरी आपल्याला कुंडलिनी ध्यानाकडे वळायचे नसेल आणि अन्य कोठले ध्यान (उदाहरणार्थ ब्रह्मयोग, विपश्यना, सहजयोग इत्यादी) करायचे असेल तर प्राणाधारणा उपयोगी आहे. दहा वर्षांपासून पुढील मुलांना प्राणाधारण शिकविल्यास त्यांची एकाग्रता वाढून अभ्यासालाही मदत होऊ शकते. 

प्राणधारणेतील मला लक्षात आलेली एक युक्ती तुम्हाला सांगतो. मात्र ही युक्ती नेहमीसाठी वापरात आणायची नाही. क्वचित एखाद्या दिवशी काही घटनांमुळे आपले मन खूप विचलित झालेले असते. अशावेळी ध्यान लागत नाही. प्राणाधारणा केली तरी मन श्वासावर टिकत नाही. अशा वेळी केवळ दोन-तीन श्वास आपला श्वास जोरात घ्यायचा आणि श्वासाचा स्पर्श नाकात अनुभवायचा. दोन तीन श्वासानंतर परत नैसर्गिक श्वासाकडे यायचे आणि श्वासाचा स्पर्श अनुभवायला सुरुवात करायची. आपल्याला जोरात श्वास घेताना जेथे स्पर्शाची अनुभूती येत होती त्याच ठिकाणी स्पर्शाची अनुभूती जाणवते आणि आपली प्राणधारणा सुरु होते. मन शांत होऊ लागते. 

आपण प्राणाधारणेत थोडी प्रगती केल्यावर प्राणधारणा आपल्या रोजच्या बसच्या-लोकल ट्रेनच्या प्रवासातही बसण्यास जागा मिळाल्यावर करू शकता. आजूबाजूच्या माणसांना आपण डोळे मिटून झोपला आहात असे वाटेल. 

आपल्या प्राणधारणेतील अनुभवांचे कॉमेंटमध्ये आदान-प्रदान करा. त्याने बाकीच्यांना फायदा होईल. येथे कोणीही गुरु नाही-कोणी शिष्य नाही. आपण सर्व सहाध्यायी आहोत आणि एकमेकांना मदत करतच आपल्याला वाटचाल करायची आहे. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ'

जर कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता अथवा माझ्या फेसबुक मेसेज बॉक्स मध्ये मला मेसेज करू शकता. 

शांतीमंत्राने प्राणाधारणेच्या या सत्राची सांगता करू. 

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

Wednesday, June 23, 2021

कुंडलिनी विद्या भाग ६

काही वाचकांनी या आधीचे लेख वाचून प्राणधारणेला सुरुवात केली असे कळले. छान.
 
कुंडलिनी विद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आधीच्या  लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे मी ही विद्या पारंपरिक  पद्धतीने शिकलो नाही. बराचसा अंत:प्रेरणेने आणि आणि नंतर इंटरनेटवरून माहिती घेत शिकलो.  म्हणूनच ज्यांना ही  विद्या पारंपरिक पद्धतीने शिकायची आहे त्यांच्यासाठी ही लेखमाला नाही. गौतम बुद्धाच्या 'अत्त दीपो भव' (तूच तुझा दीप बन) या वचनावर माझी श्रद्धा आहे. ज्यांना ही पद्धत मान्य आहे त्यांच्यासह आपण एकमेकांना साहाय्य  करीत या  विद्येतील बारकावे जाणून घेऊ. 

मागील लेखात आपण प्राणधारणेच्या पहिल्या टप्प्याची ओळख करून घेतली. भ्रूमध्य आणि वरचा ओठ या त्रिकोणात श्वासाची जाणीव आपल्याला घायची आहे. आपण ही पहिल्या टप्प्याची साधना किमान एक महिना रोज एक तास करणार आहोत. फार घाई केली तर हवे तसे लाभ मिळणार नाहीत. आपल्याला शांतपणे पुढे जायचे आहे. 


भ्रूमध्य आणि वरचा ओठ या त्रिकोणात श्वासाची स्पष्ट जाणीव होऊ लागली आणि हे ध्यान विनाअडथळा  किमान दहा मिनिटे टिकून राहू लागले की पुढील टप्प्यास सुरुवात करावी. आता आपल्याला हा त्रिकोण लहान करायचा आहे. भ्रूमध्य आणि नाकाची छिद्रे या लहान त्रिकोणात (चित्र  Level 2 पहा) आता श्वासाची जाणीव घ्यायची आहे. मन अधिक सूक्ष्म करायचे आहे. मन जितके सूक्ष्म बनेल तेवढे आपले ध्यान अधिक चांगले, परिणामकारक होणार आहे. हा दुसरा टप्पाही सुमारे एक महिना चालेल. 

त्या पुढील टप्प्यात हा स्पर्श जाणण्याचा भाग अधिक सूक्ष्म करायचा आहे. आता फक्त नाकाच्या द्वारांवरती (चित्र Level 3 पहा) श्वासाची जाणीव घ्यायची आहे. 




या सर्व प्रक्रियेत कोठेही श्वासाची गती स्वत:हुन बदलायची नाही. नैसर्गिक श्वास चालू असला पाहिजे. आपण या श्वासाचे केवळ 'द्रष्टा' बनायचे आहे. प्राणधारणेची ही क्रिया कोठल्याही ध्यानाचा पाया आहे. पाया भक्कम झाल्याशिवाय इमारत  राहू शकणार नाही. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी अधिक माहिती पुढील लेखात. 

Tuesday, June 22, 2021

कुंडलिनी विद्या भाग ५

 आता आपण कुंडलिनी विद्याप्राप्तीसाठी कुंडलिनी ध्यान कसे करावे या बद्दल विचार करीत आहोत. 

कोठल्याही ध्यानप्रकाराची सुरुवात भारतीय प्राचीन शास्त्राप्रमाणे प्राणधारणेने होते.  प्राणाधारणा ही ध्यानाची पूर्वतयारी (pre-requisite) आहे.आपले भरकटणारे मन काबूत आणायला ही प्राणधारणा उपयोगी पडते. जर प्राणधारणेवर आपण सुरुवातीस भर दिला तर पुढील साधना वेगात आणि अडथळ्याविना होऊ शकते. 

सुरुवात करतानाच एक लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला प्राणधारणेमध्ये आपल्या भरकटणाऱ्या मनाला काबूत आणायचे आहे, आपल्याला वश करायचे आहे. मनाची ताकद प्रचंड आहे हे आपल्याला माहीत आहे. जंगली हत्तीची ताकद प्रचंड असते. तो जंगली असतो तेव्हा त्याची ही ताकद आपल्याला खूप त्रासदायक ठरते. पण हाच हत्ती एकदा माणसाळला की त्याची ही अफाट ताकद आपल्या उपयोगाला येते. पण हत्तीला माणसाळविणे हे सोपे काम नाही. अतिशय शांतपणे प्रेमाने चुचकारून त्याला आपलेसे करावे लागते. त्याच्याशी कठोर व्यवहार केल्यास तो माणसाळविणे कठीण बनत जाते. मनाचे असेच आहे. त्याला माणसाळविण्यासाठी अत्यंत शांतपणे प्राणधारणा करावी लागेल. हे धसमुसळेपणाचे काम नाही. 

पद्मासन,सुखासन अथवा खुर्चीत पाठीचा कणा ताठ ठेऊन बसावे. खूर्चीत बसल्यास दोन्ही तळपाय जमिनीला पूर्णपणे स्पर्श केलेले असावेत. पायाखाली उशी अथवा जाड सतरंजी ठेवल्यास उत्तम. डोळे मिटून स्वस्थ बसावे. इष्ट  देवतेची प्रतिमा डोळ्यापुढे आणून तिला वंदन करून आशीर्वाद घेऊन प्राणधारणेला सुरुवात करावी. 


भ्रूमध्य (जेथे दोन्ही भुवया जुळतात) आणि वरचा ओठ या त्रिकोणात (पहा सोबतचे चित्र क्रमांक १) श्वासाचा स्पर्श कोठे होत आहे याचा अनुभव घ्यावा. प्रत्येक श्वास - परत एकदा सांगतो, प्रत्येक श्वास - आत घेताना आणि सोडताना त्याचा स्पर्श अनुभवायचा आहे. हा स्पर्श आपल्याला या त्रिकोणात एखाद्या ठिकाणी -कदाचित नाकाच्या आतील त्वचेला किंवा ओठावर- जाणवेल. ही गोष्ट दिसायला सोपी  वाटते,पण थोड्याच काळात श्वासावर लक्ष ठेवता ठेवताआपले मन भरकटण्याचा अनुभव येतो. त्याने निराश होण्याची गरज  नाही. याच भरकटणाऱ्या मनाला आपल्याला काबूत आणायचे आहे. जेव्हा आपले मन असे भरकटले आहे असे लक्षात येईल तेव्हा आपल्या अशांत मनाकडे पाहून हसून परत नव्या उत्साहाने सुरुवात करायची. या ध्यानात  आपला श्वास पूर्णतः नैसर्गिकपणे चालू ठेवायचा आहे. आपण आपल्या श्वासाचा केवळ 'द्रष्टा' बनायचे आहे. प्रथम दहा मिनिटांपासून सुरुवात करून वेळ  वाढवत दिवसातून एक तास असे ध्यान केले तरी पुरेसे आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला पाच मिनिटेही सातत्याने श्वासाकडे लक्ष देणे कठीण वाटेल. आपले लक्ष सारखे विचलित होईल. मनात विचार येऊन हे श्वासावरील लक्ष उडेल. पण त्याने निराश होण्याचे कारण नाही. असे बहुतेक सर्वांचेच होते, माझेही झाले होते, कधीकधी मन काही कारणाने खूप विचलित झाले असेल तर माझे अजूनही असे होते.  मन एकाच ठिकाणी टिकविण्याची जिद्द नको. त्याने मन अधिक अशांत होईल. चिकाटीने यावर काम करीत राहिले की प्राणधारणेत प्रगती होऊ लागते. मन आपल्या काबूत येऊ लागते.  हा पहिला टप्पा किमान एक महिना रोज करायचा आहे. प्राणधारणा हा कुंडलिनी ध्यानाचा पाया आहे. पाया भक्कम असेल तरच इमारत भक्कमपणे उभी राहाते. 

चिकाटी आणि सातत्य (रोज ध्यान/प्राणाधारणा करणे) हीच ध्यानात प्रगती करण्याची  गुरुकिल्ली आहे. 

अशा प्रकारे प्राणधारणेला सुरुवात करा. प्राणधारणेतील पुढील टप्पा नंतरच्या लेखात. 

Friday, June 18, 2021

कुंडलिनी विद्या भाग ४

मागील लेखात आपण कुंडलिनी मार्गातील सात चक्रांची आणि त्यांच्या गुणांची (Attributes) अत्यंत त्रोटक स्वरूपात माहिती घेतली. या चक्रांचा आणि आपल्या मनोव्यापाराचा संबंध काय हे ही पहिले. या चक्रांचे स्थान आणि अधिक माहिती आपल्याला इंटरनेटवर सहज मिळू शकेल. मी या लेखमालेच्या शेवटी लिंक्स देईनच. या चक्रांची विस्तृत माहिती देणे हा या लेखमालेचा हेतू नाही, तर कुंडलिनी ध्यानाला सुरुवात कोठून करावी हे सांगणे हा हेतू आहे. 

ध्यान करणे याचा अर्थच आपले सतत भरकटणारे मन एका ठिकाणी स्थिर करणे. हे मन एखाद्या माकडासारखे असते. माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असते. तसेच एका गोष्टीचा विचार  मनात येतो, काही मिनिटातच त्या विचारावरून मन एकदम दुसऱ्या विचारावर झेप घेते. मग तेथून आणखी वेगळ्याच. हे सतत चालू असते. हे चक्र डोक्यात  सतत चालू असल्याने आपल्या मेंदूची बरीच क्षमता फुकट जात असते. कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो तेव्हा तो कॉम्प्युटरच्या प्रोसेसिंग पॉवरचा बराचसा भाग खाऊन टाकतो. तसेच काहीसे हे आहे.  खरे तर विचार करण्याची क्षमता हे आपल्याला मिळालेले वरदान आहे. पण त्याचा आत्यंतिक वापर झाल्याने आपण हे विचार बंद कसे करायचे याचा स्विच कुठे आहे हेच विसरून गेलो आहोत. एकदा या सतत भरकटणाऱ्या मनाला ताळ्यावर आणले की आपला पुढील प्रवास सोपा आहे. हा अनावश्यक विचार बंद करण्याचा स्विच शोधायचा आहे. भरकटणारे मन स्थिर केल्याशिवाय कुंडलिनी ध्यान करणे अशक्य आहे. आपापले मन एकेका चक्रावर क्रमाक्रमाने स्थिर करूनच ते ते चक्र कार्यान्वित करायचे आहे- भेदायचे  आहे. 

भारतीय प्राचीन शास्त्रानुसार ध्यानाला सुरुवात करण्याची अथवा मन स्थिर करण्याची एकच पद्धत आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्मियांची पद्धत एकच आहे. त्याला निरनिराळी नावे आहेत. आपण आपल्या सोयीसाठी राजयोगात पतंजलीऋषींनी दिलेले नाव 'प्राणधारणा' वापरू. प्राण' म्हणजे 'श्वास' आणि 'धारणा' म्हणजे धारण करणे -त्यावर लक्ष ठेवणे. ही प्रक्रिया म्हणजे 'प्राणायाम' नव्हे. प्राणायामात श्वास बदलायचा असतो. प्राणधारणेत मात्र नैसर्गिक श्वासावर लक्ष ठेवायचे असते. त्याची गती वाढली, मंद झाली तरी आपण स्वत:हुन त्यात बदल न करता फक्त अनुभवायचे असते. 

 यासंबंधी पुढील लेखात जाणून घेऊ. 

Wednesday, June 16, 2021

कुंडलिनी विद्या भाग ३

 मागील दोन भागात आपण कुंडलिनी विद्येची थोडक्यात तोंडओळख करून घेतली. आता आपण थोडे खोलात जाऊ. 

कुंडलिनी विद्येत सात महत्वाची चक्रे मानली गेली आहेत. ती क्रमवार अशी. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार. ही चक्रे म्हणजे ज्या ठिकाणाहुन  आपल्या मनोवस्थेच्या दृष्टीने  महत्वाचे चेतातंतू पाठीच्या पाण्यातून बाहेर पडतात ती जागा. अशी सात महत्वाची चक्रे असली तरी इतर अनेक चक्रे आहेत. 

प्रत्येक चक्राचे काही महत्वाचे गुण मानलेले आहेत. हे सांकेतिक भाषेत आहेत. प्रत्येक चक्राची देवता आहे, रंग आहे, त्याची काही रत्ने सांगितली आहेत. बीजध्वनी आहे, प्रत्येक चक्राला विशिष्ट संख्येने पाकळ्या आहेत. हठयोगसाधनेत त्या त्या चक्राला जागृत करण्यासाठी काही आसने आहेत. हे सर्व समजून घेणे महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आपल्या साधनेला वेग येऊ शकतो.  पण सुरुवातीला हे सर्व अनाकलनीय वाटते. माझ्यासारख्या चिकित्सक वृत्तीच्या माणसाला हे सर्व हास्यास्पदही वाटले होते. पण जशी ध्यानात प्रगती झाली, एक एक चक्र उमलताना जाणवू लागले तसे या सर्व संकेतांत असलेले गूढ अर्थ ध्यानात येऊ लागले. या संकेतांचा अर्थ जसा मला उमगला तसा सांगण्याचा प्रयत्न करीन. तो अर्थ पारंपरिक अर्थाच्या जवळ जाईल असेही नाही. कारण मी पारंपरिक पद्धतीने कुंडलिनी विद्या शिकलेलो नाही. 

प्रत्येक चक्राला एक रंग आहे. माझ्या असे लक्षात आले, की या सात चक्रांचे रंग हे इंद्रधनुष्यातील सप्तरंग (तानापिहिनिपाजा) सर्वात कमी वारंवारितेपासून (frequency) पासून सर्वात जास्त वारंवारितेकडे जाणारे आहेत. सर्वात पाहिले चक्र म्हणजे मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. लाल रंगाची वारंवारिता आपल्याला दृश्य असणाऱ्या रंगपट्ट्यात सर्वात कमी आहे, म्हणजेच त्यातून येणारी ऊर्जा सर्वात कमी आहे. या उलट सर्वात उलट सर्वात शेवटचे चक्र सहस्रार याचा रंग जांभळा आहे. याची वारंवारिता रंगपट्ट्यात सर्वात अधिक आहे, त्याची ऊर्जावहन क्षमता सर्वात अधिक आहे. अगदी हीच गोष्ट ध्वनीच्या बाबतीत आहे. कमी वारंवारितेचे ध्वनी खालील चक्रे उघडतात. जसजसे आपण उच्च वारंवारितेच्या ध्वनीकडे जातो तसे ते ध्वनी वरील चक्रे उघडतात. यात कुठेतरी एक संगती दिसते. यावर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. 

प्रत्येक चक्रासाठी काही रत्ने सांगितली आहेत. याबाबतही अर्थ स्पष्ट दिसतो. ज्या चक्राचा जो रंग असेल त्या रंगाचे रत्न त्या चक्रासाठी सांगितले आहे. त्या त्या चक्रांच्या देवतांचे स्वरूपही रौद्राकडून सौम्य स्वरूपाकडे जात असल्याचे जाणवते. 

चक्राच्या पाकळ्यांच्या संख्येबाबत मी अजून निष्कर्षाला आलेलो नाही. पण या पाकळ्यांची संख्या म्हणजे या चक्रातून निघणाऱ्या प्रमुख मज्जातंतूंची संख्या असावी. या प्रत्येक पाकळीलाही एक बीजध्वनी दिलेला आहे. कदाचित हा बीजध्वनी त्या विशिष्ट मज्जातंतूला कार्यरत करीत असावा. या संबंधी मला अधिक काही लक्षात आले तर मी ते आपणास कळवीन. 

प्रत्येक चक्रासाठी एक अंत:स्त्रावी ग्रंथी सांगितली आहे. आपल्याला माहीत आहे की अंत:स्त्रावी ग्रंथींचा  आपले मनोव्यापार नियंत्रित करण्यात मोठा वाटा असतो.  त्या त्या चक्रातून निघणारे मज्जातातंतू या ग्रंथीमध्ये जात असावेत. त्यामुळे या चक्रांवर ध्यान केले असता त्या ग्रंथींच्या स्रावावर परिणाम होत असावा.  

पहिल्या पाच चक्रांपैकी प्रत्येक चक्र हे एकेका पंचमहाभूताशी (क्रमाने पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश) संलग्न आहे. तसेच आपल्या पंचेंद्रियांशी एक-एक चक्र (क्रमाने नाक, जीभ, डोळे, त्वचा, कान) संबंधित आहे.याचा उपयोग आपण विशिष्ट चक्राचे ध्यान करताना करू शकतो. उदाहरणार्थ मूलाधार चक्रावर ध्यान करताना कोणकोणते वास आपल्याला जाणवत आहेत यावर ध्यान करता येईल. 

प्रत्येक चक्राचे जे बीजध्वनी आहेत त्यातही एक संगती आढळते. हे बीजध्वनी वर्णमालेतील  'अंतस्थ'  या वर्गातील (य,र,ल,व) आहेत. पहिल्या चार चक्रांसाठी मात्र ते क्रमाने येत नाही तर 'ल,व,र,य' अशा क्रमाने येतात. आकाश तत्वाशी संबंधित आणि पहिल्या पाच चक्रांमधील सर्वात उर्जावान अशा घशातील विशुद्ध चक्रासाठी उष्म विभागातील शेवटचे व्यंजन 'ह' आहे.  

शेवटची दोन चक्रे अन्य पाच चक्रांपेक्षा वेगळी आहेत. ही चक्रे आपल्या मस्तकाच्या भागात आहेत, पाठीच्या कण्यात नाहीत. ती कोठल्याही पंचमहाभूतांशी अथवा आपल्या पंचेंद्रियांशी संबंधित नाहीत. 

मी ही लेखमाला फार लांबविणार नाही. प्रत्येक चक्राचे गुण (Attributes - रंग, बीजमंत्र इत्यादी ) सांगत बसणार नाही. कारण ते इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. मी शेवटच्या लेखात त्यांची लिंक देईन. पण कुंडलिनी ध्यानाला सुरुवात कशी करावी (माझ्या मते) याचे थोडे विस्तृत विवेचन करीन. मला वाटते, वाचक त्यात अधिक उत्सुक असतील.  पुढील लेख ध्यानास सुरुवात करण्यासंबंधी. 

कोणाला विशिष्ट चक्रासंबंधात काही माहिती हवी असल्यास कॉमेन्टमधून अथवा काही खाजगी असल्यास  मेसेजमधून संपर्क करू शकतात. मात्र माझी मेसेज बॉक्स केवळ अशा स्वरूपाच्या अथवा अन्य कामांसाठी मी वापरतो. त्यात कोणी काही लिंक टाकल्यास अथवा अर्थहीन मेसेजेस टाकल्यास  त्या व्यक्तीला मी मेसेजबॉक्ससाठी ब्लॉक करतो. 


Monday, June 14, 2021

कुंडलिनी विद्या - भाग २

मागील लेखात आपण कुंडलिनी विद्येसंबंधात थोडी माहिती घेतली होती.  कुंडलिनी विद्या ही कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून म्हणजेच मूलाधार चक्रापासून सहस्रारात वसलेल्या शिवापर्यंत नेण्याची विद्या आहे हे आपण पाहिले. हा प्रवास पाठीच्या मणक्यातून होतो. पाठीच्या मणक्यातून मज्जारज्जू (Spinal Chord) जातो. ही विद्या आपल्या मज्जारज्जूला आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला कार्यान्वित  करण्याची विद्या आहे. अर्थातच आपल्या शरीर-मनावर परिणाम घडविणारी विद्या आहे. आपले शरीरस्वास्थ्य-मनोस्वास्थ्य टिकविण्याची विद्या आहे. कोणाला काही अद्भुत-अलौकिक अनुभव  घेण्यासाठी ही विद्या शिकायची असेल तर त्यांनी या वाटेला न जाणेच चांगले. कारण काही अदभूत अनुभवाच्या प्रतीक्षेत मूळ उद्देशावरून लक्ष उडून शरीर-मनाला काही धोका संभवू शकतो. जर कोणाला यातून काही अलौकिक वाटणारे अनुभव आलेच तर ते त्याने स्वत:जवळच ठेवावे, विसरून जावे. त्याची वाच्यता केल्याने अथवा सतत मनात घोळवत राहिल्याने (मन विचलित होऊन) कुंडलिनी परत खाली उतरून मन:स्वास्थ्य बिघडू शकते. एकदा वर  गेलेली कुंडलिनी परत खाली आल्यास त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. काही अध्यात्मिक गुरु काही काळानंतर वासनेच्या आणि अन्य चिखलात रुतलेले दिसतात. हा वर गेलेली कुंडलिनी परत खाली उतरण्याचा परिणाम असावा. 

कुंडलिनी विद्येचा अभ्यास करताना पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्यातून निघणारे मज्जातंतू (Nerves) प्रथम कार्यान्वित करायचे आहेत. यालाच पाठीच्या शेवटच्या मणक्यातील चक्र म्हणजे मूलाधार चक्र भेदणे असे नाव आहे. हे या चक्रातून निघणारे मज्जातंतू ज्या ज्या अवयवात जातात ते अवयव चांगल्या प्रकारे कार्यंवित होतात. पण याचा आणखीही एक महत्वाचा परिणाम होतो. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूत जाते. मेंदूच्या या भागात काही मनोव्यापार नियंत्रित करणारी केंद्रे असतात. त्यावरही हे मज्जातंतू कार्यान्वित झाल्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.

उदाहरणार्थ: स्वाधिष्ठान चक्रातून निघणारे मज्जातंतू लैंगिक अवयवांकडे जातात. आपल्याला माहीत आहे की लैंगिक आवेग हे तीव्र आणि आवरण्यास कठीण असतात. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूतील आवरत्या न येणाऱ्या तीव्र भावना नियंत्रित करणाऱ्या भागात जाते. यामुळे या चक्रावर ध्यान केल्यास अति तीव्र भावनांवर (झटकन राग येणे इत्यादी) नियंत्रण मिळविता येते. तसेच या चक्रातून निघणारे काही मज्जातंतू लहान आतड्याच्या शेवटच्या भागाकडे आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाकडे जातात. संतापी स्वभावामुळे शरीराच्या या भागाला इजा पोचू शकते. या चक्रावर ध्यान केल्यास (हे चक्र भेदले गेल्यास) स्वभाव शांत होतो आणि पोटाचे हे रोगही आटोक्यात येतात.

 मनोव्यापार उच्च पातळीवर नेणे आधुनिक वैद्यकीय शास्त्राला कठीण वाटते, पण कुंडलिनी विद्येच्या साहाय्याने ते साध्य करता येते. 

कुंडलिनी जागृतीच्या मार्गात असणारी चक्रे कोणती, त्याचा आधुनिक शास्त्राच्या परिभाषेत संबंध काय हे आपण पुढील लेखात पाहू. 


Sunday, June 13, 2021

कुंडलिनी विद्या- भाग १

 मध्यंतरी एकदा 'कुंडलिनी विद्या' अर्थात 'सप्तचक्रांवर' लिखाण सुरु केले होते. परंतु ती लेखमाला सुरु ठेवणे कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. 

माझा कुंडलिनी शास्त्रावरील अभ्यास फार खोलवर नाही. ध्यान करताना लक्षात आले की खोलवर ध्यानात गेलो की  आपोआप सप्तचक्रांवर ध्यान लागते. म्हणूनच मग त्याचा अभ्यास करण्याचे ठरविले. इंटरनेटवरून बरीच माहिती मिळविली.  प्रत्यक्ष ध्यानात अनुभव घेतले आणि लिहिण्यास बसलो. 

कुंडलिनी शास्त्र हे आपल्या अतिप्राचीन सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. सांख्य दर्शनात प्रत्येकाचा पुरुष स्वतंत्र मनाला गेलेला आहे. सभोवताली प्रकृतीचा खेळ चालू आहे आणि पुरुष तो खेळ अलिप्तपणे अनुभवतो. कुंडलिनी  शास्त्रात पुरुषाला शिव मानले आहे. प्रकृतीला कुंडलिनी शक्ती मानले गेले आहे. आणि प्रत्येक माणसासाठी हा शक्तीचा खेळ शक्तीच्या शिवसोबत मीलनासाठी चालला आहे असे मानले गेले आहे. 

कुंडलिनी शास्त्राप्रमाणे आपल्या डोक्याचवरील सर्वोच्च स्थान (टाळू) येथे शिवाचे वास्तव्य आहे. कुंडलिनी आपल्या पाठीच्या मणक्याच्या सर्वात खालच्या ठिकाणी वास्तव्य करीत असते. या कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून क्रमाक्रमाने शिवापर्यंत आणणे ही कुंडलिनी साधना आहे. कुंडलिनीच्या स्थानापासून शिवाच्या स्थानापर्यंत हा प्रवास पाठीच्या कण्याच्या मार्गाने होतो. या मार्गात सात प्रमुख चक्रे अथवा स्थाने मानली गेली आहेत. ही चक्रे ओलांडत म्हणजे भेदत कुंडलिनीचा प्रवास होतो. 

ग्रंथ हेच माझे गुरु आहेत. ग्रंथांपर्यंत पोचण्याचे इंटरनेट हेच माझे साधन आहे. म्हणूनच ज्यांना या कारणामुळे माझे लेख वाचायचे नसतील त्यांनी कृपया या लेखांच्या वाटेला जाऊ नये.  त्यांनी माहिती मिळविण्यासाठी त्यांचे अन्य मार्ग शोधावेत. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाण्यासाठी मोकळे आहेत. 

हे शास्त्र समजावण्यासाठी जे साहित्य उपलब्ध आहे ते थोड्याफार सांकेतिक भाषेत आहे. त्यामुळे समजणे कठीण जाते. अनेक वेळा तर प्रत्यक्ष अनुभवानंतर या शास्त्रातील गूढ भाषेचा अर्थ लागतो.  मलाही अनेक वर्षांच्या ध्यानानंतर त्यातील थोड्याच संकेतांचा अर्थ कळला आहे. त्यामुळे या शास्त्रातील मी मोठा जाणकार आहे असा मी दावा करीत नाही. परंतु मला जेवढा अर्थ उलगडला आहे तेवढा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचत त्यामुळे आपल्याला या शास्त्रात गोडी वाटेल आणि आपला प्रवास सुरु होईल. हे ज्ञान फक्त त्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण कारण्याएवढेच असेल, कारण माझी झेप तेवढीच आहे. 

पुढील लेखात आपण हा विषय समजून घेण्यास सुरुवात करू.