ll महाघोरा ll
मोकळ्या सोडलेल्या केसांना
त्वेषाने आपटून तिने
गगनभेदी आरोळी ठोकली
गजचर्म ल्यालेली "कालरात्री"
गळ्यांत दैत्यमुंड अडकवून
विक्राळ हसत होती
त्वेषाच्या रक्तरंजित ज्वाळांनी
तिच्या हातातील खड्ग
अजूनही तळपत होते
मूळची हिमासम "गौरी" ती
काळीठिक्कर पडली होती
अवसेच्या कभिन्न रात्रीसारखी
डोळ्यांच्या प्रदीप्त चिता
लसलसत होत्या संतापाने
मुख रक्ताने माखलेले ..
ती प्रलयंकारी "रौद्ररूपिणी"
अनंतालाही तिला थांबवणे
शक्य होत नव्हते...
अख्खा रक्तबीज संपवल्यावर
अनिष्ट शक्तींनी घेरलेली
"विनाशिनी" अनियंत्रित झाली
"त्राही माम् माते!"
एकच पुकारा झाला
तिला कोण थोपवणार?
ती उधळत गेली
वाटेत आडव्या येणाऱ्या
प्रत्येक सजीव निर्जीवाला
कुणीतरी अडवले तिला
निखाऱ्यागत डोळे वळले
जाळून भस्म करणार..
इतक्यात अद्भुत घडले
बाळहातांची मिठी पडली
"आई, मी तुला ओळखलं.."
इवली चिमुरडी म्हणाली
दोन्ही हात पसरले
उचलून घ्यावे म्हणून..
लेकीला काळजाशी धरले
"काली" शांत झाली
आईचे काळीज तिचे
"कसे ग सोडलेस केस?
थांब वेणी घालते"
लेकीने मायेने गोंजारलं..
महाकाली खाली बसली
मंदीराच्या शेवटच्या पायरीवर
लेक वरच्या पायरीवर..
युगांच्या वेदना गुंतलेल्या
लेक एकेक बट
हळुवार सोडवत होती..
No comments:
Post a Comment