Sunday, May 27, 2018

'घोंगड्या' ✍🏼 रवि वाळेकर, पुणे

"घोंगड्या लै डेंजर हाये बर्का" आमच्याच वाड्यात राहणाऱ्या सातवीतल्या सुनिलदादाने मौलिक माहिती पुरवली होती.

"त्याच्याशी एकदम नीट राहायचे. आमच्या वेळी ४६ जणांना त्याने पहिल्याचं घटक चाचणीत नापास केले होते"

"बाप रें! कितीजणं होते तुमच्या वर्गात?" मी भीतभीत विचारले.

"४७!"

पोटात गोळाचं आला!

त्या सरांचे आडनाव चांगले दोन अक्षरी होते. हे 'घोंगड्या' असे त्यांना का म्हणायचे, ठाऊक नव्हते. शाळेतले सगळेचं 'दादा' त्यांना 'घोंगड्या' म्हणायचे, म्हणून आम्हीही म्हणायला लागलो.

प्राथमिक शाळेची टेकडी पार करून नुकतीच माध्यमिक शाळेच्या डोंगरावर चढायला सुरूवात झाली होती. शाळेचा गणवेश, टैमटेबल, इंग्रजीत 'म्याय कम्मिंग, स्स्सर?' असे विचारणे याचे भलतेचं अप्रूप वाटत होते.

प्राथमिक शाळेतं, हे सारे नव्हते. गणवेश वगैरे फालतू भानगडी नव्हत्या, पुर्ण कपडे घालून जाणे, हेचं खुप होते. एक पवार गुरुजी एकटे सगळा वर्ग हाकायचे. सरकारी कामांमधून वेळ मिळाला, तर अधुनमधून शिकवायचे पण! 'पारथमिक शाळा' असा खरा ऊच्चार असलेल्या प्राथमिक या शाळेत - ४ वर्षात - मी, 'गायी पाण्यावरं काय म्हणूनी आल्या' ही कविता आणि १२ पर्यंतचे पाढे, एवढेचं शिकल्याचे आठवते. चार वर्षे वर्गात इतरं काय शिकलो, ते काहीच आठवतं नाही.

वर्गात नसेल, पण 'डबा खायच्या' आणि 'लघ्वीच्या' सुट्टीत मात्र बरेचं ज्ञानसंपादन व्हायचे.

रिठ्याच्या बिया घासून गरम करून चटका कसा द्यायचा, अंगठा चार बोटांच्या मध्ये घुसवून आणि अंगठ्याला थुंकी लाऊन बुक्की कशी मारायची, कागदी विमानाच्या शेपटात पोट खपाटीला जाईपर्यंत फुंक मारून सगळ्यांपेक्षा वरं कसे ऊडवायचे, भिंगाने कागद कसा जाळायचा, पडलेल्या दाताचा योग्य ऊपयोग कसा करायचा, रक्ताने भळभळणाऱ्या जखमेवर एका दिवसात खपली धरण्यासाठी काय करायचे, अशा अनेक गोष्टी गुरूजींनी न शिकवता आणि गुरूजींना न कळू देता शिकलो.

'मुली' नामक देवाने निव्वळ तिरस्कार करण्यासाठी बनवलेल्या प्राण्यापासून दुर कसे राहायचे, कधीकाळी एखाद्या 'फिंद्री'च्या मागे बसावेचं लागले, तरं त्या मुलीला कळूही न देता तिच्या वेण्यांच्या 'रिबणी' एकत्र करकचून कशा बांधायच्या, अशा बऱ्याच मौलिक गोष्टी शिकता शिकता शाळेतली पहिली ४ वर्षे कशी निघून गेली, ते कळलेही नव्हते.

पवार गुरूजींचे एक बरे होते. 'हजेरी' घेतली की एखादा धडा वाचायला वा कविता पाठ करायला सांगायचे आणि आपल्या लिखाणाच्या कामाला लागायचें. ते त्यांच्या कामात आणि आम्ही आमच्या कामात! एकमेकांना काडीचाही त्रास देत नव्हतो. वर्षातून एकदा 'इनसपेक्टर सायेब' नावाचा फाजील इसमं येई, तो यायच्या आधीचा आठवडा फक्त थोड्या हाल-अपेष्टा काढाव्या लागायच्या!

पवार गुरूजी अधुनमधून छड्या वगैरे मारायचे, पण त्याचे काही विशेष नव्हते. त्यांची खरी मोठी शिक्षा असायची, ती दोन मुलींमध्ये बसायची शिक्षा! सगळी मुले तिरप्या डोळ्यांनी बघतं तोंडावर हात ठेऊन हसायचे आणि शिक्षा मिळालेल्या मुलाला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे! लहान होतो, समजं नव्हती.

त्या वयात ती शिक्षा वाटायची!

(पुढे कॉलेजात आल्यावर, पवारगुरूजींनी दोन बुके जास्त शिकून आपल्या वर्गावरं 'प्रोफेसर' म्हणून कमीतकमी या शिक्षेसाठी यायला हवे, असे राहून राहून वाटायचे!)

माध्यमिक शाळेला 'हाय्स्कूल' म्हणायचे, हे नव्या शाळेच्या पहिल्याचं दिवशी समजले. शाळेत कधी झिपऱ्यांची शुद्ध नसलेल्या गुरूजींच्या साऱ्या शिष्या इथे दोन वेण्या घालून, एकसारख्या लाल रंगाच्या रिबिणी लाऊन एकदमं झोकात! स्नो-पावडर लाऊन, कपाळावर टिकली लाऊन, डोक्याला खोबरेल तेल चोपडून आलेल्या, निळ्या गणवेशातल्या कित्येकींना तरं पहिल्या दिवशी आम्ही ओळखलेही नाही. मुलांची अवस्थाही वेगळी नव्हती. दोन्ही खिशातल्या गोट्या, चिंचा, विट्ट्या यांच्या वजनाने चड्डीची बटणे तुटली तरी, पर्वा न करणारी पोरं इथे स्वच्छ पांढरा शर्ट निळ्या चड्डीत खोचून, 'जंगणमन'ला चप्पल घालून रांगेत हजर!

संपुर्ण नाक स्वच्छ असलेल्या विजा ढगेला (मुळ ऊच्चार - इजा ढग्या) पवार गुरुजींनी सोडा, खुद्द इजाच्या टेलर बापानेसुद्धा ओळखले नसते!

"ही काही धर्मशाळा नाही. कधीही यायचे आणि कधीही जायचे चालणार नाही. वर्गात येताना 'म्याय कमिन सर' असे विचारायचे"

पहिल्याचं तासाला पहिलेच 'सर' कडाडले! गुरुजींचे इथे 'सर' झाले होते. 'काटकसर' हा शब्द त्याकाळी सगळीकडे ऐकू यायचा, त्यामुळे या 'हायस्कूला'त 'काटक' नावाचे एखादे सरं असावे, असे ऊगाचचं वाटले. नव्हते. काटक-सर कोणी नव्हते, पण हे पहिल्याचं तासाला आलेले सर मात्र भलतेचं राकट-सर होते.

इंग्रजीत बोलायला लागलो, या आनंदात पहिला दिवस मस्त गेला.

दुसऱ्या दिवशी 'जंगणमन' आणि 'पारथना' संपवून बेंचवर बसलोचं होतो, की सरं आले. मी नुकताच पाच काडिपेट्यांवरच्या चित्रांच्या बदल्यात दोन रिकाम्या सिगारेट पाकिटांचा 'व्यवहार' आटोपला होता. ही सिगारेटची पाकिटे वेगळी होती. आमच्या गावात ती सिगारेट कोणी पीत नव्हते, त्यामुळे दुर्मिळ खजिनाच मला मिळाला होता. व्यवस्थित 'डिल' झाल्याची खुशी दोन कानांमध्ये आरपार पसरली होती.

"हसतोय काय रे फिदीफिदी?"

सर मलाचं ऊद्देशून बोलतं होते. ते वर्गात आले तेव्हा मी ओणवा होऊन मागच्या बाकावरच्या एकाशी, '१२ चिंचोक्यांच्या बदल्यात ३ सागरगोटे' अशा महत्वाच्या वाटाघाटी करतं होतो. सर वर्गात आले तरी मी फारसे लक्ष दिले नाही. त्यांना सागरगोट्यांत काय इंटरेस्ट असणार?

"नाव काय रे तुझे?" मी खरेतरं कालचं नाव सांगितले होते, पण ऊगाच द्विपक्षीय संबंध बिघडू नये म्हणून परतं सांगितले. त्यांनी काल सांगितलेले त्यांचे नाव मी लक्षात ठेवले होते, आणि यांना माझे नाव आठवू नये? असतात, काही जण विसरभोळे!

त्यांचे खरे नाव आणि 'घोंगड्या' हे टोपणनाव, मला दोन्ही आठवत होते. 'घोंगड्यासर' म्हंटलो, असतो तरं मजाचं आली असती!

"घरी कोणी आले, तरं असेच दाताड दाखवतो का?"

मी 'नाही' म्हणालो खरां, कारण तेच ऊत्तर समोरून अपेक्षित होते, पण मी खरचं घरी कोणी आले तरं काय करतो, हेचं आठवतं नव्हते!

हे एवढे महत्वाचे असेल, असा कधी वाटले नव्हते.

"मग? मग काय करतो?"

मी खरेचं यावर कधीच विचार केला नव्हता.

"काहीच नाही!"

"काहीच नाही? तू मुर्ख आहेस"

हे घरी सकाळ-संध्याकाळ ऐकलेले असायचे, त्यामुळे अमान्य असायचे काही कारणचं नव्हते.

"आता तुम्ही सगळे मोठे झालात. हायस्कूलमध्ये आलाय. वर्गात सर आले की, 'गुड मॉर्निंग, सरं' असे म्हणायचे. काय?"

मग, त्या दिवशीची गुड मॉर्निंग पार गुड इव्हिनींग होईपर्यंत आम्ही सगळेजण सामुदायिक रित्या 'गुड मारनिंग, स्स्सर' घोकत होतो!

सर इंग्रजी शिकवायचें.

पुढचा आख्खा महिना या सरांनी आम्हाला सळो की पळो केले. घामाघूम केले.

या सरांचा वेग भन्नाट होता. आम्हीही त्यांच्या वेगाने पळावे ही अपेक्षा! आम्ही बैलगाडीत, तरं हे मोटारसायकलवरं!.

'चला, पळा माझ्या बरोबरीने!' मग त्यांच्या मोटारसायकलीची बरोबरी करता करता आम्हाला ते फरपटतं न्यायचे. आमची दाणाफाण व्हायची. घटोत्कच पडल्यावर कौरवसेनेची धावाधाव व्हायची, तशी आमची अवस्था व्हायची! बैल कुठे, गाडी कुठे, कासरा कुठे, चाबूक कुठे आणि आम्ही कुठे! अरारा! एकदमं दैन्यावस्था व्हायची! आम्हा मस्तवाल बैलांची पार केविलवाणी गोगलगाय व्हायची!

कुठून अवदसा आठवली आणि चौथी पास झालो, असे झाले! काही जण तरं संध्याकाळी पवारगुरूजींच्या घरी जाऊन, परतं चवथीचे काही जमते का, याची चाचपणी पण करून आले!

"ए, बी, सी, डी,... किती शिंपल आहे रे गधड्यांनो. तुमच्या क, ख, ग, घ पेक्षा किती सोपे. काय?"

सगळे 'गधडे' निमूटपणे माना डोलवायचे!

सिम्पल या साध्या शब्दाला हे 'शिंपल' का म्हणतात? पण, विचारायची सोय नव्हती!

"नंदिबैलासारखे मान काय डोलावताय?"

'गधडे' की 'नंदिबैल' यातले आपण नक्की कोण, याचा विचार करत असतानाचं फर्मान यायचे,

"परवा सोमवारी चार रेघी वहीत पाच वेळा सगळे अल्फाबेट्स लिहून आणा"

एक सुकलेला, धारातीर्थी पडलेला रविवार डोळ्यासमोर यायचा. खरेतरं रविवारी शेजारच्याच गल्लीतल्या पोरांबरोबर 'टेस्टमॅच' ठरवलेली असते. आता कॅन्सल केली, तर ती पोरं गावभरं 'शेपुट घातली रे' असा गवगवा करणार!

बरं, चार रेघी वही आणणे म्हणजे काही कमी दिव्य नसायचे! अगोदरं आईला पटवावे लागायचे. मग तिच्या, 'कोऱ्या पानांची वही आहे ना? त्यावर चार रेघा मारून घे', 'ताईच्या मागच्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही पाने सापडतात का बघं', अशा अलौकिक सुचनांवर बाजीप्रभू देशपांडेंच्या थाटात खिंड लढवावी लागायची. जिंकलो, तर जेवताना वहीची केस हायकोर्टात पोहोचायची!

"शाळा सुरू होतानाचं घ्यायला काय होते रे? दररोज हे घ्यायचे आणि ते घ्यायचे. शाळेला सांग, वडिलांचा सगळा पगार शाळेतच जमा करून घ्या दर महिन्याला. घेत रहा काय घ्यायचे ते"

हे सगळे मुकाट्याने ऐकून घेऊन पैसे मुठीत घेऊन दुकानाकडे पळायचें! त्याच्याकडे तसली चार रेघी वही संपलेली नसेलं, तर हायसे होऊन जाताना केलेला नवस फेडायला, येताना मारुतीला जाऊन यायचे!

अल्फाबेट कसेबसे पाठ झाले, तर 'ए, ई, आय, ओ, यू' या पाच स्वरांनी 'आय' आठवायची! मग टेंशन द्यायला 'टेन्स' आले! त्यात प्रत्येक काळाचे तिन तिन प्रकार! खरेतरं, एकदा 'पास्ट' झाला म्हणजे पास्ट झाला, त्याचे तिन्ही प्रकार 'प्रेझेंट'मध्ये कशासाठी? 'फ्युचर'चे तिन प्रकार जेव्हा फ्युचर येईल तेव्हा बघू. प्रेझेंट मध्ये हा चोंबडा कशासाठी लुडबूड करतो?

हे सगळे बोलायची चोरी होती, कारण, "शिम्पल आहे रे, गधड्यांनो" असे ५४ गधड्यांचे सर तासाला दहादा म्हणायचे!

"एकदा तुम्हाला ए, ई, आय, ओ, यू समजले ना, की कोणाच्या बापाची तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची हिंमत नाही!"

हे जे कोणी, 'कोण आणि त्याचा बाप' होते, त्यांना आमच्या इंग्रजी शिकण्यात एवढा का रस होता, ते समजायचे नाही, पण ते बाप-लेक पुढच्या आठवड्यात परतं वर्गात हजर असायचे!

" हे एवढे, सी कधी वापरायचे, के कधी आणि एस कधी वापरायचे, एवढे आले ना, की कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची!"

हे बाप-लेक परतं आमच्या मानगुटीवर!

पहिल्या काही महिन्यातचं आता झाले तेवढे शिक्षण पुरे करावे आणि कामधंद्याला लागावे, असे आमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटू लागले. चौथी पास, हे काही कमी शिक्षण नाही. कित्येक जणं एवढेही शिकत नाहीत.

गोट्या, विटीदांडू, पतंग, लपाछपी, लिंगोरच्या आणि मुख्य म्हणजे क्रिकेट यांचा बळी देऊन पाचवीला आम्ही थोडेफार इंग्रजी शिकलो आणि सहाव्वीला आलो.

घोंगड्याला दिव्य सिद्धी प्राप्त आहे, यावरं आम्हा विद्यार्थ्यांमध्ये 'मे महिन्याच्या सुट्टी'त एकमतं झाले. ज्या पोराने अभ्यास केलेला नसतो, त्यालाचं नेमका प्रश्न कसा विचारतो? आपण रविवारी 'म्याच' ठरवली, की याला कसे कळते? नेमका त्याचं शनिवारी जास्तीचा 'एच.डब्ल्यू.' कसा देतो?

सहाव्वीला याने कहरचं केला. वर्गात म्हणे इंग्रजीत बोलायचे! दुसरी भाषा चालणारं नाही! वर्गात टॉयलेटला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली! ऊगाच इंग्रजीचा खुन नको आणि डोक्याला ताप नको, म्हणून बरेचं जण बेंबीला थुंकी लाऊन स्थितप्रज्ञासारखे बसायचे. बरेचं जण जबड्यात कापसाचा मोठा बोळा घालुन बसू लागले. सरांनी विचारले तर 'टिथ इज पेन' असे लिहून देऊन 'पेन' नसलेल्या बाजूला मुस्कडात खाऊ लागले. इंग्रजी बोलण्यापेक्षा एक मुस्कडात खाल्लेली कधीही बरी!

तरीही सर हिरिरीने शिकवतचं राहिले. सगळ्या वर्गाला 'शँपेन'चे स्पेलींग बरोबर आले, तेव्हा तरं ते नाचायचेच बाकी होते! त्या आनंदात त्यांनी दुसऱ्या दिवशी 'झेकोस्लोव्हाकीया'चे स्पेलींग पाठ करून यायला सांगितले!

त्या दिवशी रात्री विठ्ठलमंदिरात, विठ्ठलाच्या साक्षीने, 'घोंगड्या'वर कोणीतरी 'चेटूक' केलेचं पाहिजे, यावरं आम्हा ४-५ मित्रांमध्ये एकमतं झाले. पण हे 'चेटूक' नेमके कोण करतो, हे आमच्यापैकी कोणालाही माहिती नसल्याने 'घोंगड्या' वाचला!

सहावीच्या दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून भाषण स्पर्धा होती. दोन गट. ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी.

सहामाहीच्या शेवटच्या परिक्षेनंतर सरांनी मला 'टिचर्स रुम'मध्ये बोलावले. एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितले, "चिठ्ठी वडलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे, तु भाग घे. जायचे भाडे आपल्याला भरायचे आहे, तुझ्या वडिलांना काही जास्त नाही'"

"सर! ते भाड्याचे ठिक आहे, पण..."

"तु काळजी करू नकोस. मी भाषण लिहून देतो. तु सुट्टीत सराव करं. एकदम शिंपल आहे रे......."

त्यांनी 'गधड्या' हा शब्द निग्रहाने घशातून परतं पाठवला होता, हे जाणवले.

घरच्यांनी ना म्हणायचा प्रश्नचं नव्हता. यथावकाश नागपूरला गेलो. मुखोद्गत केलेले 'सरांचे भाषण' पोपटासारखा तिथे बोललो. निर्णय नंतर देणार होते. मला पर्वा नव्हती. भुगोलात वाचलेले 'नागपूर' मी प्रत्यक्ष पाहिले होते. नागपूर पहाणारा शाळेतला मी पहिलाचं!

दुसरी सहामाही सुरु झाली. नागपुरहून काहीच ऊत्तर आले नव्हते. फक्त जिंकलेल्यांना कळवतं असावेत. नंतर मी ती स्पर्धा विसरूनही गेलो.

पंधरा-विस दिवस गेले असावेत. रात्री साडेदहाला तारवाला घरी आला. सगळे काळजीत. त्याकाळी तार येणे अशुभ सुचक! त्यात एवढ्या रात्री!

वडिलांनी तार घेतली.

वाचली.

माझ्याकडे डोळे रोखतं म्हंटले,

"नागपुरात जिंकलास रे तू! तुझ्या गटात तू राज्यात पहिला आला आहेस!"

आई तर आनंदाने रडायलाचं लागली! मला काहीच ऊमजेना.

वडिल ऊठले. मला म्हणाले, "चल, शाळेचा गणवेश घाल"

मग आईकडे वळून म्हणाले, "कागदात साखर बांधून दे!"

आम्हाला दोघांनाही काहीच कळले नाही! रात्रीचे अकरा वाजलेले.

"चलं, तुझ्या सरांच्या घरी जाऊ. ही बातमी पहिल्यांदा ऐकायचा मान त्यांचा आहे!"

सगळे गाव साडेआठ-नऊला झोपते. आमच्या मोटारसायकलच्या आवाजाने सरांची आख्खी गल्ली ऊठली. मोटारसायकल असणे, ही फार मोठी गोष्ट होती त्याकाळी. गावात फक्त २ मोटारसायकल. त्यातली एक आमची!

डोळे चोळतचं सरही बाहेर आले. फाटक्या बनियन आणि विटक्या पायजम्यात ते ओळखू येत नव्हते!

वडील बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. वडिलांकडे बघताचं ते म्हणाले,

"काय झाले साहेब?"

वडिलांनी साखरेची पुडी त्यांच्या हातात दिली.

"नाही समजले, साहेब!"

वडिलांनी तार त्यांच्या हातात दिली.

तार वाचताच सर ओक्साबोक्शी रडू लागले. भर ओसरल्यावर मला जवळ घेत, डोक्यावर हात फिरवत म्हणाले,

"तुला सांगितले नव्हते?, 'शिम्पल' आहे रे...."

आणि परत रडायला लागले.

वडिलांनी मला खुण केली. मी त्यांच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला.

त्यांनी "नको रे नको रे" म्हणतं मला ऊचलतं, मला छातीशी कवटाळले.

"सर, आता कोणाचा बाप म्हणू शकत नाही, मला इंग्रजी येत नाही...."

"खरं आहे रे पोरा...."

एवढा कर्दनकाळ 'घोंगड्या' एखाद्या मुलीसारखा मुसमुसत होता! मनातल्या मनात का होईना, पण त्यांना ते 'घोंगड्या' म्हणणे, मला खुप खजिल करून गेले!

ते पाठीवर हात फिरवतं असताना जाणवले, आई-वडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरचं शिक्षकाचा असतो!

शिम्पल आहे! नाही का?

No comments:

Post a Comment