Sunday, May 6, 2018
जैन दर्शन
जैन दर्शन हे अन्य सर्व दर्शनांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. अन्य दर्शने आपल्याला जे मत मांडायचे आहे ते निरनिराळ्या प्रमाणांच्या सहाय्याने मांडण्याचा प्रयत्न करतात. पण जैन दर्शन हे कोठलेही मत अथवा भूमिका ठामपणे मांडत नाही, तर 'प्रत्येक मत अथवा भूमिका आपापल्या परीने योग्यच असते' असा सिद्धांत मांडते. 'अनेकांतवाद' हा जैन धर्माचा पाया आहे. खरेतर अनेकांतवाद हा जैन धर्माच्या आत्यंतिक अहिंसावादाची तार्किक परिणीती आहे. बौद्धिक पातळीवर अहिंसा अथवा भिन्नमतसहिष्णुता म्हणजेच अनेकांतवाद. यासंबंधी अधिक माहिती नंतर घेऊ.
चार्वाक आणि बौद्ध दर्शनांप्रमाणे जैन दर्शन हे 'नास्तिक' दर्शन म्हणून ओळखले जाते. जी दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत ती दर्शने प्राचीन मान्यतेप्रमाणे 'नास्तिक' दर्शने म्हणून ओळखली जातात. 'देव आहे अथवा नाही' असे मानण्याचा आणि या 'नास्तिक' शब्दाचा काहीही संबंध नाही. जैन परंपरा वेदपूर्व कालापासुनाची आहे असे काहींचे मत आहे. यज्ञयाग करून देवतांना प्रसन्न करून त्यांच्या कृपाप्रसादाने मोक्ष मिळविण्याची वैदिक परंपरा येथे होती तशीच गृहत्याग करून स्वत:च्या तपोबलाने मोक्षप्राप्ती करण्याची श्रमण परंपरासुद्धा येथे नांदत होती. जैन आणि बौद्ध दर्शने ही परंपरा मानतात.
जैन परंपरेनुसार वस्तूंचे 'जीव' आणि 'अजीव' असे प्रकार आहेत. जीवांचे 'संसारी' आणि 'मुक्त' असे प्रकार आहेत. 'संसारी' जीव हे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात 'सरत' जाणारे जीव होत. 'मुक्त' जीव यातून बाहेर आले आहेत. पण त्यांचे ही दोन प्रकार आहेत. 'सिद्ध' आणि 'तीर्थंकर'. सिद्धजीव हे 'संसारी सुखदु:खे' यापासून पूर्णत: अलिप्त असतात तर तीर्थंकर (अथवा अर्हत) जीव काही काल संसारी जीवांना मार्गदर्शन करतात. भगवान महावीर हे जैन परंपरेतील चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर होत. त्यापूर्वी २५० वर्षे आधी भगवान पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर होऊन गेले.
जैन धर्माच्या धर्मग्रंथांच्या खोलात न जाता आपण दर्शनशास्त्राच्या दृष्टीने महत्वाच्या अनेकांतवादाचा विचार करणार आहोत. हा अनेकांतवाद 'नयवाद' आणि 'स्यादवाद' यातून स्पष्ट होतो. त्याचा विचार पुढील लेखात करू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment