दु:खनिरोध शक्य आहे आणि त्यासाठी एक निश्चित मार्गही आहे असे ठाम प्रतिपदन गौतम बुद्धाने केले. या मार्गाला आर्यअष्टांगिकमार्ग असे नाव आहे. ही आठ अंगे पुढीलप्रमाणे
- सम्यक दृष्टी
- सम्यक संकल्प
- सम्यक वाचा
- सम्यक कर्म
- सम्यक आजीविका
- सम्यक व्यायाम
- सम्यक स्मृती
- सम्यक समाधी
आटोपशीर व्हावे म्हणून अनेकवेळा या आठ अंगांचा समावेश शील, प्रज्ञा आणि समाधी या तीन भागात केलेला असतो. आपणही या तीन भागातच याचे विवेचन करू.
- शील: शील म्हणजे सदाचार. वागण्याचे नैतिक नियम. भिक्खुंसाठी असे दहा नियम आहेत. इतरांसाठी यातील पाच आहेत. यालाच 'पंचशील' असे म्हणतात. जैनांच्या 'अनुव्रत' आणि पातंजल योगाच्या 'यमनियम' याच्याशी साम्य असणारे आहेत.
- प्रज्ञा : सर्व पदार्थ अनित्य आहेत असे मनात पुरेपूर ठसणे यालाच 'प्रज्ञा' असे नाव आहे. जगात 'नित्य' असे काहीच नाही. नित्यतेच्या आभासामुळेच दु:ख अनुभवाला येते असे बुद्धाचे प्रतिपादन आहे. उपनिषदांच्या अविनाशी आत्म्याच्या प्रतिपादनाच्या बरोबर विरुद्ध हे प्रतिपादन आहे. अविनाशी आत्म्याच्या कल्पनेमुळेच अहंकार ("मी") आणि ममत्व ("माझे") हे भाव निर्माण होतात आणि अंतिमत: दु:खाला कारणीभूत ठरतात असे बुद्धाचे मत आहे.
- समाधी: शील आणि प्रज्ञा यानंतर समाधीचा टप्पा येतो. समाधी म्हणजे चित्ताची अत्यंत समतोल अवस्था. ध्यानाने चित्ताची अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. अशी समतोल अवस्था प्राप्त करण्यासाठी गौतम बुद्धांनी 'विपश्यना' ध्यानपद्धतीचा अवलंब करण्यास सामान्य नागरिकांना शिकविले. त्या काळी अशी ४५ दिवसांची ध्यानशिबिरे स्वत: बुद्ध घेत असत आणि त्यात एकावेळी दहा हजारापर्यंत नागरिक सहभागी होत असत. 'राजगृह (बिहार)' येथे त्यासाठी भव्य सभागृह बांधले होते. आता गोएंकागुरुजी ही ध्यानपद्धती शिकविण्यासाठी दहा दिवसांची नि:शुल्क शिबिरे आयोजित करतात. (http://www.dhamma.org)
दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी 'द्वादशनिदान सिद्धांत' आणि 'प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत' मांडला. पुढील भागात आपण हे द्वादशनिदान आणि प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत समजून घेऊ.
No comments:
Post a Comment