मागील भागात आपण 'उपाधी' या संकल्पनेविषयी जाणून घेतले. आता आधिष्ठान या संकल्पनेसंबंधी जाणून घेऊ.
मागील काही लेखांत आपण प्रकाश आणि त्याचे साक्षी चैतन्याशी साम्य याचा परिचय करून घेतला. परंतु त्यालाही मर्यादा आहे. प्रकाश हा फक्त तेथे असलेल्या वस्तूंची जाणीव करून देतो. परंतु प्रकाशामुळे त्या वस्तू अस्तित्वात येत नाहीत. चैतन्याचे तसे नाही. आपण थोड्या खोलात जाऊन बघू.
एखाद्या गोष्टीचे अस्तित्व दुसऱ्या गोष्टीला अस्तित्व प्रदान करीत असेल तर पहिली गोष्ट त्या वस्तूचे आधिष्ठान आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ टेबल हे लाकडाने बनलेले आहे. जर त्या लाकडाचे अस्तित्व काढून घेतले तर त्या टेबलालाही अस्तित्व राहणार नाही.
सोन्याच्या पाटल्या आहेत. त्यांचे अस्तित्व सोन्यामुळे आहे. उद्या या पाटल्या वितळवून त्याच्या बांगड्या केल्या तर सोन्याचे अस्तित्व तसेच राहील. कारण सोन्याचे अस्तित्व पाटल्यांवर अवलंबून नाही. जर पाटल्यांमधील सोने काढून घेतले तर पाटल्या अस्तित्वात राहणार नाहीत. म्हणून सोने हे पाटल्यांचे आधिष्ठान आहे.
मातीचा घट आहे. त्याचे अस्तित्व मातीमुळे आहे. जर तो घट फोडून त्याचे चूर्ण बनविले तर घटाचे अस्तित्व संपेल, पण मातीचे अस्तित्व तसेच राहील. माती त्या घटाचे 'अधिष्ठान' आहे.
समुद्रात लाटा येतात. लाटांचे अस्तित्व समुद्राच्या पाण्यामुळे आहे. जर समुद्रात पाणी नसेल तर लाटा निर्माण होणार नाहीत. समुद्राच्या पाण्याचे अस्तित्व मात्र लाटांवर अवलंबून नाही. म्हणजेच समुद्राचे पाणी हे समुद्राच्या लाटांचे आधिष्ठान आहे.
आधुनिक युगातील अधिष्ठानाचे उदाहरण हे चित्रपटाच्या पडद्याचे आहे. सिनेमाचा पडदा हा चित्रपटातील प्रसंगांना अस्तित्व देतो. जर चित्रपटाचा पडदाच नसेल तर चित्रपट बघता येणार नाही. परंतु चित्रपटाचे प्रक्षेपण होत नसतानाही त्या पडद्याला अस्तित्व आहे. म्हणजेच चित्रपटाचा पडदा हे चित्रपटाचे 'आधिष्ठान' आहे.
तसेच 'मी' अथवा 'माझे चैतन्य' हे माझ्या देह-मन आणि आसपास असणाऱ्या गोष्टींचे अधिष्ठान आहे. जर माझा देह-मन यांना चैतन्याचा स्पर्श नसेल तर त्यांना कोणत्याच गोष्टींची जाणीव नसेल - त्यांचे अस्तित्व शून्यवत असेल. मात्र माझ्या चैतन्याच्या अस्तित्वासाठी देह-मनाची आवश्यकता नाही. म्हणजेच माझे चैतन्य हे माझ्या देह-मनाचे अधिष्ठान आहे.
जर मी म्हणजे माझे चैतन्य माझ्या आसपास घडणाऱ्या घटनांचे, माझ्या मनात उठणाऱ्या तरंगांचे आधिष्ठान असेल तर या सर्व गोष्टींपासून असंग अथवा अलिप्त कसे राहू शकेल? टेबलाचे लाकूड त्या टेबलाचे आधिष्ठान आहे. मी टेबलावर ओरखडा ओढला तर त्या लाकडावरही ओरखडा उठणारच. समुद्राचे पाणी हे समुद्राच्या लाटांचे आधिष्ठान आहे. मी त्या लाटांत थोडा रंग मिसळला तर पाण्यालाही तो रंग येणारच. मग माझे चैतन्य जर या विश्वाचे आधिष्ठान असेल तर विश्वात घडणाऱ्या घटनांचा परिणाम चैतन्यावरही होणारच. ते असंग-निर्लेप कसे राहू शकेल?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आणखी एका संकल्पनेसंबंधात जाणून घ्यावे लागेल. पुढील लेखात आपण 'विवर्त' या संकल्पनेसंबंधी जाणून घेऊ.
No comments:
Post a Comment