.मागील भागात आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही तर चैतन्य आहोत हे पहिले. या भागात आपण साक्षित्व समजून घेऊ. त्यासाठी आपल्या चैतन्याचे प्रकाशाशी काय साम्य आहे ते पाहू.
प्रकाशाची जाणीव होण्यासाठी प्रकाशाच्या मार्गात अन्य कोठलीतरी वस्तू यावी लागते. आपल्याला मग त्या वास्तूच्या अस्तित्वाची जाणीव होते तसेच तेथे असलेल्या प्रकाशाचीही जाणीव होते. अंतराळात निर्वात पोकळीत एखादी वस्तू असेल तरच प्रकाशाची जाणीव होते, अन्यथा सर्वत्र अंधार भासतो. आपल्या चैतन्याची जाणीवही आपल्या शरीर-मनाला होणाऱ्या संवेदनांतून होते. या संवेदना आपले चैतन्य प्रकट करते. संवेदनाच नसतील तर चैतन्य तेथे असूनही चैतन्याचे प्रकटीकरण होणार नाही.
आपल्या आसपास सूर्यप्रकाश पसरलेला आहे. हा प्रकाश ज्यावर पडेल ती वस्तू प्रकाशित करतो. ती वस्तू घाणेरडी असेल तर तसे दाखवितो, स्वच्छ असेल तर तसे दाखवितो. पण त्यामुळे तो प्रकाश घाणेरडा अथवा स्वच्छ होत नाही. हा प्रकाश त्या वस्तूंपासून 'असंग' असतो. त्या वस्तू त्या प्रकाशाला सुंदर अथवा बेढब करू शकत नाहीत. जे आहे, जसे आहे तसे दाखविण्याचे काम प्रकाश करतो. प्रकाश त्या कोठल्याही वस्तूला चिकटून राहत नाही. ती वस्तू त्या खोलीतून बाहेर नेली तर तो प्रकाश त्या वस्तूबरोबर चिकटून बाहेर जाणार नाही. ती सुंदर वस्तू आता बेढब केली तर तो प्रकाश आधीच्याच सुंदरपणाला चिकटून राहण्याचा आग्रह धरणार नाही.
या प्रकाशासारखेच जे काही या चैतन्याच्या परिक्षेत्रात येते त्याला हे चैतन्य आपल्यासमोर ठेवते. आपल्या पंचेंद्रियांना जे जाणवते त्याची सूचना देते. त्या क्षणी जे जाणवते तेच सांगते, आधीच्या अनुभवाला धरून बसत नाही. जर माझ्या चैतन्याला आरोग्यपूर्ण शरीराचा अनुभव येत असेल तर माझ्या चैतन्याने (म्हणजे मी) आरोग्यपूर्ण शरीर धारण केले आहे असे हे चैतन्य दाखविते. 'मी धट्टाकट्टा आहे' असे आपण व्यवहारात म्हणत असलो तरी त्याचा खरा अर्थ 'हे शरीर' धट्टेकट्टे आहे असाच होतो. मी-म्हणजे माझे चैतन्य- जसे आहे तसेच दाखवते आणि दाखवत राहील. मी उद्या रोगग्रस्त झालो तरी माझे चैतन्य रोगग्रस्त कसे होईल? माझे मन खिन्न झाले आहे हे चैतन्य दाखवून देईल. पण त्यामुळे माझे चैतन्य खिन्न कसे होईल? माझ्या शरीराच्या, मनाच्या बदलत्या अवस्थांचा मी केवळ साक्षी आहे. पण त्या अवस्थांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही. मी 'असंग' आहे.
ही 'असंगत्वाची' भूमिका अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील. पुढील लेखात आपण 'उपाधी' ही संकल्पना समजून घेऊ.
No comments:
Post a Comment