'असंग' होणे म्हणजे केवळ शरीराने अथवा मनाने आसपास घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त राहणे नव्हे. 'असंग' या शब्दात खूप खोलवर अर्थ दडला आहे. हा अर्थ समजून घेण्यासाठी आपण प्रथम 'मी कोण आहे' याचा शोध घेत आहोत.
दुसऱ्या भागात आपण पहिले की साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्या मनावर उमटते आणि अहंकाराच्या साहाय्याने ही ही प्रतिमा आपल्या शरीराच्या रोमारोमात पसरते. आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. आपण या चैतन्यालाच 'मी' समजू लागतो. हे चैतन्य प्रकाशासारखे असते हे आपण तिसऱ्या भागात पहिले. अर्थात प्रकाशाचे साम्य चैतन्याशी दाखविताना प्रकाश आणि चैतन्य यांचे सर्वच गुण सारखे नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण आता आपल्या प्राचीन ग्रंथातील 'उपाधी'ची संकल्पना समजून घेऊ. एखाद्या सानिध्यात असलेल्या वस्तूचे गुण सानिध्यामुळे त्याच वस्तूचे आहेत असे वाटणे म्हणजे 'उपाधी'. एखाद्या अत्यंत पारदर्शक अशा स्फटिकाच्या गोळ्याच्या मागे आपण लाल रंगाचे फुल ठेवले असता आपल्याला तो गोळा लाल रंगाचा आहे असे वाटते. तो लाल रंग त्या गोळ्याचा नसतो, परंतु सानिध्यामुळे त्या गोळ्याला तसा रंग आहे असे भासते. हे फुल बाजूस केले असता गोळा परत पारदर्शकच भासतो. हे उपाधीचे एक उदाहरण आहे.
मन-शरीराच्या सानिध्यामुळे चैतन्यात हेच घडते. शरीराला - मनाला झालेल्या संवेदनांचे प्रतिबिंब आपल्या चैतन्यात उमटते. त्या पारदर्शक स्फटिकाच्या गोळ्यात कोठलाही रंग उतरलेला नाही. तो तसाच पारदर्शक आहे. मात्र केवळ लाल फुलाच्या सानिध्यामुळे तसे भासते. तसेच आपल्या शरीरातील चैतन्यात काहीही बदल झालेला नसतो, मात्र तसे भासते. मग आपण 'मला दु:ख झाले', 'मला आनंद झाला' अशी भाषा बोलू लागतो. केवळ भाषा नव्हे, आपल्याला तसेच वाटते. सानिध्यामुळे चैतन्याने हे 'रंग' धारण केले आहेत - चैतन्यात बदल झाला आहे असे भासते. उपाधीमुळे झालेला हा भ्रम आहे. पण चैतन्य 'निरामय' आहे, 'नि:संग' आहे.
'उपाधी' या संकल्पनेसारखीच 'अधिष्ठान' ही संकल्पना आपण पुढील भागात समजून घेऊ.
No comments:
Post a Comment