Saturday, March 20, 2021

असङ्गो अहम् | भाग ६ : विवर्त

 मागील लेखात आपण 'आधिष्ठान' या संकल्पनेसंबंधात जाणून घेतले.  या विश्वाला - माझ्या शरीराला-मनाला  माझ्या चैतन्याचे अधिष्ठान आहे हे आपल्याला समजले.  त्यामुळे विश्वात  घडणाऱ्या घटनांनी, माझ्या शरीराला मनाला होत असलेल्या संवेदनांमुळे माझ्यावर - माझ्या चैतन्यावर परिणाम होणार -  असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच आता आपण 'विवर्त' ही संकल्पना समजून घेत आहोत. 

'विवर्त' म्हणजे 'सत्याचे भिन्न पातळीवरील प्रकटीकरण'. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण चित्रपटाच्या पडद्याचे उदाहरण घेऊ.  चित्रपटात अनेक प्रसंग घडतात. नायिका-नायक नाच करतात, नायकाच्या दुष्ट लोकांबरोबर मारामाऱ्या होतात, आगी लागतात, भूकंप होतात. पण चित्रपटाचा पडदा या सर्व गोष्टींपासून 'असंग' असतो, 'निर्लेप' असतो. चित्रपटात आग लागल्याने तो जळत नाही, चित्रपटातील पावसाने तो ओला होत नाही. तो पडदा तेथेच असतो. यात  पडद्याचे प्रकटीकरण चित्रातील दृश्यात होते. पडद्याच्या ठिकाणी सुंदर दृश्ये, धरणीकंप, आग, पाऊस वगैरे प्रकट होतात. हे प्रकटीकरण निश्चित सत्य आहे. पडदाही सत्य आहे. पण ही दोन्ही सत्ये वेगळ्या पातळीवर आहेत. म्हणूनच आग, पाऊस, धरणीकंप वगैरे चित्रपटात घडणाऱ्या गोष्टींचा त्या पडद्यावर परिणाम होत नाही . चित्रपट हे त्या पडद्याचे 'विवर्त' आहे.  

आपल्याला अंधाऱ्या जागी असलेला दोर सापासारखा भासतो. तेव्हा तो दोर आणि साप हे दोन्ही सत्य असतात. पण त्या दोन्हीच्या सत्याची पातळी वेगळी असते. त्या दोराचे प्रकटीकरण सापात होत असते.  साप हा दोराचा 'विवर्त' असतो. जेव्हा वाळवंटात मृगजळ दिसते तेव्हा ते मृगजळ सत्य असते - आपल्या डोळ्यांना ते दिसत असते. पण त्या सत्याची पातळी वेगळी असते. त्याला आपण आपल्या भाषेत 'भासमान' म्हणू, पण ते सत्यच असते. वाळवंटाचे विवर्त असते. वाळवंटाचे विवर्त असलेले मृगजळ त्याचे अधिष्ठान असलेल्या वाळवंटातील वाळूचा एक कणही ओला करू शकत नाही. कारण विवर्त आणि आधिष्ठान हे सत्याच्या एका पातळीवर नाहीत. 

चित्रपट हा त्या पडद्याचा विवर्त आहे, तो पडदा 'असंग' आहे म्हणूनच त्या पडद्यावर तो चित्रपट दाखविता येतो. चित्रपटातील आगीने तो पडदा जळला असता तर अनावस्था प्रसंग आला असता. जर त्या पडद्याला अमिताभ बच्चन आवडला म्हणून त्याने अमिताभच्या प्रतिमेला पकडून ठेवले असते तर तो चित्रपट पुढेच जाऊ शकला नसता.  चित्रपटातील खलनायकाची गुंडगिरी आवडली नाही म्हणून पडद्याने खलायकाला पडद्यावर दाखवायचेच नाही असे ठरविले असते तर चित्रपटाचे काय झाले असते? तो पडदा चित्रपटातील कोणताही प्रसंग दाखविण्यास सज्ज आहे, कोणताही प्रसंग दाखविण्यास त्याचा आक्षेप नाही आणि तरीही तो चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात पूर्णपणे 'असंग' आहे, 'निर्लेप' आहे. एवढेच नाही, जर त्या पडद्यावर कोणताच चित्रपट दाखविला जात नसेल तर त्या पडद्याला त्याचा खेद नाही. अशावेळी संपूर्ण कोरा असण्याचीही त्याला वैषम्य नाही.  

'विवर्त' हे सत्याचे भिन्न पातळीवरील प्रकटीकरण आहे. जेव्हा बीजाचे प्रकटीकरण रोपात होते तेव्हा ते सत्याचे एकाच पातळीवरील प्रकटीकरण असते. त्याला 'विवर्त' म्हणता येणार नाही. 

जेव्हा आपण एखादे स्वप्न बघतो तेव्हा ते स्वप्न पूर्णतः: सत्य असते. म्हणूनच आपण त्या स्वप्नात घाबरतो, आनंदित होतो. पण त्या स्वप्नाच्या सत्यतेची पातळी वेगळी असते. केवळ आपल्या मनाने आपल्यापुढे उभे केलेले ते सत्य असते. त्याचा  आपल्या सध्याच्या पातळीवरील जीवनाशी तसा संबंध नसतो. ते आपल्याच मनाचे 'विवर्त' असते. 

सत्याच्या या भिन्न पातळीवर - विवर्त पातळीवर - झालेल्या गोष्टींचा परिणाम मूळ आधिष्ठानावर होत नाही ही अद्वैत वेदान्तातील खूप महत्वाची संकल्पना आहे.  ही संकल्पना नीट समजावून घेऊन आपण पुढील लेखाची वाटचाल करणार आहोत. 

No comments:

Post a Comment