Wednesday, July 14, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १०

 आपण या लेखात विपश्यना ध्यानाच्या थोडे खोलात शिरू. 
विपश्यना ध्यानासाठी प्रथम एका पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून एक एक बोट करत सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा, पोटरी, गुढगा. मांड्या, पृष्ठभाग अशा क्रमाने त्या पायातील संवेदना बघाव्या. नंतर दुसरा पाय बघावा. अशाच क्रमाने डोक्याच्या वरच्या बिंदूपर्यंत (टाळू) संवेदना बघाव्या. शरीराचा एकही भाग सुटता काम नये. या संवेदना बघताना मनाची स्थिरता महत्वाची  आहे. एखादी संवेदना परत व्हावी अशी अपेक्षा करावे अथवा एखादी संवेदना होऊ नये अशी अपेक्षा करणे यामुळे एकाग्रता भंग पावेल. विपश्यना होणार नाही. 
सर्व शरीराच्या संवेदना जाणवू लागल्या की शरीराच्या आतील संवेदनांची नीट जाणीव घ्यावी. यासाठी शरीराला छेदून जाणारी पद्धत वापरावी. म्हणजे छातीपासून सुरु करून शरीराच्या आतून पाठीपर्यंत संवेदना अनुभवाव्यात. तोंडाच्या आत जिभेच्या टोकापासून सुरुवात करून जिभेच्या दुसऱ्या टोकापर्यंत (पडजीभ) जावे. नंतर वरील बाजूला असलेल्या सर्व दातांच्या संवेदना अनुभवाच्या. मग खालील सर्व दातांच्या. तसेच डोळे, कान इत्यादी अवयवांच्या संवेदना आतून अनुभवाव्या. आपल्याला या स्पर्शाच्या संवेदनेबरोबरच आवाज, गंध, चव इत्यादी संवेदनांवरही ध्यान करायचे आहे. 

जर विपश्यना सुरु असताना मन विचलित होत आहे असे जाणवले तर काही काळ प्राणधारणेकडे यावे आणि मन स्थिर झाले की परत विपश्यना सुरु करावी. 

विपश्यनेच्या प्रगती झाली की संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह जाणवू लागेल. संपूर्ण शरीरात एकाच प्रकारची सुखद संवेदना जाणवू लागेल. संपूर्ण शरीर एकाच प्रकारे कंपन पावते आहे असे जाणवू लागेल. आपल्या विपश्यना ध्यानाची या पातळीपर्यंत प्रगती झाली की कुंडलिनी ध्यानाला सुरुवात करायची आहे. 
काहींना हा खूपच दूरचा पल्ला वाटेल. पण आपण नित्य नियमाने रोज ध्यान करू लागलो तर काही महिन्यांत अथवा वर्षात हा पल्ला गाठणे कठीण नाही. येथे सातत्य महत्वाचे आहे. काही जण मागील जन्मात खूप साधना करून आलेले असतात. अशांची प्रगती एका विशिष्ट टप्प्यापर्यंत अत्यंत वेगाने होते. कारण त्यांनी हा टप्पा मागील जन्मात गाठलेला असतो. परंतु आपण कोठल्या टप्प्यावर आहोत हे ध्यानाला सुरुवात केल्यावरच कळू शकते. म्हणूनच ही साधना खूप जटील, दूरवरची वाटत असली तरी कदाचित आपण यात पूर्वजन्मीच प्रगती केलेली असेल. जरी या जन्मी आपण उद्दिष्टांपर्यंत पोचू शकलो नाही तरी पुढील जन्मी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. 

सातत्य आणि मनाची स्थिरता ही विपश्यना ध्यानात प्रगती करण्याची गुरुकिल्ली आहे. 

पुढील लेखात आपण कुंडलिनी ध्यानासंबंधी माहिती घेऊ. 

No comments:

Post a Comment