Monday, July 12, 2021

कुंडलिनी विद्या भाग ९

तुम्ही ध्यानाचा पहिला टप्प्यामध्ये म्हणजेच प्राणधारणेमध्ये गेल्या एका महिन्यात प्रगती केली असेल असे मी मानतो.  प्राणधारणेमुळे आपल्याला खूप शांतता अनुभवायला आली असेल. मनातील सतत चालणारे अनावश्यक  विचारांचे चक्र मंदावले असेल. शांत झोप लागत असेल. कौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणावर आणि अन्य लोकांसोबतच्या संबंधात सुधारणा झाली असेल. ध्यानाला सुरुवात केल्यावर ताबडतोब दिसून येणारे हे फायदे आहेत. अर्थात आपले मुख्य उद्दिष्ट अजून खूप पुढे आहे. आपल्याला अजून खूप मार्गक्रमणा करायची आहे. पण या प्रवासातला आनंद मनमुराद उपभोगायचा आहे. आपल्याला एक महिना प्राणधारणा करूनही  हे फायदे अनुभवाला येत नसतील तर प्राणाधारणा करताना आपली कोठेतरी चूक होते आहे हे निश्चित. अशा व्यक्तींनी माझ्याशी कॉमेंटमधून अथवा मेसेज बॉक्सतर्फे संपर्क साधावा. 

आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे निघालो आहोत. हा टप्पा विपश्यना ध्यानाचा आहे. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपण पहिल्या टप्प्यात आपल्या ध्यानाचा पाया मजबूत केला. कमकुवत असलेला पायाच खचला तर त्यावर अगदी भक्कम बांधलेली इमारतही कोसळते. म्हणून मजबूत पाया सर्वात महत्वाचा.  आता भिंती, छप्पर उभे करायचे आहे. वादळात छप्पर उडून जाता कामा नये. एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी भितींना तडे जात काम नयेत. कोठल्याही मानसिक वादळात अथवा मोठ्या मानसिक धक्क्यात आपण उन्मळून पडू नये असे आपले ध्यान असले पाहिजे. हेच काम विपश्यना करणार आहे. 

आपण या लेखात विपश्यना ध्यानचं विवेचनाचा सुरुवात करू. 'वास्तवाचा संपूर्ण स्वीकार' अशी ध्यानाची एक व्याख्या करता येईल. विपश्यना ध्यानात जाण्यासाठी आपले शरीर हे एक माध्यम म्हणून काम करते. आपल्या शरीराला पंचेंद्रियांद्वारे विविध संवेदना जावणतात, मनात विचार येतात. या सर्वांचा संपूर्ण स्वीकार म्हणजे विपश्यना ध्यान. 

विपश्यना ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी रोज किमान दहा मिनिटे प्राणधारणा  करावी. नंतर कोणत्याही एका पायापासून सुरुवात करावी. प्रथम पायाच्या अंगठ्याला  काय संवेदना मिळत आहेत ते पाहावे. कदाचित कसला स्पर्श जाणवत असेल, कदाचित काही वेदना जाणवत असेल अथवा अन्य काही संवेदना असेल. ही संवेदना नीट जाणून घ्या. मात्र या संवेदनेबद्दल नकार नको. म्हणजेच समाज वेदना असेल तर ती कधी जाईल या संबंधी विचार नको. जे आहे त्याचा स्वीकार करून दुसऱ्या बोटाकडे जावे. त्या पायाची सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा अशा क्रमाने संपूर्ण पायाच्या संवेदनांकडे बघावे. मग दुसऱ्या पायाच्या संवेदनांकडे बघावे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शरीराच्या संवेदना जाणून घ्याव्यात. एकही अवयव अथवा शरीराचा लहानात लहान भागही यापासून सुटता कामा नये. पायापासून डोक्यापर्यंत संवेदना जाणून झाल्यावर उलट्या क्रमाने डोक्यापासून पायापर्यंत संवेदना जाणून घ्याव्यात. नंतर परत पायापासून डोक्यापर्यंत अशाप्रकारे हे ध्यान रोज किमान एक तास करावे. 

या सर्व ध्यानात मनाची स्थिरता महत्वाची आहे. कोणत्याही संवेदनेबद्दल अभिलाषा (ही संवेदना मला सारखी होत राहो) अथवा द्वेष (ही संवेदना कधी जाईल) नको. विपश्यनेबद्दल अधिक जाणून घेऊ पुढील लेखात. 

No comments:

Post a Comment