एका लहानश्या मध्यंतरानंतर आपण परत या लेखमालेला सुरुवात करत आहोत.
आपण सगळ्यांनी प्राणधारणेला सुरुवात केली असेल. प्राणधारणा हा कोठल्याही ध्यानप्रकाराचा पाया आहे. रोज एक तास किमान एक महिना प्राणाधारणा केल्याशिवाय पुढील टप्प्याला सुरुवात करू नका. कुंडलिनी ध्यान हे शरीर-मन यात संवाद निर्माण करते. आपली चेतासंस्था (Nerves System) जागृत करते. म्हणूनच हे ध्यान करताना अत्यंत सावकाश टप्प्याटप्प्याने पुढे जायचे आहे. घाई केलीत तर शरीर-मनाला इजा होऊ शकते.
प्राणधारणा हा पाया पुरेसा भक्कम झाल्यावर आपल्याला त्यावर बांधकामाला सुरुवात करायची आहे. बांधकाम क्षेत्रात असलेल्यांना माहीत असेल, घराच्या बांधकामाचे तीन प्रमुख टप्पे असतात. पाया हा पहिला टप्पा , भिंतीच्या-छत वगैरेचे बांधकाम हा दुसरा टप्पा आणि फरशा बसविणे, प्लम्बिंग-वायरिंग, रंगरंगोटी आणि बाकीची सजावट हा झाला तिसरा टप्पा. तसेच या कुंडलिनी ध्यानातही तीन प्रमुख टप्पे आहेत. दुसरा टप्पा हा 'विपश्यना ध्यानाचा' आहे. विपश्यना ध्यानाची पद्धत अत्यंत प्राचीन आहे. वेदांत तिचे उल्लेख आहेत. परंतु विपश्यना ही गुरूच्या सानिध्यातच शिकविली जात असल्याने तिचे विस्तृत वर्णन वेदात नाही. गौतम बुद्धाने अत्यंत परिश्रमाने या विद्येच्या बारकाव्यांचा शोध घेतला आणि सामान्य लोकांना ती शिकविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यासक्रम तयार केला. गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत (http://www.dhamma.org) विपश्यना विद्या या गौतम बुद्धाने आखून दिलेल्या पद्धतीने शिकविली जाते. मी ही गोएंका गुरुजींच्या विपश्यना केंद्रात प्रत्येकी दहा दिवसांची नऊ शिबीरे केली आहेत. आजवर मी कोणालाही विपश्यना शिकविण्याचे टाळत होतो. कारण हा विषय त्या शिबीरातच चांगला शिकविला जातो आणि समजतो असे .मला वाटते. पण सध्याच्या करोनाच्या संकटात शिबिरांत जाऊन ही विद्या शिकणे कठीण आहे. तसेच अनेकांना लॉकडाउन काळात मानसिक अस्थैर्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यांना ताबडतोब मदतीची गरज आहे. म्हणून मी हा विषय इंटरनेट माध्यमातून शिकवायला घेतला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जमेल तेव्हा या शिबिरांत जाऊन यावे असे मी सुचवेन.
यानंतर तिसरा टप्पा हा घराच्या सुशोभीकरणाचा म्हणजेच कुंडलिनी ध्यानाचा असेल.
No comments:
Post a Comment