मागील लेखात आपण पहिल्या तीन चक्रांवर (मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर) ध्यान कसे करायचे याची माहिती घेतली. आता पुढील चक्रांकडे वळू.
खालील तीन चक्रे म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ही आपल्या या जीवनातील गोष्टींशी संबंधीत आहेत. तर वरील तीन चक्रे म्हणजे विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार ही चक्रे दैवी गोष्टींशी संबंधित आहेत. अनाहत चक्र हे यामधील दोहोंचा सांधा जुळविणारे चक्र आहे. या दृष्टीने अनाहत चक्राचे महत्व आहे. प्राणाधारणा करताना आपण श्वासाचा उपयोग करतो हे आपल्याला माहीत आहेच.
मणिपूर चक्राच्यावर हुदयाच्या पातळीत पाठीच्या कण्यात अनाहत चक्र आहे. या चक्रातून अनाहत नाद (कोठल्याही आघाताशिवाय निर्माण झालेला नाद) ऐकू येतो . हा नाद अत्यंत मधुर असा जाणवतो. हा नाद विश्वनिर्मितीचा नाद आहे असे मानतात. ख्रिश्चनिटी आणि सुफीझममध्येही या दैवी नादाला खूप महत्व दिलेले आहे. हे चक्र वायू या पंचमहाभूतांशी जोडले गेलेले आहे. दहा प्रकारचे जे वायू (प्राण, अप्पन, समन इत्यादी) आपल्या आयुर्वेदात सांगितले आहेत ते या चक्राशी संबंधित आहेत. हे वायू आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा दर्शवितात. आपल्या भाव-भावना या वायूंवर अवलंबून असतात. हे चक्र आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टींची पारख करण्याची शक्ती देते. म्हणजेच आपला विवेक जागृत करते. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमची नीतिमूल्ये निश्चित करते. ही नीतिमूल्येच तुम्ही आता वरील चक्रांचे भेदन करण्यास योग्य झालात का हे ठरविते आणि तशा तुम्हाला सूचना देते. ममता या चक्राशी संबंधित आहे. आसपासचा निसर्ग आणि आपण एकाच असल्याची भावना हे चक्र भेदन केल्यावर निर्माण होते. हे चक्र आपल्या रोगप्रतिकार शक्तीशीही संबंधित आहे. या चक्राची व्याप्ती छातीपासून गळ्यापर्यंत आहे. या चक्रावर ध्यान करताना फुफ्फुसातील हालचाल स्पष्ट जाणवली पाहिजे. तसेच हृदयाची स्पंदने स्पष्टपणे कळली पाहिजेत. फुफ्फुसे आणि हृदय यांच्यातील संवेदना स्पष्ट कळल्यावर हृदयाच्या पातळीवर मणक्यात ध्यान करावे. अनाहत चक्र हे ऐहिक आणि दैवी चक्रांच्या मध्ये आहे. आपण या चक्राचा भेद केला की आपल्याला दैवी चक्रांचा भेद करत पुढे जायचे की पुनश्च ऐहिक चक्रांत जायचे हे ठरविण्याची एक संधी मिळते. काहीजण पुनश्च ऐहिक चक्रांत जाण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्तींना ऐहिक सुख भरपूर मिळते आणि ते त्यातच समाधानी असतात.
अनाहत चक्राच्या वर घशात विशुद्ध चक्र आहे. पंचमहाभूतांशी संबंधित असे हे शेवटचे चक्र. हे चक्र थायरॉईड ग्रंथीशी संबंधित आहे. थायरॉईड ग्रंथीचा आपल्या शरीरावर आणि मनावर किती मोठा परिणाम होतो हे आधुनिक विज्ञानही जाणते. पाठीच्या मणक्याचा शेवट जेथे होतो तेथे हे चक्र आहे. या दृष्टीने या चक्राचे महत्व आहे. या चक्रावर ध्यान केले असता गळ्यातून मेंदूत जाणाऱ्या रक्तप्रवाहाची स्पष्ट जाणीव होते. हे चक्र भेदण्याचा आणखी एक मार्ग आहे. जिभेच्या टोकाच्या संवेदना घेऊन हळू हळू जिभेच्या मागच्या टोकापर्यंत (पडजीभ) गेले की हे मागचे टोक घशाला चिकटलेले असते तेथपर्यंत संवेदना मिळविता येतात. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित असल्याने ते भेदले गेले की असीम शांततेचा अनुभव येतो. हे चक्र भेदले गेल्यावर आपले मन स्वार्थापासून मुक्त होते, विशाल होते, विशुद्ध होते. त्यामुळे मनाच्या अनेक आजवर अज्ञात राहिलेल्या शक्ती मोकळ्या होतात. हे चक्र आपल्या मेंदूला चालना देऊन बुद्धी तीक्ष्ण बनविते. हे चक्र अत्यंत शक्तिशाली असल्याने तसेच ते विशुद्ध स्वरूपात असल्याने ते पांढरा हत्ती (ऐरावत) या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. (मूलाधार चक्र हे काळ्या हत्तीच्या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. ही हत्तीद्वारे दर्शविलेली प्रचंड ऊर्जा आता शुद्ध स्वरूपात उपलब्ध झाली आहे हा त्याचा अर्थ आहे.) हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित आहे. आकाश तत्व हे सर्वात सूक्ष्म तत्व आहे. ते तत्व वाणीशी संबंधित आहे. ऐकणे आणि आवाज काढणे या दोन्ही क्रियांशी संबंधित आहे. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यावर आवाज मृदू बनतो, आवाजात एक प्रकारची संमोहन शक्ती येते. हे चक्र भेदले गेल्यास निरनिराळे हार्मोन्स स्रवण्यात झालेल्या बदलामुळे दाढीमिशांचे आणि अंगावरील केस झपाट्याने वाढू लागल्याचाही अनुभव येतो. (हिमालयात काही व्यक्तिंना अंगावर भरपूर केस असलेले साधू भेटल्याचे आपण कधीकधी वाचतो.) अनाहत चक्र भेदले गेल्यावर आनंदाचा झरा आपल्या मनात वाहू लागतो. आपल्याला समाजासाठी काही कार्य करण्याची प्रेरणा मिळते. मणिपूर अथवा स्वाधिष्ठान चक्रातूनही कार्याची प्रेम मिळते. पण ही स्वाधिष्ठान चक्रातून मिळणारी प्रेरणा ही संपूर्ण स्वार्थविरहीत असते. या एकाच गोष्टीवरून आपण एखाद्याचे विशुद्ध चक्र भेदले गेले आहे काय याचा अंदाज बांधू शकतो. हे चक्र भेदले गेल्यावरच माणूस परमेश्वरापुढे संपूर्ण नतमस्तक होऊ शकतो. हे चक्र अनेक सिद्धींचे माहेरघर आहे. अर्थात सिद्धीच्या मागे लागून कधीही साधना करता येत नाही. हे चक्र ध्वनीशी संबंधित असल्याने बीजमंत्राच्या (हं) उच्चारणाचा हे चक्र भेदण्यास खूप उपयोग होतो.
पुढील दोन चक्रांसंबंधी जाणून घेऊ पुढील लेखात.
No comments:
Post a Comment