आता आपण या लेखमालेच्या तिसऱ्या टप्प्याला - कुंडलिनी ध्यानाला - सुरुवात करीत आहोत. यापूर्वी अनेक गुरूंनी आधीचे पूर्वतयारीचे दोन टप्पे गृहीत धरून हे कुंडलिनी ध्यान शिकविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कुंडलिनी ध्यान हे काहीतरी गहन आणि कठीण गोष्ट आहे अशी कल्पना जनमानसात रूढ झाली आहे. खरे तर पहिले दोन टप्पे मनापासून घाई न करता पार केले तर हा तिसरा टप्पा खूपच सोपा आहे. आपल्या हे लक्षात आले असेल की पहिले दोन टप्पे आत्मसात करणे फार कठीण नाही. त्यातील प्रत्येक टप्पा हा समजण्यास सोपा आहे. मात्र संयम हवा, येथे घाई अजिबात चालणार नाही.
आधी सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी ध्यानात काही चक्रांची संकल्पना केलेली आहे. ही चक्रे म्हणजे प्रत्यक्षातली चक्रे नसून आपले महत्वाचे चेतातंतू पाठीच्या मणक्यातून जेथून निघतात त्या जागा. हे चेतातंतू शरीराच्या काही महत्वाच्या अवयवांत जातात. तसेच त्यांचे दुसरे टोक मेंदूमध्ये जाते. हे दुसरे टोक मेंदूत जेथे जाते तेथे आपल्या मनाच्या काही घडामोडींवर नियंत्रण करणारी केंद्रे असतात. त्यामुळे या चक्रांवर ध्यान केले असता त्या विशिष्ट अवयवांवर तसेच मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. मात्र आपण प्रत्यक्ष चेतातंतूंना कार्यक्षम करीत असल्याने हे ध्यान शांतपणे करावे लागते. घाईघाईत केल्यास वाईट परिणामही होऊ शकतो.
कुंडलिनी शास्त्रानुसार आपल्या शरीरात अशी अनेक चक्रे कल्पिलेली आहेत. मात्र यातील सात चक्रे महत्वाची आहेत. ही चक्रे खालपासून डोक्यापर्यंत क्रमाक्रमाने भेदत जायचे आहे. हा क्रमही महत्वाचा आहे. प्रत्येक चक्र भेदले जाताना आपल्या काही आंतरिक शक्ती/सिद्धी जागृत होतानाही कदाचित जाणवतील. सिद्धी प्राप्त झाल्याचे लक्षात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याची वाच्यता कोणाकडेही न करणेच इष्ट. मग सिद्धींचे प्रदर्शन ही तर खूप दूरची गोष्ट झाली. या सिद्धी म्हणजे तपोभंग करणाऱ्या अप्सरांसारख्या मानल्या गेल्या आहेत. या सिद्धींमध्ये आपण गुंतून पडलो तर पुढील साधनेत खंड पडतो. आपला अहंकार जागृत होऊन आपण साधनेतून भ्रष्ट होऊ शकतो. आपली नजर आपल्या अंतिम उद्दिष्टावर असली पाहिजे.
कुंडलिनी ध्यानासंबंधी आणखी काही जाणून घेऊ पुढील लेखात.
No comments:
Post a Comment