Monday, July 26, 2021

चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य दरबार

 Siddhling Bukka यांच्या फेसबुक वॉल वरून साभार


आजवरच्या इतिहासात अकबर महान शासक होता म्हणून त्याला एक उच्च दर्जाचा मोगल सम्राट म्हणून इतिहासात स्थान दिले गेले आहे.तो महान होता की त्याला महान बनवलं गेलं हा एक इतिहासाचा भाग असू शकतो.त्याला महान बनवण्यासाठी त्यांने स्थापन केलेल्या "दिन ए ईलाही" या त्याकाळी अकबराने स्थापन केलेल्या पंथाची खूप चर्चा होते पण आज त्या पंथाची शिकवण घेऊन कोण अनुसरण करतो हे पाहणेच एक औचित्याचा ऐतिहासिक मुद्दा ठरु शकतो.अकबराच्या नवरत्नांनी पूर्ण इतिहास भरला गेला आहे, परंतु शालेय पाठ्यपुस्तकांत महाराजा विक्रमादित्यच्या नवरत्नांची चर्चा कोठेच होत नाही.

सत्य हे आहे की अकबर महान असल्याचे सिद्ध करण्यासाठी इतिहासात काही बुध्दीजीवी पत्रकार कम इतिहासकारांनी असे लिहिले होते की अकबरनेही महाराजा विक्रमादित्यचे अनुकरण करून नऊ रत्न ठेवले होते.पण हे सांगताना कोठेही चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांचं नाव कुठेही मुखपृष्ठावर येवू नये इतकी मात्र दक्षता घेतली गेली आहे...
महान चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य यांच्या दरबारातील ही नवरत्न कोण होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला तर त्यांची नावे आजही इतिहासाच्या एका मळक्या पण तेजस्वी पानावर नक्कीच आढळतील.
राजा विक्रमादित्यच्या दरबारात नवरत्नांबद्दल बरेच काही वाचले आणि पाहिलेले आहे.पण हे नवरत्न कोण होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.
राजा विक्रमादित्यच्या दरबारात असलेल्या नवरत्नांमध्ये कवी, विद्वान, गायक आणि गणिताचे महान अभ्यासक समाविष्ट होते, ज्यांची किर्ती त्याकाळी पूर्ण जगात चर्चिली जायची‌.चला कोण आहे ते जाणून घेऊया.....

१) धन्वंतरी.....
त्यांचे स्थान नवरत्नांमध्ये गणले गेले आहे. त्यांनी लिहिलेली नऊ पुस्तके आहेत.ही सर्व पुस्तके आयुर्वेद,वैद्यकीय विज्ञान याच्याशी संबंधित आहेत.ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महान शल्यचिकित्सकाबरोबर एक विद्वान होते.आजही जर एखाद्या डॉक्टरची स्तुती करायची असेल तर त्याची तुलना 'धन्वंतरी' अशी केली जाते.
२) क्षपणक.....
ह्यांच्या नावाप्रमाणेच हे एक बौद्ध भिक्षू होते.यांचे असलेले दरबारातील स्थान लक्षात घेता एक गोष्ट आजही सिद्ध होते की प्राचीन काळात मंत्रीपद हे उपजीविकेचे साधन नव्हते, तर जनकल्याणाच्या भावनेने मंत्री परिषद स्थापन केली गेली होती. हेच कारण आहे की त्याकाळात एक साधा संन्यासी देखील मंत्रिमंडळातील सदस्य होते.त्यांनी काही ग्रंथ लिहिले ज्यात केवळ 'भिक्षाटन' आणि 'नानार्थकोश' उपलब्ध आजही उपलब्ध आहेत.
३) अमरसिंह.....
हे एक महान विद्वान होते.बोधगया येथील सध्याच्या बुद्ध विहारात मिळालेल्या शिलालेखाच्या आधारे त्यांनी ते विहार निर्माण केले होते.त्यांच्या अनेक ग्रंथापैकी 'अमरकोश' हा एकमेव ग्रंथच त्यांचे असलेले श्रेष्ठत्व सिद्ध करते. संस्कृत पंडितांच्या मते 'अष्टाध्यायी' हा ग्रंथ जर पंडितांची आई आहे तर 'अमरकोश' हा ग्रंथ पंडितांचा जनक किंवा पिता आहे.म्हणजेच, जर कोणीही या दोन ग्रंथांचे वाचन पठन मनन केलं तर तो महान संस्कृत विद्वान होऊ शकतो.
४) शंखु......
यांनी लिहिलेल्या 'भुवनाभूडयम' हा त्यांचा एकमेव काव्य मजकूर खूप प्रसिद्ध आहे. पण आजही ते काव्य पुरातत्व शास्त्राचा एक विषय बनलेले आहे.त्यांचा उल्लेख संस्कृतचे एक महान अभ्यासक केला जातो.
५) वेताळभट्ट........
विक्रम आणि वेताळची गोष्ट तर आज खूप जगप्रसिद्ध आहे.त्या 'वेताळ पंचविशी' किंवा 'सिंहासन बत्तीशी' चे हेच जन्मदाते होते. पण आज त्यांचे नाव कुठेही ऐकायला मिळत नाही.सम्राट विक्रमादित्य यांच्या नेतृत्वाचा वेताळभट्ट यांच्यावर किती मोठा पगडा होता हे लक्षात येईल. त्यांनी लिहून अजरामर केलेला 'वेताळ-पचिसी' किंवा 'सिंहासन बत्तीशी' ही एकच आवृत्ती आज आपणाला पहायला मिळते.
६) घटखर्पर......
ज्यांना संस्कृत समजतं त्या व्यक्तीला सहज समजू शकते की 'घटखर्पर' हे एखाद्या व्यक्तीचे नाव असूच शकत नाही.हे त्यांचे खरे नाव देखील नाही.अशी मान्यता आहे की त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की जी कुणीही व्यक्ती किंवा कवी त्यांना अनुप्रास आणि यमक या कवितेच्या प्रकारात हरवू शकेल किंवा पराभूत करेल, त्यांच्या घरी तुटलेल्या खापरीने घटखर्पर आजीवन पाणी भरायला राहतील. पण त्यांची प्रतिज्ञा आजन्म तशीच राहिली म्हणजे त्यांना कुणीही पराभूत करुन शकले नाहीत. तेव्हापासून त्यांचे नाव 'घटखर्पर' प्रसिद्ध झाले आणि मूळ नाव नाहीसे झाले.
'घटखर्पर काव्यम' असे त्यांच्या रचनेचे नाव आहे. हे काव्य यमक व अनुप्रास यावरचे एक अतुलनीय ग्रंथसंपदा म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांचा आणखी एक ग्रंथ 'नितीसार' या नावाने ओळखला जातो.
७) कालिदास.......
यांचं नाव पूर्ण भारतात कुणी ऐकलं नसेल असं होवूच शकत नाही.असे मानले जाते की कालिदास सम्राट विक्रमादित्यचे लाडके कवी होते. राजा विक्रमादित्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचेच उज्ज्वल रूप त्यांनी आपल्या ग्रंथातही चित्रित केले आहे. कालिदास यांच्यावर देवी सरस्वती कृपावंत होती असेच म्हणावे लागेल. त्यांच्या सारखा रचनाकार या भारतभूमी वर परत कुणी झाला नाही. त्यांची चार काव्य आणि तीन नाटकं प्रसिद्ध आहेत. अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्निमगत्र, विक्रमोवर्शीय ही तीन नाटके आणि ऋतूसंहार, मेघदूत रघूवंश, कुमारसंभवम् हे त्यांचे काव्य आजही श्रेष्ठ आहे
८) वराहमिहिर.....
भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार यांचे स्थान आजही श्रेष्ठ आहे त्यांनी अनेक ग्रंथसंपदा लिहिली आहे. त्यापैकी - 'बृहज्जातक', 'सूर्यसिद्धांत', 'बृहस्पति संहिता', 'पंचसिद्धांत' हे मुख्य आहेत. 'गणक तरंगिणी', 'लागू-जातक', 'समस संहिता', 'विवाह पटल', 'योग यात्रा' इत्यादी ग्रंथाचा उल्लेख केला जातो.
त्यांचीच रचना असलेली दिल्ली येथील मेहरोली या भागातील सूर्यघड्याळ आणि इतर भौगोलिक रचना तसेच दिल्लीतील प्रसिद्ध जंतर मंतर हे त्यांच्याच काळात बांधण्यात आले आहे.
९) वररूची.......
महाकवी कालिदास यांच्याप्रमाणे वररुची यांचीही गणना एक श्रेष्ठ कवींमध्ये केली जाते.त्यांनी लिहिलेल्या 'सदुक्तिकर्णामृत', 'सुभाषितावली' आणि 'शारंगधर संहिता' ही त्यांची रचना म्हणून गणली जाते.
पण त्यांच्या नावावर मतभेद आहेत. कारण या नावाने तीन व्यक्ती इतिहासात प्रसिद्ध आहेत, त्यापैकी-
१. पाणिनी या व्याकरणावर आधारित ग्रंथाचे लेखक - वारुची कात्यायन,
२. प्राकृत प्रकाश या ग्रंथांचे रचनाकार - वररुची
३. सूक्त या ग्रंथांचे रचनाकार- वररुची
असा हा भारतवर्षातील एक महान योध्दा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांचा दरबार....

No comments:

Post a Comment