Wednesday, January 19, 2022

समांतर विश्वे तर्क आणि संभावना : भाग १० लेखक जयेश चाचड

स्ट्रिंग थिअरीच्या पाच वेगवेगळ्या आवृत्यांमधून सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांचे एकीकरण शक्य होत होते तसेच गुरुत्वाकर्षणाला इतर तीन मूलभूत बलांसोबत जोडता येत होते. एडवर्ड विटनने या पाच आवृत्यांचे एकीकरण करून १९९५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल स्ट्रिंग थिअरी कॉन्फरन्स मध्ये आपले संशोधन मांडले. "एम थिअरी" ची ही सुरवात होती. पुढे पॉल स्टाईनहार्डट, नील युरेक, जस्टीन खोवरी, बर्ट ओव्हर्ट यांनी स्ट्रिंग थिअरीत संशोधन करून ब्रेनवर्ल्ड थिअरी मांडली.

जसे एकमितीय स्ट्रिंग किंवा तंतू हा एकामितीचा लहान भाग असतो तसेच इतर बहुमित्त्यांमध्ये किंवा हायपरस्पेस मध्ये स्ट्रिंगसारखेच भाग असू शकतात. या भागांना ब्रेन असे नाव दिले गेले. उदा. एकमिती मध्ये स्ट्रिंग, द्विमिती मध्ये टू-ब्रेन (चौकोन किंवा आयत सदृश्य), त्रिमितीय थ्री-ब्रेन (गोल किंवा घनाकृती सदृश्य). आपण अवकाशाच्या त्रिमितीय विश्वात रहातो, त्यामुळे त्रिमितीपेक्षा जास्त मित्यांची कल्पना करणे आपल्याला कठीण जाते. त्रिमितीमध्ये आपण द्विमिती आकार सहज काढू शकतो त्याप्रमाणेच जर हायपरस्पेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन्स असतील तर ? ही संकल्पना समजवून घेण्यासाठी ब्रेडच्या पॅकेटची कल्पना करा. ब्रेड जरी त्रिमितीय असला तरी आपल्या आकलनासाठी ब्रेडला रुंदी नसून तो द्विमितीय आहे अशी कल्पना करा. जसे ब्रेडच्या पॅकेट मध्ये एकावर एक ब्रेड ठेवले असतात तसेच हायपरस्पेस मध्ये वेगवेगळे ब्रेन्स असतील आणि प्रत्येक ब्रेन म्हणजे एक स्वतंत्र विश्व असेल अशी साधारणपणे ब्रेनवर्ल्ड थिअरी मागची संकल्पना आहे.
ही ब्रेन्स आपल्या ब्रेन पासून काही मिलिमीटर अंतरावर असण्याची शक्यता आहे तरीही आपण त्यांना का पाहू शकत नाही ? स्ट्रिंग थिअरी याचे उत्तर देते. स्ट्रिंग मुखत्वे दोन प्रकारच्या असतात, लूप आणि स्निपेट या प्रकारच्या. गुरुत्वाकर्षण सोडून इतर तीन बलांच्या मूलकणांचे म्हणजेच फोटॉन, ग्लुऑन, डब्लू आणि झेड बोसॉन यांचा स्पिन १ आहे. गुरुत्वाकर्षणाच्या मूलकणाचा म्हणजेच ग्रॅव्हीटॉनचा स्पिन मात्र २ मानण्यात येतो, इथेच खरी मेख आहे. गुरुत्वाकर्षण सोडून इतर तीन बलांच्या मूलकणांचा स्पिन एक असल्यामुळे ते स्निपेट या प्रकारच्या स्ट्रिंगने बनलेले असावेत तर ग्रॅव्हीटॉन मात्र लूप स्ट्रिंग पासून बनलेला असावा. स्निपेट स्ट्रिंगची दोन्ही टोके त्रिमितीय ब्रेन मध्ये अडकली असल्यामुळे या ब्रेन बाहेरील हायपरस्पेस मध्ये त्यांना जाता येत नाही. या समांतर ब्रेन मधील प्रकाश अर्थात फोटॉन आपल्या विश्वात येऊ शकत नाहीत कारण ज्या स्निपेट स्ट्रिंगने ते बनलेले आहेत ते स्ट्रिंग त्या विश्वाच्या ब्रेन मध्ये बद्ध आहेत. ग्रॅव्हीटॉनचे मात्र तसे नाही. लूप स्ट्रिंग असल्यामुळे त्याची टोके ब्रेन मध्ये बद्ध नाहीत, त्यामुळे ग्रॅव्हीटॉन मात्र वेगवेगळ्या ब्रेन मध्ये प्रवास करू शकतो. गुरुत्वाकर्षण हे इतर तीन बलांच्या तुलनेत आपल्याला कमजोर जाणवते ते यामुळेच. सूक्ष्म स्तरावरील बहुमिती मुळे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी होतो. इतर विश्वातून येणारे गुरुत्वाकर्षणाचे लूप स्ट्रिंग आपल्या विश्वात मात्र डार्क एनर्जीचा आभास निर्माण करू शकतात. आपल्या विश्वाच्या प्रसरणाच्या वाढत्या वेगाला कदाचित हे दुसऱ्या समांतर विश्वातून येणारे गुरुत्वाकर्षणा चे लूप स्ट्रिंग कारणीभूत असावेत. हे लूप स्ट्रिंग आकर्षण बल निर्माण न करता अपकर्षण बल निर्माण करत असावेत. सध्यातरी हे सर्व प्रयोगाने सिद्ध करण्यासाठी आपले तंत्रज्ञान खूपच मागासलेले आहे. यासाठी आपल्याला LHC पेक्षा कित्येक पटीने अधिक शक्तिशाली मूलकण त्वरकाची गरज भासेल.
हायपरस्पेस मधील दोन किंवा अधिक ब्रेन्स एकत्र येऊन एकमेकांना धडकले तर बिग बँग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नवीन ब्रेनची अर्थात नवीन विश्वाची निर्मिती संभव आहे. या वेगवेगळ्या ब्रेन मध्ये वेगवेगळा काळ असल्यामुळे यांच्या एकत्रित येण्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन विश्वाचा नवीन काळ असेल आणि आधीच्या विश्वातील काळाचा या नवीन काळावर काहीच परिणाम होणार नाही.
एम थिअरी आणि ब्रेनवर्ल्ड थिअरीतून व्यक्त होत असणाऱ्या समांतर विश्वाच्या संकल्पना मति गुंग करणाऱ्या आहेत असे तुम्हाला वाटत असेल पण अजून काही धक्के पचवण्याची तयारी ठेवा. कृष्णविवराच्या अध्ययनातून त्याहून विलक्षण अश्या समांतर विश्वाच्या संकल्पना व्यक्त होतात. याबद्दल सविस्तर विवेंचन पुढच्या भागात...
क्रमशः

No comments:

Post a Comment