Wednesday, January 19, 2022

समांतर विश्वे तर्क आणि संभावना : भाग ६ लेखक जयेश चाचड

 समांतर विश्वाचा विचार करताना विविध वैज्ञानिक पर्यायांचाही विचार करावा लागतो. अँटी मॅटर किंवा प्रति पदार्थांच्या शोधामुळे समांतर विश्वाच्या बाबतीत एक वेगळा पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे प्रति विश्व किंवा अँटी मॅटरचे प्राबल्य असलेल्या विश्वाचा.

आपण ज्या विश्वात राहतो त्यातील दृश्य घटक मुखत्वे मॅटर किंवा पदार्थांपासून बनलेले आढळतात. पदार्थ हे अणूंपासून बनलेले असतात तर अणू हे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या कणांपासून बनलेले असतात. यात प्रोटॉन वर धन विद्युतभार तर इलेक्ट्रॉन वर ऋण विद्युतभार असतो आणि न्यूट्रॉन उदासीन असतो. पण १९३० दशकात शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की प्रत्येक कणाला त्याचा जुळा असा एक प्रतीकण असतो. लवकरच इलेक्ट्रॉनचा जुळा कण अँटी इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले. पॉझिट्रॉन इतर सर्व बाबतीत इलेक्ट्रॉन सारखाच असतो फक्त त्यावर धन विद्युतभार असतो. प्रोटॉनचा ही जुळा भाऊ अँटी प्रोटॉन प्रोटॉन सारखा असून त्यावर ऋण विद्युतभार असतो. न्यूट्रॉन चा प्रतिकण अँटी न्यूट्रॉन वर जरी कोणताही विद्युतभार नसला तरी त्याची जडण घडण वेगळीअसते. न्यूट्रॉन साधारण पणे एक अप क्वार्क आणि दोन डाऊन क्वार्कने बनलेला असतो तर अँटी न्यूट्रॉन हा एक अँटी अप क्वार्क आणि दोन अँटी डाऊन क्वार्कने बनलेला असतो त्यामुळे दोघांची जडणघडण वेगळी असते.
बिग बँगच्या वेळी मॅटर आणि अँटी मॅटर या दोघांची निर्मिती झाली असावी तरी आज आपल्याला सर्वत्र मॅटरच दिसते असे का ? अँटी मॅटर साधारणपणे सर्न आणि फर्मीलॅब येथील मूलकण त्वरकांमध्येच कृत्रिमरित्या आढळून येतात. शास्त्रज्ञांच्या मते बिग बँगच्या वेळी मॅटर आणि अँटी मॅटरच्या प्रमाणात असणारी तफावत याचे कारण असू शकते. विशिष्ट प्रकारे सममिती भंग झाल्याने मॅटरचे प्रमाण हे अँटी मॅटर पेक्षा जास्त असल्याने परस्परांनी एकमेकांना नष्ट करुनही मॅटरच्या जास्त प्रमाणामुळे पुढे ग्रह, तारे, दीर्घिका आणि पर्यायाने आपली निर्मिती ही मॅटर पासून झाली. पण जर काही प्रमाणात विश्वात अँटी मॅटर उरले असेल आणि त्यापासून तारे, ग्रह बनले असतील तर ? यासाठी २००६ मध्ये रशिया, जर्मनी, इटली आणि स्वीडन यांनी संयुक्त प्रयत्नातून वैश्विक किरणातील अँटी मॅटरचे प्रमाण शोधण्यासाठी पामेला (Payload for Antimatter-Mater Exploartion and Light - Nuclei Astrophysics) हा उपग्रह अवकाशात सोडला आहे.
या अनुषंगाने प्रश्न असा आहे आपल्या विश्वात जरी पदार्थाचे प्राबल्य असले तरी वेगळ्या प्रकारे सममिती भंग होऊन अँटी मॅटरचे प्राबल्य असलेले समांतर विश्व अस्तित्वात असेल का ? साधारणपणे अँटी मॅटर च्या कणांचा भार मॅटरच्या कणांच्या विरुद्ध असल्याने शास्त्रज्ञ अश्या विश्वाच्या संकल्पनेला सी रिव्हर्सड (चार्ज रिव्हर्सड) विश्व म्हणतात. या सी रिव्हर्सड सारखेच आपल्या आरश्यातील प्रतिमेसारखे पी रिव्हर्सड (पॅरिटी रिव्हर्सड) विश्वाची संकल्पनाही शास्त्रज्ञ मांडत आहेत. जसे आरश्यातील प्रतिमेत आपल्या डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल झालेली असते तशीच या पी रिव्हर्सड विश्वातील जीवांचीही झाली असेल अशी ही संकल्पना आहे (थोडक्यात या विश्वात डावखुऱ्या जीवांचे प्राबल्य असेल). गुरुत्वाकर्षणाचा कण ग्रॅव्हीटॉन आणि विद्युतचुंबकीय बलाचा कण फोटॉन यांचे अँटी पार्टीकल ते स्वतःच असल्याने विज्ञानाचे मूलभूत नियम सी रिव्हर्सड आणि पी रिव्हर्सड विश्वात साधारणपणे समान असतील.
हे कमी म्हणून काय की अजून एका विलक्षण सैद्धांतिक विश्वाच्या अस्तित्वाची संकल्पना शास्त्रज्ञ मांडत आहेत ती म्हणजे सीपीटी रिव्हर्सड (यात टी म्हणजे टाईम अर्थात काळ) या टाईम रिव्हर्सड विश्वात सर्वच गोष्टी विचित्र असतील. या विश्वात ताऱ्यांचा आधी मृत्यू होईल मग जन्म. कप आधी फुटेल आणि मग कपचे तुकडे एकत्र येऊन एकसंध कप तयार होईल..अर्थात अश्या विश्वात काळ हा उलट दिशेने प्रवाहित असेल.
सध्या तरी या संकल्पना किचकट गणिती स्वरुपात असून त्या पडताळून पहाण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही. भविष्यात वर्महोल द्वारे या संकल्पना पडताळून पहाण्याची संधी आपल्याला मिळेल का तेही आता निश्चित सांगता येत नाही, तरीही या संकल्पना मांडण्यामागे उच्च प्रतीचे गणित आहे, केवळ कल्पनाविलास म्हणून या संकल्पना मांडलेल्या नाहीत.
पुढील भागात अश्याच अजून काही भन्नाट संकल्पना आपण पहाणार आहोत.
क्रमशः

No comments:

Post a Comment