गेले काही दिवस आपण अद्वैत वेदांताची मांडणी बघत आहोत.
अद्वैत वेदांतानुसार सगळे विश्व (आणि अन्य विश्वे) सत्-चित्-आनंद स्वरूपी ब्रह्म आहे. विश्वाचे 'अधिष्ठान' ब्रह्म आहे. त्यावर मायेने 'नाम-रुपाचे' पांघरूण घातले आहे. पण या पांघरूणाआडूनही ब्रह्म डोकावत असते. आपण कधीही ते अनुभवू शकतो. हे आपण पाहीले. मात्र या ब्रह्माची जाणीव होण्यासाठी आपण जागृत हवे. मनाची जागरूकता कशी वाढवायची?
यासाठी दोन मार्ग आहेत. 'भक्तिमार्ग' आणि 'ध्यानमार्ग' . दोनपैकी कोठलाही मार्ग आपल्याला निवडता येतो. आपापल्या स्वभावानुसार आणि मागील जन्मातील वाटचालीनुसार हा मार्ग निवडायचा असतो. आपला मार्ग कुठला हे समजत नसेल तर सुरुवात दोन्ही मार्गांनी करावी. जो आपला मार्ग असेल त्यात प्रगती वेगाने होते. आपोआप आपल्याला आपला मार्ग कळतो.
यासाठी 'गुरु'ची आवश्यकता कितपत आहे? मला निश्चित सांगता येणार नाही. माझा प्रवास अंत:प्रेरणेने झाला. भगवान शिव हेच माझे या जन्मातील गुरु आहेत असे मी मानतो. माझ्या प्रवासात मला वेळोवेळी अनेक मार्गदर्शक भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रवास सुकर झाला. परंतु ते माझे गुरु नव्हेत. गुरूंसमोर संपूर्ण समर्पण करायचे असते. गुरु जे सांगेल ते मनात कोठेही किंतु न आणता करायचे असते. म्हणूनच केवळ भगवान शिव हेच माझे गुरु आहेत असे मी मानतो. जर गुरु निवडायचाच असेल तर फार काळजीपूर्वक निवडावा लागतो. अर्धाकच्चा गुरु असेल तर तो त्याच्या मार्गानेच जाण्याचा आग्रह धरण्याची शक्यता असते. आणि त्याचा मार्ग हा आपला मार्ग नसू शकतो.
अनेक वेळा भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्गाने बराच काळ प्रवास करूनही ब्रह्माची प्रचिती येत नाही, मन स्थिर होत नाही. याचे कारण म्हणजे मालिन चित्त. मालिन चित्त कधीही स्थिर होत नाही. चित्ताची मलिनता दूर करण्यासाठी गीतेत 'कर्मयोग' सांगितला आहे. पातंजल योगात 'यमनियम' सांगितले आहेत. तसेच बौद्ध आणि जैन धर्मातही उपाय सांगितले आहेत.
आपल्याला आपला योग्य मार्ग लवकर मिळावा आणि या जन्मातच ब्रह्मज्ञान व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ही मालिका येथेच संपवितो आहे.
लेखनसीमा.