Friday, November 24, 2023

माया

 

माया ही अद्वैत वेदांतातील महत्वाची संकल्पना. विश्व हे केवळ सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे असे हे दर्शन मानते. आपल्याला प्रतीत होणारे, आसपास आपण अनुभवतो ते सगळे 'माया' कसे असेल हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. म्हणूनच 'माया' हे सामान्य साधकांसाठी कायम एक गूढ राहिले आहे.

प्रथम हे लक्षात घेऊ की 'माया' ही ब्रह्मापासून वेगळी नाही. ती ब्रह्माची एक 'शक्ती' आहे. तिच्यात 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती सामावलेल्या आहेत. आवरणशक्ती सत्य गोष्टींवर पांघरूण घालते तर विक्षेप शक्ती आहे त्या गोष्टींना वेगळेच आहे असे भासविते. उदाहरणार्थ अंधारात एक दोर पडला आहे. आवरणशक्ती त्या दोराच्या खऱ्या स्वरूपावर आवरण घालते आणि विक्षेपशक्ती त्या दोराच्या जागी सर्प आहे असा आभास निर्माण करते. मात्र माया या दोराला संपूर्ण झाकू शकत नाही. आपल्याला भासणाऱ्या सर्पाची लांबी, जाडी, वेटोळे घालण्याची ढब इत्यादी त्या दोरापासूनच आलेले असते. मायेच्या आडून ब्रह्म असेच डोकावत असते. आपण जागरूक असू तर हे क्षणोक्षणी दिसणारे ब्रह्म ओळखू शकू. हाच मुक्तीकडे जाणारा मार्ग आहे.
आपण 'अधिष्ठान' या संकल्पनेचा विचार करताना पाहिले की मातीच्या घटाचे अधिष्ठान 'माती' आहे. हा घट फोडला तर केवळ माती शिल्लक राहील. त्या मातीपासून आपण अन्य वस्तू बनवू शकू. म्हणजेच तो घट हा केवळ मातीला दिलेले एक रूप आहे. त्या रुपाला आपण 'घट' हे नाव आपल्या सोयीसाठी दिले आहे. वस्तूत: ती केवळ माती आहे. या नावामुळे व्यवहारात या घटाचा उपयोग करणे आपल्याला सोयीचे होते.
समुद्रात लाटा उसळत असतात. प्रत्येक लाटेचे अधिष्ठान 'पाणी' आहे. लाटा या केवळ पाण्याला आलेले रूप आहे. त्याला 'लाट' हे नाव आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी दिले आहे. लाट किनाऱ्याला येऊन नष्ट होईल. त्यातील पाणी परत सागराला मिळेल. त्यातून नवी लाटही तयार होईल. तसेच दागिन्यांचे अधिष्ठान सोने आहे. एक दागिना मोडून आपलं दुसरा करू शकतो. तो दागिना हा केवळ सोन्याला दिलेले रूप आहे. आणि त्या रुपाला आपण 'बांगड्या', 'पाटल्या', 'हार' इत्यादी नावे आपल्या सोयीसाठी देतो.
अगदी अशाच पद्धतीने आपण पाहिले होते की या विश्वाचे अधिष्ठान 'सत्' म्हणजेच 'अस्तित्व' आहे, अर्थात ब्रह्म आहे. या अस्तित्वाला - आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या वस्तूंना-उर्जेला-शक्तींना मायेने काही रूप दिले आहे, त्या रुपाला आपण व्यवहारातील सोयीसाठी नावही दिले आहे. पण ते केवळ अस्तित्व आहे , ब्रह्म आहे. हेच सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्मावर मायेने घातलेले 'नाम-रूपाचे' पांघरूण'. आपण जागरूक असू तर क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तूतून आपल्याला अस्तीत्व म्हणजेच 'ब्रह्म' जाणवत असते. या जागरूकतेतूनच आपला मुक्तीचा प्रवास सुरु होतो. अशी अखंड जागरूकता म्हणजेच 'मुक्ती'.
नित्य व्यवहारात आपली जागरूकता वाढविण्यासाठी काय करावे लागेल, त्यात येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करायची हे पुढील लेखात पाहू.
संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment