Wednesday, October 23, 2024

महाघोरा

ll महाघोरा ll

दाणदाण पाऊले टाकत
ती चालत होती..
धरणी थरथरू लागली..
मोकळ्या सोडलेल्या केसांना
त्वेषाने आपटून तिने
गगनभेदी आरोळी ठोकली
गजचर्म ल्यालेली "कालरात्री"
गळ्यांत दैत्यमुंड अडकवून
विक्राळ हसत होती


त्वेषाच्या रक्तरंजित ज्वाळांनी
तिच्या हातातील खड्ग
अजूनही तळपत होते
मूळची हिमासम "गौरी" ती
काळीठिक्कर पडली होती
अवसेच्या कभिन्न रात्रीसारखी
डोळ्यांच्या प्रदीप्त चिता
लसलसत होत्या संतापाने
मुख रक्ताने माखलेले ..
ती प्रलयंकारी "रौद्ररूपिणी"
अनंतालाही तिला थांबवणे
शक्य होत नव्हते...
अख्खा रक्तबीज संपवल्यावर
अनिष्ट शक्तींनी घेरलेली
"विनाशिनी" अनियंत्रित झाली
"त्राही माम् माते!"
एकच पुकारा झाला
तिला कोण थोपवणार?
ती उधळत गेली
वाटेत आडव्या येणाऱ्या
प्रत्येक सजीव निर्जीवाला
कुणीतरी अडवले तिला
निखाऱ्यागत डोळे वळले
जाळून भस्म करणार..
इतक्यात अद्भुत घडले
बाळहातांची मिठी पडली
"आई, मी तुला ओळखलं.."
इवली चिमुरडी म्हणाली
दोन्ही हात पसरले
उचलून घ्यावे म्हणून..
लेकीला काळजाशी धरले
"काली" शांत झाली
आईचे काळीज तिचे
"कसे ग सोडलेस केस?
थांब वेणी घालते"
लेकीने मायेने गोंजारलं..
महाकाली खाली बसली
मंदीराच्या शेवटच्या पायरीवर
लेक वरच्या पायरीवर..
युगांच्या वेदना गुंतलेल्या
लेक एकेक बट
हळुवार सोडवत होती..

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss

 मिले सूर मेरा तुम्हारा ssssss 

अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी 

ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

*

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे. 

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून "मेरा भारत महान" हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले. 

*

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :

या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची  संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते. 

*

विश्वविक्रमी गाणे : 

15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात. 

*

लता दीदीची एन्ट्री : 

खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, "पंडितजी.... मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते"

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे.... कविताजी  नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या  स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच  ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. 


*

प्रसिद्ध धबधबा : 

या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर "लिरिल फॉल्स" असेच नाव पडले ! 

*

ताजमहाल शूटिंग किस्सा : 

या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते  एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं. 

*

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते. 

*

दोन महत्वाच्या रेल्वे :

या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते ! 

आहे न अभिमानाची गोष्ट !

*

कोरस मंडळींचा मोठेपणा : 

या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही  मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे. 

*

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार : 

गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते. 

*

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री 

दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, "माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण.... त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय"

यावर कैलाशजी म्हणाले की, "संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही"

आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली. 

*

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी : 

एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखाद गाणं इतकं अजरामर का होतं.... त्या मागे किती काय काय घडत असत अन कितीजणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसत. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच ! 

थोडक्यात सांगायच तर.... 

असं गाणं पुन्हा होणे नाही !!


Monday, October 14, 2024

कमला

 शक्तीच्या महोत्सवात आपण दशमहाविद्यांची ओळख करून घेत आहोत. आज या दशमहाविद्यांमधील दहावी विद्या 'कमला' देवीची माहिती घेऊ.

कमला देवीचे स्वरूप

कमला देवी ही लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि ती संपत्ती, समृद्धी, वैभव आणि सौंदर्याची देवी आहे. तिचे स्वरूप अत्यंत मोहक आणि तेजस्वी आहे. ती सुवर्णवर्णाची असून चार हात असलेली आहे. तिच्या चार हातात पद्म (कमळाचे फूल), शंख, चक्र आणि धनधान्य धारण केलेले असते. कमलाच्या आसनावर विराजमान झालेली ही देवी कमळाच्या फुलांमध्ये सजलेली असते. तिच्या अवतीभोवती हत्ती असतात, जे तिच्यावर पाणी शिंपत असतात. कमला देवी हे ऐश्वर्य, वैभव, समृद्धी, ऐहिक सुख, सौंदर्य आणि जीवनातील संपन्नतेचे प्रतीक आहे.
कमला देवीची कथा
कमला देवी ही भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी हिचे स्वरूप आहे. ती समुद्रमंथनातून प्रकट झाल्याचे सांगितले जाते. जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा अमृतासोबत अनेक रत्न बाहेर आले. त्यातील एक रत्न म्हणजे देवी लक्ष्मी, जिचे रूप म्हणजे कमला देवी होय. ती विष्णूच्या आवाहनानंतर त्याच्या सोबतीला आली आणि दोघांनी मिळून सृष्टीच्या पालनपोषणाचे कार्य सुरू केले.
देवी कमला हे संपन्नता आणि सुखाचे मुख्य प्रतीक मानले जाते. तिच्या कृपेने भक्ताला सुख, शांती, वैभव, समृद्धी आणि कुटुंबातील ऐहिक सुख प्राप्त होते.
कमला देवीची साधना
कमला देवीची साधना आर्थिक प्रगती आणि ऐहिक सुखासाठी विशेष महत्त्वाची आहे. साधक तिची साधना केल्याने संपत्ती, समृद्धी आणि ऐहिक सुखप्राप्तीच्या आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकतो. तिची साधना केल्याने साधकाला शांती, स्थैर्य आणि मन:शांती मिळते. कमला देवीची साधना करण्यासाठी भक्ताने पिवळ्या वस्त्रांचा वापर करावा आणि सोनेरी, पिवळ्या किंवा लाल रंगाच्या फुलांनी देवीची पूजा करावी.
कमला देवीचा मंत्र
कमला देवीच्या साधनेसाठी तिच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रमुख मंत्र असा आहे:
"ॐ श्रीं ह्रीं क्लीं कमलवासिन्यै स्वाहा"
या मंत्राचा नियमित जप केल्याने साधकाला देवीची कृपा मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.
कमला देवीची साधना पद्धती
साधकाने पिवळ्या किंवा सुवर्ण रंगाचे वस्त्र परिधान करावे.
देवीला पिवळ्या किंवा लाल रंगाची फुले अर्पण करावीत.
साधकाने देवीच्या समोर शांतचित्ताने ध्यान करून तिच्या आशीर्वादाची मागणी करावी.
साधनेत आर्थिक प्रगती, संपत्ती आणि समृद्धीसाठी देवीकडे प्रार्थना करावी.
प्रमुख ठिकाणे:
कमला देवी ही मुख्यत्वे लक्ष्मी म्हणून उपासली जाते, त्यामुळे लक्ष्मीचे मंदिर सर्वत्र आढळते. काही प्रसिद्ध मंदिरांत लक्ष्मी देवीच्या रूपात कमला देवीची उपासना केली जाते.
तिरुपती बालाजी मंदिर: येथे विष्णू आणि लक्ष्मी यांच्या सह-पूजेचा मोठा मान आहे.
पद्मावती मंदिर, तिरुचाणूर, आंध्र प्रदेश: येथे देवी लक्ष्मीच्या कमला रूपाची उपासना होते.
कमला देवीची साधना आर्थिक स्थैर्य, वैभव आणि समृद्धीच्या आशीर्वादासाठी केली जाते.

मातंगी

 शक्तीच्या महोत्सवात आपण दशमहाविद्यांची ओळख करून घेत आहोत. आज या दशमहाविद्यांमधील नववी विद्या मातंगी देवीची माहिती घेऊ.

मातंगी देवीचे स्वरूप :

मातंगी देवी ही ज्ञान, संगीत आणि कला यांची देवी मानली जाते. तिचे स्वरूप आकर्षक असून ती गडद निळ्या रंगाची आहे. ती हिरव्या वस्त्रांमध्ये सजलेली असते आणि तिच्या चार हातात वीणा, पुस्तक, माळ आणि कमंडलु धारण केलेले असतात. मातंगीला संगीतातील उच्च स्थान मिळालेले असून ती संगीत, कला आणि भाषेची प्रतीक देवी आहे.
मातंगी देवीची कथा मातंगी देवी विष्णूची पत्नी लक्ष्मी हिच्या सख्ख्या बहिणी मानली जाते. एकदा पार्वती आणि शिव यांच्यात खेळाच्या निमित्ताने वाद निर्माण झाला. या वादात पार्वतीने शिवाला पराभूत केले, आणि त्याच्या स्वामीभक्तीची परीक्षा घेण्यासाठी पार्वतीने एका सेविकेच्या रूपात देवी मातंगीला जन्म दिला. मातंगीला तांडव आणि नृत्याचा विशेष अधिकार मिळाला. शिवाने तिच्या ज्ञान आणि कलाविषयक शक्तींचे कौतुक केले, आणि तिला संगीत आणि ज्ञानाची देवी बनवले.
मातंगी देवीची साधना मातंगी देवीची साधना कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. संगीत, नृत्य, लेखन आणि अन्य सृजनशील क्षेत्रातील साधक तिची साधना करतात. तिच्या साधनेद्वारे, साधकांना कलाविष्कारात सृजनशीलता, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाची प्राप्ती होते. तिची कृपा प्राप्त केल्याने व्यक्तीला स्पष्ट विचारशक्ती आणि संवाद कुशलता प्राप्त होते.
मातंगी देवीचे मंत्र मातंगी देवीच्या साधनेसाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो. तिचा प्रमुख मंत्र आहे: "ॐ ह्लीं मातंग्यै नमः" या मंत्राच्या जपाने साधकाला देवीची कृपा प्राप्त होते आणि ज्ञानवर्धन होते.
मातंगी देवीची साधना पद्धती
साधकाने हरीत (हिरव्या) रंगाचे वस्त्र परिधान करावे.
साधनेच्या ठिकाणी हरित फुलांचा नैवेद्य अर्पण करावा.
देवीच्या मंत्राचा जप नियमितपणे करावा.
साधकाने शांतचित्ताने ध्यान करून तिच्या आशीर्वादाची मागणी करावी.
काही प्रमुख ठिकाणे:
मातंगी देवीची मंदिरे भारतात कमी प्रमाणात आहेत
तमिळनाडू: कुंभकोणम येथे मातंगीचे मंदिर प्रसिध्द आहे.
काशी: वाराणसीतील काही देवी मंदिरांत मातंगीची उपासना केली जाते.
मातंगी देवीच्या साधनेने साधकांना सृजनशीलतेत यश मिळते आणि कलाक्षेत्रातील अडचणी दूर होतात.
संतोष कारखानीस ठाणे

बगला मुखी

 शक्तीच्या महोत्सवात आपण दशमहाविदयांची थोडक्यात ओळख करून घेत आहोत. आज या दशमहाविदयांमधील सातवी विद्या बगला मुखीची माहीती घेऊ.

बगला मुखी देवी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे आणि ती स्तंभन शक्तीची देवी म्हणून ओळखली जाते. बगला मुखी देवीच्या साधनेत, साधक शत्रूंचा पराभव करण्यासाठी, वादात विजय मिळवण्यासाठी तिच्या शक्तीचा लाभ घेतात.
बगला मुखी देवीचे स्वरूप

बगला मुखी देवीचे रूप शांत असून, तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या एका हातात गदा असून दुसऱ्या हातात ती शत्रूचे मुख दाबून ठेवते. तिच्या गदेद्वारे ती शत्रूंच्या विचारांची शक्ती स्थिर करते, आणि त्यांच्या आक्रमक विचारांना थोपवते. पिवळा रंग ही तिची वैशिष्ट्यपूर्ण खूण आहे, कारण तो बुद्धिमत्ता, सृजनशीलता आणि शांततेचे प्रतीक आहे.
बगला मुखी देवीची कथा
एकदा ब्रह्मांडात महाभयंकर तांडव चालू होते, ज्यामुळे देव आणि ऋषी अत्यंत त्रस्त झाले. ते ब्रह्मदेवाच्या शरणात गेले, ज्यांनी त्यांना बगला मुखी देवीची साधना करण्याचा सल्ला दिला. ब्रह्मदेवांनी तळ्याच्या काठी देवीची उपासना केली, ज्यामुळे बगला मुखी प्रकट झाली आणि तिने त्या तांडवाची समाप्ती केली. तिच्या स्तंभन शक्तीमुळे सर्व त्रास थांबला, आणि ब्रह्मांडातील समतोल पुन्हा प्रस्थापित झाला.
देवीसंबंधी मान्यता
बगला मुखी देवीची साधना वादविवादांमधून विजय मिळवण्यासाठी आणि शत्रूंच्या योजनांना हानी पोहोचवण्यासाठी केली जाते. ही साधना करणारा साधक आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी देवीची कृपा प्राप्त करतो. देवीची साधना मनाच्या स्थिरतेसाठी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठीही केली जाते. तिच्या साधनेद्वारे, भक्त शत्रूंच्या विचारांचे स्तंभन करून, न्यायालयीन प्रकरणात विजय मिळवू शकतो.
बगला मुखी साधना पद्धती
बगला मुखी देवीची साधना साधकासाठी अत्यंत शक्तीशाली मानली जाते. साधनेत:
साधकाला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे लागते.
साधनेची सुरुवात 'ॐ ह्लीं बगलामुखि सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिव्हां कीलय बुद्धिं विनाशय ह्लीं ॐ स्वाहा' या मंत्राच्या जपाने केली जाते.
साधनेत पिवळ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करणे आणि हवन करणे अनिवार्य आहे.
बगला मुखी देवीची प्रमुख मंदिरे
बगला मुखी देवीची मंदिरे भारतातील काही ठिकाणी प्रसिद्ध आहेत:
दतिया, मध्य प्रदेश: येथे बगला मुखी देवीचे प्रमुख मंदिर आहे, जिथे साधक देवीची गूढ साधना करतात.
हिमाचल प्रदेश: कांग्र्यातील बगला मुखी मंदिर देखील प्रसिध्द आहे.
बगला मुखी देवी शत्रूंच्या वाईट विचारांवर विजय मिळवण्यासाठी आणि वादांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी साधकांना शक्ती देते. तिची साधना शांतता आणि विजयाची देवता म्हणून अत्यंत प्रभावी मानली जाते.
संतोष कारखानीस

धूमावती

 दशमहाविद्येमध्ये 'धूमावती' ही सातवी महाविद्या आहे. ती विधवा स्त्रीच्या रूपात असलेली, दुःख आणि दारिद्र्य दूर करणारी देवता मानली जाते. तिचे स्वरूप भयावह असले तरी ती भक्तांना संकटांतून मार्ग दाखवते आणि त्यांचे कल्याण करते.

धूमावती देवीचे स्वरूप

रूप: धूमावती देवीचा रंग धूसर किंवा काळसर आहे. ती विधवा वेशात असून, तिचे केस विस्कटलेले आहेत. तिचे वस्त्र मलिन आणि फाटके आहे. ती वृद्ध स्त्रीच्या रूपात दाखवली जाते.
वाहन: तिचे वाहन एक कावळा आहे, जो अशुभ शकुनाचे प्रतीक मानला जातो.
भूषणे: तिच्या हातात एक डाळण (सूप) असते, जे निवडून घेण्याचे प्रतीक आहे. कधीकधी तिला एका हातात त्रिशूळ धारण केलेली दाखवतात.
धूमावती देवीसंबंधी मान्यता
दुःखाची देवी: धूमावती दुःख, दारिद्र्य आणि अभाव दूर करणारी देवी मानली जाते. ती भक्तांना कठीण काळातून मार्ग दाखवते.
ज्ञानदायिनी: तिच्या भयावह रूपाखाली ती ज्ञान आणि विवेक देणारी देवी आहे. दुःखातून शिकण्याची क्षमता ती प्रदान करते.
कालसूचक: धूम म्हणजे धूर, जो सर्व गोष्टींच्या नाशाचे प्रतीक आहे. ती कालाची देवी म्हणूनही ओळखली जाते.
साधनाविधी
मंत्रजप: धूमावतीचा मुख्य मंत्र आहे: "धूं धूं धूमावती स्वाहा"
साधनाकाल: तिची साधना अमावास्येच्या दिवशी विशेष फलदायी मानली जाते.
तांत्रिक साधना: धूमावतीची साधना अत्यंत कठीण मानली जाते. ती विशेषतः तांत्रिक साधकांसाठी आहे.
साधनेचे फल
संकटमोचन: धूमावतीची उपासना संकटकाळात केली जाते. ती भक्तांना संकटातून मार्ग दाखवते.
शत्रुनाश: तिची साधना शत्रूंचा नाश करण्यासाठी प्रभावी मानली जाते.
ज्ञानप्राप्ती: दुःखातून ज्ञान मिळवण्याची क्षमता ती प्रदान करते.
धूमावती उपासना
विशेष काळ: अमावास्या, ग्रहण काळ हा तिच्या उपासनेसाठी श्रेष्ठ मानला जातो.
पूजासाहित्य: तिच्या पूजेत काळे फूल, काळे तिल, उडीद यांचा वापर केला जातो.
स्थान: स्मशान, जुनी घरे, एकांत स्थळे ही तिच्या साधनेसाठी योग्य मानली जातात.
धूमावतीची साधना अत्यंत कठीण आणि जोखमीची मानली जाते. तिची साधना योग्य मार्गदर्शनाखाली करणे महत्त्वाचे आहे. तिच्या कृपेने भक्तांना दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि जीवनातील खऱ्या सत्याचे ज्ञान होते.
संतोष कारखानीस ठाणे

भैरवी

 आज नवरात्रीचा सहावा दिवस. आज आपण दशमहाविद्यांपैकी सहावी महाविद्या भैरवी हिची ओळख करून घेणार आहोत.

भैरवी ही दशमहाविद्यांमधील एक महत्त्वाची देवी आहे. तिचं स्वरूप खूप रौद्र आणि भयानक असलं तरी ती आपल्या भक्तांना शक्ती आणि संरक्षण देणारी आहे. भैरवीला 'भयाची नाशक' म्हणून ओळखलं जातं. ती काळावर नियंत्रण ठेवते आणि तिच्या उपासकांना मृत्युच्या भयापासून मुक्त करते.
कथा अशी आहे की, एकदा सृष्टीवर असुरांनी अत्याचार वाढवले होते. ते इतके शक्तिशाली झाले की, त्यांनी देव, ऋषी-मुनी आणि मानवांवर आक्रमण सुरू केलं. सगळीकडे भय आणि त्रासाचा वातवरण पसरला. या संकटाचा सामना करण्यासाठी महादेव अर्थात भगवान शिव यांनी एक शक्तिशाली देवी निर्माण करण्याचा विचार केला, कारण त्यांचं स्वतःचं रौद्र रूप अपूरे होतं.

शिवाने आपल्या तिसऱ्या नेत्रातून एका प्रचंड तेजाचे प्रकट होण्याची प्रक्रिया सुरू केली, ज्यातून भैरवी देवी उत्पन्न झाली. ती तांत्रिक साधनांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी शक्ती आहे. तिचं रूप अत्यंत भयानक आणि उग्र होतं. तिच्या हातात खड्ग (तलवार), त्रिशूळ आणि कपाल होतं, आणि ती काळी वाघाच्या कातडीवर बसलेली होती. तिचे डोळे रागाने लाल झालेले होते, आणि ती रक्ताने माखलेली दिसत होती. तिचं हे उग्र रूप भय उत्पन्न करतं, पण तेच रूप संकटांपासून रक्षण करणारं आहे.
भैरवीच्या जन्माचं मुख्य कारण असं सांगितलं जातं की, ती असुरांचा संहार करण्यासाठी प्रकट झाली होती. कथा सांगते की असुरराजाने अमरत्वाची सिद्धी मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येमुळे देव घाबरले आणि त्यांनी शिवाकडे मदतीची याचना केली. शिवाने आपल्या शक्तीने भैरवीला प्रकट केलं आणि तिला असुरांच्या संहाराचा आदेश दिला. ती आपल्या तेजस्वी शक्तीने असुरांना संपवते आणि जगात पुन्हा शांतता आणते.
या घटनेनंतर भैरवीला 'भयाचा नाश करणारी' म्हणून पूजलं जाऊ लागलं. तिच्या रूपात ती जगाला संकटांतून मुक्त करण्याचं कार्य करते. ती केवळ असुरांचा नाश करणारी नाही, तर मानवांना त्यांच्या जीवनातील मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक अडचणींमधून बाहेर काढणारी आहे. भैरवीच्या उपासनेने साधकाला अंतर्बाह्य बल प्राप्त होतं आणि संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते.
शिवाच्या शक्तीचं रौद्र रूप म्हणून भैरवीला गणले जातं. ती शिवाच्या सहचारिणी आहे, पण ती स्वतंत्र रूपानेही पूजा केली जाते. तिची उपासना खूप साधकांना त्रासमुक्त जीवन देण्यास मदत करते, आणि त्यांची साधना यशस्वी बनवते.
तर, भैरवीची उत्पत्ती ही एक अत्यंत शक्तिशाली कथा आहे, जिच्या माध्यमातून ती देवता संहारक रूपात दिसते, पण तिच्या उग्रतेमागे एक अत्यंत सकारात्मक आणि संरक्षणात्मक शक्ती दडलेली असते.
भैरवीला 'क्षेत्रपालिका' म्हणूनही ओळखलं जातं. 'क्षेत्रपालिका' म्हणजे ती देवी काशी क्षेत्राचं संरक्षण करते. काशीमधील प्रत्येक जिवंत आणि मृत व्यक्तीचं रक्षण करण्याचं काम भैरवी करते. ती इथल्या प्रत्येक यात्रेकरूची देखील सुरक्षा करते आणि त्यांचं जीवन उन्नत करण्याचं सामर्थ्य देते.
उपासनापद्धती
काशीमध्ये भैरवीची उपासना अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. इथल्या साधकांना तांत्रिक साधना आणि उपासना तंत्राचं विशेष महत्त्व आहे. साधक भैरवीची उपासना रात्रभर करत असतात. तांत्रिक पद्धतीत, हवन, मंत्रजप, आणि ध्यान या गोष्टींचा समावेश असतो. खासकरून 'भैरवी मंत्र' चा जप अत्यंत प्रभावी मानला जातो.
काशीमध्ये 'मां भैरवी शक्तिपीठ' हे एक महत्त्वाचं स्थान आहे, जिथं साधक आणि भक्त नियमितपणे येऊन उपासना करतात. या शक्तिपीठात भक्त देवीला रक्तवर्णी वस्त्र, लाल फुलं, तांदुळ, हळद आणि कुंकवाचं अर्पण करतात. काही साधकांना मंत्रशक्ती आणि तांत्रिक शक्ती मिळवण्यासाठी कठोर उपासना करावी लागते.
विशेष काळात उपासना
काशीमध्ये भैरवीची उपासना खासकरून नवरात्राच्या काळात खूप महत्त्वाची मानली जाते. या काळात देवीला विशेष पूजा अर्पण केली जाते, ज्यात शक्ती, धैर्य, आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी साधना केली जाते. इतर वेळी, अमावस्येच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या काळातही भैरवीची साधना प्रभावी मानली जाते.
भक्तांचा श्रद्धाभाव
भैरवीच्या उपासनेमध्ये श्रद्धेचा महत्त्वपूर्ण भाग असतो. भक्त देवीच्या कृपेने आपल्या सर्व भयांवर आणि संकटांवर मात करू शकतात असं मानतात. ती मृत्यूच्या वेळी आपली मुक्ती करण्यासाठी उपस्थित असते, आणि आपल्याला यमलोकाच्या भयापासून वाचवते. भक्तांमध्ये असंही मानलं जातं की, जर कुणी काशीमध्ये मरण पावला, तर भैरवी त्याला मृत्युच्या वेळी रक्षण करते, आणि त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत करते.
काशीतील प्रमुख मंदिर
'काशी भैरवी शक्तिपीठ' हे काशीमध्ये भैरवी देवीचं प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर भक्तांसाठी एक शक्तिपीठ आहे, जिथे तीव्र साधना केली जाते. इथं हजारो भक्त देवीच्या कृपेसाठी येतात आणि आपली संकटं, भय, आणि अडचणी दूर करण्यासाठी तिच्या चरणी नतमस्तक होतात. या मंदिरात खासकरून तांत्रिक उपासक येतात आणि देवीच्या मंत्राचा जप करतात.
काशीमध्ये भैरवी देवीची उपासना ही केवळ तांत्रिक साधनेपुरती मर्यादित नाही; ती भक्तीभावाने केलेली साधना असून, ती भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.
भारतभर भैरवीची अनेक मंदिरे आहेत, पण पश्चिम बंगालमध्ये ती विशेष प्रसिद्ध आहे. काशीच्या भैरवी मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, जिथं श्रद्धाळू मोठ्या संख्येने जातात.
भैरवीची उपासना आपण धैर्य आणि शक्ती मिळवण्यासाठी करू शकतो. तिच्या कृपेने संकटांचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळते, आणि तिने दिलेल्या मार्गदर्शनाने जीवनातल्या अडचणी सहजपणे पार करता येतात.
तर अशी आहे भैरवी देवी - रौद्र रूपात आपल्याला संरक्षण देणारी, भयाचा नाश करणारी शक्ती!

Sunday, October 13, 2024

छिन्नमस्ता

 आज शक्तीच्या महोत्सवाची पाचवी माळ. आपण या महोत्सवात दशमहाविद्यांची - अर्थात दशमहाशक्तीची माहिती करून घेत आहोत. कालपर्यंत काली, तारा, त्रिपुरसुंदरी आणि भुवनेश्वरी या विद्यांची माहिती आपण घेतली. आज पाचवी महाविद्या छिन्नमस्ता या विद्येची माहिती घेऊ.

छिन्नमस्ता देवी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे आणि ती शक्तीच्या उग्र रूपांपैकी एक मानली जाते. छिन्नमस्ता देवीचे स्वरूप आणि तिच्याशी संबंधित कथांचा गूढ आणि तात्त्विक अर्थ आहे, जो आत्म्याच्या व शारीरिक अहंकाराच्या नाशाशी संबंधित आहे.
छिन्नमस्ता देवीचे स्वरूप

छिन्नमस्ता देवीचे रूप अत्यंत उग्र आणि भयभीत करणारे आहे. तिच्या नावातच तिच्या स्वरूपाचा उल्लेख आहे - 'छिन्न' म्हणजे छेदलेले आणि 'मस्ता' म्हणजे डोके. देवीने स्वतःचे डोके धडापासून वेगळे केले आहे, ज्यामुळे तिचे रक्त तिच्या हातात धरणारे शीर स्वतःच पित आहे. तिच्या धडातून तीन रक्ताच्या धारांचा प्रवाह निघतो, ज्यापैकी दोन धारांची शक्ती देवीने स्वतःची भूक भागवण्यासाठी तात्काळ निर्माण केलेल्या साथीदारिणींना दिली जाते, आणि मध्य धारा देवी स्वतः पित आहे.
ती नागासह नग्न रूपात उभी आहे, आणि तिचे शरीर लाल आहे. तिच्या एका हातात तलवार आहे, तर दुसऱ्या हातात तिने आपले शीर धरले आहे. तिच्या पायाखाली मदन (कामदेव) आणि रती (त्याची पत्नी) उभे आहेत, ज्यांचे पिळलेले रूप सांसारिक वासना आणि मोहांचे प्रतीक आहे. छिन्नमस्ता देवी शारीरिक अहंकाराच्या, मोहाच्या आणि कामनांच्या नाशाचे प्रतीक आहे.
देवीसंबंधी कथाः
छिन्नमस्ता देवीची एक महत्त्वाची कथा अशी आहे की, एकदा देवी पार्वती तिच्या सखींना घेऊन स्नानासाठी नदीत गेली. स्नानानंतर, देवीच्या सखींची भूक वाढली आणि त्यांनी देवीला काही खायला मागितले. देवी पार्वतीने त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगितले, पण त्यांच्या वारंवार विनंतीमुळे देवीने आपल्या तलवारीने स्वतःचे डोके धडापासून छेदले. तिच्या धडातून निघालेल्या रक्ताने त्या सखींची भूक भागवली. या घटनेमुळे छिन्नमस्ता देवीची कथा रूपक म्हणून घेतली जाते, जी आत्मत्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे.
देवीसंबंधी मान्यता:
छिन्नमस्ता देवीचा उपासक हा अत्यंत धैर्यशील, मनोधैर्यवान आणि मोहमुक्त असावा लागतो, कारण देवीचे स्वरूप उग्र आहे आणि ती स्वत्वाच्या आणि मोहाच्या नाशासाठी उपासली जाते. तिच्या साधनेद्वारे भक्त आत्मसंयम, अहंकार नाश, वासना नियंत्रण आणि उग्र शक्ती प्राप्त करतो.
छिन्नमस्ता देवीला उपासकांना कर्जमुक्ती, संपत्ती, आत्मिक प्रगती आणि कामवासना नियंत्रित करण्याचे वरदान दिले जाते. ती उपासकांना त्यांच्या इच्छांच्या पूर्तीसाठी शक्ती देते, परंतु त्याच्या बदल्यात भक्तांनी स्वतःचे त्यागशीलतेचे आचरण ठेवावे लागते.
छिन्नमस्ता उपासना पद्धती (साधना विधी):
छिन्नमस्ता देवीची साधना ही अत्यंत कठीण आणि गूढ साधना आहे. या साधनेत:
उपासकाला काळ्या किंवा लाल वस्त्र परिधान करावे लागते.
साधनेची सुरुवात भक्त 'छिन्नमस्तायै नमः' या मंत्राचा जप करून करतो.
देवीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर रक्तवर्णी पुष्पांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
उपासकाला देवीच्या तंत्रामध्ये दिलेल्या विशेष मंत्रांचा जप करावा लागतो.
काही साधक व्रत करून उपासना करतात आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करतात.
महत्त्वाचे: या साधनेत संपूर्ण ध्यान, भावनिक समर्पण आणि मानसिक शक्ती आवश्यक असते. ही साधना साधकाच्या आत्मिक प्रगतीसाठी प्रभावी असली तरी ती अत्यंत उग्र साधना मानली जाते आणि ती अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावी.
छिन्नमस्ता देवीची प्रमुख मंदिरे:
छिन्नमस्ता देवीची मंदिरे काही ठिकाणी प्रसिद्ध आहेत, त्यापैकी काही म्हणजे:
राजरप्पा मंदिर, झारखंड: हे भारतातील सर्वात प्रसिद्ध छिन्नमस्ता मंदिर आहे. येथे देवीची भव्य मूर्ती आहे, जिची उपासना खूप गूढ मानली जाते.
काशी, वाराणसी: काशी येथे छिन्नमस्ता देवीचे छोटे मंदिर आहे, जे शक्ती पीठांपैकी एक मानले जाते. तेथे सतीचे मस्तक पडले होते.
छिन्नमस्ता देवीची उपासना करणाऱ्यांना अत्यंत आत्मिक प्रगती आणि मोह, वासना आणि अहंकार नष्ट करण्याची शक्ती मिळते. ती सृष्टीच्या उत्क्रांतीसाठी, आत्मत्यागासाठी आणि मनाच्या नाशासाठी उभी आहे, ज्यामुळे तिची उपासना अधिक गूढ आणि उग्र आहे.
संतोष कारखानीस ठाणे

भुवनेश्वरी

 भुवनेश्वरी

आज नवरात्रीची- शक्तीच्या महोत्सवाची - चौथी माळ. आपण या शक्तीच्या महोत्सवात दशमहाविद्या अर्थात दशमहाशक्तींविषयी जाणून घेत आहोत. यापैकी काली, तारा आणि त्रिपुरसुंदरी या तीन महाविद्यांसंबंधी माहिती गेल्या तीन दिवसात घेतली. आज चौथी महाविद्या 'भुवनेश्वरी' संबंधी थोडी माहिती घेणार आहोत.
भुवनेश्वरी देवी ही हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहे आणि तिला दशमहाविद्यांमध्ये चौथ्या क्रमांकाची महाविद्या मानले जाते. "भुवनेश्वरी" या नावाचा अर्थ आहे, "भुवनांची (संपूर्ण विश्वाची) ईश्वरी (राज्ञी)". ती जगाच्या निर्मितीची, पालनाची आणि संहाराची अधिष्ठात्री आहे. देवी भुवनेश्वरीचे तंत्रशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे, कारण ती या भौतिक जगाची आणि त्यामागील अदृश्य शक्तींची अधिपती मानली जाते.
देवीचे स्वरूप:

भुवनेश्वरी देवीचे स्वरूप अत्यंत सुंदर आणि दिव्य आहे. तिला चार हात आहेत, आणि ती लाल किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केलेली असते. तिचे सौंदर्य आणि तेज तिच्या उपासकांना आकर्षित करते. तिच्या हातात पाश आणि अंकुश आहे, जे भक्तांच्या अज्ञान आणि मोहावर विजय मिळवण्यासाठीचे साधन दर्शवतात. देवीला चंद्रासमान तेजस्वी कपाळ आणि करुणामय नेत्र आहेत, जे सृष्टीतील सर्व जीवांवर तिचे प्रेम आणि संरक्षण व्यक्त करतात.
भक्तांना देवी काय देते:
भुवनेश्वरीची उपासना केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांतून आणि भयातून मुक्ती मिळते. ती आपल्या भक्तांना बुद्धी, शक्ती, आणि शांती देते. तिची कृपा झाल्यावर भक्तांना जीवनात समृद्धी, ऐश्वर्य, आणि यश प्राप्त होते. भुवनेश्वरी उपासनेत जगातील सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळविण्याची क्षमता दिली जाते, त्यामुळे तिच्या साधकांना मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. ती भक्तांचे संरक्षण करते आणि त्यांना सुखसमृद्धी आणि सृष्टीतील आनंदाचा अनुभव देते.
उपासना पद्धती:
भुवनेश्वरी देवीची उपासना अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे. तिच्या भक्तांनी तिच्या नामस्मरणासाठी भुवनेश्वरी मंत्राचा जप करावा. हा मंत्र शक्तिशाली मानला जातो:
भुवनेश्वरी बीज मंत्र: "ॐ ह्रीं भुवनेश्वर्यै नमः"
यासोबतच, देवीची पूजा फुलं, दीप, धूप, आणि नैवेद्य अर्पण करून केली जाते. ध्यान आणि मंत्रजपामध्ये एकाग्रता राखणे महत्त्वाचे आहे. तिच्या उपासनेमुळे भक्ताच्या जीवनात नवचैतन्य आणि समृद्धी येते. साधनेत श्रीचक्राचा उपयोग देखील केला जातो.
देवीचे मंदिर:
भुवनेश्वरी देवीची मंदिरे विविध ठिकाणी आहेत, जिथे तिची उपासना विशेष पद्धतीने केली जाते:
भुवनेश्वरी मंदिर, त्रिवेंद्रम (केरळ): हे एक प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे देवीची नियमित पूजा होते. येथे देवीला सर्व प्रकारच्या बाधा आणि संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी उपासक येतात.
भुवनेश्वरी मंदिर, तिरुचिरापल्ली (तामिळनाडू): तामिळनाडूतील हे मंदिर देखील भक्तांमध्ये अत्यंत पूजनीय आहे.
भुवनेश्वरी मंदिर, हरिद्वार (उत्तराखंड): हरिद्वार येथे गंगा नदीकाठी स्थित हे मंदिर आहे, जिथे देवीच्या उपासनेसाठी हजारो भक्त येतात.
भुवनेश्वरी देवीची उपासना भक्तांच्या जीवनात शांती, स्थिरता, आणि संपूर्ण विश्वाशी एकात्मता आणते. तिच्या कृपेने साधकांना आध्यात्मिक उन्नतीची प्राप्ती होते, आणि या भौतिक जगातही यश आणि समाधान मिळते.
संतोष कारखानीस ठाणे

त्रिपुरसुंदरी (ललिता)

 त्रिपुरसुंदरी (ललिता)

आपण गेले काही दिवस दशमहाविद्या अर्थात दशमहाशक्ती यांच्याविषयी जाणून घेत आहोत. पहिल्या दोन शक्ति - काली आणि तारा - यांच्याबाबत गेले दोन दिवस माहिती घेतली. आज तिसऱ्या महाविद्येसमबंधी - त्रिपुरसुंदरी (ललिता) संबंधी थोडी माहिती घेऊ. त्रिपुरसुंदरीचे 'श्रीचक्र' अनेक घरांत पूजले जाते. परंतु ते ज्या देवतेचे प्रतीक आहे तिची माहिती त्यांना नसते.
त्रिपुरसुंदरी (ललिता) ही देवी तंत्रशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती "सर्व सौंदर्याची" आणि "सर्व सृष्टीची" अधिष्ठात्री देवी म्हणून ओळखली जाते. तिला त्रिपुरसुंदरी किंवा ललिता म्हणून ओळखले जाते, कारण ती तीन जगांच्या सुंदरतेचे प्रतीक आहे – भौतिक, मानसिक, आणि आध्यात्मिक. देवी ललिता त्रिपुरसुंदरीची पूजा तांत्रिक आणि वेदाधिष्ठित पद्धतीने केली जाते, जी तिच्या उपासकांना विशेष फल प्रदान करते.
देवीचे स्वरूप:

त्रिपुरसुंदरीला महाशक्ती मानले जाते आणि तिचे वर्णन "चतुर्भुजा" म्हणून केले जाते – म्हणजेच, तिच्या चार भुजा आहेत. ती कमळासनावर बसलेली असते, आणि तिच्या हातात पुष्प, धनुष्य, बाण आणि पाश असतात. तिचा रंग चमकदार लाल असतो, जो तांत्रिक साधनेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तो उर्जेचे प्रतीक आहे. तिचे सौंदर्य आणि दैवी तेज अतुलनीय आहे.
भक्तांना देवी काय देते:
त्रिपुरसुंदरीची उपासना केल्याने भक्तांना दैवी शक्ती, आध्यात्मिक उन्नती, ज्ञान, आणि प्रसन्नता प्राप्त होते. ती आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करते आणि त्यांना समृद्धी आणि स्वास्थ्य प्रदान करते. तिच्या उपासनेमुळे भक्तांच्या जीवनात संतुलन, शांती, आणि ऐश्वर्य येते. तसेच, ती इच्छापूर्ती आणि मोक्ष (मुक्ती) प्राप्त करून देते. विशेषत: तंत्रशास्त्रीय साधनांमध्ये, ललिता देवी आपल्या भक्तांना आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक शक्ती आणि जगातील सुखांची प्राप्ती करून देते.
पुराणात वर्णन :
देवी ललिता शक्तीचे वर्णन देवी पुराणात आढळते. भगवान शंकरांना हृदयात धारण केल्यावर सती नैमिष येथे लिंगधारिणी नामाने प्रसिद्ध होतात आणि त्यांना ललिता देवी या नावाने ओळखले जाऊ लागते. एका अन्य कथेनुसार ललिता देवी यांचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा भगवानाच्या सोडलेल्या चक्रामुळे पाताळाचा नाश होऊ लागतो. या परिस्थितीमुळे ऋषी-मुनी घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करतात. त्यांच्या प्रार्थनेमुळे देवी प्रसन्न होते आणि ती विनाशकारी चक्र हातात घेत सृष्टिला पुन्हा नवजीवन देते.
उपासना पद्धती:
ललिता त्रिपुरसुंदरीची उपासना तंत्रमार्गात विशेषतः प्रसिद्ध आहे. ललिता सहस्रनाम स्तोत्र हे तिच्या उपासनेसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. भक्तांनी तिचे नामस्मरण, ध्यान, हवन, आणि देवीची प्रतिमा वा यंत्रासमोर दीपप्रज्वलन करून उपासना करावी. त्रिपुरसुंदरीचे श्रीचक्र (श्रीयंत्र) देखील अत्यंत पूजनीय आहे आणि त्याच्या समर्पक पद्धतीने पूजेसाठी भक्तांनी यंत्रपूजा करावी. मंत्रजप, हवन, ध्यान, आणि श्रीयंत्राच्या उपासनेमुळे देवी प्रसन्न होते आणि भक्तांना परमोच्च आध्यात्मिक फल मिळते.
मंदिरांची माहिती:
त्रिपुरसुंदरीचे अनेक प्रसिद्ध मंदिरं भारतभरात आढळतात, परंतु काही ठिकाणी ती विशेष पूजनीय आहे:
त्रिपुरसुंदरी मंदिर, त्रिपुरा: हे भारताच्या त्रिपुरा राज्यात आहे आणि हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. येथे देवीला "त्रिपुरा सुंदरी" म्हणून पूजले जाते. हे एक शक्तिपीठ आहे. येथे सतीचा उजवा पाय पडला होता.
ललिता देवी मंदिर, वाराणसी: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हे एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे, जेथे देवी ललितेची उपासना विशेष पद्धतीने केली जाते.
त्रिपुरसुंदरी मंदिर, तिरुवनंतपुरम: केरळ राज्यातील हे मंदिरही त्रिपुरसुंदरी उपासनेचे महत्त्वाचे केंद्र आहे.
संतोष कारखानीस ठाणे