Thursday, May 10, 2018

बौद्ध दर्शन : आर्यसत्ये


गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर पहिले प्रवचन त्यांनी सारनाथ येथे त्यांच्याबरोबर आधी मुक्तीचा मार्ग शोधत असलेल्या पाच श्रमणांना दिले. हे प्रवचन 'धम्मचक्र प्रवर्तन' या नावानेही ओळखले जाते.  अशोकचक्र याच धम्मचक्राचे प्रतीक आहे.
यावेळी गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली. ('आर्यसत्ये' म्हणजे 'शाश्वत सत्ये').

  1. दु:ख आहे : या जगात दु:ख आहे हे भगवान बुद्धांनी ठामपणे सांगितले. म्हणूनच काही टीकाकार 'दु:खवादी' अशी या धर्मावर टीका करतात. 'सुख पाहता जवापडे, दु:ख पर्वताएवढे' किंवा 'अधिक सुख मिळवावे' अशी बुद्धाची भूमिका नाही. एखाद्या गोष्टीत काही काल सुख वाटले तरी नंतर ती गोष्ट नाहीशी झाल्यावर दु:खच वाट्याला येते. त्यामुळे सुखाचे अंतिम पर्यावसान दु:खातच होते अशी ही भूमिका आहे. एखादा वैद्य रोगावर औषधोपचार करण्यापूर्वी रोग असल्याची खात्री करून घेतो त्याप्रकारची ही भूमिका आहे.
  2. दु:ख समुदाय (दु:ख कारण) : एखादा निष्णात वैद्य रोगाची खात्री करून घेतल्यावर त्या रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतो. मूळ कारण सापडल्यावरच त्यावर इलाज करणे शक्य होते. अन्यथा हे इलाज वरवरचे तात्कालिक होतील. दु:खाचे मूळ कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अहंकार ('मी') आणि ममत्व ('माझे') यातून उगम पावलेली आत्मकल्पना. अविद्येतून तृष्णा आणि तृष्णेतून दु:ख जन्माला येते असे बुद्धाने प्रतिपादन केले. अविद्येतून दु:खाचा जन्म कसा होतो याचे विस्तृत विवेचन बुद्धाने केले आहे. त्याला द्वादश-निदान असे म्हणतात. आपण द्वादश-निदान या लेखमालेत नंतर समजून घेऊ. 
  3. दु:ख निरोध : रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यावर त्यावर काय इलाज करता येईल याचा वैद्य शोध
    घेतो. मूळ कारण कळल्याने इलाजाची दिशा मिळते. बुद्धाने 'अविद्येचा नाश केल्यास दु:खापासून मुक्ती मिळते' असे सांगितले. दु:खापासून मुक्ती ही केवळ कल्पना नाही तर आपण स्वत: दु:खापासून मुक्ती मिळविली असल्याचे ठाम प्रतिपादन केले.
  4. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा (दु:ख निरोधचा मार्ग) : रोगावर इलाज ठरविला की वैद्य औषध कसे घ्यायचे हे विस्तृतपणे सांगतो. तसेच भविष्यात पुन्हा हा रोग उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची याची माहिती देतो.  गौतम बुद्धाने हा दु:खापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग टप्प्याटप्प्याने विषद केला. आज अडीचहजार वर्षानंतरही सामान्य संसारी माणूस या मार्गाने जाऊन जीवनातील दु:खांवर मात करू शकतो. 'आर्यअष्टांगमार्ग' असे त्या मार्गाचे नाव आहे.
पुढील लेखात या 'आर्यअष्टांगमार्गाचा' विचार करू.

No comments:

Post a Comment