Sunday, May 20, 2018

उत्तरमीमांसा (वेदांत दर्शन) : अद्वैतवाद

सांख्यदर्शनाखालोखाल भारतीय समाजावर अद्वैत दर्शनाचा प्रभाव आहे.

एका जुन्या सुभाषितकाराने अद्वैतवाद एका श्लोकात मांडला आहे
ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव, नापर: |

आपण आद्यशंकराचार्यांनी मांडलेला अद्वैतवाद थोडक्यात पाहू.
१>पहिला सिद्धांत म्हणजे ब्रह्म हेच सत्य होय. ब्रह्म म्हणजे जाणीव, आपणास एकसारखे होत राहणारे भान. ती स्वयंसिद्ध आहे. इतर पदार्थ आहेत अथवा नाहीत हे जाणीवेच्या सहाय्याने कळते. परंतु जाणीव आहे अथवा नाही हे आपणास कळण्यासाठी अन्य कशाचीही आवश्यकता नसते. अद्वैत्वाद्यान्च्या मते ब्रह्म हे सत्, चित् आणि आनंद स्वरूपी आहे.
२>दुसऱ्या सिद्धांतानुसार जग हे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ असा नाही की त्याला घनता, आकार नाही. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी मिथ्या आहे असा त्याचा अर्थ आहे. दिशा, काल आणि कार्य-कारण संबंध या संदर्भातच या जगाला अर्थ आहे असाही त्याचा अर्थ आहे. काल हे परिमाण सापेक्ष आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. दिशा/अंतर हे परिमाणेही सापेक्ष आहेत हे अत्याधुनिक पदार्थ विज्ञान सांगते. इतकेच नव्हे तर या विश्वासारखीच अनेक विश्वे एकाचवेळी अस्तित्वात असू शकतील असेही नवे विज्ञान सांगते. या सापेक्षतावाद सिद्धांताचा विचार केला तर 'जग हे मिथ्या आहे' या विधानाचा अर्थ थोडा थोडा उलगडू लागतो.
३>'जीवो ब्रह्मैव' हा तिसरा सिद्धांत आहे. 'जग हे मिथ्या' म्हटल्यावर काहीच उरणार नाही असा आपला समाज होतो. पण वेदांत दर्शन हे 'ब्रह्म सत्यं' अधिक उच्चरवाने सांगते. जीव म्हणजे ज्याला आपण 'मी' म्हणतो त्यातून 'अहंकार' काढल्यावर जे उरते ते. जीवाला आत्मा असेही म्हणतात. हा आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. उपाधीमुळे आत्म्यास जीवत्व येते असे अद्वैतदर्शन सांगते. स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फुल ठेवल्यास स्फटिकाला त्या फुलाचा लाल रंग आला आहे असे भासते. तसेच आत्म्याला उपाधी लावल्याने त्याच्यात जीवत्व भासते.
सर्वाचा आत्मा एकाच ब्रह्मस्वरूपी असूनही वेगवेगळे का भासतात याचे कारण देताना अद्वैतदर्शनकार घटाकाश आणि महाकाश यांचे उदाहरण देतात. घटामुळे घटात कोंडलेले आकाश आणि बाहेरील आकाश वेगळे भासते. अशाप्रकारे प्रत्येक घटातील आकाश स्वतंत्र भासते. पण तो घट फुटल्यास घटातील घटाकाश आणि बाहेरील महाकाश एकच आहेत याचे ज्ञान होते.
अद्वैत दर्शनाच्या (आणि उपनिषदांच्या) मते मोक्ष ही प्राप्त करून घेण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष हा सिद्धच असतो. परंतु आत्म्याला त्याचे भान नसते. म्हणूनच संसार आणि बंध येतात. मायेमुळे आत्म्याला ते भान रहात नाही. म्हणून मायेचे आवरण दूर केल्यावर आत्म्याला तो मुक्त असल्याचे भान येते.
या संदर्भात एक मनोरंजक गोष्ट आहे. उंटांचा एक काफिला प्रवासास निघालेला असतो. रात्री एका ठिकाणी मुक्काम पडतो. काफिल्याच्या प्रमुखाच्या लक्षात येते की बांधण्यासाठी आणलेले दोरखंड अपुरे आहेत. एका उंटाला बांधण्यासाठी दोरखंड कमी पडत आहे. तो विचारात पडतो. पण त्याच्या काफिल्यातील एक शहाणा माणूस प्रश्न सोडवितो. तो त्या उंटाला दोरखंडाने बांधण्याचा अभिनय करतो. आश्चर्य म्हणजे तो उंट आपल्याला बांधले आहे असे समजून रात्रभर तेथेच बसून असतो. सकाळी काफिला पुढे जाण्यास निघतो. पण तो उंट काही जागेवरून हलत नाही. त्याला मारूनमुटकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण तरी तो काही हलत नाही. तेवढ्यात  या शहाण्या माणसाच्या लक्षात एक गोष्ट येते. तो त्या उंटाला बांधलेली दोरी सोडविण्याचा अभिनय करतो. उंट लगेच चालू लागतो. उंटाची जशी आपल्याला बांधले असल्याची समजूत झाली होती तशीच आपल्या आत्म्याची आपण बद्ध असल्याची समजूत झालेली असते. त्या शहाण्या माणसासारखे कोणीतरी आपल्याला सोडविण्याचा अभिनय करावा लागतो. उपनिषदे याचाच प्रयत्न करीत असतात.
वेदांत दर्शनातील नंतर आलेल्या आचार्यांनी शंकराचार्यांनी प्रतिपादिलेल्या अद्वैतमतात काही बदल सुचविले. परंतु आजही वेदांत दर्शनात शंकराचार्यांचे मत प्रमाण मानले जाते.

आपण आठ महत्वाच्या प्राचीन भारतीय दर्शनांची थोडक्यात माहिती गेले काही दिवस घेतली. पुढील लेखात या सर्व दर्शनांचा एकत्रित गोषवारा घेऊ. तसेच या दर्शनशास्त्राचा सध्याच्या आपल्या जीवनाशी काही संबंध आहे काय हे ही पाहू.


No comments:

Post a Comment