Tuesday, May 1, 2018

*मोहोलेश ते महाराष्ट्*

ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो *"मोहोलेश’* म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा. तो म्हणतो, ‘महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ते धनधान्याने समृद्ध आहे. तेथील लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. या प्रदेशाला *‘दंडकारण्य’* असेही म्हणत आणि या प्रदेशाचे नाग, मुंड, भिल्ल इत्यादी आदिवासी समाज हे मूळ रहिवाशी होते. नंतरच्या काळांत उत्तरेकडून आर्य, शक, हूण लोक आले; दक्षिणेकडून द्रविडी लोक आणि सागरे मार्गाने परदेशी लोक आले. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वसाहत केली, आणि महाराष्ट्राच्या रहिवाशांना *महारट्ट’* म्हणून ओळखले जाऊं लागले.
महाराष्ट्राची प्राचीनता साधारणपणे इ.स.पू. तिसर्‍या शतकापर्यंत नेता येईल. कारण संस्कृत भाषेपासून उदयाला आलेली महाराष्ट्री भाषा ही इ.स.पू. चवथ्या अथवा तिसर्‍या शतकांत प्रचारात होती असे तज्ज्ञांचे मत आहे. आजची या प्रदेशाची मराठी भाषा या महाराष्ट्री-प्राकृत भाषेपासून विकसित झाली असून इ.स. च्या १०व्या शतकापासून ती प्रचलित झाली असावी. महाराष्ट्र हे नांव देखील या भाषेवरूनच पडले असावे. कालौघात या नांवाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात अपरान्त, विदर्भ, कुंतल, मूलक व अश्मक यांचा अंतर्भाव झालेला दिसतो.


〰〰〰〰〰〰〰📕

*सं - श्रीधर कुलकर्णी*

*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment