Saturday, May 12, 2018

बौद्धदर्शन : द्वादश-निदान

दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी दु:खाला कारणीभूत असलेली बारा कारणांची मालिका सांगितली. यातील प्रत्येक दुव्याला बुद्धांनी 'निदान' असे म्हटले आहे. त्यामुळे ही मालिका 'द्वादश-निदान' या नावाने ओळखली जाते. ही बारा निदाने पुढीलप्रमाणे : अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाति, जरामरण.
जरामरणाच्या अनुषंगाने शोक-परिवेदना-दु:ख-दौर्मनस्य येतात असेही सांगितले आहे.
अविद्येमुळे (अविद्येचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) आपल्या मनात विकार निर्माण होतात. यालाच बौद्ध दर्शनात 'संस्कार' (पाली भाषेत 'संखारा') म्हटले आहे. या विकारातून 'मी आहे' अथवा 'पदार्थ आहेत' अशी अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. यालाच बौद्ध दर्शनात 'विज्ञान' म्हटले आहे. विज्ञानामुळेच 'नामरूपाची' निर्मिती होते. 'नाम' म्हणजे मन:पिंड आणि रूप म्हणजे शरीरपिंड. या नामरूपामुळे सहा इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये आणि मन) तयार होतात. या सहा इंद्रियांना बाहेरील कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होतो. डोळ्यांना वस्तू दिसतात, कानाला ऐकू येते, मनात विचार येतात इत्यादी. त्यामुळे सुख-दु:ख इत्यादी भावना निर्माण होतात. त्यांना 'वेदना' म्हटले आहे. या सुखद वेदना पुन्हा पुन्हा अनुभवाव्या, दु:खद वेदना परत अनुभवण्यास लागू नये अशी भावना म्हणजे 'तृष्णा' निर्माण होते. या तृष्णेची अत्यंतिकता म्हणजे 'उपादान' (यालाच 'आसक्ती' असेही म्हणता येईल). उपदान मृत्युनंतर पुढील जन्मास ('भव') कारणीभूत ठरते. त्यामुळे पुढील आयुष्याला ('जाती') सामोरे जावे लागते. आयुष्य आले की वृद्धत्व आणि मृत्यू ('जरामरण') आलेच. त्यामुळेच दु:खाची निर्मिती होते. अशी ही दु:खनिर्मितीची साखळी आहे. या मालिकेतील आधीच्या दुव्यामुळे पुढील गोष्ट घडते. याला 'प्रतीत्यसमुत्पाद' असेही नाव आहे.
ही शृंखला तोडणे मानवाला शक्य आहे. 'तृष्णा जागविणे-न जागविणे' माणसाच्या हातात आहे. समाधी अवस्थेत (समाधीचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) मनाच्या समतोल अवस्थेमुळे नवी तृष्णा जागत नाही आणि मनुष्य या दु:ख निर्माण करणाऱ्या साखळीतून मुक्त होऊ शकतो असे बुद्धाचे प्रतिपादन आहे.
ही मालिका थोडी किचकट आणि ओढून-ताणून आणली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ध्यानात खोलवर गेले असता या दुव्यातील अनेक गोष्टींचा अनुभव येतो.
पुढील लेखात प्रतीत्यसमुत्पाद आपण अधिक सोप्या शब्दात समजून घेऊ आणि आपल्या जीवनातील दु:खे कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहू. प्रतीत्यसामुत्पादाचा आणि ध्यान-समाधीचा काय संबंध आहे ते ही पाहू.

No comments:

Post a Comment