Thursday, May 17, 2018

न्याय दर्शन

या आधीच्या लेखात आपण न्याय-वैशेषिक या जोडगोळीतील 'वैशेषिक दर्शन' पाहिले. आता न्याय दर्शनाकडे वळू. आपण पाहिले की न्याय-वैशेषिक दर्शने सामान्य माणसाच्या व्यावहारिक भाषेचा हिरीरीने पुरस्कार करतात. यापैकी वैशेषिक दर्शन हे प्रमेये मांडते तर न्याय दर्शन हे या प्रमेयाना प्रमाण देण्याचे काम करते.
गौतम ऋषी (मेघानिधी गौतम : इ.पू.५५०) हे न्याय दर्शनाचे प्रणेते मानले जातात. त्यांचा न्यायशास्त्र हा ग्रंथ न्याय दर्शनाचा आद्य ग्रंथ मानण्यात येतो. न्याय दर्शनाचे विपुल वाङ्मय आणि टीका उपलब्ध आहेत.
न्यायदर्शनाची मूलभूत प्रेरणा ही वादविवाद / चर्चेत उपयुक्त ठरतील अशी प्रमाणे ठरविण्याची आहे. 'न्याय' या शब्दाचा अर्थच 'उभय पक्षांना मान्य असणारा सिद्धांत' असा आहे. न्यायदर्शनात 'अनुमान' या प्रमाणाचा सखोल विचार झाला आहे. या दर्शनात यथार्थ ज्ञानाचे स्वरूप, भ्रम म्हणजे काय याचाही विचार झाला आहे. 'प्रमाणे' ठरविणे हाच मुख्य हेतू असल्याने प्रमाणांची चर्चा विस्तृतपणे केली आहे. ती आपण 'प्रमाण' या लेखात यापूर्वीच पाहिली आहे.
नैयायीकानी ईश्वर मानला. किंबहुना पाश्चात्य ज्याला theism म्हणतात त्याची व्यवस्थित मांडणी प्रथम त्यांनीच केली. नैयायीकांचा ईश्वर सृष्टीचा कर्ता आहे, तिचा नियंता आहे आणि भक्तांवर अनुग्रह करणारा आहे. जीवात्म्याप्रमाणे तो ही एक आत्मा आहे. मात्र तो सुख-दु:ख , पाप-पुण्य याना अलिप्त आहे. त्याने हे विश्व निर्माण केले. त्यासाठी इतस्तत: पसरलेले परमाणु ही सामग्री वापरून त्याने के कार्य केले. या मांडणीत अनेक त्रुटी दिसतात. परंतु सामान्य माणसाच्या समजुतींना आधार देणे न्याय-वैशेषिक दर्शनाने आपले कार्य मानल्याचे दिसते.
ईश्वराचे अस्तित्व नैयायीकानी जरी मानले असले तरी त्याचा आणि मोक्षाचा संबंध लावल्याचे दिसत नाही. तत्वज्ञानाने म्हणजे पदार्थांच्या सम्यक आणि यथार्थ ज्ञानाने मिथ्याज्ञान नाहीसे होते. हे मिथ्याज्ञान हे आत्मा, त्याचे स्वरूप या संबंधाने असते. यथार्थ ज्ञानाने रागद्वेष  (राग म्हणजे पूर्वीच्या भाषेत लोभ) नाहीसे होतात. त्यामुळे त्या गोष्टी मिळविण्यासाठी अथवा टाळण्याच्या प्रवृत्तीचा नाश होतो. ही प्रवृत्तीच पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. मोक्ष हा सुखस्वरूप असून परमेश्वराच्या प्रत्यक्ष ज्ञानाने प्राप्त होतो असे नैयायिक मानतात.
मोक्ष म्हणजे आत्म्याने मूळच्या प्रवृत्तीत रहाणे हे अन्य दर्शनकारांचे मत नैयायीकाना मान्य आहे. पण या अवस्थेत आत्म्याला जाणीव नसते असे ते मानतात. जाणीव ही मनाच्या आत्म्याशी झालेल्या संयोगाने निर्माण होते असे त्यांचे मत आहे.
वैशेषिक आणि नैयायिक यांच्यात काही भेदही आहेत. उपमान हे प्रमाण नैयायिक मानतात, पण ते वैशेषिक नाकारतात. नैयायिक 'एक' हीच संख्या वास्तव सृष्टीत असे मानतात. अन्य संख्या एकच्या संयोगाने झाल्या आहेत असे त्यांचे मत आहे. हे वैशेषिकांना मान्य नाही. असे अन्य काही छोटे भेट आहेत.
पुढील लेखात 'सांख्य दर्शनाची' माहिती घेऊ. 

No comments:

Post a Comment