मागील काही भागांमध्ये आपण सात पैकी पहिल्या पाच चक्रांबाबत माहिती घेतली. या चक्रांपैकी पहिली तीन चक्रे म्हणजे मूलाधार, अनाहत आणि मणिपूर चक्र ही माणसाच्या आदिम प्रेरणांशी संबंधित आहेत. ज्याला इंग्रजीत survival instincts म्हणतात त्याच्याशी संबंधित आहेत. या आदिम प्रेरणांची चक्रे भेदल्याशिवाय आपल्याला आपल्या दैवी प्रेरणांची चक्रे भेदणे कठीण जाईल.
अनाहत चक्र हे आदिप्रेरणा आणि दैवी प्रेरणा यांच्यात सांधा जुळविणारे चक्र आहे. म्हणूनच ते दोन त्रिकोणांनी दर्शविले जाते. एक त्रिकोण हा खालच्या बाजूकडे निर्देश करतो. हा आदिम प्रेरणा दाखवितो. तर दुसरा त्रिकोण हा वरील बाजूकडे निर्देश करतो. हा त्रिकोण दैवी प्रेरणा दर्शवितो. वरील तीन चक्रे म्हणजेच विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार दैवी प्रेरणांशी संबंधित आहेत.
आज आज्ञाचक्राबाबत विचार करू. हे अत्यंत महत्वाचे चक्र असल्याने जरा विस्ताराने विचार करू.
हे चक्र भ्रूमध्यात म्हणजे दोन भुवयांच्या मध्यभागी आहे. 'ज्ञ' हे अक्षर ज्ञानाकडे निर्देश करते. आज्ञा चक्र हे आपल्याला ज्ञानाचे संतुलन करणारे केंद्र आहे. आपल्याला दोन प्रकारांनी ज्ञान मिळते. आपण आपल्या आसपासच्या गोष्टींचे ज्ञान आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने घेतो. हे 'वस्तुनिष्ठ' ज्ञान जसेच्या तसे आपल्या मेंदूत जात नाही. आपल्या संवेदनांवर आपला मेंदू आपल्या पूर्वीच्या अनुभवांवरून संस्करण करतो. हे संस्करण झालेले ज्ञान मेंदूत साठविले जाते. लाल गुलाब पाहिल्यास त्याचा रंग, रूप याचे ज्ञान मेंदूला पूर्वी पाहिलेल्या त्या रंगाच्या आणि रूपाच्या वस्तूशी तुलना करून होते. आणि मग हे ज्ञान मेंदूत साठविले जाते. हे प्रामुख्याने कार्यकारणभावाचे ज्ञान (Logical Thinking) असते. याउलट दुसरा ज्ञानाचा प्रकार हा वस्तुनिष्ठ नसतो. हे ज्ञान आपल्याला उस्फुर्तपणे होते. भाव-भावना यांचे ज्ञान असे होते. भूक लागली की रडण्याचे उस्फुर्त ज्ञान नुकत्याच जन्मलेल्या बाळाला याच प्रकाराने होते. ते शिकवावे लागत नाही. कलाकार आपली कला याच उस्फुर्ततेने सादर करू शकतात. या दोन्ही प्रकारच्या ज्ञानात संतुलन राखण्याचे काम आज्ञा चक्र करते. या चक्राची जागा दोन भंवयांच्या मध्यभागी कपाळावर आहे. या चक्रावर ध्यान करताना भ्रूमध्याच्या संवेदना बघायच्या आहेत. नंतर हळूहळू भ्रूमध्यापासून आत डोक्याच्या मागील भागापर्यंतच्या संवेदना बघायच्या आहेत. या ठिकाणी मोठ्या मेंदूचे उजवा आणि डावा भाग एकत्र येतात. मेंदूचा डावा भाग हा आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे मिळविलेल्या संवेदनांसाठी - logical thinkingसाठी महत्वाचा आहे तर उजवा भाग हा आपली उस्फूर्तता (Intutive Power) नियंत्रित करतो. कलाकारांच्या मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यक्षम असतो. उजवा मेंदू आणि डावा मेंदू यात संतुलन असणे अत्यंत आवश्यक असते. ज्यांच्या मेंदूचे हे दोन्ही भाग चांगल्या प्रकारे कार्यरत असतात आणि दोन्ही भागात संपर्क चांगला असतो ते अत्यंत कार्यक्षम असतात आणि योग्य निर्णय उस्फुर्ततेने घेऊ शकतात. मेंदूच्या दोन्ही भागात संपर्क साधण्याचे काम या दोन्ही भागांना जोडणारे चेतातंतू करतात हे लक्षात घेतले तर या चक्राचे महत्व लक्षात येईल. आपल्याला या चेतातंतूंना कार्यंवित करून मेंदूच्या या दोन्ही भागांचा समतोल साधायचा आहे. याच ठिकाणी आपली पिट्युटरी ग्लॅन्ड आहे. ही ग्लॅन्ड आपल्या सर्व अंत:स्त्रावी ग्रंथींच्या (Glands) स्रावांचे नियंत्रण करते. अंत:स्त्रावी ग्रंथी आपल्या भावभावना नियंत्रित करतात. म्हणूनही या चक्राचे महत्व आहे.
ॐ च्या योग्य प्रकारे केलेल्या सततच्या उच्चारानेही हे चक्र भेदता येते. तिबेटियन संस्कृतीत या चक्राला म्हणजेच 'तिसऱ्या डोळ्याला' खूप महत्व आहे.
हे चक्र अत्यंत प्रभावशाली आहे. केवळ हे चक्र कार्यंवित करून खालील सर्व चक्रे कार्यंवित करता येतात. म्हणूनच काही गुरु केवळ या चक्रावर ध्यान करून खालची चक्रे भेदण्यास उत्तेजन देतात. पण ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. मी त्याची शिफारस करणार नाही.
आपण शेवटच्या चक्रासंबंधी म्हणजेच सहस्रारासंबंधी माहिती पुढील लेखात घेऊ.